संवादाची वेगळी दिशा- दृष्टिकोन सापडला आणि उलगडलंच सगळं. सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता सापडली आणि मनातला झगडा संपला. अस्वस्थता, भीती, संताप, ईगो, हरल्याची भावना पुसली जाऊन अंजूचा चेहराही उजळला. कोणता हा संवादाचा वेगळा दृष्टिकोन?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सकाळी सातची वेळ. जिम नुकतंच सुरू झालं होतं. तेवढय़ात अंजू धपकन् दार ढकलून आत शिरली. घाबरलेली, चेहरा घामेजलेला. ‘काय झालं ग अंजू?’ कुणीतरी विचारलं.
‘‘अगं, एका रिक्षावाल्याशी भांडण झालं आता येताना. तो पाठलाग करत बाहेर येऊन थांबलाय.’’
‘‘कशामुळे झालं भांडण?’’ सगळ्या गोळा झाल्या.
‘‘अगं, चौकातल्या लाल सिग्नलला थांबले होते, तर या मागच्या रिक्षावाल्यानं हॉर्न वाजवायला सुरुवात केली. मी रस्ता दिला नाही. सिग्नल का तोडू द्यायचा? बराच वेळ कर्कशपणे हॉर्न वाजवत राहिला. तेव्हा ‘‘नाही सरकणार, काय करशील?’’ असं पुटपुटत मी त्याला एक सणसणीत लुक दिला. तर सिग्नल सुटल्यावर त्रासच द्यायला लागला गं. माझ्या गाडीला जवळजवळ रिक्षा चिकटवत वेडीवाकडी झिगझ्ॉग चालवत होता. मग माझंही डोकं सटकलं. गाडी रिक्षासमोर थांबवून मी उभी राहिले. तर म्हणाला,
‘‘एवढा माजुर्डेपणा कशाला करतीस ग? रस्ता काय तुझ्या बापाचा आहे का?’’ तरी मी शांतपणे बोलले हं, ‘‘माजुर्डेपणा तुम्ही करताय. सिग्नल पाळायला नको का?’’ तर शहाणा म्हणतो कसा, ‘‘२० र्वष रिक्षा चालवतोय. मला शिकवू नको. तुझी अक्कल ठेव तुझ्यापाशी.’’
‘‘अक्कल काढल्यावर मी पण चिडले, पण काय गं त्याची भाषा? गर्दी जमायला लागली. तेव्हा ‘जाऊ दे. तुम्हाला मान्य करायचंच नसेल तर बोलण्यात काय अर्थ आहे?’ असं म्हणून मी निघाले, तर माझ्या मागेमागे येत होता. मला एकदम खूप भीती वाटली ग. तो आता खुन्नस देईल का?’’
तिचं ऐकल्यानंतर सगळ्या जणींनी आपापले अनुभव सांगायला सुरुवात केली. ‘रिक्षावाले असेच असतात’ पासून ‘बेशिस्त भारतीय..खऱ्याची दुनिया नाही..’ इथपर्यंत वाट्टेल ते फाटे फुटले.

अस्वस्थपणे माझ्या शेजारच्या सायकलवर बसून अंजू सायकलिंग करायला लागली. मी तिच्याकडे पाहून हसले, तशी म्हणाली, ‘‘इतका क्षुल्लक प्रसंग आहे, पण टोकाची भीती वाटतेय गं. असली प्रचंड भीती मला सहसा वाटत नाही.’’
मी विचारलं, ‘‘दुसऱ्याच कशाची भीती वाटतेय का?’’ अंजू विचारात पडली. मग म्हणाली, ‘‘माझी बारावीतली मुलगी कुणी सिग्नल तोडताना दिसलं की काहीतरी बोलतेच. तिच्यासोबत असं काही घडलं तर? अशी काळजी वाटतेय बहुतेक.’’
‘‘ती तर आत्ता या क्षणी घरात गाढ झोपली असेल ना? उगीच रक्षणकर्त्यां आईच्या भूमिकेत शिरून भलत्या कल्पना करून घाबरू नको. निभावेल तिचं ती. आणखी कसली भीती आहे शोध जरा.’’
‘‘रिक्षावाल्यानं त्रास द्यायचं ठरवलं, घर पाहून ठेवलं तर? त्यानं गाडीचा नंबर तर पहिलाच आहे. गाडीतली हवा सोडून ठेवेल, पंक्चर करेल. म्हणजे ऐन गडबडीच्या वेळी खोळंबा.. अति केलं तर पोलिसांकडे जावं लागेल..’’
‘‘अगं, पुन्हा कल्पनेचे खेळ? त्यांनीच भीती वाढतेय तुझी.’’
अंजू क्षणभर गप्प झाली. मग हसून म्हणाली. ‘‘हो गं, कल्पनेचेच खेळ. आता भीती कमी झालीय, पण तरी ‘रिक्षावाले असेच’ असं सगळ्या म्हणाल्या ना, ते मनाला पटत नाहीये. या सगळ्यात माझीही थोडी तरी जबाबदारी आहेच ना? ते खटकतंय बहुतेक.’’
‘‘बघ. तुझ्या अस्वस्थतेचे बरेच पदर उलगडले.’’
‘‘हो गं, पण खरं सांगू का, ‘दृष्टिकोन बदलला की संवाद बदलतो, त्यामुळे रिझल्ट्स बदलतात’ यावर माझा पक्का विश्वास आहे. तसं असेल तर रिक्षावाल्याशी झालेला हा संवाद कसा असायला हवा होता?’’
अस्वस्थतेमागच्या मुळापर्यंत पोहोचण्याच्या तिच्या प्रक्रियेमध्ये आता मलाही उत्सुकता वाटली.
‘‘चल. आपण तुमच्यातलं सगळं ट्रान्झ्ॉक्शन रिवाइंड करून सुरुवातीपासून तपासू. कुठे बदलायला हवं होतं? रिक्षावाल्याच्या हॉर्नमुळे तू सरकली नाहीस ते ठीक. पण ‘नाही सरकणार, काय करशील?’ असं पुटपुटत उद्दाम लुक देण्याची काय गरज होती? रिक्षावाला तिथूनच खवळला.’’
‘‘मी उद्दाम? लोक मला मनमिळावू म्हणून ओळखतात. तुलाही माहितेय.’’
‘‘नेहमी मनमिळावू असतेस ग, पण आत्ता होतीस का? सकाळी सात वाजता रस्ता मोकळा असताना ‘एवढा’ संताप कशाचा?’’
जरा थांबून अंजूनं आठवण्याचा प्रयत्न केला. ‘‘हो, अगं, असाच प्रकार हल्ली पीएमटी बस ड्रायव्हरकडूनही होतोय. वाट दिली नाही तर गाडीच्या मडगार्डला बसचा हलकासा धक्कासुद्धा देतात. यांनीही नियम तोडले तर कुणाकडून अपेक्षा करायची? त्यात रिक्षावाल्याने पण तसाच माज दाखवावा?’’ तिचा सात्त्विक संताप पाहून मला हसू आलं.
‘‘बसवाल्यापेक्षा रिक्षावाल्यावर राग काढणं सोपं वाटलं ना?’’ मी चिडवलं.
‘‘असं नाही. वाहतुकीचे नियम माझ्यासमोर मोडले जात असताना कधीच अ‍ॅक्शन न घेणं हा भित्रेपणा नाही का?’’
‘‘अगं पण तू ज्या पद्धतीनं अ‍ॅक्शन घेतलीस त्यामुळे त्याची जाणीव जागी करण्याचा हेतू साध्य झाला का? भीती तर तुलाच जास्त वाटली.’’
‘‘उद्देश साध्य नाही झाला, पण त्यानं उद्धटपणे माझा बाप, अक्कल काढली, अगं तुगं केलं. तरी मी गप्प बसायचं?’’ अंजू पेटलीच.
‘‘म्हणजे त्यानं तुझा ईगो दुखावला. बरं, भांडून निष्पन्न काय? चार बघे जमले इतकंच. रिक्षावाल्याला तसंच भांडायची सवय असेल. पण तुझी देहबोलीसुद्धा अ‍ॅटिटय़ूड दाखवतच असणार. भाषा सभ्य असेल पण चिडलीस की तुझ्या आवाजात दादागिरी येतेच.’’
‘‘थोडी दादागिरी होती, पण त्यानं नियम पाळावा असा हेतू होता ना माझा?’’ इति अंजू.
‘‘हेतू चांगला असेल तर उद्धटपणे बोलायची परवानगी मिळते का? तू बस ड्रायव्हरवरचा राग रिक्षावाल्यावर काढलेला चालतो. त्यानं एखाद्या उद्धट गिऱ्हाईकाचा राग तुझ्यावर का काढायचा नाही?’’ अंजू थोडी वरमली. म्हणाली, ‘‘ओके. दिसतंय मला कसं घडत गेलं ते. फार सालं ओरबाडून नको काढू माझी. आता प्रश्न असा, की रिक्षावाल्याची प्रतिक्रिया वेगळी हवी असेल तर माझा संवाद कसा आणि कुठल्या टप्प्यावर बदलायला हवा होता?’’ आम्ही दोघी विचारात पडलो.
‘‘आता थोडं वेगळ्या दिशेनं जाऊन पाहू. समजा या रिक्षावाल्याच्या जागी एखादा ओळखीचा रिक्षावाला, किंवा गल्लीतला दादा किंवा मोठा अधिकारी आहे. तरीही कर्तव्य म्हणून तुला काहीतरी म्हणायचंच आहे. तर?’’
‘‘तर..तर..खुन्नसच्या लुकऐवजी मी त्याच्याकडे हसून पाहिलं असतं. ‘सिग्नल मिळेपर्यंत थांबा की साहेब’ असं काहीतरी मजेनं म्हटलं असतं.’’
आम्ही दोघीही एकमेकींकडे चकित होऊन पाहत राहिलो. संवादाची वेगळी दिशा-दृष्टिकोन सापडला आणि उलगडलंच सगळं. सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता सापडली आणि मनातला झगडा संपला. अस्वस्थता, भीती, संताप, ईगो, हरल्याची भावना पुसली जाऊन अंजूचा चेहराही उजळला. आपल्याला न पटणाऱ्या एखाद्या गोष्टीशी कसं डील करायचं आणि संवाद आपल्याकडून ‘सुफळ संपूर्ण’ करायचा याचा आम्ही दोघींनी नकळत एक ‘ड्राय रन’ घेतला होता.
या प्रसंगाने अनेक गोष्टी जाणवून दिल्या. आपण समानता, व्यक्तीसन्मान, मनमिळावूपणा, प्रामाणिकपणा, जबाबदारी घेणं, माणुसकी अशी तत्वं मनापासून मानतो. पण अपेक्षित आणि आणीबाणीच्या अशा दोन प्रकारच्या परिस्थितीत आपण तत्वानंच वागू असं नाही. आपण आपल्या लक्षातही न येता वेगवेगळं वागू शकतो. रिक्षावाल्याची चूक असल्याने तो गप्प बसेल, निदान वरमेल हे अंजूला अपेक्षित होतं. भांडणाची शक्यताही वाटली नव्हती. तो अनपेक्षितपणे आक्रमक झाला म्हणून मनातली अतिरंजित, काल्पनिक भीती, लपलेले ईगो बाहेर आले. एरवी ते कळलेही नसते.
रिक्षावाला हा निमित्त. त्याच्या जागी कुणीही जवळची-लांबची व्यक्ती असू शकत होती. खरा इंडिकेटर होता तो मनातल्या भीती आणि अस्वस्थतेचा अतिरेक. तिथे खोल कुठेतरी अस्वस्थतेचं मूळ असणार हे अंजूला जाणवलं म्हणून ही प्रक्रिया घडली. त्यातही अंजूनं स्वत:ला फक्त आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं असतं तर ती आपला हेतू चांगला होता एवढंच पटवत राहिली असती. तिची भूमिका घटना पाहणाऱ्या त्रयस्थ, प्रामाणिक साक्षीदाराची जास्त होती. त्यामुळे तर्कशुद्ध प्रश्नोत्तरांनी अंतरंग उलगडत नेलं. कुठल्याही जवळच्या नात्यातल्या गाठी- निदान काही गाठी उलगडता येतील अशी एक प्रक्रिया हाती आली. यातून उमगलं की, प्रगल्भ नात्याच्या स्थानकावर संवादातून पोहोचता येतं आणि चूक की बरोबरमार्गे जाण्यापेक्षा योग्य व न्याय्यमार्गे जाणं श्रेयस्कर ठरतं.

मराठीतील सर्व संवादाने रचला पाया बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Conversation