दु: ख हे मानवी जीवनाचं एक सत्य आहे, असं गौतम बुद्धानं फार फार वर्षांपूर्वी सांगितलं होतं. ती प्रत्येकाच्याच आयुष्याची कहाणी आहे. दु:ख हेच आयुष्याचं सत्य असेल तर का जगायचं, हा प्रश्न उरतोच! का जगायचं, याचं उत्तर शोधण्यासाठी नेमकं काय करायला हवं? आणि मग याच प्रश्नांच्या बरोबरीनं माझ्या जगण्याचा अर्थ काय? मी कशासाठी जगायचं? असे प्रश्न तुम्हाला पडतात का? पडले आहेत का? की फक्त आलेला दिवस ढकलत राहाणं तुम्हाला मान्य आहे? जसं आजच्या भाषेत ‘गो विथ द फ्लो?’ सगळयांचं आयुष्य एकसुरी नसतंच. प्रत्येकाने या प्रश्नांची उत्तरं आपापल्या आयुष्यातील अनुभवातून मिळवली असतील, मिळवत असतील.

एक घटना आठवतेय. उरुग्वेच्या ‘ओल्ड ख्रिश्चन क्लब’चे रग्बी खेळाडू विविध देशांतील संघांमधील स्पर्धेत भाग घेण्यासाठी १३ ऑक्टोबर १९७२ रोजी त्यांचे मित्र आणि त्यांच्या कुटुंबीयांसह चिलीची राजधानी सॅंटियागोहून विमानाने निघाले. ते विमान अँडीज पर्वतरांगांमध्ये कोसळलं. समुद्रसपाटीपासून ३५०० मीटर उंचीवर असलेल्या अँडीज पर्वतरांगांमध्ये त्यातील काही जणांनी मृत्यू स्वीकारला, पण काही जण मात्र मृत्यू समोर दिसत असूनही जीवन-मरणाची लढाई लढत राहिले. आणि अखेर त्यांनी मृत्यूवर विजय मिळवला. नजर जाईल न जाईल तिथवर फक्त बर्फ आणि मोठमोठया पर्वतरांगा असणाऱ्या या ठिकाणी, जखमी अवस्थेत ७२ दिवस ही १४ माणसं कशी जगली असतील?

analysing psychology of Spread Rumours by People
अफवा : एक खेळ
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Once you find yourself, then the energy, the joy, the energy to live will continue to make you happy forever.
अन् मी मला सापडले…
necessary to consider hearing health separately
कानांचे सरावलेपण..
loksatta readers reaction on chaturang articles
पडसाद : बुरसटलेपण कधी कमी होणार?
chaturang article on revolutionary tone of Indian womens liberation
भारतीय स्त्रीमुक्तीचा क्रांतिकारी सूर
Kaun Banega Crorepati loksatta article
अग्रलेख : कौन बनेगा…?
Article of Tushar Kulkarni who worked tirelessly to save giraffe with help of Assam Zoo
उंच तिचं अस्तित्व…

आणखी एक उदाहरण. आशीष, सुनील आणि शोएब हे तिघेही ‘उदयपूर सेंट्रल जेल’मध्ये त्यांनी केलेल्या वेगवेगळया गुन्ह्यांसाठी शिक्षा भोगत होते. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये राहून, आपणही गँगस्टर व्हायचं असं स्वप्न पाहू लागले होते. तुरुंगामधील अंधारमय आयुष्य आणि सततची निराशा यामुळे तिघेही आपल्या जीवनाला कंटाळले होते. एक दिवस त्यांना तेथे वाद्यांचा आवाज ऐकू आला. तुरुंगात ‘आउट ऑफ द बॉक्स’ हा एक गट होता, जो कैद्यांना संगीत वाद्ये वाजवून पाहण्याची संधी देत होता. या तिघांनीही ‘आउट ऑफ द बॉक्स’ या गटाच्या मदतीने तबला, पियानो अशी वेगवेगळी वाद्यं शिकून घेतली. भविष्य अंधारात असताना ‘संगीता’च्या माध्यमातून त्यांना एक आशेचा किरण दिसला. जेलमधून बाहेर पडल्यानंतर आशीष, सुनील आणि शोएब या तिघांनी मिळून ‘नया सवेरा’ या बँड ग्रुपची स्थापना केली. आता हे तिघेही बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम करतात. थोडक्यात, योग्य विचार तुमच्या जगण्याला अर्थ मिळवून देतात.

व्हिक्टर फ्रँकल हे एक प्रसिद्ध ऑस्ट्रियन मानसशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, आणि ‘लोगोथेरपी’ या मानसशास्त्रीय संकल्पनेचे ते संस्थापक होते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात, व्हिक्टर फ्रँकल आणि त्यांच्या कुटुंबाला आउश्वित्झ छळ- छावणीमध्ये बंदी केलं गेलं होतं. असह्य मारहाण, उपासमार, मानसिक व शारीरिक छळ यामुळे व्हिक्टर फ्रँकल यांनी त्यांचे आईवडील व पत्नी या तिघांना गमावलं. सततच्या क्रूर छळामुळे छळछावणीतील अनेक ज्यू कैद्यांनी आत्महत्या केली. कुटुंबाला गमावल्याचं दु:ख, क्रूर छळ आणि न संपणारी निराशा या अशा परिस्थितीत व्हिक्टर फ्रँकल कसे जगले असतील? त्यांनी आपले हे सारे अनुभव पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांसमोर ठेवले.

‘अर्थाच्या शोधात’ या पुस्तकात व्हिक्टर फ्रँकल म्हणतात की, ‘‘जगात सर्वात कठीण गोष्ट म्हणजे ‘कोणताही अर्थ नसलेलं जीवन’ कसलंही संकट असो, जर आपल्याला जीवनात काही अर्थ शोधता आला, तर तो आपल्याला आयुष्याच्या सर्व त्रासाशी लढण्याची शक्ती देऊ शकतो. त्यातून बाहेर पडायला मदत करू शकतो.’’ फ्रँकल यांचं म्हणणं होतं की, जरी बाह्य परिस्थितीवर आपलं नियंत्रण नसलं, तरी एखाद्या घटनेकडे/ परिस्थितीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन आणि त्याविषयीची प्रतिक्रिया निवडण्याचा अधिकार आपल्याकडे नेहमीच असतो. आणि यावरच पुढील सर्व दिशा ठरते.

व्हिक्टर फ्रँकल यांनी ‘लोगोथेरपी’ हा मानसशास्त्राचा एक वेगळा दृष्टिकोन विकसित केला. ‘लोगो’ म्हणजे ‘अर्थ’ आणि ‘थेरपी’ म्हणजे ‘उपचार!’ ते सांगतात की, ‘‘जीवनाला सर्व परिस्थितीत अर्थ आहे, अगदी दयनीय परिस्थितीतही.’’

जगण्याची आपली मुख्य प्रेरणा म्हणजे जीवनात अर्थ शोधण्याची आपली इच्छा. तसेच अति दु:खाच्या परिस्थितीला तोंड देत असताना आपण घेतलेल्या भूमिकेत अर्थ शोधण्याचे आपले स्वातंत्र्य. त्यांच्या मते, ‘आपल्याला जीवनातील हा अर्थ तीन वेगवेगळया मार्गानी शोधता येतो. एक म्हणजे प्रत्यक्ष कामातून, दुसरं म्हणजे प्रेमातून आणि तिसरं म्हणजे वेदना आणि यातनांमधून! नक्की कसं ते काही उदाहरणांमधून समजून घेऊ या.

प्रत्यक्ष कामातून – आपल्याला जीवनाचा अर्थ आपल्या कार्यातून, सर्जनशीलतेतून किंवा आपण इतरांसाठी केलेल्या गोष्टींमधून/ त्यांच्यासाठी उभ्या केलेल्या कामातून सापडतो. हे केवळ आर्थिक कमाईसाठी केलेल्या कामाबद्दल नसून, आपल्या कामाचा परिणाम इतरांच्या जीवनावर सकारात्मकरीत्या कसा होतो, याबद्दल आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजेच डॉक्टर अभय बंग व राणी बंग ज्यांनी आपल्या जगण्याचा अर्थ ‘गडचिरोलीमधील आदिवासी लोकांच्या आरोग्यावर काम करणं आहे’ हा शोधला. त्यांनी विकसित केलेल्या ‘Home- Based Newborn Care ( BNC)’ मॉडेलमुळे गडचिरोलीसारख्या ग्रामीण भागात बालमृत्यूदर लक्षणीय घटला. त्यांच्या या कामाची नोंद जागतिक स्तरावर घेतली गेली. फक्त भारतच नव्हे तर जगातील अनेक देशांमधली बालके त्यांच्या या संशोधनामुळे वाचू शकली.

स्वत:पलीकडे जाऊन प्रेम करणे – प्रेम ही जीवनाचा अर्थ शोधण्याची दुसरी मोठी प्रेरणा आहे. जेव्हा आपण कोणावर प्रेम करतो, तेव्हा त्यांचं अस्तित्व आपल्याला जगण्याचं कारण देतं. प्रेम फक्त रोमॅन्टिक असण्याची गरज नाही; ती कुटुंब, मित्र, समाज किंवा माणुसकीसाठी असलेली कृतज्ञतादेखील असू शकते, असेही तो नमूद करतो. उदाहरणार्थ आपल्या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्य सैनिक.

यातना आणि वेदनेतून सापडलेला अर्थ – यातना आणि वेदना यादेखील जीवनाचा अर्थ शोधण्याचा मार्ग ठरू शकतात, जर आपण त्यांच्याकडे योग्य दृष्टिकोनातून पाहिलं तर. फ्रँकल सांगतो की, दु:ख अपरिहार्य असलं तरी त्याचा सामना करताना दाखवलेला संयम, धैर्य आणि जिद्द यामुळे आपल्याला अर्थ सापडतो. जसे की अवनी लेखरा, मानसी जोशी यांसारखे, एखाद्या अपघातात हात-पाय गमावलेली अनेक माणसे. पॅरालिम्पिकमध्ये आपल्या खेळाद्वारे, जागतिक स्तरावर देशाचं नाव उज्ज्वल करत आहेत.

थोडक्यात, फ्रँकलने नाझी छळछावणीतील आपल्या अनुभवांवरून आणि वरील इतरही उदाहरणांनी हे दाखवून दिलं की, जरी परिस्थिती आपल्या नियंत्रणात नसेल, तरी आपण त्या परिस्थितीला द्यायचा प्रतिसाद मात्र बहुतांश वेळा आपल्यावरच अवलंबून असतो. वरील अनेक उदाहरणे बारकाईने पाहिली असता, अर्थपूर्ण आयुष्य जगलेल्या लोकांच्या गोष्टींमध्ये आपल्याला वरील तीनही गोष्टी सापडतील. आपल्याही आजूबाजूला दिसणारे प्रश्न, आपल्या आयुष्यातील दु:ख, निराशा जर नीट समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याही जगण्यातला अर्थ शोधता येईल आणि कुणी सांगावं, हाच कदाचित दुसऱ्यांच्या जगण्याला अर्थ देईल.
rutumj9893@gmail.com

Story img Loader