जास्तीत जास्त मुलींनी उच्च व तंत्रशिक्षण घ्यावे यासाठी शासनातर्फे मुलींच्या उच्च शिक्षणासाठी ‘प्रियदर्शिनी’ वसतिगृहांची योजना राबविली जाते. गेल्या वर्षांपासून २०३५ मुलींनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
‘पहिला माझा नमस्कार गणेश देवाला. मुलासंग मुलीला मी पाठवते शाळंला.’ असं म्हणत ज्या मातेनं मुला-मुलींच्या शिक्षणाच्या हक्काला समान मानलं आणि मुलाबरोबर मुलीला शाळेत पाठवलं त्या मातांच्या इच्छाशक्तीला अधिक बळ देण्याचं काम शासनाच्या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून झालं आहे. त्याला भारतीय संविधानाचा भक्कम आधार आहे.
भारताच्या राज्यघटनेत स्त्री-पुरुष भेद न ठेवता समानतेचे तत्त्व, हा नागरिकांचा मूलभूत हक्क मानण्यात आला आहे. पण ही समानता साधायची असेल तर अविकसित राहिलेल्या स्त्रियांना विविध क्षेत्रात आरक्षण देऊन मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे होते, आहे. त्यासाठी शासनाने काही ठोस पावले उचलली. जसे निवडणुकांमध्ये (लोकसभा-विधानसभा) स्त्रियांना ३३ टक्के तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्के आरक्षण. शासकीय नोकऱ्यांमध्ये ३० टक्के आरक्षण आदी. आरक्षण मिळाले पण त्याचा लाभ घेऊन प्रत्यक्षात कार्यरत होण्यासाठी स्त्रियांच्या शिक्षण संधीमध्ये गुणवत्तापूर्ण वाढ आणि विस्तार होणे तितकेच गरजेचे होते. त्यासाठीही शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले, बारावीपर्यंत मुलींना मोफत शिक्षण, महाराष्ट्र राज्यातील सर्व पारंपरिक विद्यापीठे, त्यांना संलग्न असलेली महाविद्यालये, अनुदानित, विनाअनुदानित महाविद्यालये, इतर शैक्षणिक संस्था यामध्ये मुलींना ३० टक्के आरक्षण आदी.
महाराष्ट्रातील उच्च शिक्षण
सर्वागीण आर्थिक विकासासाठी आवश्यक असणारे तांत्रिक व कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यामध्ये उच्च शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. उच्च शिक्षणात कृषी, पशुवैद्यक, औषध निर्माण शास्त्र, अभियांत्रिकी, तांत्रिक व व्यावसायिक शिक्षण आदींचा समावेश होतो. मूलभूत शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाबरोबरच उच्च शिक्षणातील संधींचा विकास व्हावा, मुलींचे उच्च शिक्षणातील प्रमाण वाढावे यासाठी शासन विशेष प्रयत्नशील आहे. राज्यात एकूण २१ राज्य विद्यापीठे आहेत. त्यात चार कृषी विद्यापीठे, एक आरोग्य विज्ञान विद्यापीठ, एक पशुवैद्यकीय विद्यापीठ, एक तंत्रज्ञान विद्यापीठ, आणि १४ इतर सर्वसामान्य विद्यापीठे आहेत. त्यामध्ये केवळ स्त्रियांसाठी असणारे मुंबईतील ‘श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ’ आहे. अनौपचारिक शिक्षणासाठी नाशिक येथे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ तर संस्कृत भाषेचा अभ्यास, संशोधन आणि विकास करण्यासाठी ‘कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठ’ नागपूर येथे आहे. याशिवाय राज्यात २० अभिमत विद्यापीठे, एक केंद्रीय विद्यापीठ आणि चार खासगी विद्यापीठे आहेत.
महाराष्ट्रातील तंत्रशिक्षण
राज्यात १९६०-६१ मध्ये तंत्रशिक्षणाच्या एकूण २८ संस्था होत्या. सध्या अभियांत्रिकी पदविकेच्या ४७३, पदवीच्या ३६६, पदव्युत्तर शिक्षणाच्या २२६ संस्था कार्यरत आहेत. याशिवाय वास्तुशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट आणि केटिरग टेक्नॉलॉजी, औषध निर्माणशास्त्र, मास्टर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्स आणि व्यवस्थापनशास्त्राचाही मोठय़ा प्रमाणात विस्तार झाला आहे.
प्रियदर्शिनी वसतिगृहे
उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत खास मुलींच्या उच्च शिक्षणासाठी ‘प्रियदर्शिनी’ वसतिगृहांची योजना राबविली जात आहे. राज्यातील मुलींचे उच्च शिक्षणातील प्रमाण वाढावे, विशेषत: ग्रामीण भागातील मुलींना उच्च शिक्षणासाठी अडचणी उद्भवू नयेत यासाठी राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ५० ते १०० मुलींची सोय असलेले ‘प्रियदर्शिनी वसतिगृह’ सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आणि राज्यातील २१ स्वंयसेवी संस्थांना प्रियदर्शिनी वसतिगृहे चालवण्यास मान्यता दिली. शैक्षणिक वर्षांतील दहा महिन्यांसाठी प्रत्येक विद्यार्थिनीला दरमहा ९०० रुपयांचा पोषण भत्ता तसेच वसितगृहाच्या अधीक्षिकेला दरमहा ४५०० रुपयांचे अनुदान योजनेअंतर्गत देण्यात येते. २०१५-१६ व २०१७-१८ या वर्षांत आतापर्यंत २०३५ मुलींनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
या वसतिगृह योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज पुढील पत्त्यावर करता येईल.
अधीक्षिका,प्रियदर्शिनी मुलींचे वसतिगृह, अंमलबजावणी यंत्रणा, शिक्षण संचालक, उच्च शिक्षण संचालनालय, पुणे-१
राज्यातील वसतिगृहे
* प्रियदर्शिनी मुलींचे वसतिगृह, राजगड ज्ञानपीठ, भोर, ता. भोर, जि. पुणे
* प्रियदर्शिनी मुलींचे वसतिगृह, वेंगुर्ला, तालुका वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग
* प्रियदर्शिनी मुलींचे वसतिगृह, गोकुंदा, किनवट, ता. किनवट, जि. नांदेड
* प्रियदर्शिनी मुलींचे वसतिगृह अहमदपूर, तालुका अहमदपूर, जि. लातूर
* श्री. छत्रपती शिवाजी प्रसारक मंडळ प्रियदर्शिनी मुलींचे वसतिगृह, कोटग्याळ, ता. मुखेड, जि. नांदेड
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
* छत्रपती शिवाजी प्रसारक मंडळ प्रियदर्शिनी मुलींचे वसतिगृह, कन्नड, ता. कन्नड, जि. औरंगाबाद
* शेतकरी शिक्षण संस्था, प्रियदर्शिनी मुलींचे वसतिगृह आष्टी, ता. आष्टी, जि. बीड
* कोयना एज्युकेशन सोसायटी प्रियदर्शिनी मुलींचे वसतिगृह, पाटण, ता. पाटण, जि. सातारा
* जनता शिक्षण प्रसारक मंडळ प्रियदर्शिनी मुलींचे वसतिगृह, पुसद, ता. पुसद, जि. यवतमाळ
* मिलिंद शिक्षण प्रसारक मंडळ, अंबाडी, प्रियदर्शिनी मुलींचे वसतिगृह, घाटंजी, ता. घाटंजी, जि. यवतमाळ
* कै. गीताबाई जैन महिला शिक्षण संस्था प्रियदर्शिनी मुलींचे वसतिगृह, चिकणी, ता. नेरसोपंत, जि. यवतमाळ
* शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे प्रियदर्शिनी मुलींचे वसतिगृह, शिरपूर, ता. शिरपूर, जि. धुळे
मुंबईमधील मुलींसाठी वसतिगृहे
मुंबईमधील विविध महाविद्यालयांमधून शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या राहण्याची सोय व्हावी यासाठी चर्चगेट, मुंबई येथे न्या. तेलंग स्मारक वसतिगृह आणि चर्नीरोड, मुंबई येथे सावित्रीदेवी महिला वसतिगृह कार्यरत आहे.
राज्यामध्ये उच्च शिक्षण विभागाच्या नियंत्रणाखाली सह संचालक (उच्च शिक्षण) यांच्या मुख्यालयी मुलींची ९ नवीन वसतिगृहे बांधण्यास तसेच सध्या अस्तित्वात असलेल्या ५ वसतिगृहांचा विस्तार करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. नवीन ९ वसतिगृहांसाठी १७७० तर पाच जुन्या वसतिगृहांसाठी ४८० अशा मिळून १४ वसतिगृहांसाठी २२५० प्रवेश क्षमतेलाही शासनाने मान्यता दिली आहे. अकरावी आणि बारावीनंतर महाविद्यालयीन उच्च शिक्षणात मुलींचे प्रमाण अधिक वाढावे, उच्च शिक्षणातील मुलींची गळती थांबावी हा त्यामागचा हेतू आहे.
राज्यातील मंजूर नऊ नवीन वसतिगृहे
* इस्माईल युसुफ महाविद्यालय, हिंदू फ्रेंड सोसायटी रोड, जोगेश्वरी पूर्व, मुंबई
* पुणे डेक्कन कॉलेज पदव्युत्तर व संशोधन संस्था येरवडा, पुणे
* शासकीय अध्यापक महाविद्यालय, स्टेशनरोड औरंगाबाद जळगाव (शासकीय तंत्रनिकेतन) जळगाव
* स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसर, ज्ञानतीर्थ, विष्णुपुरी, नांदेड
* सोलापूर महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्था
* अध्यापक महाविद्यालय मुंबई-पुणे मार्ग, पनवेल
* विज्ञान महाविद्यालय, चामोशी रोड, गडचिरोली, जालना
* सध्या सुरू असलेली आणि विस्तार करावयाची वसतिगृहे
* राजाराम महाविद्यालय, विद्यानगर, कोल्हापूर
* शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय औरंगाबाद
* विज्ञान संस्था, वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्था, नागपूर
* विज्ञान संस्था, रवींद्रनाथ टागोर मार्ग, नागपूर
* शासकीय विदर्भ ज्ञानविज्ञान संस्था- विदर्भ महाविद्यालय रोड, अमरावती</p>
तंत्रशिक्षण
तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत राज्य आणि केंद्र पुरस्कृत ४२ योजना राबविल्या जातात. संचालनालयाच्या अधिपत्याखालील संस्थांमध्ये मुली आणि मुले या सर्वाना प्रवेश दिला जातो. एकूण ४२ योजनांपैकी खालील योजनांमध्ये १०० टक्के मुली लाभार्थी असून या योजनांचा १०० टक्के खर्च मुलींसाठी होत आहे.
शासकीय तंत्रनिकेतनामधील काही वसतिगृहे आणि मुलींची प्रवेशक्षमता खालीलप्रमाणे (कंसातील आकडा प्रवेश क्षमता)
मुंबई विभागात रत्नागिरी (१८०), मालवण (५४), पुणे विभागात सोलापूर (५४), पुणे (५४), मिरज (१८०), तासगाव (५६), कोल्हापूर (५४) आणि कराड (१८०), नाशिक विभागात अहमदनगर (६०), जळगाव (२८), औरंगाबाद विभागात बीड (५४), जालना (४८), औरंगाबाद (३४), लातूर (६८), अंबड (५६), उस्मानाबाद (५०), अमरावती विभागात अमरावती (२ तंत्रनिकेतने मिळून १०४), नागपूर विभागात आर्वी फेज २ (५४), गडचिरोली (४८), यवतमाळ (५०) आणि ब्रह्मपुरी (५८)
गावात शालेय शिक्षण संपल्यानंतर उच्च शिक्षणासाठी किंवा तंत्रशिक्षणासाठी मुलीला शहरात कसं पाठवायचं, ती शहरात एकटी कशी राहील या सर्व प्रश्नांना राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने मुलींच्या वसतिगृहाच्या माध्यमातून उत्तरं दिलं आहे एवढंच नाही तर मुलींच्या उच्च आणि तंत्रशिक्षणाच्या वाटा अधिक सोप्या केल्या आहेत, असंच म्हणावं लागेल.
डॉ. सुरेखा म. मुळे drsurekha.mulay@gmail.com