आर्य वंशाचं अस्तित्व माणसाच्या अस्तित्वापेक्षाही मोठं झालं आणि नाझींनी ज्यूंचं शिरकाण करायला सुरुवात केली. ६० लाखांपेक्षा जास्त ज्यू मारले गेले, या मृत्यूलाही अनेक पदर होते. एका आईला तर आपल्या मुलीला ठार करावं लागलं, पण याच मृत्यूच्या तांडवात सृजन-सोहळाही पार पडला. त्या छळछावणीत,  जन्म-मृत्यूच्या अमानुष भीतीच्या छायेत तीन बाळं जन्माला आली. त्याला कारण होतं त्या मातांचं जिवावर उदार झालेलं मातृत्व. उद्याच्या जागतिक मातृ दिनानिमित्त या तीन मातांना सलाम!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘‘तूगरोदर आहेस?’’ डॉ. मेंगलेने एका २८ वर्षीय शिक्षिकेला विचारलं.. ती म्हणाली, ‘नाही’. तो   प्रिस्काकडे वळला तेव्हा आपल्या पोटातल्या बाळाला दोन महिने झालेत हे माहीत असूनही तिनं ‘नाही’ म्हटलं. त्या वेळी तिचं ते नाही म्हणणं तिला वाचवणार होतं की पश्चात्ताप करायला लावणार होतं याची निदान त्या वेळी तरी तिला कल्पना नव्हती..

अॅडॉल्फ  हिटलरचा जन्म आणि मृत्यू एप्रिलमधलाच. त्याच्या मृत्यूला ३० एप्रिलला ७० वर्षे पूर्ण झाली. छळाच्या नरकयातनेतच जन्मलेल्या मार्क, हाना आणि इवा या तीन मुलांचाही जन्म याच महिन्यातला. त्यांनाही नुकतीच ७० वर्षे झाली. हिटलरच्या आत्महत्येनंतरच या भयानक यातनाप्रवासातून या माता-मुलांची सुटका झाली ती ३ मे रोजी.

दुसरं महायुद्ध ऐन भरात होतं. हिटलरला सगळं जग आपल्या ताब्यात घ्यायचं होतं. एकेक देश पादाक्रांत करत तो पुढे जात होता. पण असंख्य ज्यूंना चिरडूनच. त्याच्या लष्कराने अगणित ज्यूंना पकडून छळछावणीत कोंडून ठेवलं होतं, असंख्यांची वासलात गॅस चेंबरमध्ये लावली जात होती. काहींना पकडल्या जागीच ठार केलं जात होतं. सगळीकडे दहशत होती ती फक्त आणि फक्त नाझींची. अनेक छळछावण्या मृत्यू छावण्या झाल्या होत्या. अशीच एक छळछावणी.. ऑश्वित्झ.  असंख्य ज्यू तिथे आणले गेलेले होते, आणले जात होते. त्यांच्यावर पाशवी नजर होती हिटलरच्या तैनातीत तयार झालेला क्रूरकर्मा डॉ. जोसेफ मेंगले याची. मेंगले डॉक्टर होता, परंतु त्याला माणसं हवी होती ती त्याच्या अमानवी प्रयोगांसाठी.. ज्याचा शेवट ठरलेला होता, मृत्यू! यातना देणारा, वेदनेनं पिळवटून टाकणारा मृत्यू.. त्यांच्या आर्य वंशाचं अस्तित्व माणसाच्या अस्तित्वापेक्षाही मोठं झालं होतं. आणि म्हणूनच तिथे सुरू होतं, फक्त यातनांचं आणि मृत्यूचं तांडव!  
आता श्वास चालतोय, पुढच्या क्षणी काय होईल हे माहीत नसतानाही त्याच छळछावणीत एक चमत्कार घडत होता आणि तीन बाळं जन्माला येत होती. कुणाच्याही नकळत.. जगण्याची विजिगीषु वृत्तीच त्यांना जगवत होती कारण ते बाळकडू पाजत होती त्यांची जन्मदात्री आई! आपलं बाळ जन्माला घालायचंच या एकाच चिवट इच्छेपोटी या तीन मातांही तिथे अमानुष जीवन जगत होत्या.. प्रिस्का, अ‍ॅन्का आणि रचेल. या तिघी जणी. ऑश्वित्झ या एकाच छळछावणीतील ही तीन वेगवेगळी आयुष्य.. कधीही एकमेकांसमोर न आलेली. पण तरीही एकच जगणं जगत असलेली.. हे जगणं होतं, भयाचं, दहशतीचं, तरीही धाडसाचं आणि आशेचंही.
  ०
 ऑक्टोबर १९४४. ऑश्वित्झच्या दिशेने त्यांची रेल्वे व्ॉगन जात होती. भविष्यात काय वाढून ठेवलंय हे माहीत नसलेले टिबोर आणि प्रिस्का एकमेकांचा हात हातात घेऊन बसले होते. पुढे भेटू का ते माहीत नव्हतं. पण त्यांच्या प्रेमाची साक्ष असलेलं बाळ तिच्या पोटी होतं. त्यांनी आपल्या बाळाचं नाव नक्की केलं.. आणि छावणीच्या दारातच ते विभक्त झाले. कायमचे..

ज्यूंचा र्निवश करायचाच या पाशवी नाटकाचा आता शेवटचा प्रयोग सुरू झाला होता. ऑश्वित्झ.. इथली सूत्रं होती डॉ. मेंगलेकडे. अध्र्या तासापूर्वी प्रिस्कासह अनेक ज्यूंना तिथं आणलं होतं.. एकजात सगळ्या जणी नग्न, डोक्याचं मुंडण केलेलं, थरथरत्या शरीरानं रांगेत उभ्या होत्या..
‘‘तू गरोदर आहेस?’’ प्रिस्काला डॉ. मेंगलने विचारलं. तेव्हा तिनं ‘नाही’ म्हटलं.  तिलाच काय तिथल्या कुणालाच आपल्या भवितव्याची कल्पना नव्हती, मेंगले त्यांचं काय करणार आहे, त्याच्या अतिमानवी प्रयोगासाठी वापरणार आहे, की त्यांच्यावर कष्टप्रद गुलामगिरी लादणार आहे की गॅस चेंबरमध्ये ढकलणार आहे.. पण प्रिस्काची सुटका झाली. तिला ‘फिट’ म्हणून लेबर कॅम्पमध्ये पाठवण्यात आलं..

रचेल पोलंडवरून आणलेली. तिचीही रवानगी लेबर कॅम्पमध्येच करण्यात आली होती.. खायला पुरेसं नव्हतंच, सतत कामामुळे विश्रांतीही नव्हतीच. पण बाळ पोटात वाढत होतं. कुणालाही, अगदी स्वत:च्या बहिणींनाही कल्पना येऊ नये म्हणून तिनं तिथल्या रक्षकांनी फेकून दिलेले अति ढगळ कपडे वापरायला सुरुवात केली..

 अ‍ॅन्का, प्रागला राहणारी, कायद्याची विद्यार्थिनी. नवरा बेर्नडबरोबर इंटर्नमेंट कॅम्पमध्ये राहत असताना तिला बाळाची चाहूल लागली खरी परंतु लागलीच तिचीही रवानगी लेबर कॅम्पमध्ये करण्यात आली आणि कठोर परीक्षा सुरू झाली.

 अंगावर पुरेशी वस्त्रे नाहीत, खायला अन्न नाही मेहनत मात्र प्रचंड करवून घेतली जात होती. वातावरणात फक्त निराशा, घृणा आणि चीड भरून राहिली होती. या तिघी आणि असंख्य ज्यू आणि इतर कैदी अत्यंत हालाखीत एक एक दिवस ढकलत होते. मात्र बाहेर राजकीय परिस्थिती बदलू लागली होती. हिटलर कोंडीत सापडला गेला आणि रशियाच्या लष्कराने आपले फास आवळायला सुरुवात केली..

एप्रिल १९४५. तत्पूर्वीचे सात महिने त्या तिघींची रवानगी फ्रिबर्ग येथील एका फॅक्टरीत करण्यात आली होती. घालायला तेच ते ऑश्वित्झचे गलिच्छ कपडे, लाकडी मोजडय़ा, अंतर्वस्त्र तर नव्हतीच. जड मशिन्सवर काम करायचं, पुरेसं खाणंही नव्हतं. क्रूर नाझींना त्यांची दया येत नव्हतीच, पण निसर्गही फितुर झाला होता. गेल्या पंधरा वर्षांत पडली नव्हती एवढी गारठवणारी थंडी पडली होती. श्वास घेणंही शक्य नव्हतं. त्यात अनेकींचे श्वास कायमचेच गोठून गेले. हाडांचे सापळे शिल्लक राहिलेल्या काहींची रवानगी पुन्हा ऑश्वित्झला केली गेली..
 ..आणि एके सकाळी प्रिस्कासमोर मृत्यू उभा ठाकला.. अंघोळ म्हणून थंड पाण्याचा फवारा तिच्यावर सोडण्यात आला त्या वेळी तिचं पुढे आलेलं पोट एका झेक स्त्री कैद्याला दिसलं. ती किंचाळलीच, ‘तू स्वत:बरोबर आम्हालाही ठार करशील’ आरडाओरडा ऐकून जर्मन महिला रक्षक धावत आल्या. प्रिस्का गारठली.. तिची अवस्था तर पार वाईट होती. पाय सुजलेले आणि त्यात  पू  झालेला होता नि वजन होतं जेमतेम ३५ किलो. आपल्याला गोळी घालणार याबद्दल सुतराम शंका नसलेल्या प्रिस्काला आश्चर्याचा धक्का बसला कारण तिच्यासाठी गरम पाणी आणण्यात आलं. तिला त्यात पाय बुडवून ठेवायला सांगितलं गेलं..
या बदलाला बाहेरची बदलेली राजकीय परिस्थिती कारणीभूत असावी..

 रचेल आणि अ‍ॅन्काचं गरोदरपणही त्याच दरम्यान उघडकीस आलं. रचेल तर इतकी अशक्त झाली होती की तिला पावलंही टाकवत नव्हती. अ‍ॅन्काही इतकी हाडकुळी झाली होती की आपल्याला कुठल्याही क्षणी ठार करण्यात येईल, असच तिला वाटत होतं. फक्त त्यांना काळजी होती आपल्या बाळांची. फक्त त्यांच्यासाठी त्या तग धरून राहिल्या होत्या.  आणि त्या तिघीही वाचल्या कारण एकच, नाझी राजवट कोसळत होती..

पण तरीही त्यांची छळछावणी काही सुटत नव्हती.. १२ एप्रिलची सकाळ. प्रिस्का कुठल्याही क्षणी बाळंत होणार होती. सगळ्या बराकी उवांनी भरलेल्या होत्या.. अस्वच्छतेचं साम्राज्य होतं. मधूनच बॉम्बस्फोटांचा आवाज धडकी भरवत होता. त्याच काळीज कापणाऱ्या  वातावरणात तिला वेणा सुरू झाल्या. सुरक्षारक्षक तिची अवस्था पाहत होत्या. त्या पैज लावण्यात दंग होत्या.  मुलगी झाली तर हे युद्ध थांबेल आणि मुलगा झाला तर.. युद्धाला अंत नाही. प्रिस्काच्या वेदनांना अंत नव्हता. अखेर प्रिस्काच्या मदतीला आली एक कैदी, मुलांची डॉक्टर असलेल्या एडिथाच्या मदतीनं  फॅक्टरीतल्या एका लाकडी टेबलवरच तिने मुलीला जन्म दिला.. जर्मन रक्षक आनंदाने रडू लागल्या.. त्यांच्या दृष्टीने युद्ध थांबण्याचा संदेश तिने आणला होता.
प्रिस्का अधिकच घाबरली. तिची लेक तिच्या गर्भात थोडी तरी सुरक्षित होती, परंतु आता ती ज्यूंचा तिरस्कार करणाऱ्या नाझींच्या जगात आली होती. एक ज्यू म्हणून. त्या नाजूक लेकीचं रडणंसुद्धा दुबळं होतं. पण प्रिस्का म्हणते, इतकं सुंदर बाळ मी त्यापूर्वी कधीच पाहिलं नव्हतं, मुख्य म्हणजे तिला तिच्या वडिलांसारखे निळेशार डोळे मिळाले होते. तिच्या बरोबरीच्या कैद्यांनीही आपल्या जेवणातील द्रवपदार्थ बाळाला पाजायला सुरुवात केली. त्या कॅम्पमध्येच त्यांना कापूस मिळाला मग त्या सगळ्यांनी मिळून हानासाठी छान गालिचा तयार केला. लाल फुलं लावली..
पण नियतीनं मात्र कठोर व्हायचंच ठरवलं होतं. हानाच्या जन्माला जेमतेम ३६ तास उलटले नव्हते तोच एका मध्यरात्री त्या सगळ्यांना उठवण्यात आलं.  रेड आर्मी आणि अमेरिकी सैन्यांनी डिसेंबर १९४४ पासूनच नाझींना छावण्या रिकाम्या करण्यासाठी दबाव आणायला सुरुवात केलीच होती. ही छावणीही रिकामी करावी लागणार होती..
 नरसंहार सुरूच होता. मात्र काहींना जिवंत ठेवण्यात आलं, कारण ‘राईश’चं पुनर्निर्माण करायचं होतं. त्यासाठी त्यांना मजूर हवे होते. सगळ्या कैद्यांना एका ट्रेनमध्ये भरलं गेलं. ते बहुधा बुहेनवाल्डला जाणार होते. स्त्रीवर्गाला ट्रेनमध्ये बसवण्यात आलं.. बाकींना मात्र त्या कडक्याच्या थंडीत पायी चालायला लागणार होतं, त्यांची दीर्घ वाटचाल सुरू झाली.. अनेकांची मृत्यूच्या दिशेने..
प्रिस्का आणि आजारी ३० जणी फक्त मागे उरल्या होत्या. बाकीच्यांना पुढे पाठवण्यात आलं होतं. जाण्यापूर्वी अनेकींनी, तुम्हाला ते मारून टाकणार आता, म्हणत रडून तिचा निरोप घेतला. प्रिस्काला पुन्हा एकदा मृत्यू स्वच्छ दिसू लागला.. हाना तर थंडीने गारठली होती. तिला ऊब मिळावी म्हणून प्रिस्काने तिला छातीशी घट्ट धरून ठेवलं होतं. हानाची जगण्याची तीव्रेच्छा कामी आली. त्यांना ठार न करता एका सैन्याच्या ट्रकमध्ये कोंबण्यात आलं.

ट्रक निघाले. नंतर त्यांना एका ट्रेनमध्ये बसविण्यात आलं. त्या वेळी आपण एकाच ट्रेनमध्ये आहोत याची प्रिस्का, रचेल, अ‍ॅन्का तिघींनाही कल्पना नव्हती. १९ एप्रिलचा तो दिवस. रचेलचेही दिवस भरत आले होते. अचानक तिला वेणा सुरू झाल्या. असह्य़. तिनं आपल्या बहिणीचे हात घट्ट धरून ठेवले. काय होणार माझं? या तिच्या प्रश्नाचं तिनंच उत्तर दिलं, एक तर माझं बाळ असेल किंवा माझं बाळ नसेल. तेवढय़ात कोणी तरी डॉ. एडिथाला शोधून आणलं. आणि.. मार्क जन्माला आला. नाळ कापायलाही काही नव्हतं. कुणी तरी रचेलला सुचवलं, तूच आता दाताने कुरतड. पण एक गंजलेला रेझर  डॉ. एडिथाच्या हातात ठेवला गेला आणि मार्कची सुटका झाली. अत्यंत लहानखुरा, अशक्त, फक्त जगण्याच्या तीव्रतम इच्छेने जगात आलेला. कुणी तरी सांगितलं, त्याला वाचवायचं असेल तर तो हिटलरच्या जन्मदिनी, २० एप्रिलला जन्मला असं सांगा..

अ‍ॅन्काचेही दिवस भरत आलेले. तिचा देह म्हणजे बोलता फिरता सापळा झाला होता. आपल्याला नेमकं कुठे नेत आहेत याची तिलाही कल्पना नव्हती. ट्रेन फक्त पुढे सरकत होती. खाण्या-पिण्याचे-झोपण्याचे हाल होत होते. अखेर तो १६ दिवसांचा अत्यंत भयानक ट्रेन प्रवास संपला आणि सुरक्षा रक्षकांनी एकेकाला बाहेर काढायला सुरुवात केली. त्यांच्या चेहऱ्यावरचे मग्रुरीचे आणि क्रूर भाव आपल्यापुढे काय वाढून ठेवलंय याची कल्पना देत होतं.. आणि रचेलला ते शब्द दिसले..  ‘मॉथॉसन’. ऑश्वित्झच्याच लायकीची ती छळछावणी. अ‍ॅन्का इतकी घाबरली की तिच्या पोटात दुखू लागलं. रेल्वे व्ॉगनच्या दाराला धरून ती कशीबशी उभी होती. तिला आपली स्थिती कुणालाही जाणवू द्यायची नव्हती. कारण  कुणाला शंका जरी आली असती तरी तिच्यासह तिचं बाळ गॅस चेंबरमध्ये फेकलं जाणार होतं.
तिला चालणं अशक्य होतं. तिची चाल बघून ती मरणार हे गृहीत धरून तिला एका शेतगाडीवर फेकून देण्यात आलं. गाडी डोंगरमाथा चढत होती. सकाळच्या प्रहरातील सूर्याची प्रभा पसरू लागली होती. वातावरणात गारवा होता आणि आजूबाजूला हिरवंगार कुरणं. अ‍ॅन्कासाठी ती सर्वात सुंदर सकाळ होती. कदाचित शेवटची!
दोन मैलांचा प्रवास करून गाडी डोंगरमाथ्यावरच्या कॅम्पवर पोहोचली. तिथलं चित्र तर जीवघेणं होतं. उवा, कीटक सुखेनैव फिरत होते. सर्वत्र गलिच्छपण भरून राहिलेलं. गाडीवरची एक बाई शेवटचे आचके देत होती. अ‍ॅन्काला अधिक तग धरणं शक्यच नव्हतं. तिने त्या गाडीतच बाळाला जन्म दिला. बाळ रडत नव्हतं. आणि तीही निश्चल पडून होती. तितक्यात एक डॉक्टर कैदी धावत आला. त्याने बाळाला धरून पाठीवर थापडा मारल्या आणि बाळ रडायला लागलं.. सगळं काही नीट झालं. अ‍ॅन्काला सुखाश्रू आवरेनात. तिला मुलगी झाली होती. तिने तिचं नाव इवा ठेवलं.. त्याही परिस्थितीत ती जगातली सर्वाधिक आनंदी व्यक्ती होती.

पण रचेल तितकी सुदैवी नव्हती. अ‍ॅन्कासारख्याच दुसऱ्या एका गाडीने तिचीही रवानगी एका डोंगरमाथ्यावर केली गेली. सर्वत्र मृत्यूचा वास भरून राहिलेला. माणसांची ही गर्दी. जेवण-खाणं तर दिसतच नव्हतं. वाढती रोगराई प्रत्येकाचा घास घ्यायलाच टपलेली! त्यातच रशियाच्या सैन्याच्या हातात कोणताही पुरावा सापडू नये म्हणून जर्मन रक्षक धडपडत होते. जवळची सगळी कागदपत्रं जाळणं सुरू होतं आणि त्याच्या जोडीला जाळले जात होते, कालच ठार केलेल्या ४३ कैद्यांचे मृतदेह!
 ०
ज्यूंचा नरसंहार अद्याप थांबलेला नव्हताच.. जर्मन रक्षक यमदूत बनूनच आलेले. पन्नास पन्नास जणांचे गट करून रांगेत उभं केलं गेलं.. कुणाचं लक्ष जाऊ नये म्हणून रचेलनं मार्कला आपल्या घाणेरडय़ा कपडय़ांमध्ये लपवलं. नि दोघांचा प्रवास सुरू झाला.. गॅस चेंबरच्या, मृत्यूच्या दिशेनं. तिथे लांबच लांब पाइप ठेवलेले होते. त्यातून कसला फवारा मारणार याची कल्पना तिला ऑश्वित्झच्या छावणीतल्या अनुभवावरून होती. सायनाइडचा फवारा त्यांना थेट मृत्यूच्या दारात नेणार होता.. मागचे दरवाजे बंद झाले होते. पण कदाचित मार्कची जीवनेच्छा पुन्हा एकदा प्रबळ ठरली. काही कैद्यांनी ते पाइपच उखडून, मोडून ठेवलेले होते आणि मुख्य म्हणजे सायनाइड संपलं होतं..

दुसरीकडे प्रिस्का आणि इतर कैद्यांना अशाच एका डोंगरमाथ्यावर जबदस्तीने ढकललं जात होतं. जे चालत नव्हते त्यांना जर्मन रक्षकांची मारहाण सहन करावी लागत होती. एक अंतहीन वाट समोर होती. तेवढय़ात एका कापोची, कैद्यांमधल्याच त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी नेमलेल्या एकीची नजर प्रिस्काच्या हातातल्या छोटय़ाशा गाठोडय़ावर, हानावर गेली. ती ओरडली, ‘इथे बाळ आहे.’ इतक्यात दुसरी तिकडे आली, इथे लहान बाळाला परवानगी नाही, असं म्हणत हानाला खेचायचा प्रयत्न केला. दोघींचं भांडण, मारामारी सुरू झाली. प्रिस्का हतबुद्ध! इतक्यात एक वयोवृद्ध कापो आली, तिनं प्रिस्काला म्हटलं, ‘तिला माझ्याकडे दे. गेल्या सहा वर्षांत मी बाळ पाहिलेलं नाही. काही वेळ खेळू दे तिच्याशी.’ प्रिस्काच्या लक्षात आलं, हीच वेळ आहे, हानाला वाचवायची. तिने हानाला तिच्या ताब्यात दिलं. कापो पोलंडची असावी. तिनं हानाला आत नेलं, कपडे बदलले. आणि तासाभरानं प्रिस्काच्या हवाली केलं..

प्रिस्का आणि हाना एका गलिच्छ झोपडीत येऊन पोहोचल्या होत्या. तर अ‍ॅन्का आणि इव्हाची रवानगी एका इस्पितळात करण्यात आली होती. रचेल मार्कसह एका बराकीत पडली होती. सोबतीच्या मृत्युपंथाला लागलेल्या, रोगजर्जर लोकांमध्ये या तिघींची आयुष्ये हेलखावे खात होती. त्याच वेळी ती बातमी आली.. हिटलरने केलेल्या आत्महत्येची!  आणि चित्र एकदम पालटलं. जर्मन रक्षकांना एकदम प्रेमाचा पुळका आला आणि त्यांनी सगळ्या कैद्यांना भरपूर खायला घालायला सुरुवात केली. अ‍ॅन्का सांगते, मी किती तरी दिवसांची उपाशी होते. भराभर खाल्लं. इतकं की खूप दूध आलं आणि त्यामुळे माझं बाळ एकदम खूश झालं.
   आणि ३ मे रोजी अमेरिकी सैन्याने त्यांची सुटका केली.. जीवन-मृत्यूचा खेळ अखेर संपला होता. जखमी, आजारी लोकांवर औषधोपचार केले गेले. तिन्ही आया आपल्या तिन्ही लेकरांबरोबर सुखरूप होत्या. पण दुर्दैवाने तिघींनी आपले जोडीदार गमावले होते. काही काळानंतर रचेल आणि अॅन्काने पुन्हा लग्न केलं. प्रिस्का मात्र शेवटपर्यंत अविवाहित राहिली. वयाच्या ९० व्या वर्षी २००६ मध्ये ती स्लोव्हाकिया येथे मरण पावली. रचेल २००३ मध्ये वारली तेव्हा ती ८४ वर्षांची होती तर अॅन्का ९६ व्या वर्षी गेली, २०१३ मध्ये. छळछावणीत कधीही एकत्र न आलेल्या. एकमेकींना कधीही न भेटलेल्या या तिघी जणी, पण त्यांची मुलं हाना, इवा, मार्क मात्र पाच वर्षांपूर्वी एकमेकांना भेटली. आज तिघंही आपापल्या आयुष्यात मग्न आहेत.
       या भेटीत या तिघांची कदाचित आणखी एकीशी भेट होऊ शकली असती पण, तिची जीवनेच्छा कमी पडली किंवा काळाचा फास तिच्या इच्छेपेक्षा बळकट असावा. या तीन मुलांच्या जन्माचा सृजनाचा धाडसी सोहळा एका बाजूला सुरू असताना मृत्यूची अमानुष सावली एका आईला मात्र वेगळंच धाडस करायला प्रवृत्त करत होती. ती दुर्दैवी माता होती, रुथ एलियाझ.. रुथचं नवजात अर्भक क्रूरकर्मा डॉ. मेंगलेच्या नजरेस पडलं तेव्हा आपल्या अमानवी प्रयोगासाठी त्याने तिची निवड केली. एक अर्भक किती काळ उपाशीपोटी तग धरून राहू शकेल हे त्याला पाहायचं होतं. रुथचे स्तन बांधून टाकण्यात आले होते. तिची मुलगी  दूध-पाण्यावाचून सात दिवस तग धरून राहिली. सातव्या दिवशी मेंगलेने तिला, तुम्हा दोघींना मी नेणार असल्याचे सांगितलं. रुथ असाहाय्य होती. इतक्यात त्याच छावणीतली एक डॉक्टर कैदी तिच्याकडे आली. तिच्याकडचं इंजेक्शन देत तिनं रुथला सांगितलं, ‘तुझ्या मुलीला दे हे.’
रुथनं विचारलं, ‘कसलं इंजक्शन.’
ती म्हणाली, मॉर्फिन, वीष आहे. ’
‘तुझं म्हणणं आहे मी माझ्या मुलीला माझ्या हाताने ठार मारू?’ रुथनं विकल होतं विचारलं. ‘तुझ्या मुलीला मरायचं आहेच. तू मारलस तर शांत मरण येईल.. अन्यथा..’
आणि रुथनं आपल्या मुलीला इंजेक्शन दिलं..
आरती कदम -arati.kadam@expressindia.com

या लेखातील या तीन माता आहेत,  प्रिस्का लोवेनबिनोवा, रचेल फ्रिडमन, अॅन्का नॅथनोवा. आणि त्यांची मुले हाना, मार्क, इवा. त्यांचे फोटो त्यांच्या आणि ‘मेल ऑनलाईन ’च्या सौजन्याने.
—————-
संदर्भ – वेंडी होल्डन यांच्या ‘बॉर्न सर्वायव्हर्स’ या पुस्तकांवर आधारित ‘मेल ऑनलाइन’ वर प्रकाशित झालेला लेख आणि फोटो.    