मी जन्माला आले तेव्हा पायाला भिंगरी जडवली होती की काय, नकळे. कारण पुढे आयुष्यात तेहतीस-चौतीस देशांमधून भ्रमंती करण्याची संधी मला लाभली. हे देश कोणते विचाराल, तर स्वित्झर्लंड, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अमेरिका, कॅनडा, जर्मनी, इटली, स्पेन, ग्रीस, रशिया, उझबेकिस्तान, बल्गेरिया, सेशेल्स, मॉरिशिअस, रे-युनियाँ (रियुनियन), ग्वादलुप (Guadeloupe),टांझानिया, केनिया, इथिओपिया, ब्राझिल, अर्जेटिना, श्रीलंका, थायलँड, मलेशिया, इंडोनेशिया, चीन, जपान, सिंगापूर, हाँगकाँग, नॉर्वे आणि आइसलँड.
ही एवढी यादी दिल्याबद्दल कुणी माझ्यावर बढाई मारल्याचा आरोप केला तर मी तो नम्रपणे स्वीकारीन. माझ्या कला कारकिर्दीत मी फारशी कमाई (रूढ अर्थाची) करू शकले नाही; पण भरपूर आणि नानाविध प्रवास अनुभव मात्र गाठीशी बांधला. तो माझा मोलाचा ठेवा आहे. या एका लेखात सगळ्याच मुशाफिरीचं वर्णन करणं आणि वास्तव्य केलेल्या तमाम देशांना न्याय देणं हे केवळ अशक्य आहे. तेव्हा वेळोवेळी भावलेले विलक्षण अनुभव, काळजाला भिडलेले हृद्य प्रसंग आणि स्मृतिपटलावर कायमचे कोरले गेलेले जादूचे क्षण यांचाच मी आवर्जून उल्लेख करते. काही विस्तृत वर्णनं, तर काही क्षणचित्रं पेश करण्याचा यत्न करते.
हेही वाचा – नवीन वर्षांचे स्वागत करताना.. उद्देश आणि सिद्धांत : युरेका क्षणाचा साक्षात्कार..
मी सात वर्षांची असेन. अचानक अप्पांना (माझे आजोबा- रँग्लर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे) ऑस्ट्रेलिया देशासाठी भारताचे पहिले राजदूत होण्यास विचारणा करण्यात आली. अप्पांनी होकार कळवला. मला नकाशामध्ये हा नवा देश दाखवण्यात आला. जागतिक महायुद्ध चालू होतं. आमची बोटीची तारीख ठरली; पण अप्पांना अद्याप त्यांचा प्रमुख सेक्रेटरी न मिळाल्यामुळे थोडं थांबणं भाग पडलं. आधी ठरलेली बोट सोडावी लागली. नेमकी तीच बोट पुढे जपानी सुरुंगाला बळी पडून धारातीर्थी- नव्हे दर्यातीर्थी कामी आली. अखेर २४ ऑक्टोबर १९४४ रोजी आम्ही मुंबई बंदर सोडलं आणि शत्रूने पाण्यात पेरलेले सुरुंग चुकवत चुकवत फ्रीमँटल (पर्थजवळचं बंदर) आणि मेलबर्नमार्गे सिडनीला बोटीतून उतरलो. एरवी दहा दिवसांत उरकणाऱ्या सफरीला तब्बल चोवीस दिवस लागले होते. पुढे सिडनीतून मग इष्ट स्थळी, म्हणजे राजधानी कॅनबेराला पोहोचण्यासाठी आम्ही मोटारीनं कूच केलं. हे सगळं मला स्वत:ला आठवत नाही. आईच्या ‘थ्री इयर्स इन ऑस्ट्रेलिया’ या पुस्तकामधून हा तपशील घेतला. तिनं तीन वर्ष अप्पांची ‘सोशल सेक्रेटरी’ म्हणून काम सांभाळलं.
लहान मुलं खूप लवकर नवीन भाषा शिकतात. कॅनबेराला स्थिरस्थावर झाल्यावर मीही पाहता पाहता इंग्रजी बोलू लागले. पुण्याला मी साने गुरुजी, भा. रा. भागवत, चिं. वि. जोशी, अरबी भाषेतल्या सुरस आणि चमत्कारिक गोष्टी आणि खेरीज लक्ष्मीबाईंची ‘स्मृतिचित्रे’, हरि नारायण आपट्यांच्या काही कादंबऱ्या, खांडेकरांचा ‘ययाति’ ग्रंथ, अशा पुस्तकांचा फडशा पाडला होता. आता माझ्यासमोर उत्तमोत्तम इंग्रजी बालवाङ्मयाची भली थोरली रास होती. मी अधाशासारखी तिच्यावर तुटून पडले. डॉ. डूलिटल, अॅन ऑफ ग्रीन गेबल्स, पॉलियाना, देशोदेशीच्या जुळ्या भावंडाची मालिका, अॅलिस इन वंडरलँड, ईनिड ब्लायटनच्या तमाम साहसकथा.. किती नावं घ्यावीत? याखेरीज एका नव्या वाचन प्रकाराची ओळख झाली- कॉमिक्स. हा अभूतपूर्व वाचन प्रकार पाना-पानांमधून रंगपंचमी साजरी करीत मुलांवर गारूड करतो. आधीच जागरूक असलेल्या माझ्या कल्पनाशक्तीला या चौफेर वाचनामुळे पंख फुटले त्यात नवल नाही. याहीखेरीज आवर्जून सांगायची गोष्ट म्हणजे खास बालचमूसाठी उपलब्ध असलेला मनोरंजनाचा खुला खजिना- नाटक, सिनेमा, बॅलेज्, जादूचे प्रयोग, नाच-गाणी-नकला यांची रेलचेल असलेले नानाविध खेळ, असं खूप काही असे आणि सर्व काही अतिशय देखणं, नेत्रदीपक आणि विस्मयकारक वाटत असे. या पौष्टिक खुराकामुळे मी समृद्ध झाले.
ऑस्ट्रेलियाचा प्रमुख उद्योग पशुपालन. मेंढ्यांचा व्यवसाय चालवणाऱ्या स्थानकांना ‘शीप स्टेशन’ म्हणतात. शेकडो मेंढ्या एका कुरणात बंदिस्त असतात. एकूणच मनुष्यबळ कमी असल्यामुळे मेंढ्यांवर पहारा करायला खास कुत्र्यांची नेमणूक केली जाते. ही धनगर कुत्री महातरबेज असतात. एकदा शीपडॉग स्पर्धा पाहायला आम्ही गेलो होतो. शंभर-दीडशे मेंढ्यांना एका विशिष्ट दिशेनं न्यायचं, त्यांना वळवायचं, एखादं चुकलं मेंढरू ठोसून पुन्हा कळपाकडे न्यायचं, मग अरुंद फाटक पार पाडायचं अशा नाना कामगिऱ्या या चार पायांच्या धनगरांनी लीलया आणि बिनबोभाट (न भुंकता) पार पाडल्या. लोकरीसाठी मेंढ्यांना वर्षांतून एकदा भादरलं जातं. त्यासाठी या ‘कर्तनकार्या’त तरबेज असलेल्या कारागिरांचा तांडा शीप फार्मवर दाखल होतो. मला हा सोहळा पाहायला मिळाला, त्याची छान आठवण आहे. मालक एकेका मेंढीला, तिच्या शिंगांना किंवा कानांना धरून ओढीत आणी, तिला मग पालथी पाडून आपल्या पायामध्ये गच्च दाबून धरी. कर्तनकार मग तिच्या पोटावरची आणि पाठीवरची लोकर अलगद कातरून काढी. एका मेंढीला फार तर तीन मिनिटं लागत. दिवसाला शेकडो मेंढ्यांचा समाचार घेतला जाई. या सोहळ्याच्या आधी मी एका डौलदार गुबगुबीत मेंढीच्या पाठीवरच्या लोकरीत हात खुपसला होता. तो पार माझ्या मनगटापर्यंत खोल गेला. त्या दाट मऊमऊ लोकरीचा स्पर्श रोमांचक होता. हा सोपस्कार पार पाडलेली मुकी मेंढरं फार केविलवाणी दिसतात, नुसते सापळे.
मुलखावेगळ्या चित्रविचित्र प्राण्यांसाठी ऑस्ट्रेलिया विख्यात आहे. कांगारू म्हणजे निसर्गाचा एक चमत्कार, तर दुसरा कोआला बेअर. त्याच्यासारखा गोजिरवाणा प्राणी दुसरा होणे नाही. गोलगोबरा चेहरा, काळ्या मण्यांचे लुकलुक डोळे, उभं चपटं काळंभोर नाक आणि दोन्ही बाजूला पिंजारलेले केसाळ कान. अतिशय प्रेमळ प्राणी. एकदा मी एका छोट्या कोआलाला कौतुकानं कडेवर घेतलं. त्यानं आपलं गार-गार नाक माझ्या मानेवर दाबून मला गच्च मिठी मारली! त्या मऊमऊ ‘मगरमिठी’ची पकड अजून ढिली झाली नाही. एक आणखी विचित्र प्राणी म्हणजे उंदराच्या जातीचा, पाण्यात आणि जमिनीवर सहजतेनं संचार करणारा- प्लॅटिपुस. त्याला अळ्या चारायचा मान मला मिळाला होता! एक आणखी वैशिष्ट्यपूर्ण नमुना म्हणजे ऑस्ट्रेलियन काळे राजहंस. तोच आकार, तोच डौल, पण रंग काळा. काळाभोर!
माणसांकडे वळायचं, तर अतिशय दिलखुलास, हसतमुख, तगडे, मनमिळाऊ, स्पष्टवक्ते आणि निरागस असे लोक आहेत. ‘मेट’ म्हणजे मित्र, सखा. खरं तर साथीदार. तर समोरच्याला (भले तो अनोळखी का असेना) ‘दोस्त’ म्हणून संबोधल्याखेरीज तो संभाषण करुच शकत नाही. तुम्ही ‘कोण’ आहात, पेक्षा तुम्ही ‘कसे’ आहात, याचं त्याला अधिक महत्त्व वाटतं. पंतप्रधानालासुद्धा ‘किती वाजले मेट?’ असं विचारायला कमी करणार नाहीत.
मनावर बिंबलेली काही धावती वर्णनं- क्वीन्सलँड या देशाच्या ईशान्येला असलेल्या प्रांतामध्ये थेट भारताचं हवामान. उष्ण कटीबंधीय. त्यामुळे तिथली वनराई, झाडंझुडपं आणि फुलोरा तद्दन ओळखीचा. ठिकठिकाणी चिंचांनी लहडलेली झाडं पाहून मला अक्षरश: रडू कोसळलं. ‘घे हव्या तेवढ्या’ मला सांगण्यात आलं; पण काय उपयोग? माझा हेवा करायला नवीन मराठी शाळेतले माझे सवंगडी कुठे होते? ही जाणीव विषण्ण करणारी होती. लालभडक मिरच्यांचे घोस घराघरांतून फुलदाणीत सजवलेले पाहून आईचा जीव असाच कासावीस झाला होता. तेव्हा दर शनिवारी रात्री ९ वाजता रेडिओवरून एका तासाची रहस्य श्रुतिका सादर होत असे. ती ऐकायची मला मुभा होती. जॅनेट फिपार्ड आणि कॅथी व्हाइट या जिवलग मैत्रिणीही आवर्जून हजर असत. अप्पांना त्यांच्या फिजी बेटाच्या भेटीमध्ये कुणी तरी मोठ्या प्रचंड शंखात बसवलेला दिवा नजर केला होता. शंखाच्या भेसूर लाल प्रकाशात ती भयनाटिका ऐकायला धमाल मजा यायची. मला वाटतं रेडिओचा प्रभाव आणि जवळीक यांनी तेव्हापासून माझ्यावर गारूड केलं असणार.
ऑस्ट्रेलियाला नेमलेला भारतीय राजदूत म्हणून अप्पांनी जेव्हा सूत्रं सांभाळली, तेव्हा झालेल्या बोलण्यात त्यांनी न्यूझीलंडला धावती भेट द्यावी, असं सूचित करण्यात आलं होतं. त्यानुसार आम्ही न्यूझीलंडचा दहा-पंधरा दिवसांचा दौरा केला. न्यूझीलंडला येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचं जणू हमखास तीर्थक्षेत्र म्हणजे रोटारुआ. उत्तर बेटामध्ये असलेलं हे शहर औषधी गरम पाण्याच्या झऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. तिथे औष्णिक पाण्याचे डोह आहेत, ज्यांच्यात स्नान केल्यामुळे पुष्कळशा दुखण्यांपासून आराम मिळतो असा समज आहे. या पाण्यामध्ये कॅल्शियम, सोडियम, मँगनीज, लोह, सल्फर अशी नाना खनिजं आणि द्रव्यं आहेत. डबक्यांमधून खदखदणारा चिखल पाहून मी थक्क झाले होते. केवळ पाणीच नाही, तर बरीचशी जमीनही तापलेली असते; पायाला चटके बसतील अशी. सुदैवानं कुणी अनवाणी फिरत नाही. जमिनीमध्येच खोल खड्डा खणून त्यात पातेली रचून अन्न शिजवता येतं. खास आमच्यासाठी या नैसर्गिक स्वयंभू शेगडीमध्ये भात बनवला होता. पण वातावरणात अतिशय उग्र वास दाटला असल्यामुळे (मला वाटतं सल्फरचा) त्याची फारशी लज्जत चाखता आली नाही.
रोटारुआची आणखी एक खासियत म्हणजे ते माऊरी लोकांचं सांस्कृतिक केंद्र आहे. माऊरी हे न्यूझीलंडचे आदिम रहिवासी. शूर, रांगडे, देखणे असे हे लढवय्ये लोक मोठ्या अभिमानानं आपले रिवाज आणि चालीरीती यांचं पालन करतात. एकमेकांना अभिवादन करण्याची त्यांची पद्धत मोठी मजेशीर आहे. दोन सगे भेटले की दोघं नाकावर नाक घासून आपला मित्रभाव व्यक्त करतात.
रुआकिरी गुहेला दिलेल्या भेटीत निसर्गाचा एक अजब चमत्कार पाहायला मिळाला. स्टॅलेकटाइट आणि स्टॅलेगमाइट हे बर्फापासून बनलेले स्तंभ. लाखो वर्षांपूर्वीपासून, थेंब थेंब गळणारं पाणी गोठून जमिनीवर एक खांब उभा राहतो. तो स्टॅलेकटाइट. त्याचप्रमाणे वरून ठिबकणारे थेंब गोठून जमिनीवरून वर जाणारा खांब तो स्टॅलेगमाइट. या गुहेतून एक कालवा वाहत जातो. त्यावरून नौकाविहारमार्गे आत आत जाता येतं. चपट्या बुडाच्या बोटीत बसून जायचं. हिमस्तंभाची नवलाई पाहात असताना अचानक सभोवताली लुकलुकणारे निळे काजवे प्रकट होतात आणि गुहेमधला काळोख गूढरम्य रूप धारण करतो. शेकडो- हजारो- लाखो काजवे. निळे तेजबिंदू जणू. काजव्यांची ती आरास पाहून आपण एखाद्या परिकथेत शिरलो की काय असं भासू लागतं. त्या अवर्णनीय देखाव्यानं डोळ्यांचं पारणं फिटतं.
तेहतीस देशांसाठी राखून ठेवलेल्या जागेवर, दोन देशांनी आक्रमण केलं! तेव्हा आता काही देशांच्या ठळक आठवणी तेवढया नमूद करते माझ्या या भ्रमणगाथेत.
आइसलँड- जगाच्या उत्तर टोकाला असलेल्या या अंजान देशात मला जायला मिळालं, ही मी एक मोठी पर्वणी समजते. एका चित्रपट महोत्सवासाठी मी नॉर्वेला गेले होते. आइसलँडची फेरी करण्याचं धाडस केलं. एक दिवस एका पर्यटक कंपनीच्या आलिशान बसमधून देश पाहायला निघालो. हिरवा किंवा इतर कोणताही नैसर्गिक रंग दिसला नाही. फक्त कृष्णधवल मामला होता. शुभ्र पांढऱ्या बर्फानं आच्छादलेली धरती आणि तिच्यातून अधूनमधून वर डोकावणारे काळेशार फत्तर, असा देखावा पाहून आपण पृथ्वीवरच आहोत, की चंद्रावर पोहोचलो, असा प्रश्न पडला. उणे ६ अंश तापमान असलेल्या मोकळ्या हवेत फिरण्याची एकदा हिम्मत केली आणि खरी थंडी कशी असते याचा दातखिळा प्रत्यय आला.
ताश्कंद- ‘मॉस्को फिल्म फेस्टिव्हल’ला ‘स्पर्श’ हा सिनेमा घेऊन गेले असताना ताश्कंदला भेट देण्याचा योग जुळून आला. माझी गाईड मला बाजार बघायला घेऊन गेली. टरबुजांचा मोसम होता. सगळीकडे टरबुजंच टरबुजं. ढीगच्या ढीग. नारिंगी रंगाच्या सोहळ्यानं मी अक्षरश: वेडावले. बाजारातल्या प्रत्येक फळानं जणू उगवतीच्या कोवळ्या सूर्याकडून रंग उधार घेतला होता.
सेशेल्स- आफ्रिका खंडाच्या पूर्वेला असलेल्या पिटुकल्या देशामध्ये शबाना आझमी आणि परीक्षित साहनी यांना घेऊन ‘साज’ चित्रपटाचं शूटिंग मी केलं. निसर्गाच्या नाना रंगांची किमया या देशात प्रकर्षांनं जाणवली. या पाचूच्या बेटात हिरव्या रंगाच्या असंख्य छटा पाहायला मिळाल्या. सर्वत्र वनराई नि हिरवाई. भोवताली निळाशार चमकदार समुद्र आणि ठायी ठायी आढळणारी शंकराच्या पिंडीच्या आकाराची, लालभडक अँथूरिअम फुलं. हे त्यांचं राष्ट्रीय फूल. या फुलांचा गच्च ताटवा पाहिला. वाटलं, की कुणी रक्ताच्या ठिपक्यांची रांगोळीच काढली आहे! रोज रंगपंचमी साजरी करणारा सुंदर सेशेल्स देश.
चीन- या विलक्षण देशाला मी दोनदा भेट दिली. एकदा बालचित्रपट समितीची अध्यक्ष असताना ‘शाही पाहुणी’ म्हणून आणि एकदा त्यांच्या चित्रपट महोत्सवात ‘स्पर्श’च्या वशिल्यानं भाग घ्यायला. चित्रपट व्यवसायामध्ये अभिमानानं ऊर भरून येण्याचे अधूनमधून प्रसंग आले, पण बीजिंग शहरात, एका भव्य सिनेमागृहावर उंचावर चिनी अक्षरात ‘स्पर्श’ची पाटी पाहिल्यावर वाटलेली धन्यता.. तिला तोड नाही. चिनी भोजन मला अतिशय प्रिय आहे. दुर्दैवाने भारतात मिळणाऱ्या पंजाबी, मद्रासी किंवा सडकछाप धाटणीच्या चिनी पदार्थावर समाधान मानावं लागतं. (अद्याप ‘जैन चायनीज’ नाही ऐकिवात आलं.) पण चीनमध्ये बोटं नव्हे, चॉपस्टिक्स चाटत राहाव्यात असे नानाविध पदार्थ खाऊन अस्सल चिनी जेवणाचा आस्वाद घेतला. चीनमधली एक गंमत. द ग्रेट वॉल, फॉरबिडन सिटी, टेम्पल ऑफ हेव्हन या ‘तीर्थक्षेत्रां’ना भेट देऊन झाली होती. आपल्या गोंडस लहान मुलांना हाताला धरून फिरवणाऱ्या तरुण आयांचं जागोजागी दर्शन घडे. विलोभनीय दृश्य. एका गोष्टीचा मात्र मला फार अचंबा वाटे. मधूनच एखादी आई आपल्या पिटुकल्याला रस्त्याच्या कडेला बसवी ‘सू’ला.. पण त्याची विजार न काढताच! मजेत उकिडवी बसलेली ही पोरं म्हणजे आश्चर्यच होतं. हे काय? कपडे नाही का खराब होणार? थंडीत लेकराला ओली विजार घालायला चिनी आया कशा तयार होतात? चार-पाच वेळा हा प्रकार पाहिल्यावर आमच्या हुशार सहलदर्शिकेनं एका आईला थांबवलं. तिच्या मुलाच्या कोटाची पाठ वर केली. विजारीला मोक्याच्या जागी भलं थोरलं भोक कापलेलं होतं! त्याच्या गोंडस गुलाबी ढुंगणाचं दर्शन घडलं आणि एका चिनी कोड्याचा उलगडा झाला!
जपान- या देशात प्रकर्षांनं काय जाणवतं, तर स्वच्छता, टापटीप आणि त्यांची वैशिष्ट्यपूर्ण अशी सौंदर्यदृष्टी. त्यांची तमाम ‘स्वच्छतागृहं’ नावाला साजतील अशीच असतात. रेस्ट्रॉ किंवा खाद्यपदार्थाच्या दुकानांच्या दर्शनी खिडक्यांमधून मांडलेले शोभिवंत नमुने अतिशय सुबक आणि आकर्षक दिसतात. प्रत्यक्ष पदार्थ म्हणाल तर काहीशी निराशाच पदरी पडते. खाण्याच्या बाबतीत मी धाडसी आहे. (फ्रान्समध्ये गोगलगाय चाखली आहे!) मात्र जपानी सूशी हा प्रकार (यात कच्चा मासा वापरला जातो) मला जमला नाही.
अर्जेटिना- या राष्ट्राचा ‘टँगो’ हा नाच माझ्या मते मादक नृत्याचा सर्वोत्तम आविष्कार आहे. नृत्य करणारे ‘तो’ आणि ‘ती’ यांची लय, ठेका, पदन्यास, विरामक्षण (पॉझेस) हे इतके एकरूप असतात, की दोघांच्या हृदयाचे ठोकेपण एकसाथ पडत असणार असं वाटावं. एका नावाजलेल्या कार्यक्रमाला मी गेले होते. नृत्य पाहून झिंगलेले रसिक मी प्रथमच पाहिले.
लंडन- पिकाडिली ट्यूब स्टेशनाच्या फलाटावर मी गाडीची वाट पाहात उभी होते. माझा सलवार-कमीझ पाहून एक सावळा इसम जवळ आला. ‘‘तुम्ही पाकिस्तानच्या का?’’ विचारलं. ‘‘नाही. मी भारतीय!’’ मी उत्तर दिल्यावर हसून तो म्हणाला, ‘‘तेच ते!’’ ‘तेच ते?’.. किती सहजपणे त्यानं दोन दुष्मन राष्ट्रांचं वैर संपवून टाकलं होतं.
हेही वाचा – मधल्या पिढीचं ‘लटकणं’!
न्यूयॉर्क- जयू आणि अतुल गोखले या माझ्या कुटुंबागत स्नेह्यांकडे मी सुट्टीसाठी न्यूयॉर्कला पंधरा दिवस मुक्काम केला. दुधात साखर म्हणजे ‘यूएस ओपन’ हा टेनिसचा जंगी सामना तेव्हा चालू होता. आम्ही सगळे टेनिसचे वेडे. तेव्हा मोठ्या उत्साहानं फ्लाशिंग मेडोजला हजेरी लावत होतो. माझा अत्यंत आवडता टेनिसपटू नोव्हॅक जोकोविचची सेमी फायनल मला प्रत्यक्ष पाहायला मिळाली. आयुष्यातली एक मोलाची आठवण!
इटली- इटालियन पुरुष प्रेमवीर असतात, असं ऐकलं होतं. ते शंभर टक्के खरं असल्याचा अनुभव मी घेतला. फ्रान्सहून माघारी परतताना वाटेत दहा दिवस मी रोमला भेट दिली. मी साधारण पंचविशीत होते आणि बरी दिसत असे (म्हणतात!). शिवाय साडीमुळे एक वेगळाच गूढरम्य आभास होत असावा. विमानतळापासून चाहत्यांची दाद सुरू झाली. कुणी कौतुकानं मान डोलवी, तर कुणी जाता जाता ‘माँटे बेल्ला’ म्हणून शेरा मारी. एकानं ‘काही मदत लागली तर बंदा हजर आहे,’ असं म्हणून उमेदवारी नोंदवली. ‘परस्त्री मातेसमान’ मानणाऱ्या देशातून आलेल्या मला गोंधळल्यासारखं झालं. दुसऱ्या दिवशी मी एका प्रवासी सफरी चालवणाऱ्या संस्थेत गेले. कंपनीचं ऑफिस तसं छोटं, पण टुमदार होतं. तिथल्या संचालकाशी चर्चा करून त्याच्या साहाय्यानं ‘ऐतिहासिक रोम’ ही ट्रिप मी ठरवली. अमेरिकेत राहिल्यामुळे त्याचं इंग्रजी चांगलं होतं. शिवाय इटलीचा इतिहास तो शिकवत असे. दुसऱ्या दिवशी सकाळची वारी ठरली. ‘९ वाजता बरोब्बर ये, बस थांबत नाही,’ त्यानं बजावलं. दुसऱ्या दिवशी धास्तीपोटी मी जरा लवकरच, आठलाच त्यांच्या ऑफिसात धडकले. ‘फारच लवकर आलीस. बस आली की तुला बोलावतो,’ असं सांगून संचालकानं मला आतल्या दालनात बसवलं. उतावळेपणामुळे मी एक-दोनदा बाहेर डोकावले, तेव्हा मात्र, ‘‘सांगितलं ना? बस आली की कळवतो..’’ असं म्हणून त्यानं दटावलं. मग मात्र मी चूपचाप बसून राहिले. शेवटी ९ वाजले तेव्हा न राहवून बाहेर आले. मला पाहून प्रचंड धक्का बसल्याचा त्यानं आविर्भाव केला. ‘‘मामा मिया, बस आत्ताच निघून गेली!’’ मी रडवेली झाले, तेव्हा तो शांतपणे म्हणाला, ‘‘काळजीचं कारण नाही. माझ्या मोटारीमधून आपण त्यांचा मागोवा घेऊ. बसचा रूट मला चांगला ठाऊक आहे. आम्ही निघालो. पहिल्या थांब्यावर काही बस दिसली नाही. किंबहुना योजलेल्या कोणत्याच ऐतिहासिक स्थळावर तिला आम्ही गाठू शकलो नाही. मात्र अत्यंत रंजक प्रकारे स्टिफानोनं (एव्हाना आम्ही नावावर आलो होतो) रोमन इतिहास माझ्यासाठी जिवंत केला. व्हॅटिकन, सिस्टीन चॅपलचं घुमट, मायकल अँजेलोची छतावरची अप्रतिम चित्रकारी, ट्रेव्हीचं कारंजं, स्पॅनिश स्टेप्स, पॅन्थेऑन, रोमन फोरम या सगळ्या महत्त्वाच्या ठिकाणांच्या मागची नाट्यपूर्ण माहिती खरोखर विलक्षण होती. स्टिफानो उत्कृष्ट आणि माहीतगार गाईड होता. बस माझ्यासाठी थांबली नाही हे किती फायद्याचं ठरलं! चाळिसेक सहपर्यटकांच्या जोडीनं, चाकोरीबद्ध जुजबी माहिती ऐकण्यापेक्षा ही वैयक्तिक वारी लाखपटीनं रोचक होती. टूर संपल्यावर स्टिफानोनं मला माझ्या हॉटेलवर सोडलं. ‘‘आपण शेवटी बस नाही गाठू शकलो,’’ निरोप घेताना मी म्हटलं. ‘‘काही तक्रार आहे का?’’ स्टिफानोनं विचारलं आणि मग मिश्कीलपणे हसून तो म्हणाला, ‘‘आपण बस कधी गाठणार नव्हतोच मुळी! मी तिसराच रूट पकडला होता. म्हटलं नव्हतं का, की मला बसचा रूट अगदी छान माहिती आहे म्हणून?’’
दहा-बारा वर्षांनी पुन्हा इटलीला- रोमला जायची पाळी आली. या खेपेला पूर्वानुभव स्मरून मी चाहत्यांच्या हल्ल्याला तोंड द्यायला सज्ज होते! पण काय गंमत.. या खेपेला कुणीही माझा पाठलाग केला नाही. एकही उसासा ऐकू आला नाही. एकही कौतुकाची नजर माझ्या दिशेला वळली नाही. हा काय चमत्कार? अचानक गेले कुठे ते सगळे रोमिओ?.. आणि मग खोल गाभाऱ्यातून आवाज ऐकू आला, ‘अगं, सगळे रोमिओ इथेच आहेत; पण आता तू ज्युलिएट राहिली नाहीस!’ कटू सत्य!
saiparanjpye@hotmail.com