‘‘क्षुल्लक वाटणारी गोष्ट जेव्हा मोठी बनते तोच तर इंडिकेटर असतो स्वत:ला आणि परिस्थितीला तपासून पाहण्यासाठीचा. तू या प्रसंगाकडे विचारांच्या चष्म्यातून पाहतोयस आणि ती भावनेच्या चष्म्यातून पाहतेय इथेच तर गडबड होते. उल्का ‘तुझ्याच जेवणाखाण्याचं’ नीट होण्यासाठी ‘रोज’ सकाळी तुझ्याकडे दुर्लक्ष करते आणि तूही ‘घरासाठीच’ म्हणून उमेदीची र्वष उल्काच्या इच्छांकडे दुर्लक्ष करतोस. कर्तव्याच्या संस्कारांचा वेढा एकेकाला आलटूनपालटून पडतो. त्यातून दुसऱ्याची घुसमट होते..’’ भावनिक संतुलनासाठी काय करायला हवं ?
‘‘आज उल्का माझ्यावर वैतागून माहेरी निघून गेली. ‘तुझ्या अमर्याद जबाबदाऱ्या झेलायची शक्ती आल्यावर परत येईन, उगीच फोन करून माझं डोकं फिरवू नको,’ म्हणाली. तिच्याशी कसं वागावं तेच कळेनासं झालंय मला..’’ अतुलचा फोन आला.
‘‘एवढी कशामुळे वैतागली?’’ मानसीनं विचारलं.
‘‘बऱ्याच दिवसांपासून उल्का राजस्थान ट्रीपसाठी मागे लागली होती. अखेरीस गेल्या आठवडय़ात आम्ही तारीख ठरवली, तिनं बुकिंगही केलं आणि कालच कळलं की आमच्या ऑफिसचा झोनल हेड नेमका तेव्हाच येतोय. आता ट्रीप रद्द करण्याशिवाय काय पर्याय उरतो?’’
‘‘हं. तुझं काम, घरगुती अडचणी कशाकशामुळे तुमचे बेत रद्दच जास्त वेळा झालेत. तुमचा गोतावळाही मोठा.’’
‘‘खरंय, पण चक्क काल उल्का काहीच बोलली नाही. झोनल हेडसोबतची मीटिंग किती महत्त्वाची आहे, हे मी तिला समजावून सांगितलं आणि माझं काम करीत बसलो. सकाळी माझा डबा करून दिला आणि तेवढं एकच विचित्र वाक्य बोलून आईकडे निघून गेली. माझे फोनही घेईना, म्हणून शेवटी तुला फोन लावला.’’ अतुल हवालदिल.
‘‘हल्ली तुमची भांडणं बरीच वाढली होती का?’’
‘‘हो. वादासाठी काहीही निमित्त पुरतं. ‘तुला माझी किंमत नाही. तुझं काम आणि जबाबदाऱ्या यापलीकडे तुझ्यासाठी काहीच महत्त्वाचं नाही एवढंच तिचं पालुपद. खरं तर एकमेकांशिवाय जराही करमत नसताना हल्ली अशी आमच्यात कशावरूनही भांडणं का होतात?’’
‘‘तुम्ही ठरवलेला बेत पुन्हा एकदा रद्द झाल्यामुळे अपेक्षाभंगाचा कडेलोट झाला असणार.’’
‘‘पण जबाबदाऱ्या महत्त्वाच्या नाहीत का मानसी? आपण एकमेकांचे असतोच.’’
‘‘जबाबदाऱ्या महत्त्वाच्याच असतात, पण त्यांच्यातही प्राधान्य ठरवता येतं. उल्काही रोज नवा हट्ट धरणाऱ्यांपैकी नाही.’’
‘‘तू उल्काचीच मैत्रीण. बायका बायकांचीच बाजू घेणार.’’
‘‘तुम्ही दोघंही माझे मित्र आहात. मी फक्त डेटा म्हणून परिस्थितीकडे बघते तेव्हा काही गोष्टी जाणवतात. तुझ्या घरात सहसा अंतिम निर्णय तुझा असतो. सतत जबाबदाऱ्यांना प्राधान्य देता देता उमेदीची दहा र्वष निघून गेली हे तर खरं? प्रत्येक वेळी जबाबदारी एवढी अटीतटीची होती का रे?’’
‘‘पण मी काही मुद्दाम करतो का? परिस्थितीच तशी येते. मी घरातला कर्ता, ऑफिसातही अतिशय जबाबदारीच्या पदावर, त्यामुळे असं होणारच. तिनं समजून घ्यायला नको? रागानं निघून जाण्याएवढी ट्रीप मोठी कशी झाली?’’
‘‘चिडू नकोस. इतकी क्षुल्लक वाटणारी गोष्ट एवढी मोठी बनते हाच तर इंडिकेटर असतो अतुल, स्वत:ला आणि परिस्थितीला तपासून पाहण्यासाठी. उल्का तिची नाराजी तुझ्यापाशी बोलून दाखवत असेल पण अडचणीमध्ये तिनं जबाबदारी टाळली असं कधी वाटतं तुला?’’
‘‘कधीच नाही. अशा वेळी ती अतिशय तत्पर असते.’’
‘‘तरीही आज ती एवढी वैतागली असेल, तर काय घडतंय याकडे त्रयस्थपणे पाहायला हवं ना? मुद्दा प्राधान्याचा आणि एकमेकांच्या भावना समजून घेण्याचा असतो. आजचा तूच सांगितलेल्या प्रसंगातून मला तुझ्यापेक्षा वेगळं चित्र दिसतंय.’’
‘‘???’’
‘‘ट्रीपला जाण्यासाठी उल्का खूप आतुर आहे. बुकिंग झाल्यामुळे ती मनानं तुझ्यासोबत राजस्थानात पोहोचलीय आणि अचानक इतकी हाताशी आलेली ट्रीप रद्द झाल्याचं नवरा शांतपणे सांगतो. या दृश्यात तिच्या निराशेची तीव्रता नवऱ्यापर्यंत पोहोचलीय आणि त्यावर तो हळुवार फुंकर घालतोय असं कुठेच दिसत नाही.’’
‘‘असं कसं? मलाही वाईट वाटणारच ना?’’
‘‘वाटलं असेल हे गृहीतक झालं. पण ‘मलाही वाईट वाटतंय.’ ही तुझी भावना तू तिच्यापाशी शब्दांनी, स्पर्शातून व्यक्त केलीच नाहीस. उलट, ‘ही मीटिंग किती महत्त्वाची होती’ ते पटवून लगेच शांतपणे कामालाही लागलास. म्हणजे तुझ्यासाठी ऑफिसचं काम सर्वोच्च असाच निष्कर्ष निघतो ना?’’
‘‘असं झालं का?’’ अतुल गडबडला. पण लगेच सावरून म्हणाला, ‘‘पण व्यक्त करायला कशाला पाहिजे? तिला समजायला हवं.’’
‘‘तू या प्रसंगाकडे विचारांच्या चष्म्यातून पाहतोयस आणि ती भावनेच्या चष्म्यातून पाहतेय इथेच तर गडबड आहे अतुल. तुमच्या दोघांच्या भावनांची पातळी पहिली, तर तू उत्साहाच्या चौथ्या पायरीवर होतास, उल्का दहाव्या पायरीवर पोहोचली होती. तिच्याएवढा गुंतलेला नसल्यामुळे ट्रीप रद्द करताना तू व्यवहारी विचार केलास, मीटिंगचं महत्त्व स्वत:ला समजावून तुझी भावना पहिल्या पायरीवर सहज आणलीस. उल्का दहाव्या पायरीवर आहे याचं गांभीर्य जाणवलंच नाही तुला. त्यामुळे तू तिचीही तशीच समजूत घालायला बघितलीस. तू पहिल्या पायरीवर इतका सहज जाऊन पोहोचलेला तिला दिसलास तेव्हा आपल्याला एकटीलाच सहवासाची ओढ वाटतेय हे जाणवून ती एकाकी झाली, तुझ्यापासून आणखी दूर, थेट वरच्या मजल्यावरच पोहोचली असणार हे दिसतंय का तुला? तुझ्या कामापुढे आपल्याला पुन्हा एकदा डावललं गेल्याच्या निराशेची तीव्रता तुला कळलीसुद्धा नाही, हे दु:ख ट्रीप रद्द झाल्याच्या दु:खापेक्षा फार मोठं असणार अतुल.’’
‘‘तू उलगडून सांगितल्यावर आता जाणवतंय मला, पण ती भडकणार या भीतीनं गोंधळायला होतं. काय करायला हवं होतं मी?’’ अतुलचा आवाज उतरला.
‘‘तुलाही वाईट वाटलंय हे एखादी पायरी वर येऊन तिच्यापर्यंत पोहोचवलं असतंस तर तिला तुझी भावनिक सोबत वाटली असती. तीही दोन पायऱ्या खाली आली असती. त्यानंतर ‘येत्या वीकेण्डला आपण जवळच कुठे तरी दोन दिवस जाऊन येऊ,’ असा काही तरी मधला मार्ग काढला असतास तरी ती खुलली असती, कारण तिच्या तीव्र भावनेला तू साथ दिलीस.’’
‘‘असं काही मला सुचतच नाही गं.’’
‘‘असं लहान-मोठय़ा प्रसंगात नेहमीच होत असणार. ‘मला सुचतच नाही’ हे समर्थन सतत स्वीकारलंस तर हा विसंवाद वाढतच जाईल अतुल. खटकणाऱ्या भावनिक घडामोडी उलगडून पाहायला शिकायला हवं. उल्काच्या जागी जाऊन तिच्या नजरेतून पाहा. मग कळेल, की तिच्या विश्वात तुझा विचार सदैव पहिला आहे. तुझ्या वागण्यात मात्र तिचं, तिच्या इच्छांचं प्राधान्य बहुतेकदा दुय्यम. नाटक-सिनेमासारख्या छोटय़ा गोष्टींसाठीसुद्धा तुझी सोबत मिळावी म्हणून ती महिनामहिना वाट पाहते पण तुझ्या लेखी या गोष्टी फालतू, नकळतपणे त्यामुळे उल्काच्या इच्छाही फालतू, फक्त काम, जबाबदाऱ्या महत्त्वाच्या असं चित्र दिसतं. तुझ्या कुठल्याही प्राधान्यासाठी तू उल्काची सोबत गृहीत धरणार पण तिची छोटीशीही इच्छा वारंवार डावलली जाणार. त्यामुळे हळूहळू उल्काची निराशा टोक गाठणार. आज ती माहेरी निघून गेली यापेक्षा, ‘तुला हे नाहीच कळणार’ याची तिला खात्री वाटली, तुझ्या सोबतीची तिनं अपेक्षाही केली नाही हे गंभीर आहे.’’
‘‘कालच्या प्रसंगाबाबत मान्य आहे, पण असं दुर्लक्ष उल्काकडूनही घडतं. सकाळी चहाच्या टेबलवर मी तिची वाट बघत असतो. बोलायला तेव्हाच दहा-पंधरा मिनिटं मोकळी असतात कारण ऑफिसातून येण्याची वेळ माझ्या हातात नाही. उल्का समोर असली तरी तिचं लक्ष दूधवाला, डबा, कामवाली यांच्याकडेच असतं. माझ्यासोबत नसतेच ती.’’
‘‘हेच तर एकमेकांना गृहीत धरणं असतं ना, आणि तेही आपलेपणातून आलेलं. उल्का ‘तुझ्याच जेवणाखाणाचं’ नीट होण्यासाठी ‘रोज’ सकाळी तुझ्याकडे दुर्लक्ष करते आणि तूही ‘घरासाठीच’ म्हणून उमेदीची अनेक र्वष उल्काच्या इच्छांकडे दुर्लक्ष करतोस. कर्तव्याच्या संस्कारांचा वेढा त्या त्या वेळी एकेकाला आलटूनपालटून पडतो. त्यातून दुसऱ्याची घुसमट होते.’’
‘‘म्हणजे नक्की वागायचं कसं मानसी?’’
‘‘मुख्य मुद्दा जबाबदारी आणि गृहीत धरण्याच्या अतिरेकाचा आहे हे समजून घ्यायचं. तीव्र भावनांचा पुन:पुन्हा विरस झाला की संताप आणि निराशा येते. त्यानंतर टोकाला जाण्यासाठी छोटय़ाशाही प्रसंगाचा, शब्दांचा ट्रिगर पुरतो. आपल्याला हवंय ते कधीच मिळणार नाही, असं वाटायला लागलं की माणूस अतिरेकी पावलं उचलतो. म्हणून जाणीव जागी ठेवायची. जोडीदाराच्या भावनांनाही अधूनमधून प्राधान्य द्यायचं. भावना बाराव्या पायरीवर पोहोचू द्यायच्या नाहीत. कारण त्या टोकावर विचाराला थारा नसतो. त्यामुळे तुम्ही दोघंही शांत असताना याबद्दल बोलून आपल्या भावना आणि विचार शेअर केल्यात तर मधला मार्ग निघू शकतो. थोडक्यात, भावनांचं संतुलन विचारांनी करायचं.’’
‘‘मग आता मी उल्काला फोन करू की घ्यायला जाऊ?’’
‘‘असं रेडीमेड सोल्युशन मी नाही सांगू शकत. कारण ते तुला शिकायचंय. तू जेव्हा तिच्या भावनिक पातळीला समजू शकशील तेव्हा काय करायचं तेही तुझं तुलाच उमगेल. आणि हो, उल्कालाही मी तुझी बाजू दाखवून हेच सांगेन बरं का.’’
फोन ठेवताना अतुलच्या विचारमग्न चेहऱ्यावर हसू उमटलं.
नीलिमा किराणे
neelima.kirane1@gmail.com