‘‘घर म्हणजे फक्त स्वयंपाक आणि मुलगा का? तुझ्या संसाराच्या व्याख्येत एकमेकांना समजून घेणं, एक जण कमी पडेल तिथे आधार देणं नाहीच का? मला बिझनेसच करायचाय हा जसा अंशुमनचा हेका होता, तसाच ‘अंशुमननं माझ्या अपेक्षेप्रमाणेच जबाबदार असावं’ हा तुझाही हेकट इगोच आहे.’’

हल्ली राधा बरेचदा तंद्रीत दिसायची. मनातल्या मनात कुणाशी तरी बोलतेय असं वाटायचं. कधी डोळ्यांत पाणी असायचं तर कधी विखार. आमची इव्हिनिंग वॉकची मैत्री. म्हणजे ओळख जुजबी पण भेट रोजची. तिचा तीन वर्षांचा मुलगा रॉकी आणि बिझनेसवाला नवरा अंशुमनही क्वचित सोबत असायचे. एकदा बाकावर ती एकटीच रडत बसलेली पाहून मी ‘काय झालं?’ विचारायला गेले, तर आवेगानं म्हणाली,
‘‘मला घरात राहावंसं वाटत नाहीये दीदी. अंशुमनला सहन करणं अशक्य होतंय.’’
‘‘भांडण झालं का आज?’’
‘‘भांडणं होऊन संपली. आता संवादही संपलाय. ‘तुझं तोंड कायम असं उदास, दु:खी का? मी काय करतो तुला?’ म्हणून चिडला आज. रॉकीसमोर तमाशा नको म्हणून मी बाहेर पडले.’’
‘‘तुला त्रास होणार नसेल तर पहिल्यापासून सांगशील का?’’
‘‘..अंशुमनच्या आणि माझ्या वडिलांची जुनी मैत्री. अंशुमन इंजिनीअर, देखणा, सुस्वभावी. घरातल्या मोठय़ांच्या बोलण्यातून लग्न ठरून गेलं. मी ग्रॅज्युएट झाल्या झाल्या लग्न झालं आणि त्याच्या कंपनीच्या एका प्रोजेक्टवर आम्ही परदेशी गेलो. ती दोन र्वष अतिशय सुंदर होती. खूप काळजी घ्यायचा माझी. त्याच्या हुशारीमुळे संधी फटाफट मिळाल्या. सेव्हिंग्जही भरपूर झाली. भारतात परतल्यावर वर्षभरानं याला नोकरीचा कंटाळा आला. बिझनेस करायचं खूळ डोक्यात घेतलं. त्याची वृत्ती बिझनेसवाल्याची मुळीच नाही. सगळं आयुष्य धाकटेपणाच्या लाडात गेलंय. स्वभाव भिडस्त. धंद्याचे टक्केटोणपे खाणं, प्रसंगी कठोर होणं त्याला नाही जमत. पण आर्थिक अडचणीतही राहणीमान उच्चच. प्रवासाला कार किंवा फ्लाइटच. सेकंड एसीचा रेल्वेप्रवाससुद्धा बिलो डिग्निटी. या सगळ्यामुळे वर्षभरात भरपूर लॉस झाला. सुदैवानं सॉफ्टवेअरचं एक परदेशी काँट्रॅक्ट मिळालं. सगळी सेव्हिंग्ज संपवून आम्ही इथली देणी मिटवली आणि तिकडे गेलो. तिथे मलाही एक छोटा जॉब मिळाला.’’
‘‘पहिल्यांदाच घराच्या बाहेर पडली असशील ना?’’
‘‘हो. बाविसाव्या वर्षी गेले तेव्हा ‘पती परमेश्वर’वाल्या पारंपरिक संस्कारात वाढले होते. परदेशी येऊनही माझं विश्व अंशुमनभोवतीच फिरत होतं. पण आता जॉब करताना माझ्या तिथल्या मैत्रिणींच्या विचारातला स्वतंत्रपणा, स्वत:चे निर्णय स्वत: घेणं मला जाणवत गेलं. त्यांचा आत्मसन्मान त्यांचे नवरेही कसा जपतात ते मी पाहिलं. मग अंशुमनचा हेकटपणा, मला गृहीत धरणं, बालिश चिडचिड तीव्रपणे जाणवायला लागली. हॉटेलमध्ये गेल्यावर मला काय हवंय? ते न विचारताच तो नेहमी त्याला आवडणारी ऑर्डर माझ्यासाठी देतो. कम्फर्टेबल वाटतं म्हणून घरात मी थोडे जुने सुती कपडे घालते. तर ‘असलं जुनं का घालतेस, बावळट. आपल्याला काय कमी आहे?’ म्हणून भांडतो. इतक्या छोटय़ा गोष्टींवर पण याचाच ताबा. मग माझी चिडचिड होते.’’
‘‘हे तू त्याला कधी सांगितलंस का?’’
‘‘सांगून पाहिलं. पण तो उडवून लावतो. खातोय, पितोय, भटकतोय, हवं ते आणून देतोय. क्षुल्लक गोष्टींत काय अडकते? इथपर्यंतच विचार जातो त्याचा. एवढे देश फिरूनही तो बुद्धिमान, लाडावलेला धाकटा मुलगा आणि टिपिकल भारतीय नवराच राहिलाय.’’
‘‘तुमची भांडणं तेव्हाच टोकाला गेली का?’’
‘‘नाही. तरीही आवडत होतो आम्ही एकमेकांना. दोन वर्षांनी बरी कमाई करून परतलो तेव्हा रॉकीची चाहूल लागली होती. तर याच्या डोक्यात पुन्हा बिझनेसचं खूळ. पुन्हा तेच चक्र.’’
‘‘तू थांबवलं नाहीस का?’’
‘‘आता मला तुझ्या सोबतीची गरज आहे. बिझनेसचे ताण झेपत नाहीत तुला.’’ असं म्हणाले तर चिडला. माझं ऐकलं नाहीच. दिवस-रात्र फक्त काम. डोक्यातही तेवढाच विषय. घरात मी एकटी. पूर्ण नऊ महिने मला खूप त्रास झाला. माझी आई, सासू मध्येमध्ये येऊन राहायच्या. पण अंशुमनची सोबत शून्य. माझ्यापेक्षाही काम महत्त्वाचं.’’
‘‘तेव्हापासून तू मनातून दुरावत गेलीस का?’’
‘‘हो. अंशुमनला जमत नव्हतंच. पैशाची चणचण. मग सगळं फ्रस्ट्रेशन घरात काढायचा. मी काही म्हटलं की अजून संताप. थयथयाट. वस्तू फेकणं, फडाफडा स्वत:च्या थोबाडीत मारून घ्यायचा. किती वेळा घर सोडून गेला. त्याच्या या अनोळखी रूपानं हादरून गेले मी. रॉकी झाल्यांनतरही काही काळ ते चालू होतं. या सगळ्यातून मी अंशुमनलाच विटत गेले. नंतर व्यवसायाची घडी बसली, घरी वेळेवर यायला लागला, मला कितीदा सॉरी म्हणाला. पण..’’
‘‘या सगळ्यात तुमच्यातलं पतीपत्नीचं नातंही दुरावलं असेल..?’’
‘‘..हो. माझ्या मनातली जवळीक संपली. माझ्या थंडपणानं तो चिडायचा. मग जबरदस्ती न करता आपण काही काळ मित्र-मैत्रिणीसारखे एका घरात राहू असंही आम्ही ठरवलं. पण त्याचा अर्थ फक्त रात्री पती-पत्नीचं नातं नाही असा तो घेतो. माझ्या प्रत्येक लहानसहान गोष्टींत मोठेपणाचा सल्ला, आवडलं नाही की कडवट कमेंट असणारच. या सततच्या अपेक्षा, नवरेगिरीमुळेच त्याच्याबद्दलची ओढ संपते, नातं कोरडं होतं हे कळत नाही त्याला.’’
‘‘माहेरी माहितेय का हे?’’
‘‘दोन्ही घरी माहितीय. सगळे मलाच वेडय़ात काढतात. ‘नवरे असेच असतात. आता पैशाची कमी आहे म्हणून तुझे नखरे चाललेत.’ म्हणतात. एकदा सासऱ्यांनी सहा महिन्यांच्या घरखर्चाएवढे पैसे माझ्या हातात ठेवले आणि ‘आता शांत रहा’ म्हणाले. खूप लाजिरवाणं, अपमानित वाटलं. अंशुमनच्या बेजबाबदारपणामुळे ही वेळ आली. आता त्याचा बिझनेस कितीही जोरात चालला तरी सन्मान संपलाच. रॉकीसाठी एकत्र राहायचं, पण अंशुमनसोबत ना मैत्रिणीसारखं राहता येत, ना बायकोसारखं. काय करू मी?’’
‘‘मधल्या त्रासदायक भूतकाळाला फार घट्ट धरून बसलीयस तू राधा. त्याचं अनपेक्षित वागणं तुला झेलता आलं नाही. शिवाय ‘मी सांगत होते तरी तू ऐकलं नाहीस’चा राग पण आहेच. त्याच्या जागी जाऊन बघ. तोही बिझनेस नव्यानं शिकत होता. ती एक दुर्दैवी फेज होती राधा. तुझा आधाराचा हात त्याला तेव्हा हवा असणार.’’
‘‘मला त्याचा हात हवा होता तेव्हा कुठे आला तो?’’
‘‘हो, पण ते जाणूनबुजून नव्हतं. माझ्या गरजेला तू नव्हतास, आता तुझ्या गरजेला मी का येऊ? या वृत्तीतून नुकसान कुणाचं होतंय? अंशुमनच्या बेजबाबदार, बालिश, हेकटपणाला दोष देत, तूही तशीच वागतेयस?’’
‘‘असं कसं दीदी? याही परिस्थितीत मी घराची जबाबदारी पूर्ण करतेय.’’
‘‘घर म्हणजे फक्त स्वयंपाक आणि मुलगा का? तुझ्या संसाराच्या व्याख्येत एकमेकांना समजून घेणं, एक जण कमी पडेल तिथे आधार देणं नाहीच का? तुमच्या भांडणांमुळे छोटय़ा रॉकीला जे असुरक्षित वाटत असेल तो बेजबाबदारपणाच झाला ना? मला बिझनेसच करायचाय हा जसा अंशुमनचा हेका होता, तसाच ‘अंशुमननं माझ्या अपेक्षेप्रमाणेच जबाबदार असावं’ हा तुझाही हेकट इगोच आहे. चुका दोघांच्याही झाल्यात. तो पारंपरिक नवरा आणि तू तलवार उगारलेली मर्दिनी. अपेक्षांबाबत तो बालिश असेलही, पण तुझं रुसणं-फुगणं, अबोला बालिशपणाच नाही का? प्रगल्भ संवाद तुला तरी कुठे जमला? तरीही तुझ्या मनातलं ओळखून त्यानं स्वत:ला बदललं पाहिजे ही अपेक्षा अवास्तव नाही का? तू खूप सहन केलंस हे मान्य आहे, पण त्याचं भांडवल करून उगाळत राहायचं की अंशुमनमधल्या चांगल्या गोष्टींकडे बघायचं?’’
‘‘त्याचं विक्षिप्त वागणं आठवलं तरी कसं तरी होतं.’’
‘‘अगं, त्या फेजमधल्या विचित्र वागण्याचं भान येऊन अंशुमन तुला सॉरी म्हणतो. मित्र-मैत्रिणीसारखं राहायलाही तयार होतो हे कसं नजरेआड करतेस राणी? त्याला वागायचं कळलं नसेल, पण तू हवी आहेस त्याला. तुझं प्रेम मात्र फक्त तुझ्या अपेक्षांवर, अंशुमनवर नाही असं चित्र दिसतंय. काहीही केलं तरी तू नाराजच. त्यामुळे गोंधळला असणार तो. आधी व्यवसायात हारतच होता. त्यात तूही रिजेक्ट केल्यामुळे आणखी हताश होत असणार. त्याची आदळआपट त्या असाहाय्यतेतून होती हे समजून घे राधा. जे प्रसंग तुला अधिकार गाजवल्यासारखे वाटतात ते त्याच्या दृष्टीनं प्रेम व्यक्त करणं असू शकतं. एकाच गोष्टीकडे पाहण्याचे दोघांचे दृष्टिकोन वेगवेगळे आहेत एवढाच खरं तर ब्लॉक आहे. मोकळ्या संवादातून तो संपू शकतो.’’
‘‘पण संवाद उरलाय कुठे दीदी आमच्यात..’’
‘‘कुणा मोठय़ांची किंवा समुपदेशकाची मदत घेऊ शकाल. एकत्र राहायचा निर्णय पक्का असेल तर पुन्हा नव्यानं एकमेकांना समजून घ्यायलाच हवं. संपूर्ण आयुष्य एकमेकांना बोचकारत जगणं किती अवघड असेल? नकोशा गोष्टी डोक्यात घोळवत बसण्यापेक्षा, लग्नानंतरच्या पहिल्या दोन सुखी वर्षांचा विचार करत घरी जा राधा. अंशुमन आणि रॉकी तुझी वाट बघतायत.’’

Bharatiya Janata Party continues to pursue the state government for waiver of penalty on property tax panvel municipal corporation
पनवेल: शास्तीमाफीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
Mazagon Dock Shipbuilders limited
नोकरीची संधी : माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये भरती
article for husband and wife to maintaining healthy relationships
समुपदेशन : तुमचं ‘रॉटन रिलेशनशिप’ नाही ना?
loksatta money motra article Growth and Value strategy
तुमची रणनीती काय? ‘ग्रोथ की व्हॅल्यू’
stock market sensex and nifty
खिशात नाही आणा…
Order to seize Ajit Pawar property cancelled Mumbai news
शपथ घेतली, चिंता मिटली; अजित पवारांना दिलासा, मालमत्तेवर टाच आणण्याचा आदेश रद्द

– नीलिमा किराणे
neelima.kirane1@gmail.com

Story img Loader