बिचारेपण मनात असतं. ते सोडून स्वत:कडे सन्मानानं बघायला हवं. मनाविरुद्ध घटना घडतात आयुष्यात, त्याकडे तटस्थपणे बघता आलं पाहिजे. एखादा उदास दिवस येईलही, पण मोकळं हसणं सोबत ठेवलं तर ‘मूव्ह ऑन’ कसं करायचं हा प्रश्न पडणारच नाही. ते होऊन जाईल.
‘आज तुझ्याकडे गप्पा मारायला येऊ का?’ दीप्तीचा, माझ्या जिवलग मैत्रिणीचा मेसेज पाहून खूप बरं वाटलं. शाळा, कॉलेजच्या उनाडक्यापासून सगळीकडे आम्ही एकत्र. दीप्ती-संदीपची प्रेमकहाणी, सोनेरी दिवस, लग्न, मुलं, सुखी संसार सगळ्याची मी साक्षीदार. तीन वर्षांपूर्वी संदीपच्या आयुष्यात त्याची सहकारी, केतकी आली. तिच्या वैयक्तिक अडचणीत मदत करता करता एकमेकांमधली गुंतवणूक मैत्रीच्या पलीकडे कधी गेली ते दोघांनाही कळलं नाही आणि अखेरीस घर सोडून केतकीसोबत राहण्याच्या निर्णयापर्यंत संदीप पोहोचला. दीप्तीला प्रचंड मानसिक धक्का बसला. भरपूर भांडणं, आरोप-प्रत्यारोप, वेगळं होणं, कोर्टाच्या चकरा, घटस्फोट सगळं यथाक्रम घडत गेलं. हळूहळू दीप्ती सावरली तरी हसल्यावर उजळणाऱ्या तिच्या चेहऱ्याच्या जागी दु:खी, विचारांत हरवलेला, उदास, भकास चेहरा पाहणं ही जवळच्या माणसांसाठी शिक्षाच होती. घटस्फोटानंतर मलाही टाळणारी दीप्ती आज आपण होऊन येत होती.
कॉफीच्या कपाची ऊब घेत दीप्ती म्हणाली, ‘‘अजून एकटेपण पचत नाहीये गं. सकाळी उठल्या उठल्या त्याचं शेजारी नसणं जाणवतं, मनात एक कळ घेऊनच दिवस सुरू होतो. सतत मागचं काही ना काही आठवतं, त्याचं तेव्हा न समजलेलं वागणं अचानक उलगडतं. उलथापालथ करतं. असहाय्य वाटतं, सगळ्या जगाचा संताप येतो.’’
‘‘खूप दिवस एकटीनं काढलेस ताणात. तोच तोच विषय नको म्हणून मैत्रिणींनाही टाळलंस.’’
‘‘हो. जवळच्यांच्या चेहऱ्यावरची काळजी बघवत नाही. कामात गुंतल्यावर विसरतं तात्पुरतं, पण कुणाशी बोलताना धाकधूक असते. लोकांच्या नजरा माझ्यावरच खिळल्यात असं वाटत राहतं. ऑफिसात कुणाशी स्ट्रिक्ट वागले की वाटतं, ‘अशा खाष्ट बाईसोबत नवरा कसा टिकणार?’ असं लोक म्हणत असतील. शेजारणीशी दोस्तीत बोलतानाही मनात येतं, ही मनात मला ‘बिचारी’ म्हणत असेल. वावरताना आत्मविश्वासच वाटत नाही गं.’’
‘‘ लोक काय म्हणतील?, एवढाच मुद्दा असेल, तर ‘खूप ताकदीनं झेलला हिनं आलेला प्रसंग. कोसळून पडली नाही.’ असंही म्हणू शकतात.’’
‘‘..हो? असेलही!? पण कुणाला माहीत मी मनातून किती तुटलेय ते?’’
‘‘खरंय. पण तुला तरी काय माहीत कोणाला मनातून काय वाटतंय ते? लोकांना तू बिचारी किंवा खाष्ट वाटतेयस असं वाटण्याऐवजी, जिद्दी वाटतेयस असं मनाला पटवून द्यायचं. एवीतेवी सगळं तुझ्याच मनातलं..’’ दीप्तीनं माझ्याकडे चमकून पाहिलं आणि विचार करत हसली.
‘‘खरंच की गं.. पण तरी ‘एकटी बाई’ अनेकांना..’’
‘‘‘लोक’ काहीही म्हणतात. प्रत्येकीच्या बाबतीत तोच नियम कसा लागू पडेल? झाशीची राणी म्हणायचे तुला शाळेत.’’
‘‘हंऽ. विसरलेच होते. संदीपच्या सोबतीची सवय झाल्यावर हिंमत दाखवायची कधी वेळच आली नाही.. असो. मनातल्या प्रश्नांचाच खूप त्रास होतो. मी एवढी मूर्ख कशी? किती बेसावध राहिले? संदीपच्या वागण्यात पडलेला फरक कळला कसा नाही? एवढं वेडं प्रेम केलं, विश्वास टाकला ते चुकलं का गं?’’ दीप्तीचा आवाज कातर झाला.
‘‘तुझ्या विश्वास ठेवण्या-न ठेवण्याचा इथे प्रश्नच कुठे होता दीप्ती? विश्वास हा प्रेमाचाच भाग असतो. संदीपचंही वेडं प्रेमच होतं तुझ्यावर. जे भरभरून दिलं-घेतलं त्यात खोट शोधू नको राणी. सावध राहायचं म्हणजे काय? संशय घेत, पहारा करत जगायचं? ते तरी कुठे सुखाचं आहे?’’
‘‘पण केतकीला आयुष्यात येऊ दिलंच कसं त्यानं?’’
‘‘ते अपघातासारखं घडून गेलं असेल किंवा आकर्षण म्हण, कदाचित बदल हवासा वाटला असेल.’’
‘‘असं कसं? हे साफ चुकीचं आहे. म्हणजे मला कधी कुणाचं आकर्षण वाटलं नाही तेच चुकलं ना? तू तर सरळसरळ त्याची बाजू घेतेयस.’’ दीप्ती उसळलीच.
‘‘मी कुणाचीच बाजू घेत नाहीये दीप्ती. तुझी तडफड माझ्याएवढी कुणाला समजेल? घडलं ते विपरीतच घडलंय. पण मी वस्तुस्थितीकडे त्रयस्थपणे पाहतेय. माझ्या चूक किंवा बरोबरचा शिक्का मारण्यामुळे एखादा जादूचा मंत्र टाकल्यासारखा तुमचा सुखी संसार परत येणार असेल तर तेही करेन. पण कुणीही चूक-बरोबरचा निवाडा केल्यामुळे किंवा ‘असं घडायला नको ‘होतं’ ही सदिच्छा व्यक्त केल्यामुळे तुमच्या परिस्थितीत काय फरक पडतो? तात्पुरता दिलासा मिळतो इतकंच.’’
‘‘पण जे घडलं त्याला तोच जबाबदार नाही का? माझं सोड, मुलं बावरून गेलीत, शाळेत चोरटय़ासारखं वाटतं, घरात सुतकी वातावरण. माझी एकटीची धावपळ होते, त्याचाही राग कधीकधी मुलांवर निघतो. संदीप मुलांना भेटायला आल्यावर तर डोकंच सटकतं माझं.’’
‘‘मुलांच्या जबाबदारीचा ताण येणं साहजिक आहे, पण मुलं संदीपकडे गेली असती तर तू कशी जगली असतीस? ‘जबाबदारी कुणाची?’ याचा ‘इश्यू’ करून तुम्ही आणखी दहा र्वषसुद्धा भांडाल. निष्पन्न काय? तुम्ही दोघंही जास्त जास्त कोरडे होत जाल आणि मुलांचं लहानपण करपून जाईल. गेल्या दोन वर्षांत तुमचं घर म्हणजे लोडेड गन झालं होतं. फक्त ट्रिगर दाबायचा अवकाश असायचा.’’
‘‘अगं, केवढा अनपेक्षित धक्का होता. ‘ती’ आवडल्यावर माझं काहीच आवडेनासं झालं संदीपला.’’ दीप्तीचा आवाज तापला.
‘‘हे दुष्टचक्र सुरू करण्याची जबाबदारी संदीपची असली, तरी एकदा तो धक्का झेलल्यावर पुढे काय? चाळिशीतल्या तुम्हाला अनपेक्षित परिस्थिती हाताळताना बावचळायला होतं, तर १२-१४ वर्षांच्या मुलांना तुमची भांडणं, आरोप, वडिलांचं प्रकरण झेलताना किती असुरक्षित वाटलं असेल? तुझा सध्याचा भकास चेहरा, चिडचिड सहन करणं मुलांसाठी किती अवघड असेल? त्यांच्या जागी जाऊन बघ ना.’’
दीप्तीचे डोळे टचकन भरून आले. ती असहायपणे म्हणाली, ‘‘सगळेच सांगतात, दीप्ती, ‘मूव्ह ऑन’. पण ते करायचं कसं? काहीच न घडल्यासारखं जगायचं कसं?’’
‘‘काहीच घडलं नाही असं कशाला समजायचं? सुखी संसार आणि दु:खी शेवट दोन्ही स्वीकारायचं. यापुढे तू दु:खात जग किंवा आनंदात, ‘तो’ संसार परत येणारच नाहीये. त्या दु:खात यापुढची २०-२५ र्वषही घालवायची की आनंद शोधायचा हे तूच निवडायचं आहेस. धक्का ताजा असताना भावना अनावर होत्या, तेव्हा ही निवड शक्य नव्हती. पण आता वस्तुस्थिती जेवढी लवकर स्वीकारशील तेवढी तक्रार लवकर संपेल. संदीपची मदत असो, नसो, मुलांना आनंदी वातावरण देणं ही आता तुझी पहिली जबाबदारी आहेच. तुझी मैत्रीण म्हणून मला एवढंच कळतं की आयुष्य एकदाच मिळतं, त्यामुळे तुही आनंदानं जगायला हवंस. आजपर्यंत जे गेलं ते संदीपमुळे असेल, पण पुढचं गेलं तर त्याची जबाबदारी तुझी असेल. म्हणून दृष्टिकोन बदलायला हवा.’’
‘‘कसा बदलायचा दृष्टिकोन?’’
‘‘तुझा सध्याचा विचार असा आहे, की ‘ज्या दु:खी परिस्थितीला मी जबाबदारच नाही, तिला मी ‘बिचारी’ कुठे आणि कशी पुरी पडणार? माझ्या हातात काहीच नाही.’ या विचारांचा गरगरणारा भोवरा तुला असहाय करतो. त्याऐवजी ‘मी प्रामाणिकपणे जगले, मी का कोसळून पडायचं? माझी आणि मुलांची जबाबदारी पेलायला मी समर्थ आहे. संदीप सोडल्यास माझ्याकडे सर्व काही आहे’ असा विचार केलास तर?’’
दीप्ती विचारात पडली. ‘‘खरंच गं, आम्ही तिघं ‘किती बिचारे झालोत’ असं वाटूनच असहाय चिडचिड होतेय माझी.’’
‘‘एका टप्प्यानंतर हा रागराग आणि तिरस्कार बालिश ठरतो दीप्ती. आता ‘माझ्या भावना’, ‘माझा भूतकाळ’ हे इश्यू बाजूला ठेवून परिस्थिती प्रगल्भपणे हाताळता यायला हवी. तुमच्या भांडणांमुळे मुलांच्या मनात नकळतपणे एकमेकांबद्दल विष पेरलं गेलं असणार, त्यांना अधांतरी वाटत असणार. त्यामुळे, ‘आमच्यात मतभेद असले तरी तुमच्यासाठी आम्ही पूर्वीचेच आहोत.’ हा विश्वास दोघांनी जाणीवपूर्वक पेरायला हवाय. तुझ्याकडे घर आहे, नोकरी आहे. संदीपचं मुलांवर प्रेम आहे, सासर-माहेर दोन्हींची मदत आहे. ही अघटिताची चांगली बाजूही बघ. कित्येकींकडे यातलं काहीच नसतं गं. बिचारेपण तुझ्या मनात आहे, ते सोड. स्वत:कडे सन्मानानं बघ. एखादा उदास दिवस येईलही, पण तुझं मोकळं हसणं सोबत ठेवलंस तर ‘मूव्ह ऑन’ कसं करायचं हा प्रश्न पडणारच नाही. ते होऊन जाईल.’’
माझा हात हातात घेऊन दीप्ती हसली, तिचा चेहरा पूर्वीसारखाच उजळतोय, असं मला वाटलं..
neelima.kirane1@gmail.com
बिचारेपण सोडताना..
बिचारेपण मनात असतं. ते सोडून स्वत:कडे सन्मानानं बघायला हवं. मनाविरुद्ध घटना घडतात आयुष्यात, त्याकडे तटस्थपणे बघता आलं पाहिजे. एखादा उदास दिवस येईलही, पण मोकळं हसणं सोबत ठेवलं तर ‘मूव्ह ऑन’ कसं करायचं हा प्रश्न पडणारच नाही. ते होऊन जाईल. ‘आज तुझ्याकडे गप्पा मारायला येऊ का?’ दीप्तीचा, माझ्या जिवलग मैत्रिणीचा मेसेज पाहून खूप बरं वाटलं. शाळा, […]
Written by नीलिमा किराणे
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 20-02-2016 at 01:31 IST
मराठीतील सर्व संवादाने रचला पाया बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to handle relationship break up and dievorce