डॉ. प्रदीप पाटकर
समाजमाध्यमांवर एखादी विखारी पोस्ट ‘व्हायरल’ होते किंवा एखादा नेता भरसभेत काहीतरी चिथावणीखोर वक्तव्य करतो आणि अशा घटनेनंतर काही ठिकाणी अचानक दंगली होतात, हे चित्र आपण फार पूर्वीपासून पाहात आलो आहोत. कोण असतात हे झुंडीनं येणारे दंगेखोर? कशी असते त्यांची मानसिकता? स्वत:ची स्वतंत्र ओळख आणि विवेकी विचार बाजूला टाकत ‘ते’ बिनचेहऱ्यानं झुंडीत कसे सामावले जातात? माणुसकीचा बळी घेणाऱ्या झुंडीचं हे मानसशास्त्र..
सर्वाना आपलं चांगलं, तेही नेहमी चांगलं व्हावं, असं साहजिक वाटत असतं. त्यासाठी आज जगभर समंजस नागरिकांना समाज-राज्य-देश व्यवस्थेसाठी इतर व्यवस्थांपेक्षा लोकशाही व्यवस्था (त्यातील त्रुटी लक्षात घेऊनही) पसंत आहे असं दिसतं.
मात्र लोकशाहीतले कायदेकानू काहींना हवे असतात, ते फक्त इतरांच्या रानटीपणापासून आपण स्वत: सुरक्षित राहावं एवढय़ाचसाठी! त्यांना समानता हवी असते, पण ती समाजातल्या उतरंडीत आपल्यापेक्षा उच्च स्थानावर असलेल्यांना खाली, निदान थोडं जमिनीवर आणण्यासाठी! त्यांना संपत्तीचं समान वाटप आवडतं श्रीमंत मंडळींना धडा शिकवण्यासाठी/ ताळय़ावर आणण्यासाठी. जात निर्मूलन हवं असतं इतरांसाठी. आपल्यासाठी आपली जात थोडी वरची (!) असल्यास ती अभिमानाचं, अस्मितेचं रूप असतं. हिंसाचार स्वत:वर होतो, तेव्हा अन्याय, अत्याचार असतो. आपण हिंसा केली, तर त्याला अनेक न्याय्य (?) कारणं आणि स्पष्टीकरणं त्वरेनं त्यांच्या मनाशी तयार होतात. कायद्यानं धडा शिकवायचा तो इतरांना,
मी कायदा तोडतो तो मात्र नाइलाजापोटी! लोकशाही या पळवाटा समजून घेणार असेल तरच ती हवी असते. अन्यथा आपल्याला हवं तसं घडवणारी ठोकशाही हवीशी वाटते. लोकराज्य चालवताना मतभिन्नतेचा आदर ठेवलाच पाहिजे, हेच मुळात अशा मनांना पटत नाही.
लोकशाहीतल्या न्याय्य व्यवस्थेतली दिरंगाई, तपासातला गोंधळ आणि भ्रष्टाचार, शासनाचा संथ कारभार, अतिश्रीमंत मान्यवर भ्रष्टाचारी अपराध्यांना वाचवण्याचे प्रयत्न, अशा अनेक कारणांपोटी स्वत:ला न्याय मिळेल व तोही वेळेवर असं साध्या नागरिकाला वाटत नाही. मग संधी मिळेल तेव्हा माणसं कायदा हातात घेऊन ताबडतोब आपल्याला वाटेल त्याला/ तिला दोषी ठरवून भयानक क्रूर शिक्षा देऊ पाहतात. तिथे त्यांना हवं ते घडवण्यासाठी विचारी अनुयायी नको असतात, झुंड हवी असते.
आपल्या देशात अजूनही लोकशाहीचे मूळ सिद्धांत- आचार-विचार-भाषण-लेखन-धर्माचरण स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आदी संकल्पना नीटशा न रुजल्यामुळे परिस्थिती प्रतिकूल वाटली, की लोकशाहीतले संकेत विसरले जातात आणि वर्षांनुर्वष जनमानसात रुजलेली हुकूमशाही संधी मिळताच डोकं वर काढताना दिसते. वैयक्तिक असो, वा सार्वजनिक वर्तन असो, जमावानं उन्मादी झुंड बनून दंगे, हल्ले, लूटमार, कत्तली करणं हे देशात पुन:पुन्हा प्रत्ययाला येतं. काहींच्या मनात पिढय़ान्पिढय़ा सुप्तावस्थेत असलेल्या विवेकाला जागं होण्यास वेळ लागतो. मनानं परिस्थितीचं नीट अवलोकन करून, शांतचित्तानं, काही गृहीत पूर्व सिद्धांतांच्या आधारे भविष्याविषयी अनुमान काढायचं असतं. आजूबाजूच्या वास्तवाचं बारकाईनं निरीक्षण करून, त्याविषयी चिंतन करून इतर अभ्यासकांशी विचारविनिमय करून मग काय कृती करावी हे ठरवायचं असतं. हे सर्व विचारवंताला सोपं असतं. या प्रकारचा विचार करणाऱ्या समंजस नेत्याला प्रत्यक्ष कृती कार्यक्रम आखणं आणि तो अनुयायांना समजावून देणंदेखील फार कठीण नसतं. मनात मुळातच विवेक नसेल, तर मात्र चिंतन, मननाचा प्रश्नच येत नाही. सदोष, समाजघातक व्यक्तिमत्त्वाच्या नेत्यांचं मतलबी, गुन्हेगारी सत्ताकारण, त्यांचं हितसंबंधितांशी असलेलं साटंलोटं, यामुळे ते संविधान, सार्वजनिक वर्तनात जपण्याचे संकेत, कायदा आणि सुव्यवस्था या साऱ्यांना जुमानत नाहीत. विवेकी सूचना देणाऱ्यांना गप्प बसवतात. अशा वेळी, वेगवेगळय़ा कारणांनी प्रक्षोभित होण्यासाठी सदैव सज्ज असलेले बेभान अनुयायीही नेत्याला मवाळ मार्ग घेऊ देत नाहीत. अनुयायांचा समूह झुंडीत परावर्तित होतो. झुंडीत उन्माद वाढला, की तिला हिंसक आणि निर्नायकी होणंच आवडतं. आपल्या मनातल्या विखाराला आणि वैफल्याला वर उसळू देणं आणि कायदा आणि सुव्यवस्था विस्कटून अनागोंदी माजवणं अशा झुंडीला हवं असतं. त्यात सार्वजनिक संपत्तीचा विध्वंस, लुटालूट आणि जाळपोळ हा त्यांचा मुख्य अजेंडा असतो.
बेभान होण्यासाठी जात, धर्म, राजकीय, सामाजिक मुद्दे मोठय़ा प्रमाणात वापरले जातात. खालच्या जातीतल्या मुलानं उतरंड तोडत वरच्या जातीतल्या मुलीशी प्रेम/ विवाह करण्याचा प्रयत्न केला, की ‘उच्च’ जात पिसाळून मुलाची कधी नग्नावस्थेत धिंड काढून त्याचे तुकडे करते, त्याला जाळते किंवा सार्वजनिक जागी फाशी देते. कधी अधार्मिक वर्तन केल्याचे, धार्मिक भावना दुखावल्याचे, जबरदस्तीनं केलेल्या धर्मातराचे मुद्दे घेऊन घडवलेल्या धार्मिक दंग्यात इतर धर्मीय जाळले, मारले जातात. चेटूक, करणी करत असल्याच्या संशयानं चेटकीण, डाकीण ठरवून स्त्रियांना जगभर जाळलं गेलं. राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक मुद्दय़ांवरून, जमिनींच्या वादातून, आजकाल विकासाच्या नावाखाली विस्थापना (displacement) घुसडताना कायदा हातात घेऊन कितीतरी हिंसक प्रकार जगभर होत राहतात.
आपल्याकडे वर्णवर्चस्व, पुरुषसत्ता, देवदैवाविषयीच्या पराकोटीच्या अंधश्रद्धा, यांच्या भावनिक प्रभावाखाली हिंसा, हत्या, सामूहिक बलात्कार, खैरलांजी, हाथरससारख्या घटना होतात, संपत्तीच्या लोभानं नरबळी दिले जातात. देशभर दु:खाची, संतापाची लाट पसरते. पूर्ण खरी माहिती समोर येत नाही. चौकशी, शोध, तपासातून वस्तुस्थिती समजण्याआधीच स्वत:पाशी पोहोचलेल्या माहितीला ग्राह्य मानून जनसमूह आपापसात वितंडवाद घालत बसतात, मनातच झटपट न्यायनिवाडे करतात, आपापली भूमिका ठरवतात. त्यात हेतुत: पसरवलेली चुकीची/ खोटी माहिती भर घालते. समूहाचं मन प्रक्षुब्ध होतं. आंतरजालामुळे, समाजमाध्यमांमुळे आता बातम्या आणि अफवा द्रुत गतीनं पसरतात. मनामनात पेटलेली होळी विझता विझत नाही. आयुष्यभरासाठी मनात संताप/ द्वेष टिकून राहतो. एकमेकांतील संबंधांत पडलेली भेग रुंदावतच जाते. पुढील पिढय़ांमध्ये संक्रमित होत राहते.
इतिहास तपासल्यास लक्षात येतं, की पीडित, असुरक्षित, प्रक्षुब्ध, उतावीळ माणसाला, त्यातल्या त्यात कुठल्याही विचारानं मन आधीच भारलं गेलं असेल, तर अशा अनुयायाला त्या उन्मादी अवस्थेत विवेकी विचार-मनन-चिंतन यांचं महत्त्व लक्षात येत नाही. मग आपल्या अज्ञानाची जाणीव आणि त्याविषयीचा न्यूनगंड झाकून, तो त्याच्या विश्वासू नेत्याचे आदेश विनातक्रार, चिकित्सा न करता स्वीकारतो आणि झटपट आदेशानुसार वागू लागतो. इतिहास दाखले देतो, की आजवर प्रतिगामी, संधिसाधू नेत्यांनी लोकप्रियतेच्या हव्यासापोटी सामान्य अनुयायांचं अतिरिक्त कौतुक केलं, त्यांच्या परिस्थितीचं वस्तुनिष्ठ आकलन न मांडता समोरील शत्रूकडे सतत बोट दाखवलं. त्यागाचं उदात्तीकरण केलं, अभ्यास आणि चिंतनापासून दूर ठेवत ‘रेडीमेड फास्ट फूड’सारखी मतं आणि विधानं शिकवली, ती सभेत आवेशपूर्ण आवाजात पाठ म्हणून दाखवायचा सराव करून घेतला.
जेव्हा ‘जमावातले आपण एक’ ही एवढीच ओळख अनुयायांना अतिरिक्त महत्त्व मिळवून देते, उथळ विचार पुरेसे वाटू लागतात, अंतिम सत्य सापडल्याचा भास होतो, तेव्हा काही अनुयायांच्या मनात नेत्याचं महत्त्व कमी होत जातं. त्या अनुयायांना लवकरच स्वत:चंच मत अंतिम सत्य वाटल्यानं मत तयार करण्यासाठी क्लिष्ट अभ्यास जरुरीचा वाटत नाही. स्वत:ची प्रतिमा मोठी करण्यासाठी असा महत्त्वाकांक्षी अनुयायी संधी मिळताच, बेभान जमावाचा पेटता निखारा बनतो. तीव्र भावनावेग आणि बहुमताचा आंधळा पािठबा उतावीळ होण्यासाठी पुरेसा असतो. विवेकाचा शांतपणा, न्यायबुद्धीचा संयम अशा जमावाला परवडत नाही. संयमी नेतृत्व बाजूला फेकलं जातं. आग पेटवणारा आवडतो, विझवणारा भेकड वाटतो.
अविचारी समाज फारसे उलटे प्रश्न विचारत नाही, तोडफोडीचे, हिंसेला उद्युक्त करणारे आदेश त्वरित शिरोधार्य मानतो. असे अनुयायी ज्यांना हवे असतात, ते नेते मग पुढे येतात, मान्यता पावतात. त्यांची असंस्कृत भाषा, उद्धट वर्तन, समाजाविषयीचा अपुरा अभ्यास आणि खोलवर रुजलेले पूर्वग्रह, हिंसेवरचा विश्वास हे सारं उतावीळ, प्रक्षोभित मनांच्या अनुयायांमध्ये मान्यता पावतं. अभिरुची लोप पावते. जग अधिक सुसंस्कृत, प्रगत होईल अशी काही कृती करणं सुचत आणि रुचत नाही.
नेता सामान्य आणि रानटी होत जातो, तसतसा महत्त्वाकांक्षी अनुयायांचा आत्मविश्वास वाढत जातो. त्यांना सामाजिक प्रश्नांमध्ये आपली उत्तरंच अंतिम वाटतात. समाजव्यवस्थेला हाताशी घेऊन मग ते आपली मतं इतरांवर लादण्यात यशस्वी होतात. असं करू नका, याचा दूरगामी परिणाम लक्षात घ्या, अशी विवेकी आवाहनं धुडकावली जातात. गंमत (?) ही, की कायद्यांविषयी, लोकशाहीविषयी, विचार विनिमयाविषयी उघड अनादर व्यक्त करणारा हा नेता कायद्याच्या कचाटय़ातून संधी मिळताच निसटू पाहतो, जमल्यास आपल्या अविचारी कृत्याला शासनाकडून माफी मिळवू पाहतो. हिंसेचं समर्थन करणारा हा तथाकथित शूर नेता चौकशी सुरू झाली की (सुरक्षित जागी लपलेल्या दहशतवाद्याच्या धिटाई (?) नुसार) स्वत:च्या हिंसक कृत्याची जबाबदारी न स्वीकारता बचाव करत राहतो, भ्रष्ट तडजोडी करू लागतो. तेही न जमल्यास पळ काढतो, समाजपटलावरून अदृश्य होतो..
झुंड कायदेकानू बाजूला फेकून स्वत:च कुणाचा बळी घेते, तेव्हा नेमकं काय घडतं हा प्रश्न समूहमानसाच्या अभ्यासाला खूप चिंतनीय वाटतो. त्यातली काही निरीक्षणं विचारात घेऊ.
अशा जमावातल्या/ झुंडीतल्या बऱ्याच जणांचं सर्वसाधारण वय १५ ते ३० र्वष असतं. यातले बरेचसे असमंजस, काही रोजच्या ओळखी सोडल्यास या झुंडीत अपरिचित असतात. समाजात अद्याप स्वत:ची ओळख तयार झालेली नसते, जीवनाचं ध्येय सापडलेलं नसतं. व्यवसाय, स्वप्रतिमा न सापडलेले आणि म्हणून गोंधळलेले आणि इतरांमध्ये स्वत:चा चेहरा शोधणारे हे तरुण असतात. ज्यासाठी आपण एवढा गोंधळ घालतो आहोत, तो विषय नेमका न समजलेले अनेकजण या गर्दीत असतात. या झुंडीतील अनेकांना दुसऱ्या व्यक्तीबाबत, सार्वजनिक मालमत्तेबाबत, कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल काहीही देणंघेणं नसतं. बरेचजण ‘थ्रिल’ शोधत, कुणी करमणूक शोधत, त्या गर्दीत घुसलेले असतात. त्यांना नंतरच्या गोंधळात लूटमार साधायची असते, स्त्रियांची छेडछाड करायची असते.
यातली मंडळी तीन प्रकारच्या भूमिका वठवत असतात. काही नेते, काही व्यवस्थापक, तर इतर अनुयायी असतात. या भूमिका नंतर उन्माद उठावानुसार बदलतही असतात. नेत्यांना प्रक्षोभक विधानं/ घोषणा करून, खोटय़ा अस्मिता जागवून लोकांना बेभान, उन्मादी, उतावीळ, क्रोधी बनवायचं असतं. वातावरण जेवढं तापेल तेवढा वैयक्तिक विवेक त्यात जळून जातो, माणसं नुसत्या सूचनांनी पेटून अविचारी कृत्यं करायला धजावतात. एकटय़ानं जे केलं नसतं, करता आलं नसतं ते समूहात जमून जातं. स्वत:ची ओळख जमावाच्या मनात विरघळून जाते, दुष्कृत्याची जबाबदारी विभागली जाते, वातावरणातला उन्माद मनात भिनतो, एकटं पकडलं जाण्याची भीती चेपते, व्यक्तिमत्वाचं विघटन होतं, झुंडीशी नातं-निष्ठा जोडली जाते आणि पाशवी, निर्घृण कृत्य अशा वेळी सहज जमून जातं. बळींवर खुनानंतरही हल्ले चालू राहतात, प्रेताची विटंबना केली जाते. समाजविघातक व्यक्तिमत्त्वाच्या नेत्यांना, अनुयायांना ना त्याची शरम वा दु:ख वाटतं, ना अशा कृत्याचा पश्चात्ताप होतो!
पूर्वी मानवी समाजानं काही व्यवस्था निर्माण व्हावी यासाठी शोधलेल्या, सधन मालकवर्गाना उपयुक्त ठरलेल्या वर्ग, वर्ण, जात, धर्म, उच्चनीचतेच्या, भेदभावाच्या, श्रेष्ठत्व-कनिष्ठत्वाच्या, दैववादाच्या कल्पना नंतरच्या अभ्यासात अधिक स्पष्ट होत गेल्या. समष्टीची समज वाढत गेली आणि या कल्पनांचा उपयोग कष्टकऱ्यांच्या श्रमशोषणासाठी आणि समाजात दुही पेरण्यासाठी केला जातो हे कळून आलं. या कालबाह्य, उपद्रवी कल्पना समष्टीत अविवेक, अमानुषता, अवैज्ञानिकता, गुलामगिरी पसरवून साध्यासरळ माणसांचा आणि एकंदर माणुसकीचा बळी आजही घेताना दिसतात.
या देशाचे नागरिक म्हणून आपण काय करू शकतो?..
संविधान नीट वाचून, समजून घेणं आणि ते जपणं खूप आवश्यक आहे. एक सजग नागरिक म्हणून आपली आणि लोकप्रतिनिधींची कर्तव्यं आणि हक्क समजून घेत आणि आपलं मत त्यांच्याकडे व प्रशासनाकडे लोकशाही मार्गानं पोहोचवत राहिलं पाहिजे. कायदा आणि सुव्यवस्था या आपल्या हितासाठी आहेत, हे लक्षात घेऊन वैयक्तिक व सार्वजनिक जीवनात त्यांचा आदर ठेवावा. जागरूक राहून अफवा, खोटय़ा पोस्ट्स यांना प्रतिसाद न देणं विशेष कठीण नाही, पण उपयुक्त आहे. अडचणीत कायद्याला बगल देऊन भ्रष्टाचाराची मदत घेणं सोपं वाटलं, तरी दूरचं हित लक्षात घेऊन तो मोह टाळावा. लोकशाहीत प्रश्न मांडण्यासाठी आणि सोडवण्यासाठी जनसंघटन प्रभावी ठरतं.
ग्राहक चळवळ, ज्येष्ठ नागरिक संघ, महिला मंडळ, सेवाभावी संस्था, पालक संघ, अशा चांगली कामं करणाऱ्या संघटनांच्या कामात सहभाग देता येतो. एकजुटीनं सार्वजनिक अव्यवस्था आणि अन्याय यांबाबत प्रशासनाकडे सातत्यानं दाद मागावी लागते. हे करताना समाजकंटकांचा त्रास होऊ शकतो, पण त्यावर एकजुटीनं प्रयत्न करत राहिल्यास तो त्रास कमी होऊ शकतो, टाळता येऊ शकतो. वेळेला समाजमाध्यमं, वृत्तपत्रं आणि प्रसारमाध्यमं यांची योग्य ती मदत घेणं उपयुक्त ठरतं. असे आणि इतर अनेक मार्ग लोकराज्यातून सुराज्य निर्माण करण्यासाठी आपल्यापाशी उपलब्ध आहेत.
patkar.pradeep@gmail.com
संग्रहित लेख, दिनांक 30th Apr 2022 रोजी प्रकाशित
समष्टी समज: झुंडीचे मानसशास्त्र
समाजमाध्यमांवर एखादी विखारी पोस्ट ‘व्हायरल’ होते किंवा एखादा नेता भरसभेत काहीतरी चिथावणीखोर वक्तव्य करतो आणि अशा घटनेनंतर काही ठिकाणी अचानक दंगली होतात, हे चित्र आपण फार पूर्वीपासून पाहात आलो आहोत.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 30-04-2022 at 00:02 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samashti samaj psychology swarms social media psychology society state country system democratic amy