माणूस एकटा राहू शकत नाही. माणसांमध्ये राहणाऱ्या त्याला मग नाती चिकटतातच आणि एकदा का नाती जोडली की त्याबरोबर साऱ्या भावभावनांचा खेळ सुरू होतो. अनेकदा कसं वागावं कळत नाही. मग त्याचा ताण, निराशा सारं काही मनाविरुद्ध जायला लागतं. अशा वेळी उपयोगी येतो तो एकमेकांशी संवाद. त्यातूनच नात्याचा पाया रचला जातो, हे सांगणारं हे सदर दर पंधरा दिवसांनी.
नाती.. रोजच्या जगण्याला एक अविभाज्य भाग. नाती नाना परींची. एकीकडे आई-वडील, पती-पत्नी-मुलं, भावंडं, नातलग असा सासर-माहेरचा कौटुंबिक गोतावळा तर दुसरीकडे सहकारी, बॉस आणि कामाशी संबंधित अनेक असा व्यावसायिक गोतावळा सांभाळत आपला प्रवास चालू असतो. केंद्रस्थानी मित्र-मैत्रिणी असतातच. प्रत्येक नात्याचे अनेक पदर. काही सदैव अलवार, काही सदा टोचणारे, तर काही कधी अलवार, कधी टोचणारे. काही जरतारी तर काही विरले-विटलेले. हवेसे, नकोसे अनेक प्रकारचे. पण ते असतात. कधी त्यांनी सुखावत, गुंतत, गुरफटत तर कधी फाटत-तुटत आपली वाटचाल सुरू असते. जसा असेल तसा, नाती हा जगण्याचा आधार असतो.
ज्या नात्यांवर आपण भावनिकदृष्टय़ा अवलंबून असतो, त्यांच्याबद्दलच्या विचारांनीच मनाचा बराचसा भाग व्यापलेला असतो. एखादा प्रसंगानं, जवळच्या व्यक्तीसोबतच्या नात्यात ताण येतो आणि आपण विलक्षण अस्वस्थ होतो. त्या अस्वस्थतेच्या मागे मनातल्या काही उलाढाली, काही आठवणी असतात. भीती, तणाव, असुरक्षितता अशा नकारात्मक भावना आणि तशाच विचारांच्या हिंदोळ्यावर आपण हेलकावत राहतो. तोल कसा सांभाळावा याबाबत गोंधळायला होतं. काही विशिष्ट परिस्थितीत ‘कसं वागावं?’ याचे ठोकताळे आपल्याकडे कुटुंबातून, रूढी-परंपरेतून आलेलेही असतात. पण रूढ पद्धतीनं वागलं तरी अनेकदा उत्तर सापडत नाहीच. आजच्या नवीन जीवनशैलीत जुन्या जाणिवा अपुऱ्या पडतात. एखाद्या नात्याचं हे अनपेक्षित नवं वळण कसं झेलायचं ते माहीतच नसतं. माणूस चक्रावून जातो. विचार आणि भावनांच्या भोवऱ्यात गरगरत राहतो.
सध्याचा काळ हा संक्रमण काळ आहे. ज्या बदलांना काही पिढय़ा लागायच्या ते काही वर्षांत घडताहेत. सगळंच घुसळलं जातंय. माहिती तंत्रज्ञानाची क्षितिजं विस्तारतायत, जग जवळ येतंय तसं पिढीतलं अंतर मात्र वाढत चाललंय. पूर्वी ३० वर्षांची एक पिढी समजली जायची. आता ५ वर्षांतच जीवनशैली बदललेली असते. संवाद, सहवास आणि सोबत यातून नाती घडतात, रुजतात. पण व्हॉट्सअॅप-फेसबुकच्या जमान्यात त्यांच्याही व्याख्या बदलत चालल्यात. सांस्कृतिक देवाणघेवाणीसोबत सांस्कृतिक धक्केही (कल्चरल शॉक) वाढले. बदलाचा वेग एवढा आहे की पालकांच्या विश्वात मुलं रमू शकत नाहीत, कंटाळतात आणि पालकांना तर मुलांचं विश्व सुधरतच नाही. प्रियकर-प्रेयसी, ब्रेक अप्स, लिव्ह इन, घटस्फोट, दत्तक पालकत्व याही गोष्टी आता नवीन राहिलेल्या नाहीत. त्यामुळे नात्यांनाही नवे आयाम आले. संवाद-सहवास-सोबत पूर्वीसारखे राहिले नाहीत.
जुनं मोडकळीस आलंय, कालबाह्य़ झालंय हे कळतंय, त्यातलं शाश्वत असेल ते टिकेलच पण नवं अजून बांधून व्हायचंय. वडील-मुलगी, वडील-मुलगा ही नाती आत्ता कुठे कात टाकतायत. पती-पत्नीमधलं नातं मैत्रीचं असलं पाहिजे, हे आत्ता कुठे पचायला लागलंय. त्यात दोघांनी नोकरी करण्यामुळे दोघांच्याही आयुष्यातला खूप जास्त वेळ इतरांच्या सहवासात जातो, बायकोचा मित्र, नवऱ्याची मैत्रीण याची सवय व्हायला लागली आहे. एवढंच कशाला, दोघंही नोकरी करणाऱ्या आणि एकुलत्या मुलाला घरी ठेवून जाणाऱ्या घरात घरच्या कामवालीशी असलेलं नातंसुद्धा खूप महत्त्वाचं ठरतंय. प्रत्येक नात्यात सर्वाना स्पेस मिळायला हवी हे मान्य होतंय. पण पिढय़ान्पिढय़ांच्या जुन्या सवयी आणि विचारपद्धती एवढय़ा पटकन बदलत नाहीत. काळासोबत खेचलं गेल्याची एक जबरदस्ती वाटते. त्यामुळे वागताना आत्मविश्वास वाटत नाही, अधांतरी वाटतं.
आत्ता आत्तापर्यंत रूढी-परंपरांना महत्त्व असणाऱ्या कुटुंब-समाजकेंद्री जीवनशैलीत सगळं ठरलेलंच असायचं. अमुक प्रसंगात कोणाचं चूक आणि कोणाचं बरोबर याचा न्यायनिवाडा झाला की विषय संपायचा. आता समाज व्यक्तिकेंद्री बनतोय. आता समजत चाललंय की अशा निवाडय़ानं प्रश्न संपत नाहीत. चूक आणि बरोबर असं काळ्या-पांढऱ्या कप्प्यांत वर्गीकरण व्हावं ही अपेक्षा उलट नात्यातली लवचीकता संपवते. माणूस म्हणून परस्परांना स्वीकारण्याच्या मध्ये येते. स्वीकार आणि विश्वासाच्या पायावर उभी असणारी, ‘असंच हवं’ हा ‘च’चा अट्टहास न धरणारी नाती जास्त आनंददायी असतात.
संक्रमणकाळात जीवनशैली बदलते तेव्हा खोलवर रुजलेले जुने दृष्टिकोन बदलावे लागतात. त्यामुळे बदल खूप मोठे वाटतात. पण त्याच वेळी समजून घ्यायला हवंय, की तरीही मूल्य चिरंतनच असतात. जग कितीही बदललं तरी मनातली नात्यांची गरज राहतेच. मूळ भावना बदलत नाहीत. कदाचित परिमाणं बदलतात. सख्खी भावंडं कमी झाली पण मित्रपरिवार वाढला. महिना महिना नातलगांकडे राहणं कमी झालं, पण संपर्कमाध्यमं वाढली. हे बदल लवचीकतेनं समजून घ्यायला हवेत. ‘‘समोरच्या माणसाशी बोलायचं नाही आणि फेसबुकला दोनशे फ्रेंड्स करायचेत काय?’’ अशा कडवट कॉमेंट केल्याने जग पुन्हा पन्नास र्वष मागे जाणार नाहीये हे समजून घ्यायला हवंय. नव्या जगाशी जोडून राहायला हवंय. नात्यांच्या जुन्या संकल्पनांतून बाहेर आलं तरच समजेल की नव्या पिढीशी नातं जोडण्याच्या जागा आणि पद्धती वेगळ्या आहेत. संवाद म्हणजे मोठय़ांनी सांगायचं आणि कनिष्ठांनी ऐकायचं या पारंपरिक समजातून बाहेर यायला हवंय. नवीन विश्व आता नव्या पिढीकडूनच समजून घ्यायचंय हे स्वीकारलं तर तिच्याशी संवाद जमेल. सांगण्यापेक्षा ऐकणं वाढवलं तर नात्यांचे पूल नव्याने बांधले जातील.
एखादं नातं आनंददायी असेल की साकळलेलं, बिघडलेलं असेल ते ठरवण्यात आपण चूक आणि बरोबर याच्या पलीकडची जी समंजस ‘भूमिका’ घेऊ ती पूर्वीपेक्षा जास्त महत्त्वाची असेल. बाहेरच्या जगात घडणाऱ्या बदलांनी येणारी अस्वस्थता, साशंकता ही आपल्या मनातलीच असते. घटना, प्रसंग हे निमित्त असतात. एखाद्या प्रसंगानं पराकोटीचं अस्वस्थ केलं तरी त्या भावना आणि विचारांचा उगम आपल्या स्वत:च्याच मनात असतो आणि त्यांचं वास्तव्यही तिथेच. त्यामुळे स्वस्थ नात्यांकडे जाण्याचा रस्ताही मनातूनच जातो. म्हणून मन सशक्त करायला हवं.
संक्रमण काळ म्हणजे स्वत:ला प्रश्न विचारण्याचा काळ, पूर्वापारपासून धरलेल्या कल्पना तपासून पाहण्याचा काळ असं त्याकडे पाहायला हवं. घडलेला प्रसंग आणि त्यामुळे स्वत:च्या मनात चालणाऱ्या उलाढालीचं निरीक्षण करून, भावना आणि विचार उलगडले पाहिजेत. भावना पराकोटीला पोहोचल्या होत्या तेव्हा आपल्या मनात काय घडत होतं ते पाहता आलं पाहिजे. त्यासाठी कधी स्वत:ला प्रामाणिकपणा आणि विवेकाच्या धारेवर कठोरपणे धरावं लागतं तर कधी दुसऱ्याच्या जागेवर संवेदनशीलतेने पोहोचावं लागतं. कुठल्याही पूर्वग्रहाशिवाय घटनांकडे पाहावं लागतं. आपल्या मनातल्या गाठी आणि पदर उलगडत आपण मूळ भावनांच्या गाभ्यापर्यंत पोहोचतो आणि मुक्ततेचा तो ‘आहा क्षण’ येतो. नाती आतून सुदृढ, सशक्त आणि मोकळी बनतात.
नात्यांच्या मांदियाळीत स्वत:चं, स्वत:सोबतचं नातं हे अतिशय आतलं, खोलवरचं नातं. स्वत:वर विश्वास, प्रेम असेल तर ते इतर नात्यांतही सहजपणे येतं. स्वत:वरच नाराजी, अविश्वास असेल तर त्याची सावली इतर नात्यावरही पडते. आत्मकेंद्री आढय़ता मनाची दारं बंद करते. नवीन काही स्वीकारता येत नाही. तेव्हाही नात्यांवर ताण येतोच. त्यासाठी इतर नात्यांसारखंच स्वत:चं स्वत:शी असलेलं नातंही मोकळं, मैत्रीचं हवं. मन उघडं असेल तर स्वत:बद्दलच्या इनसाइट द्यायला कधी एखादं पुस्तक, एखादा सिनेमा अशा परिघावरच्या गोष्टीदेखील अचानक मदत करतात. आपल्या मनातले प्रश्न, अस्वस्थता मिटवतात. आपण काही तरी शिकतो. अशा पुस्तक-नाटक-सिनेमाशी देखील आपलं एक वेगळंच जिवाभावाचं नातं जुळतं. ज्या नात्यातून काही तरी शिकणं घडतं ते नातं चिरस्थायी असतं.
या सदरात आपण स्वत:च्या अबोध मनापासून मैत्री, जिवलग आणि परिघावरच्या नात्यांचा पट उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत. अनपेक्षित परिस्थितीत योग्य भूमिकेपर्यंत कसं पोहोचायचं, एखाद्या नात्यातली समस्या जिथे सुरू झाली त्या ‘इश्यू’ला नेमकं कसं शोधायचं ते पाहणार आहोत. पूर्वग्रह, अपेक्षा, लेबल्स यांची जळमटं झटकून नात्यांकडे स्वच्छ नजरेनं, बाहेरून पाहणार आहोत. नात्यांमागच्या स्वत:च्या, इतरांच्या गरजा भूमिका तपासून आपला स्वत:शी आणि इतरांशी असणारा नेहमीचा घिसापिटा संवद, सहज, मोकळा आणि सकारात्मक करता येईल का? ते शोधणार आहोत. मोकळ्या संवादामुळे घुसमट संपते. नाती मोकळी होतात. प्रगल्भ होतात. त्यांत ताजेपणा येतो. हा ताजेपणाच तर जगण्यात मजा आणतो. माझ्या-तुमच्या अनुभवांच्या शेअरिंगमधून नाती नव्यानं शोधण्याचा प्रयत्न करणारं हे सदर, दर पंधरा दिवसांनी.