‘स्त्री-पुरुषाची नुसती मैत्री अशक्य, शारीरिक संबंधही असणारच,’ या काल्पनिक विचारातल्या भोवऱ्यातलं त्याचं गरगरणं. यामुळे त्याला तिच्याकडून तशी कबुली हवी होती. सतत प्रश्न, मोबाइल तपासणं, पर्स उचकणं, ती जाईल तिथे फोन. अशा संशयी वातावरणात तिने काय करायला हवं? शक्यतो घटस्फोट होऊ नयेत हे खरं असलं तरी तो नियम नव्हे. नातं टिकवण्याची जबाबदारी दोघांचीही असते. पण ते ज्याचं त्याला कळायला हवं ..
ती दोघं वैवाहिक समस्या घेऊन आली होती. तो संतापलेला, उद्विग्न. ती निर्विकार, थकलेली. बोलायला सुरुवात त्यानं केली. त्यांच्या लग्नाला दहा र्वष झाली होती, एक मुलगा होता. ‘ती’ बँकेत मॅनेजर, ‘तो’ तहसीलदार. पोस्टिंग कधी इथे, कधी बाहेरगावी. तिची बदली जवळपासच, त्यामुळे मुलाच्या शिक्षणाच्या दृष्टीने त्यांनी इथे शहरात घर घेतलं होतं.
अलीकडे त्याला बायकोच्या वागण्या-बोलण्यात काहीतरी विसंगती वाटायला लागली. तिचे फोन, सोशल मीडिया तपासूनही काही सापडलं नाही, पण एका सहकाऱ्याशी होणारं चॅटिंग त्याला आक्षेपार्ह वाटलं. त्यावरून खोदून खोदून विचारत राहिला. भांडणं अति झाल्यावर तिनं सांगितलं, ‘‘आमची मैत्री आहे, मी त्याच्याशी नेहमी बोलते, त्याच्याबरोबर नाटक-सिनेमालाही गेले होते.’’ त्याला प्रचंड त्रास झाला. ‘स्त्री-पुरुषाची नुसती मैत्री अशक्य, शारीरिक संबंधही असलेच पाहिजेत’ असं त्याचं ठाम मत. त्यामुळे त्याला तिच्याकडून तशी कबुली हवी होती. सतत प्रश्न, मोबाइल तपासणं, पर्स उचकणं, ती जाईल तिथे फोन. गेले तीन महिने बिनपगारी रजा घेऊन एकीकडे ही हेरगिरी चालू होती, तर दुसरीकडे ‘आता माझ्या संसाराचं आणि मुलाचं कसं होणार?’ म्हणून रडायचा. अखेरीस त्यांनी समुपदेशकाकडे जाण्याचा निर्णय घेतला होता.
‘‘आता तुम्हीच सांगा हिला काहीतरी.’’ तो म्हणाला.
‘‘मॅडम, यानं अर्धाच भाग सांगितला.’’ ती शांतपणे म्हणाली. ‘‘लग्नापासून आमचं दोघांचं नातं कधी प्रेम-आपुलकीचं नव्हतंच. लग्नात देण्या-घेण्यावरून काही गैरसमज झाले. नंतर वस्तुस्थिती स्पष्ट झाली तरीही याच्यासह सासरच्यांनी गैरसमज धरून ठेवला. माझ्या माहेरच्यांचा अपमान करतात, मी माहेरी गेलेलंही चालत नाही, पण मी जाते. माझ्या कशावरही याची फक्त टीका. सतत डाफरतो. त्यामुळे याला मी आवडत नाही असंच मला वाटायचं. मुलाच्या जन्माच्या वेळी माझी खूप बारीकसारीक आजारपणं झाली. तेव्हा याची बाहेरगावी पोस्टिंग होती. तिथे याला एक मैत्रीण मिळाली. त्यांच्या जवळिकीनं मर्यादा पार केली होती, असं त्यानंच फुशारकीनं सांगितलं मला. मी आजारी, बाळंतीण, एकटी पडले, पार कोसळून गेले.’’
‘‘त्याला मी आवडत नव्हतेच, आता जगण्यातला अर्थच संपला. जीवाचं बरंवाईट केलं नाही, पण मनानं मेलेलीच होते. तेव्हा बँकेतल्या या सहकाऱ्यानं खूप आधार दिला. त्यातून बाहेर काढलं. आपण चांगले आहोत, कुणाला तरी आवडू शकतो ही भावना मिळाल्यामुळेच मी पुन्हा माणसात आले. नंतर आमच्या शाखा बदलल्या, तरी आम्ही संपर्कात असतो, कधीतरी भेटतो. आमची फक्त मैत्री आहे. त्याचीही ‘तशी’ अपेक्षा नाही.’’
‘‘तेच तर पटत नाही मला..’’ त्याचं मध्येच बडबडणं.
‘‘संशयाचं म्हणाल तर लग्नानंतरच्या नव्या नवलाईच्या दिवसांत सुद्धा ‘अमक्याकडे का पाहिलंस?’ ‘त्याच्याशी का बोललीस?’ असेच याचे प्रश्न. अगदी चुलत दिरांशीसुद्धा हसूनखेळून वागायचं नाही. माझ्यावर याची फक्त मालकी, आपुलकी नाहीच. त्याच्या आताच्या असाहाय्य होण्यामुळे ‘याला मी हवी असू शकते’ असं वाटलं, पण किती सांगितलं तरी ‘तुमची शारीरिक जवळीक आहेच’चं खूळ संपेना. कारण याची त्याच्या मैत्रिणीशी तशी जवळीक होती.’’
‘‘पण आता आमचं काही नाही, तुला माहितीय ना?’’ तो गुरगुरला.
‘‘तिचं लग्न झालं म्हणून तिनं अच्छा केलं तुला. माझं माझ्या मित्राशी कधीच ‘काही’ नव्हतं.’’
‘‘इथे तरी खरं बोलेल म्हणून इथे आणली, पण ही काही कबूलच करे ना.’’ तो म्हणाला.
‘‘तिला मान्य करायला लावण्यासाठी माझी मदत घेताय की तुम्हाला प्रश्न सोडवायला मदत हवीय?’’
‘‘दोन्ही एकच ना?’’ त्याच्या प्रश्नावर मी थक्क झाले.
‘‘समजा तिनं मान्य केलं, तर सोडचिठ्ठी देणार का?’’
‘‘तिनं ते सर्वासमोर मान्य केल्यावर मी ठरवेन.’’
‘‘पण काही नसेलच तर मी का मान्य करू?’’
‘‘असं शक्यच नाही. आज ना उद्या तुला मान्य करावंच लागेल.’’
‘‘म्हणजे कंटाळून तिनं एकदाचं मान्य करावं एवढं तुम्ही तिला छळणार. मग त्यापेक्षा आताच का नाही सोडचिठ्ठी देत? तुमचा तिच्यावर असाही विश्वास नाहीच. मग अट्टहास कशाला?’’
‘‘माझ्यावर प्रेम असेल तर त्याच्याशी बोलणं थांबवावं आणि नोकरी ताबडतोब सोडावी. तरच मी मान्य करेन की तिला माझी किंमत आहे. मग ठेवेन कदाचित मी तिला घरात. पण तिनं कबूल केलं नाही तर तिला सोडण्याचं किंवा तिनं नोकरी सोडण्याचं कारण घरच्यांना, समाजाला काय सांगू? माझी काय इज्जत राहील? साधी बायको सांभाळू शकत नाही म्हणून हसतील.’’
‘‘जगाची पर्वा वाटतेय, पण तुम्ही केलेल्या प्रकरणाचं काय?’’
‘‘पुरुषाची मर्दानगी असते मॅडम त्यात. आमच्यात अशा एखाद्या प्रकरणाचं काही विशेष वाटत नाही. तुम्हाला नाही कळायचं ते.’’
‘‘खरं आहे, स्त्री-पुरुषांसाठी समान न्यायाचा प्रश्न येतो तेव्हा जे घडतं ते बायकांना नाहीच कळत. ते राहू दे, पण तुमच्या मते याचा संबंध मर्दानगीशी असेल तर हे पुन्हाही घडू शकतं.’’
‘‘ही अशीच वागली तर घडेलच.’’
‘‘म्हणजे याच्या प्रकरणांची जबाबदारीही माझीच. याला माझी गरज कधी कळलीच नाही हो, याला ‘मी हवी आहे’ असं जराही वाटलं असतं तरी मी कधी कुणाकडे ढुंकूनही पाहिलं नसतं. आजही पाहणार नाही. पण माझ्या ओढीनं माझ्याकडे येतच नाही हा. नैराश्यामुळे आत्महत्येचे विचार थांबेनात तेव्हा जिवंत राहण्यासाठी मी एक मदतीचा हात घेतला, कारण बाळ होतं मला. याच्या-माझ्यात मैत्रीचं नातं थोडंही नाही याचं गांभीर्य याला वाटतच नाही. शारीरिक जवळिकीच्या काल्पनिक राक्षसाभोवतीच फिरत राहतं याचं डोकं. माझी काही किंमत नाही. आजारपणात डॉक्टरांनी नोकरी सोडायचा सल्ला दिला होता, तेव्हा ‘जबाबदाऱ्या आहेत’ म्हणून काम करायला भाग पाडलं यानं. आर्थिक स्वातंत्र्य असूनही मी हा ताण झेलतेय, त्यानं प्रेमानं माझ्याकडे येण्याची अजूनही वाट पाहतेय, मुलाला आई-बाप दोन्ही हवेत म्हणून थांबलेय. हे काही कळतच नाही याला. जाऊ दे, निभेल तितकं निभेल. नाहीतर आहेच वेगळं होणं.’’ ती निराशेनं म्हणाली.
तिच्या चेहऱ्यावरच्या निर्विकार थकलेपणाचा अर्थ मला आता स्पष्ट दिसला. ती त्याच्यापेक्षा प्रगल्भ होती. तिच्या बोलण्याला तो विरोध करत नव्हता म्हणजे ती प्रामाणिक होती. पण शारीरिक जवळिकीच्या काल्पनिक भोवऱ्यातून बाहेर येणं त्याला कळतही नव्हतं, तर जमणार कुठून?
हा माणूस म्हणजे टिपिकल पुरुषी मानसिकतेचा नमुना होता. सगळं स्वत:च्या मनाप्रमाणेच हवं, शिकलेली, कमावती बायको हवी पण माझ्या इशाऱ्यावर नाचणारी. मला वाटतं तेच खरं याचा अट्टहास, मर्दानगीच्या विचित्र कल्पना, सर्वासमोर कबूल करून घेऊन मान कायमची खाली ठेवायला लावायची, नोकरी सोडायला लावून पंख कापून पिंजऱ्यात ठेवायचं म्हणजे समाज याला शेर समजणार. सोडचिठ्ठी दिली तरीही दोष तिच्याच गळ्यात.
शक्यतो घटस्फोट होऊ नयेत हे खरं असलं तरी तो नियम नव्हे. नातं टिकवण्याची जबाबदारी दोघांचीही असते. परिस्थिती आणि निष्पन्न महत्त्वाचं. खचत, विटत, फाटत दोघांपैकी एकाच जोडीदारानं नातं किती काळ ओढत राहावं? पारंपरिक वातावरणात, जिथं स्त्रियांना आर्थिक स्वातंत्र्य नाही, कुणाचा आधार नाही, तिथे नाइलाज असतो पण आर्थिकदृष्टय़ा सक्षम, माहेरचा आधार असणाऱ्या, विशेषत: वैचारिक प्रगल्भता असणाऱ्या मुलींनी, कुटुंबीयांनी ‘अशा परिस्थितीत’ समाजाच्या भीतीपलीकडे जाऊन वस्तुनिष्ठ विचार करायला हवा. मरेपर्यंत अविश्वास, संशय, अपमान सोसत अगतिक आयुष्य जगायचं की काही काळाचा अवघड टप्पा स्वीकारून आत्मसन्मान सांभाळायचा, आत्मनिर्भर व्हायचं हा निर्णय वैयक्तिक असतो.
ती दोघं पुन्हा आली नाहीत पण अजूनही दोघांसाठीही वाईट वाटतं. कारण तिला जगणं मुश्कील करताना तोही नरकातच जगत होता. पिढय़ानपिढय़ाची पुरुषी मानसिकता हा ‘ट्रॅप’ आहे हे न कळल्यामुळे ईगो दुखावणं, अपमान, असाहाय्यता, असुरक्षितता, दु:ख, हरल्याची भावना, मालकी हक्क, लाजिरवाणं वाटणं, संताप अशा सगळ्या भावनांच्या भोवऱ्यात तो गरगरत होता. माझ्या गाईडमध्ये लिहिलंय तेच माझ्या गणिताचं उत्तर आलं पाहिजे, या अट्टहासातून तो बाहेर पडू शकला असेल का? की तिनं हताश होऊन निघून जाण्याचा निर्णय घेतला असेल? काल्पनिक भोवऱ्यात अडकवणाऱ्या, ‘समाज काय म्हणेल?’ या प्रश्नापेक्षा, ‘मला काय हवंय? सुखी पत्नी-संसार? की बोचकारत अथवा एकाकीपणात मुलासह सर्वाची नासाडी?’ या प्रश्नाचं उत्तर शोधणं सोपं आहे हे त्याला आणि त्याच्यासारख्या अनेकांना कधी कळेल?
neelima.kirane1@gmail.com
काल्पनिक भोवऱ्यातलं गरगरणं
ती दोघं वैवाहिक समस्या घेऊन आली होती. तो संतापलेला, उद्विग्न. ती निर्विकार, थकलेली.
Written by नीलिमा किराणे
Updated:
आणखी वाचा
First published on: 09-07-2016 at 01:53 IST
मराठीतील सर्व संवादाने रचला पाया बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Friendship and relationship between male and female