केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाकडून गृहिणींना त्यांच्या पतीकडून पगार वा मानधन देण्याच्या विधेयकाच्या प्रस्तावावर काम सुरू असल्याचं जाहीर झालं आणि चर्चा सुरू झाली ‘चतुरंग’नेही हा विषय चर्चेसाठी खुला केला आणि प्रतिक्रियांचा अक्षरश: पाऊस पडला. त्यातली बहुसंख्य पत्रे विशेषत: स्त्री वाचकांकडून आलेली पत्रे या प्रस्तावाचा निषेध करणारी होती आणि त्याला नाव देण्यात आलं ते त्यागाचं, आपलेपणाचं.
लग्न झालेली स्त्री ही घर आपलं मानते आणि त्या भावनेतून ती सारं करते, त्याचे पैसे मिळणं हा तिचा अपमान आहे. तिचं मोल ठरवणारे तुम्ही कोण? शिवाय हे पैसे ठरवण्याचे निकष काय? त्यामुळे स्त्रीला मोलकरणीचा दर्जा येईल आणि एकदा का अशी व्यवस्था निर्माण झाली की नात्यात कोरडेपणा येईल, मुलंही आईला गृहीत धरतील. आणि घराचं घरपण नाहीसं होईल, कुटुंब व्यवस्था मोडकळीस येईल, अशा असंख्य भावनाविव्हल, चिंताग्रस्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या गेल्या.
हा प्रस्ताव अजून विचाराधीन आहे, त्याचा मसुदाही जाहीर झालेला नाही, पण अनेकांनी हा प्रस्ताव म्हणजे आपला अपमान आहे ही भूमिका घेतली आहे. काहींनी असे पैसे देण्यापेक्षा पॉलिसी काढावी, वृद्धापकाळासाठी पैसे साठवावेत, आदी सल्लेही दिले आहेत.
मुळात अशासारखं विधेयक किंवा कायदा करण्याचा विचार सरकारला करावा लागत असेल तर तेच मुळात दुर्दैवी आहे, त्याच्या मुळाशी काय आहे त्यात डोकावण्याचा प्रयत्न या पत्रांतून झालेला फारसा दिसत नाही. पण याचं उत्तर अनेकींनी आपल्या पत्रातूनच दिलं आहे. आम्हाला मानधन नको मान हवा, प्रेम हवं, आमच्या कष्टाची जाणीव नवऱ्यांना झाली तरी पुष्कळ आहे, असा सूर अनेक पत्रात आहे. याचाच अर्थ आजही अनेक घरात स्त्रीचं स्थान दुय्यम आहेच. तिला स्वातंत्र्य नाहीच, त्यामुळे आर्थिक स्वातंत्र्याचा विचारच नको करायला. जेव्हा एखादी स्त्री पूर्णवेळ गृहिणी असते तेव्हा काही अपवाद वगळता त्यांच्याकडे पैशांची नियमित आवक नसते. अनेक घरात पती स्वत:ला हवे तेवढे पैसे काढून घेतो आणि उरलेले सगळे पैसे पत्नीच्या हाती देतोही, पण तो त्याचाच पगार असतो. तो तिचा होत नाही. आर्थिक स्वातंत्र्याचा आनंद त्या घेऊ शकत नाहीत. मोकळेपणाने खर्च करू शकत नाहीत. तो आनंद कदाचित या विधेयकामुळे मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्त्री जे काही योगदान कुटुंबासाठी देते त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. पण अनेकांनी या स्वातंत्र्याला स्त्रीच्या मानसन्मानाशी जोडण्याची गल्लत केलेली आहे. त्यामुळे तो अपमान वाटू शकतो. ती जे कुटुंबासाठी करते यासाठी हा पैसा दिला जाणार नसून तिच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी देण्यात यावा, असं यात अध्याह्रत आहे.
दुसरा चिंता व्यक्त करणारा एक मुद्दा यातून व्यक्त झाला आहे तो म्हणजे, ‘नवऱ्याने असे मानधन किंवा पगार द्यायला सुरुवात केली तर बायको आणि नवरा यांच्यात मालक आणि नोकर असे नाते निर्माण होईल.’ पत्नीला स्व-खर्चासाठी काही ठराविक रक्कम देण्याने पुरुष वर्ग तिला नोकरासारखी वागणूक देणार असेल तर आपली कुटुंब व्यवस्थाच खिळखिळी आहे, असं म्हणावं लागेल.
विधेयक मांडलं जाईल न जाईल, पण यानिमित्ताने स्त्रियांनी ईमेल, पत्राद्वारे व्यक्त केलेल्या भावना कुटुंब व्यवस्थेवर, त्यातील नातेसंबंधावर पुन्हा नव्याने विचार करण्याची आणि स्त्रियांनीही आत्मपरीक्षण करण्याची गरज व्यक्त करतात हे निश्चित.
विधेयक कुटुंबात फूट पाडणारे
स्त्री घरासाठी समर्पित होते तेव्हा तिला त्या बदल्यात नवऱ्याकडून घरकामाचा वेगळा पगार वा मोबदला मिळावा असा विचारही मनात शिवत नाही, मग एखाद्या संस्थेने विशेषत: केंद्र सरकारच्या महिला आणि बालकल्याण खात्याने स्त्रियांबाबत असा विचार का करावा? महिलांसाठी आपण काहीतरी करतोय हे दाखवण्यासाठी स्त्रीला नवऱ्याकडून घरकामाचा पगार वा मानधन मिळावे ही सरकारी भूमिका पटत नाही. यात नवरा-बायको व कुटुंबात एकवाक्यता राहील, असे या विभागाला वाटते काय? ती जर राहणार नसेल तर या सौदेबाजीची गरजच काय? हा झाला केवळ व्यवहार जो जो घरकामगार वा तिऱ्हाईतांबरोबर होतो तसा! यात कुटुंबाची व्याख्या बसतेच कुठे? या निर्णयाने नवरा-बायकोतील संबंध दुरावतील. घरच्या स्त्रीला मोलकरणीपेक्षा वेगळा
दर्जा तो काय राहणार?
महिला आणि बालकल्याण विभागाला स्त्रियांसाठी काही करावेसे वाटत असेल तर गरिबीत दिवस कंठणाऱ्या महिलांचा वेगळा सव्र्हेक्षण करून त्यांच्या कुटुंबासाठी काही कल्याणकारी योजना आखता येत असतील तर त्या अमलात आणाव्यात, पण अशा कुटुंबात कलह वाढवणाऱ्या वा कुटुंबात फूट पाडणाऱ्या नसत्या विधेयकाच्या मागे लागू नये.
– मुरलीधर धंबा, डोंबिवली
‘गृहिणी’पद हा उच्च सन्मान
गृहिणी घरात पूर्णवेळ राबत असते. मुलांचे संगोपन, घरातील व्यवहार, मुलांवर संस्कार या जबाबदाऱ्या पार पाडत असते. ‘गृहिणी’ हा एक नोकरीपेक्षाही उच्च सन्मान आहे. गृहिणीपद स्वीकारणाऱ्या पत्नीला पतीने आपल्या उत्पन्नातून मानधन द्यावे हे उचित नाही. मानधन दिल्याने किंवा स्वीकारल्याने गृहिणीपदाची उंची कमी होईल. पत्नीने कुटुंबावर, पतीवर उपकार केल्यासारखे होईल. म्हणूनच, पतीकडून गृहिणी म्हणून पत्नीचा यथोचित सन्मान व्हायला हवा. पत्नीचा अभिमान वाटायला हवा. पत्नीला मानधनापेक्षा ‘मान’ महत्त्वाचा आहे.
– कृष्णा काजरोळकर, विक्रोळी
घरकामाला वेगळा न्याय का ?
गृहिणीच्या पगाराचा मुद्दा आला आणि वाटलं, वर्चस्वाखाली जगणं आपण बायका मानतच आलोय. किंवा आर्थिक जबाबदारी आपल्याला नकोय. पगार, मानधन हे शब्द बोचरे आहेत. पण यातून स्त्रीच्या कामाचे महत्त्वच अधोरेखित होणार आहे. आपण अनेक उत्पादनांची सेवा घेतल्यानंतर सेवा कर भरतो मग घरकामाला वेगळा न्याय का ? गृहिणींनीच त्यांच्या कामाची चौकट आखून घेतली आहे. मात्र स्त्रियांची ही मानसिकता बदलावी लागेल. विधायक- कायदा करून काय होतं? बालविवाह प्रतिबंध कायदा झाला, पण बालविवाह थांबले? विधेयक आपल्याला जागृत करेल इतकंच. घरकाम हे कामच आहे. त्यात साऱ्यांचा सहभाग हवा हासुद्धा विचार रुजायला हवाय.
– मंगला साने, गोवा
पगाराची सवय कशाला?
गृहिणींना, म्हणजेच बायकोला घरकामाचा पगार द्यावा, असे विधायक येणे ही गोष्टच बुद्धीचे दिवाळे वाजल्यासारखी वाटते. आपल्या संस्कृतीप्रमाणे नवरा-बायकोच नातं हे एकमेकांवरील विश्वास व प्रेमाचं प्रतिक असत. त्याप्रमाणे त्या दोघांची कर्तव्येही एकमेकांच्या मदतीने, अलिखित नियमानुसार चाललेली असतात. तसेच बायकोला पगार किती द्यावा, याचे गणित तिच्या शिक्षणावर की आर्थिक आबकेवर ठरवावे हाही एक यक्षप्रश्न होऊन बसेल. आणि यातून सुखी घरामध्ये एक नवीन कलह सुरू होऊ शकेल.
– आनंद सप्रे, गोरेगाव
प्रस्थापित व्यवस्था बळकट होईल
भांडवलशाही समाजव्यवस्थेत आज एक विचार प्रकर्षांने रुजू पाहात आहे- ‘कऋ ८४ ं१ी ॠ िं३ ंल्ल८३ँ्रल्लॠ ल्ली५ी१ ्रि३ ऋ१ी’ हा विचार केंद्र सरकारच्या महिला व बालकल्याण विभागाला मान्य असावा असे वाटते. परंतु हे विधेयक कुटुंब व्यवस्थेवरच जोरदार घाला घालणारा ठरणार आहे.
या विधेयकामुळे स्त्री-पुरुषांच्या कामाची परंपरागत भूमिका कायम होईल. म्हणजे पुरुष कर्ता म्हणून तो श्रेष्ठ व स्त्री त्याच्याकडून पैसे घेणारी म्हणून ती कनिष्ठ असेच मानले जाईल. म्हणूनच या विधेयकाचा सर्वागीण विचार आवश्यक आहे. स्त्रीने जितके सबल होणे आवश्यक तितकेच तिने सन्मानाने जगणे आवश्यक आहे.
– नलिनी निसळ,नागपूर
अविवाहितांची संख्या वाढेल
पूर्णवेळ गृहिणी म्हणून काम करणाऱ्या महिलांना मानधन देण्यात मला एक धोका दिसतो तो म्हणजे काही तरुण विवाहानंतर पत्नीला मानधन द्यावे लागेल म्हणून कदाचित अविवाहित राहतील. मुख्य म्हणजे पुरुषी वर्चस्व असलेल्या आपल्या समजात गृहिणींना मानधनाचे सुख मिळण्याऐवजी अन्यायच होण्याची जास्त शक्यता आहे. त्यातून पुन्हा पती-पत्नीमध्ये वाद होतील आणि संसार मोडण्याची भीती आहे. संसार टिकवून ठेवायचे असतील तर अशी व्यवस्था ठेवणे सर्वथा अयोग्य आहे, म्हणून हे विधेयक मंजूर होता कामा नये.
– सूर्यकांत पाटणकर, डोंबिवली
कायदा करून समस्या सुटेल?
केलेल्या कामाचा मोबदला दिला म्हणजे तो संबंध आपोआपच मालक-नोकर या धरतीवरचा होत नाही का? कायदा करून त्या समस्या सुटायला बराच अवधी, कधी-कधी पिढीचा जावा लागतो. गृहिणींना कधीकधी आपल्याला गृहीत धरले जातेय, असेही वाटते, पण त्यावर पैसे देणे हा उपाय पटत नाही. तिच्या कष्टांची फक्त जाणीव ठेवली तरी तिला पुरेसे असते. पैसे देणाऱ्याचे वर्चस्व आणि घेणाऱ्याचा मिंधेपणा पती-पत्नीच्या नात्यात नक्कीच अपेक्षित नाही. तात्पर्य काय तर सुज्ञास अधिक सांगणे न लगे!
– नंदिनी बसोले, अंधेरी
समान हक्काचे काय?
आज समान हक्काचा जमाना आहे. स्त्रिया पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. अशावेळी पुरुष मंडळीसुद्धा तिला घरकामात मदत करताना दिसतात. अशावेळी स्त्रीनेसुद्धा पुरुषाला पगार द्यावा का असा मुद्दा उत्पन्न होतो. म्हणूनच, पुरुषांनी स्त्रीला पगाराचे आमिष दाखवून नोकर बनवू नये. तिचे मानाचे, जबाबदारीचे, विश्वासाचे स्थान कायम ठेवावे असे वाटते. गृहलक्ष्मीला नोकर बनवून तिचा अपमान करणाऱ्या विधेयकाचा धिक्कार असो.
– शुभांगी कणळे, नागपूर.
‘पगार’ नाही ‘सन्मान’
गृहिणीसाठी घरकाम एक फुलटाइम जॉबच आहे. ‘नॉनस्टॉप’ अशा मानवी यंत्राची उपमा तिला दिल्यास वावगी ठरणार नाही. एकूणात ‘प्रेम पैशाने विकत घेता येत नाही आणि गृहिणीचा हात फिरल्याखेरीज घराला घरपण येत नाही’ नक्कीच. म्हणूनच तिच्या कामाची किंमत केलीच पाहिजे, पण मोलाने नाही प्रेमाने. म्हणून पत्नी दरमहा काही रक्कम ही न मागता, अचूकपणे देणं, या उत्तम प्रस्तावाचे घरोघरी स्वागत होऊन, अशा व्यवस्थेची अंमलबजावणी प्रत्येकाने स्वत:पासूनच करणे स्वागतार्ह ठरेल.
– शलाका कुलकर्णी, सातारा
त्या ‘होम मिनिस्टर’ आहेतच
‘स्त्री ही बंदिनी’ हे वाक्य आता कालबाह्य़ झाले असून बहुतांशी स्त्रिया नोकरी, उद्योग, धुणीभांडी, गृहउद्योग, पाळणाघरे, पार्लर अशा माध्यमातून स्वावलंबी व सक्षम झाल्या आहेत. जरी निरक्षर असल्या तरी अर्थार्जन करत असून कायद्याबाबत जागरूक झाल्या आहेत. ज्या गृहिणी स्वत:चे घरकाम करून कुटुंबाची देखभाल करतात त्या घरातील सर्व आर्थिक कामे सांभाळतात. कारण ९० टक्के पुरुष आपला पगार त्यांच्या अर्धागिनीकडे देतात. केवळ बोटावर मोजणाऱ्या कुटुंबांची स्थिती वेगळी असेल. म्हणूनच, नवऱ्याकडून मानधन घेणे योग्य नाही.
– सुनंदा सपकाळे, कल्याण</p>
..तर ‘जाणीव’ राहील काय?
कष्टाची पोच तर सोडाच, पण गृहिणीच्या घरकामातील कमतरता दाखवण्यासही, घरातली मंडळी, प्रसंगी मागे-पुढे पाहात नाहीत. अशावेळी आपल्या कामाचे मोल मिळावे असे वाटणे साहजिकच आहे. पण समजा एखाद्या स्त्रीने प्रस्तावित कायद्याचा आधार घेऊन मोबदला किंवा मानधन घेतले तर तिने केलेल्या कष्टांची कृतज्ञता म्हणून कुणी जाणीवच ठेवणार नाही त्याउलट तिला काही आजार किंवा अपंगत्व आले तर तिच्यासाठी आपण काही करावे ही कृतज्ञतेची भावनाही घरातल्या मंडळींना राहणार नाही.
शोभा राजे, नागपूर
मोबदला फक्त वीस टक्के?
गृहिणींना ‘पगार’ देण्याचा प्रस्ताव स्वागतार्हच! मात्र, पतीच्या पगारातील काही टक्के रक्कम पत्नीला देताना पतीच्या मानसिकतेचा विचार जास्त सजगतेने करणे आवश्यक आहे. त्यासाठी खालील मुद्दय़ांवर विचार करावा.
* पतीचा पगार खरोखरच पत्नीला माहीत असतो का? * सरकारी नोकरी, व्यवसाय यातील उत्पन्न हे ठराविकच असेल असे नाही, कधी कधी पगाराच्या तिप्पट, चौपट वर कमाई असते, कुठली रक्कम ग्राह्य़ धरणार? एकदा पैसे दिल्यानंतर ५० वेळा बोलून दाखवू नये. दिलेली रक्कम पुन्हा संसारासाठीच खर्च होणार असेल तर त्याचा उपयोग काय? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, सकाळी १० ते ६ अशी चाकरी करणाऱ्या व्यक्तीला १०,००० पासून ७०,००० पर्यंत पगार मिळतो. मग सकाळी ५ वाजता उठून रात्री साडेदहा, अकराला अंथरुणाला पाठ टेकणाऱ्या स्त्रीला तुम्ही फक्त १०, २० टक्के देण्याची शिफारस करता, जी ८०, ९० टक्के रकमेची हकदार आहे!
– सुमेधा बारलिंगे, अमरावती</p>
पण समाधानाचे काय?
नवऱ्याकडून घरकामाचा पगार देण्याचा प्रस्तावच चुकीचा आहे. असे झाले तर घरात असंतोष पसरेल. मुख्य म्हणजे पती कसले-कसले पैसे देणार पत्नीला? धुणी-भांडी, केर, लादी, स्वयंपाक इत्यादी कामाचे पैसे दिले तर मुलांवर होणारे संस्कार, प्रेम, सासू-सासऱ्यांचा सांभाळण्याची किंमत कशी करणार? स्त्री घरी असते म्हणून पुरुष निर्धास्तपणे नोकरी, व्यवसाय करू शकतो. घरातील, आपल्या संसारातील कामे केली तर त्याबद्दल मानधन कसले द्यायचे? घरची बाई व कामवाली यात फरक काय उरतो? तसेच या कामांचा नवऱ्याकडून मोबदला (मानधन) मिळाले तर गृहिणींना समाधान मिळणार का? जे पतीच्या प्रेमाने, आपुलकीने मिळते ते पैशाने मिळणार का?
– रेखा कमळापूरकर, डोंबिवली
यांच्या मोबदल्याचे काय?
संसारी स्त्रीच्या घरकामापेक्षाही अमूल्य अशा मुलांना जन्म देणे, वाढविणे आदी कामाचे काय? त्यांचा मोबदला कसा ठरवणार, उद्योगजगताच्या भाषेत ‘कॉस्ट बेनिफिट अॅनेलेसिस’ केले तर स्त्रीच्या संदर्भात संसार हा घाटय़ाचाच ठरतो, कारण पित्तृसत्ताक व्यवस्थेत मुले नाव, आडनाव पित्याचे लावतात व गरजेला वा वृद्धपणी आईची देखभाल करतील का ही शंकाच असते. (ज्याअर्थी वृद्ध पालकत्व कायद्याची गरज भासते त्याअर्थी) निम्न वा कनिष्ठ वर्गात तर पुरुष अर्थार्जन करतच नाहीत. स्त्रियाच मजुरी करून संसार चालवतात. नवऱ्याची व्यसने सांभाळत, प्रसंगी त्याचा मारही खातात. त्यांच्या मोबदल्याचे काय?
-पद्मजा बिवलकर, डोंबिवली
गृहभत्ता द्यायलाच हवा
‘नवऱ्याकडून घरकामाचा पगार?’ ही ‘पगारकल्पना’ अयोग्य वाटते. किंबहुना स्त्रियांसाठी ती अपमानास्पद आहे. कारण ‘पगार’ ही संकल्पना फार वेगळी आहे. काही तासांसाठी एखाद्या व्यक्तीचे श्रम जेव्हा आपण भाडय़ाने घेतो, तेव्हा त्याला दिल्या जाणाऱ्या मोबदल्यास आपण ‘पगार’ म्हणतो. तो न दिल्यास ती व्यक्ती काम सोडून जाऊ शकते. मग गृहिणीला मोबदला न मिळाल्यास ती घर सोडून किंवा काम सोडून बसणार आहे का? तर नाही. म्हणून तिचा नवरा जे काही पैसेरूपात पत्नीला देईल, तो तिचा पगार असू शकत नाही. तर घराबाहेरच्या नोकरीचे जादा तास, ती जे घरात वापरीत असते आणि ज्यामुळे नवरा, मुले व सासू-सासरे यांचं सेवा-स्वास्थ्य वाढतं, त्या संपूर्ण गृहव्यवस्थापनाचं हे खरं तर पैशात न करता येणारं तरी चालू जमान्यानुसार निरुपायाने पैशात करावे लागणारे मूल्यांकन आहे. त्याला नवऱ्याने दिलेला पगार म्हणणं, म्हणजे पती-पत्नीमध्ये मालक-नोकराचं नातं निर्माण करून स्त्रीची डोकेदुखी वाढवणं ठरेल.
पुरुषाने फक्त पत्नीलाच नव्हे, तर जोपर्यंत तो अविवाहित आहे, तोपर्यंत पगाराचा काही हिस्सा त्याने आपल्या आईला किंवा आजी वा बहीण घरप्रमुख म्हणून व्यवस्थापन पाहात असल्यास त्यांनासुद्धा तो देणं अत्यावश्यक आहे.
लग्नानंतर वाढलेल्या जबाबदाऱ्यांमुळे, स्वावलंबनाची ‘घराबाहेर जाऊन पैसे कमवा’ ही नोकरी-कल्पना, स्त्रीला एक सोडावी तरी लागते, नाहीतर ओढाताण करून ती झेपवावी लागते. याकरिता, स्वावलंबनाची स्त्रीच्या मानसिक व शारीरिकधर्माला जोडून येणारी नवी कल्पना म्हणजे तिच्या गृहव्यवस्थापनाचे मूल्य पैशामध्ये करता येणे, ज्याला गृहभत्ता म्हणता येईल. आपल्या देशात बेकार पुरुष हा पूर्णपणे बेकार असतो, कारण तो घरकामही करीत नाही. तरी त्याच्या बेकारभत्त्याचा विचार ही व्यवस्था करू शकते. मात्र स्त्री (आर्थिक) बेकार असली तरी घरातील कितीतरी कामे ती उरकीत असते, मग तिच्यासाठी गृहभत्त्याचा विचार का नाही करायचा?
– मंगला सामंत, पुणे
मानधन हा तिचा हक्कच
गृहिणींना नवऱ्याकडून मानधन मिळायला हवे! नव्हे तो तिचा हक्कच आहे! पूर्णवेळ गृहिणी असणाऱ्या स्त्रिया जरी सुशिक्षित असल्या तरी त्यांना काही किंमत नसते. तिला हक्काची मोलकरीण समजली जाते. त्यामुळे तिला घरकामाचा मोबदला दिल्याने पती-पत्नीच्या नात्यात व्यवहारीपणा येण्याची मुळीच शक्यता नाही. उलट तिचा आत्मविश्वास वाढेल. मी या घरातील महत्त्वाची व्यक्ती आहे ही भावना तिच्या मनात रुजल्यामुळे काम करण्यात उत्साह येईल.
– कल्पना बापट, नेरुळ
कायदा सगळ्यांसाठी नको
पत्नीला घराचे घरपण जपल्याबद्दल, तिच्या कामाचा मोबदला, वेगळे मानधन मिळायला ती नोकराणी नाही. घराची मालकीण आहे. पण ज्या स्त्रियांना घरात दुय्यम वागणूक दिली जाते किंवा पतीराज दारूडे असतात त्या स्त्रियांना घरकामाचा मोबदला मिळाला पाहिजे, असे मला वाटते. सरसकटपणे याबाबतचा कायदा करून चालणार नाही कारण गृहिणींच्या परिस्थितीनुरूप घरपरत्वे त्यात फरक पडेल.
– अलका कार्लेकर, मुलुंड
गृहिणीला द्यावा मान
नोकरी करणारी स्त्री बुद्धिमान आहे समजले तरी तिला मान मिळवतो तो ती कमवत असलेल्या पैशांमुळे. मात्र घरकाम करणाऱ्या गृहिणीमुळे तुमची अनेक कामे चटकन होतात, वेळ व पैसा दोन्हीची बचत होते याचाही पुरुषांनी विचार करावा. तिला गृहीत न धरता तिला मायेचा एखादा तरी शब्द वापरावा की, जेणे करून तिच्या कष्टाचे चीज होईल.
– मीना अभ्यंकर, कल्याण
निवृत्तिवेतनाची योजना हवी
स्त्री-पुरुष समानतेच्या आजच्या युगात पती-पत्नीसह घरातील सर्वानीच घरकामात हातभार लावायला हवा. ती काळाची गरज आहेच, पण मानधनामुळे ‘एकमेका साह्य़ करू’ ही भावनाच लयाला जाईल. ‘मानधन देतोय, मुकाट काम कर’ अशी अरेरावी वाढेल. काम करण्याचा संस्कारच नाहीसा होईल. म्हणून मानधन देण्याऐवजी निवृत्तिवेतनाची योजना असावी. स्त्रियांच्या नावे बँकेत खाते उघडून पतिराजांनी पगारातील काही रक्कम दरमहा जमा करावी, म्हणजे भावी आयुष्याचीही सोय होऊ शकेल.
– माधुरी मुनशी, बुलडाणा
मोबदला आर्थिक स्वरू पाचाच हवा
समस्त गृहिणीवर्गाचा विचार करता त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला शाब्दिक कौतुक, त्यांच्या कामाची प्रेमळ पावती याबरोबरच आर्थिक स्वरूपातही मिळाला पाहिजे. जुन्या काळात रेव्हरंड टिळकही लक्ष्मीबाई टिळकांना त्यांच्या घरकामाचा मोबदला हक्काची कमाई म्हणून देत असत. तेव्हा आजही स्त्री मिळवती असो वा नसो तिला तिच्या या कामाबद्दल पुरुषाच्या पगारातील ठराविक टक्के रक्कम तिचा स्वत:चा पगार मिळाला पाहिजे.
– ज्योती देशपांडे, पुणे
गरजेसाठी हवा पॉकेटमनी!
गृहिणीला नवऱ्याकडून घरकामाचा पगार, मोबदला देणे, म्हणजे गृहिणीला मोलकरणीचा दर्जा दिल्यासारखे होईल. ती ‘गृहस्वामिनी’ असताना तिच्या कामाचे मोल करणे म्हणजे तिचा अनादरच. माझ्या मते गृहिणींच्या कामाचे मोल पगार किंवा ठराविक रकमेत न करता, तिला स्वत:ला हवा तेव्हा ‘पॉकेटमनी’ देऊन तो खर्च करण्याचे तिला स्वातंत्र्य देण्यात यावे. म्हणजे गृहिणीला ‘पॉकेटमनी’ची गरज आहे.
-नयना साळी, डोंबिवली
‘अनमोल’ कामाचे मोल?
अनेकदा ‘घरकाम’ त्यात काय एवढे, असा गृहिणीच्या कामाचा उल्लेख करून त्या कामाचे मोल कमी केले जाते. पण मी म्हणेन रोज तेच तेच काम सातत्याने करीत राहाणे अतिशय अवघड काम आहे. त्याचे मोल अनमोल आहे. म्हणून अनमोल कामाचे मोल कसे ठरवणार..? आम्ही स्त्रिया सेवाभावी वृत्तीने घरकाम करीत असतो. ते आयुष्यभराचे योगदान आहे. या योगदानाचे मोल होऊ शकेल का?
– वीणा कुलकर्णी, दादर
मानधनाला पर्याय
मानधनाऐवजी असे सुचवावेसे वाटते की, आठवडय़ाचे दोन दिवस गृहिणीला पूर्णपणे रजा द्यावी व पतीने घर सांभाळून पाहुणे, मुलांचा अभ्यास, सर्व घरकाम एकटय़ाने करावे. यातून गृहिणीच्या कामाची किंमत कळेल. यात परस्परांमध्ये ‘अहंभाव’ किंवा बाजारीकरणाची भावना असू नये हे प्रामुख्याने सांगावेसे वाटते, तरच कुटुंबाचा गाडा व्यवस्थित चालेल.
– गिरिजा पागनीस, माहीम
नवी श्रमविभागणी हवी
पुरुष बाहेर राबतो, स्त्रीने घरात राबायचं. ही फक्त सोयीसाठी केलेली श्रमविभागणी असून विवाहसंस्था, कुटुंबसंस्था अस्तित्वात आल्यावर सहजासहजी झाली. त्यातून वंशाचं सृजन, भरण, पोषण ही अत्यंत नाजूक पण महत्त्वाची जबाबदारी निसर्गाने स्त्रीवर सोपवलेली. त्यामुळे तिचा दर्जा पुरुषाच्या बरोबरीचा ठरतो. म्हणून नवऱ्याने आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्याने घरकामातला छोटा वाटा उचलावा, इतकीच तिची मागणी आहे. घरकामाचा पगार मिळण्याऐवजी नवी श्रमविभागणी हवी हीच तिची अपेक्षा आहे.
– मीनाक्षी सरदेसाई, सांगली
नवऱ्यावर अन्याय
कामाचा मोबदला मिळाला की ती व्यक्ती नोकरदार होणार. मग नोकरीच्या अनुषंगाने येणाऱ्या इतरही मागण्या येणारच, त्या म्हणजे साप्ताहिक सुटी, किरकोळ आजारी, पगारी रजा, बोनस, याशिवाय ओव्हरटाइम. हे सर्व नवऱ्याकडून घेऊन पुन्हा सारं घर त्यानंच चालवायचं म्हटलं तर त्या बिचाऱ्या नवऱ्यावर अन्याय होणार नाही का? पण हा प्रस्ताव संमत झालाच तर सर्व नवरे त्यातून पळवाटा शोधतील व मानधन देण्याऐवजी ते चुकवावे कसे याचे मार्ग शोधतील.
-रवींद्र रामनामे, कोल्हापूर</p>
पगार नव्हे सन्मानधन!
मानधनामुळे तिच्या गृहिणीपदाचा सन्मानच होईल. स्वत:बद्दल असलेला न्यूनगंड, लाचारी राहणार नाही. कामाची कदर होत असल्यामुळे पतीविषयी, समाजाविषयी सन्मान आदर वाटेल. कामाचे समाधान मिळेल. मात्र, पगार या शब्दाऐवजी सन्मानधन, पत्नीधन असा सन्मान्य शब्द वापरावा असे मला वाटते. मानधन हे कोणचेही उपकार नाहीत तर स्वकष्टाचा सन्मान आहे.
– वृंदा राव, धुळे
दृष्टिकोनात बदल व्हायला हवा
गृहिणींना पगार देण्यापेक्षा तिला पूर्णपणे कौटुंबिक संरक्षण, आर्थिक स्वातंत्र्य व स्थैर्य, सामाजिक प्रतिष्ठा तसेच तिच्या भविष्यातली आर्थिक तरतूद जरी नवऱ्याने करून ठेवली तरी फार बरे होईल. कित्येकांचा असा गैरसमज आहे की, मिळवत्या स्त्रीला या साऱ्या गोष्टी नवऱ्याकडून मिळतात. कारण, पगार देऊन ही समस्या सुटण्यातली नाही. पुरुषांचा ‘बायको’बद्दलचा दृष्टिकोन बदलणं महत्त्वाचं आहे, अर्थात सकारात्मकरीत्या.
– शिवानी कुंभवडेकर, लोणावळा
वार्धक्यासाठी मानधन हवे
आजची गृहिणी स्वत:चं स्थान शोधत आहे. मनात आत्मसन्मानाची पहाट झाली आहे, स्वत:चे स्वत्व जपण्यासाठी, संधिकाळाला सामोरं जाण्यासाठी आर्थिक बळ तिला हवेच आहे. आयुष्यभर नवऱ्याची लहर सांभाळावी लागतेच, पण वार्धक्यात सर्वात मोठं दु:ख म्हणजे सदिच्छेची, सद्भावनेची आर्थिक अडवणूक होणे स्वाभिमानाला जबरदस्त धक्का लागण्याची शक्यता असते. म्हणूनच गृहिणींनी जीवनात गुंतवणूक करावी, अर्थबिंदू साठवले नाही तर जीवन रूक्ष होईल. पैसा सबकुछ नहीं, परंतु बहुत कुछ है. गृहिणीला नवऱ्याच्या पगारातून मानधन मिळणे ही काळाची गरज आहे.
– मोनिका कुवर, अंबरनाथ
गुलामगिरीची नांदी
गृहिणीला मानधन द्यायला सुरवात केली म्हणजे आपोआपच कामाची सक्ती आलीच. घरात कुठल्याही स्वरूपाचे नुकसान झाले तरी त्यासाठी गृहिणीलाच जबाबदार धरले जाईल. त्यामुळे तिचा दर्जा ढासळून तिला हक्काची गुलाम असल्यासारखी वागणूक मिळेल. जन्मभराची वेठबिगारी सुरू होईल. पती-पत्नीचे कौटुंबिक जीवनही यामुळे विस्कळीत होईल.
– उमा पोळ, ठाणे
कायदे कागदावरच
संसारात कायदे करून चालत नाहीत. अगदी सुशिक्षित उच्चपदस्थ बायकोही नवऱ्याविरुद्ध तक्रार करणार नाही, कारण त्याचे परिणाम तिलाच भोगावे लागणार, वर कुटुंबाची अब्रू जाणार. कायद्याने घरात असलेल्या गृहिणींना मानधन मिळते की नाही हे कोण बघणार? द्विभार्या प्रतिबंधक कायदा आला त्याची अंमलबजावणी कितपत होते? तेव्हा हे कायदे कागदावरच राहणार. गृहिणी ही कायमच गृहीत धरली जाते. ती तशीच राहणार. त्याविरुद्ध तिने बंड पुकारले तर मात्र कुटुंबसंस्था नामशेष होईल, याची शक्यता कमी.
– शुभा शिरोळकर, गोरेगाव
तिच्यावर ताण अधिक
या प्रस्तावाचे फायदे म्हणायचे झाले तर स्त्रीचे आर्थिक आणि मानसिक सबलीकरण होईल, पण तोटय़ाची गोष्ट केली तर नवरा जर घरकामासाठी संबंधित एखाद-दोन जरी काम करत असेल म्हणजे बिल भरणे, भाजीपाला वगैरे आणणे इ. तर तीसुद्धा स्त्रीलाच करावी लागतील. ज्या कामांसाठी स्त्रिया मानधन घेतील, ती सर्व कामे तिने स्वत:च पूर्णत्वास न्यायला नको का? कारण ऑफिसमध्ये नवरा राब-राब राबतो तेव्हा बायको त्याला ऑफिसमध्ये मदत करायला नाही ना जात!
– प्रमदा रहाटे, नागपूर
तिच्या खर्चासाठी
प्रत्येक गृहिणीला स्वत:चा एक खर्च असतो. तो तिला तिच्या मर्जीप्रमाणेच खर्च करावयाचा असतो; परंतु या पैशांसाठी तिला नवऱ्याचीच मनधरणी करावी लागते. काही काही वेळेस तिला ते अनिच्छेने मिळतात किंवा मिळतही नाही, म्हणून मला प्रांजळपणे असे वाटते की, एक घरकाम करणारी गृहिणी म्हणून नव्हे तर तिचा तो हक्कच समजून नवऱ्याने किंवा अन्य कुणीही तिची ‘कामवाली’शी तुलना न करता तिला तो मानधनाच्या स्वरूपात सन्मानाने द्यावा.
– हेमलता परदेशी, नाशिक
विषय सामंजस्याचा
‘स्त्री’चे घराशी भावनिक नाते जोडलेले असते. ती ‘आई’ असते. याचा मोबदला किती? ‘स्त्री’च्या कोणत्या कामाचे किती पैसे लावणार? आणि असं झालं तर सामान्य नवऱ्याजवळ ‘पै’ही शिल्लक राहणार नाही. त्यापेक्षा तिच्या त्यागाचा, प्रेमाचा, साहचर्याचा मान घरातील सर्वानीच राखावा. भावनिक ओलाव्याबरोबर थोडा आर्थिक ओलावा ठेवावा, पण त्याला मानधन म्हणू नये. त्यामुळे असा कायदा करू नये. हा सामंजस्याचा विषय आहे.
– डॉ. पुष्पा कोकीळ
खास फिक्स डिपॉझिट उघडावं
मानधनापेक्षा नवऱ्याने एखाद्या बँकेत बायकोच्या नावाने फिक्स डिपॉझिट खात्यात भविष्यनिर्वाह निधी म्हणून जरूर पैसे टाकावे. नवऱ्याकडून पगाराचा प्रस्ताव मांडला तर त्याच्या फायद्याऐवजी तोटाच होण्याची जास्त शक्यता आहे. शिवाय नवऱ्याकडून, सासू, सासरे यांच्याकडून बायकोला, सुनेला टोमणे खावे लागतील. नवरा-बायकोमध्ये लैंगिक समस्याही उभ्या राहू शकतात. बायकोच्या सुरक्षितेचा कायदा असावा, पण सहजीवनात दुरावा निर्माण करणारा कायदा नसावा.
– विमल खाचणे, पुणे
चंगळवादातून हा विचार
एकविसाव्या शतकात हा विचार मनात आला ज्याचं उत्तर एकच, सध्याचा चंगळवाद! हवे तसे पैसे खर्च करण्याची किंवा उडवण्याची इच्छा. हे पैसे जर स्त्री स्वत: कमावत असेल तरच जमू शकते. मग ही मजा लुटणे घरात राहून पूर्णवेळ काम करणाऱ्या गृहिणीला शक्य नसते आणि ती जेव्हा समाजात वावरते आणि आजूबाजूच्या स्त्रियांच्या हालचाली किंवा आयुष्य न्याहाळते तेव्हा तिच्या मनात एक प्रकारचा न्यूनगंड किंवा भयगंड येत असावा. आपण या कमावणाऱ्या बायकांपेक्षा कमी आहोत. या विचारातूनच हा विचार सुचला असावा.
– शमा रेगे, मुलुंड
हे गृहिणीपदाचं मूल्य?
‘नवऱ्याकडून बायकोला घरकामाचा पगार?’ कल्पनाच करवत नाही या संकल्पनेची! स्त्रीच्या श्रमाचं व त्यागाचं मोल पैशात करण्याची योजना म्हणजे पती-पत्नीच्या नात्याची फार मोठी अवहेलना आहे. ‘पगार’ म्हणजे ठराविक अर्थप्राप्ती. मग स्त्रीच्या सर्व वयांच्या टप्प्यात काय ही ठराविक ‘अर्थप्राप्ती’च तिच्या गृहिणीपदाचं मूल्य? मग स्वत: नोकरीवरून घरातली सर्व कामे सांभाळून, नवरा, मुलाबाळांवर अपार माया करत वृद्धत्वाकडे वाटचाल करणाऱ्या स्त्रीचा ‘पगार’ काय? का मग तिने नवऱ्याला त्याच्या नवरेपणाचा ‘पगार’ द्यायचा? ‘गृहलक्ष्मी’ला पगार म्हणजे ज्याचे त्यालाच अर्पण!
– डॉ. अरुणा क्षीरसागर
नवरा मालक नाही
‘‘एकविसाव्या युगात कामाची झाली वाटणी
जेव्हा मी करते इडली, तेव्हा.. (अहो) वाटतात चटणी’’
असा उखाणा आजच्या घडीला जर एखाद्या विवाहितेने सर्व उपस्थितांसमोर घेतला तर?.. माझ्या मते हे नक्की कौतुकास्पद आहे. त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे ‘अहों’नी ही कृती अमलात आणायला हवी. स्वत:चे अस्तित्व विसरून कुटुंबातील सदस्यांसाठी झटणाऱ्या त्या स्त्रीला पुरेसे मानधन नवऱ्याकडून मिळायलाच हवे; असे माझे ठाम मत आहे. त्याचा दुहेरी फायदा हा की- (पगार द्यावा लागल्यामुळे) नवऱ्याला बायकोच्या कष्टांची खऱ्या अर्थाने जाणीव तर होईलच; तसेच आपणही घरबसल्या कमावू शकतो, असे वाटल्यामुळे गृहिणींचा आत्मविश्वास खचितच दुणावेल. अर्थात बायकोला ‘मानधन’ देत असल्यामुळे आपणच घरात ‘मालक’ आहोत; अशी अहंगंडाची भावना पुरुषांच्या मनात येता कामा नये.
– सरिता शिरबावीकर
मानधनाचे गाजर ?
आपली भारतीय संस्कृती हीच मुळात कुटुंबप्रधान संस्कृती आहे. जर त्याची तुलना पगाराशी केली गेली तर घराघरात वाद निर्माण होतील व पती-पत्नीमध्ये दुफळी निर्माण होईल व त्याचा शेवट कुठे होईल हे सांगता येणार नाही. हा प्रस्ताव उत्पन्न करातून सूट मिळण्यासाठी तर तयार केला नाही ना? याची शंका येते. कारण पत्नीला दिलेल्या पगारावर उत्पन्न करात सूट मिळणार असे समजते. त्यापेक्षा दोघांच्या नावावर जर पगाराचे खाते उघडण्यात आले तर पती-पत्नी दोघे जण ज्याला हवे तसे पैसे सदरच्या खात्यातून काढू शकतात. त्यामुळे गृहिणी आर्थिक स्वातंत्र्याचा लाभ घेऊ शकतात.
– वसंत काळकर, जळगाव
मानधनात ‘मान’ आहे
हे शब्द वाचताना ४५ वर्षांपूर्वीच्या पिढीची प्रतिक्रिया मी देत आहे. यजमानांच्या पुढच्या यशासाठी आपणहून स्वत:च्या पैशावर पाणी सोडणारी मी कालची गृहिणी आहे. त्यावेळी पैसा हा तुझा-माझा असा भेद नव्हता. आम्ही घराच्या बाबतीत ऑलराऊंडर होतो. त्यामुळे प्रत्येक महिन्याला हातात पूर्ण पगार ठेवणाऱ्या पतिराजांना आमच्यावर पूर्ण विश्वास होता. त्यामुळे मानाने आम्हाला जे मिळत होते, त्याची तुलना महिन्याच्या मानधनाशी होऊ शकत नाही. मानधन हे उपऱ्या माणसाला देणे योग्य आहे, घरातल्या नव्हे. त्यामुळेच आज हे हयात नसतानाही मुले मला ते असताना जे आर्थिक स्वातंत्र्य होते तेच अनुभवू देतात.
– नीला केळकर, विलेपार्ले
सन्मानाने ‘मानधन’ द्या
समस्त ‘नवऱ्यांनो’, हा पगार जर गृहिणीला स्वावलंबी करत असेल, तिचा आत्मविश्वास परत मिळवून देत असेल तर नक्कीच दिला पाहिजे. शेवटी आजच्या जगात आर्थिकदृष्टय़ा स्वतंत्र असणे फार गरजेचे होऊन बसले आहे. हे पैसे तिला सन्मानाने आणि हक्काने द्या. त्यामुळे तिच्यातला बुजरेपणा कमी होईल. ‘आपण जे काम करतो ते कमीपणाचे नक्कीच नाही, उलट आपणही घरातली महत्त्वाची व्यक्ती आहोत’, ही भावना तिच्यात निर्माण होईल.
– विद्या चव्हाण, श्रीरामपूर
प्रस्ताव समर्थनीय
कौटुंबिक जबाबदारी ही कुटुंबाचे सदस्य या नात्याने स्त्री व पुरुष या दोहोंची संयुक्तिक जबाबदारी आहे. यामुळे घरकाम असो की आर्थिक जबाबदारी, दोघांनी मिळून पार पाडणे अपेक्षित आहे. फक्त बाईपणामुळे घरकाम हे स्त्रियांच्या माथी मारणे पूर्णत: चुकीचे आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्यास आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याची समान संधी प्राप्त व्हावी. या विधेयकादेवारे सद्यस्थितीत पूर्ण वेळ घरकाम करणाऱ्या स्रियांना आर्थिक न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न होतोय, हे समर्थनीय आहे. परंतु घरकाम व व्यवसाय अशी दुहेरी जबाबदारी पेलणाऱ्यास्त्रियांचा यामध्ये समावेश होणार का, असा प्रश्न उपस्थित होतो.
– भाग्येशा कुरणे, पुणे
आजच्या स्त्रिया सक्षम आहेत
आपल्या भारतीय संस्कृतीत आदर्श कुटुंबपद्धती आहे. पूर्वी स्त्रियांना शिक्षण नसल्यामुळे त्या केवळ चूल आणि मूल हेच आपले सर्वस्व मानत. आज त्या शिक्षणामुळे सर्व क्षेत्रात सक्षम आहेत व अग्रेसर आहेत. म्हणून कामवालीबरोबर तिची तुलना नको. हे विधेयक कोणत्या नवऱ्याला तरी पटेल का?
– विजया ज. मोहरे, डोंबिवली
यांचाही प्रतिसाद उल्लेखनीय होता-
शोभा बावधनकर, मंगला देशमुख, छाया मुसळे, प्रा. प्रभा बैकर, स्मिता अयाचित, प्रतिभा आळतेकर, स्मिता डोंगरे, सां. रा. वठारकर, संप्रवी कशाळीकर, महेश वाघोलीकर, अर्चना सागवेकर, अपर्णा भाटवडेकर, सुलभा दाते, सुमंगला कुलकर्णी, विद्या सामंत, द. के. दिघे, अशोक बुटाला , मानसी साळवी, मेघना चितळे, वसुधा सहस्रभोजनी, नीलम प्रधान, अनिल बिडये, चारुलता कुलकर्णी, अंजली बापट, शिल्पा अष्टमकर, राहुल कुलकर्णी, शशिकांत काळे, कमलाकर पंडित, प्रफुल्ल म्हात्रे, सुमन सावे, शुभलक्ष्मी मस्तकार, प्रा. भाग्यश्री देशपांडे, राजश्री खरे, अपेक्षा तरे, नंदिता शिरगावकर, नवनाथ भानवसे, रेखा शुक्ला, प्रतिभा बोपर्डीकर, मीनल भणगे, दत्तात्रय जोशी, उषा रेणके, सीताराम जी.ए. ,वसुंधरा नेने, वैशाली शेंडे, सुनेत्रा टिल्लू , सुधा देशमुख, भारती सावंत, साधना मेहेंदळे, संपदा जोशी, सीमा पाठक, सरिता आवाड, चिन्मय गवाणकर, स्वाती चुरी, श्याम सुतार, प्रशांत नगराळे , मीरा कोमाते, राम गोगटे, सुनंदा मोकाशी, डॉ. दीपाली मोरे, मोहिनी मोडक, अपर्णा कुलकर्णी, मंगला बक्षी, सेजा वैद्य , मीनल सरदेशपांडे, मधुरा उटगीकर, अनुप्रीता परांजपे, कुसुम कामत, मंगला तोत्रे, कांचन देशमुख, नीमा नवलकर, पल्लवी कुलकर्णी, अनघा आंधोरीकर, देविदास जंगले, विद्या पाटील, मेघश्याम पुनाळेकर, संगीता विसपुते, प्राजक्ता प्रमोद, वर्षां दिवेकर, सुधा जोशी, श्रीकांत कुलकर्णी, मेघा धर्माधिकारी, रा. आ. कंटक, ऊर्मिला परांजपे, मेघना लिमये, शरयू मोकाशी, शैलजा भाटवडेकर, रंजना लवाटे, नलिनी जुगारे, शुभदा व्यास,पद्मजा कुलकर्णी, ज्योत्स्ना डासाळकर, कल्पना शिंगणापूरकर, मीना उकिडवे, सुषमा जाधव, अनुराधा हरचेकर, डॉ. र. आ. मरकडेयवार, रमेश कारेकर, उषा खैराटकर, माणिक गारखेडकर, ए. आय. पाटील, मेघा पाटील, मंगला राजपूत, राजेंद्र देशपांडे, नीला फडके, उषा गावडे, द. वि. थत्ते, शिल्पा फडके, विवेक तवटे, अतुलचंद्र शंकरशेट, माधवी टिळवे, चित्रा नानिवडेकर, शिल्पा गडमडे-मुळे, मेधा साने, शिशिर सिंदेकर, हेमा आणेकर, आनंद सप्रे, भाग्यश्री बोरकर, आशा भागवत, मेघा आपटे, संगीता मोहिते, शिल्पा धुतमल, शलाका कुलकर्णी, मीना पांडे, डॉ. विकास खंदारे, वासंती सिधये , वैशाली भांडेकर, सरोजिनी वांद्रेकर, सबिना फोस, शैलजा लिमये, स्नेहल कुलकर्णी, सारिका राऊत, कमल नामजोशी, शुभदा कुळकर्णी,सरोज राईलकर, एस. एस. महाजन, र. भा. भागवत, आशा भिरंगी.