‘‘आई-बाबांनी उलटतपासणी घेतल्यावर तुला लहानपणी जसं वाटायचं ते आठवलंस तरी मुलीच्या नवऱ्याचं वागणं समजेल तुला.  त्यांच्या खोटं बोलण्यामागची गरज काय असेल? ती शोधलीस तरी बरंच उलगडेल. संवादाचा नवा समंजस पॅटर्न आपोआप अंगवळणी पडेल.’’

एकदा भर दुपारी एक अनोळखी फोन आला. ‘‘ मी तुम्हाला आत्ता भेटू शकते का? जवळच राहते. मला खूप कसं तरी होतंय.’’ आणि ती एकदम रडायलाच लागली. बोलताही येईना. तिची अवस्था पाहता, ‘ताबडतोब ये’ म्हणणं भागच होतं. आली तेव्हा चेहऱ्यावर विमनस्क भाव होता, पण ती पटकन सावरली. म्हणाली, ‘‘खूप ताण आला होता. तुम्ही फक्त ‘ये’ म्हटलंत तेवढय़ानंही खूप बरं वाटलं.’’
थोडक्यात तिला त्या क्षणाला फक्त एक सोबतीचा हात हवा होता. ती सांगायला लागली. ‘‘माझ्या सहावीतल्या मुलीशी माझं अभ्यासावरून जोराचं भांडण झालं. माझी मुलगी खोटं बोलतेय, माझ्यापासून काही तरी लपवतेय असं लक्षात आल्यावर मी प्रश्न विचारून शहानिशा करायला लागले तर गेले आठ दिवस तिने एकही गृहपाठ केलेला नव्हता. तिचं पितळ उघडं पडायला लागलं तशी मला वाट्टेल ते बोलायला लागली. ‘तू नवी वहीच आणली नाहीस, डब्यात एवढंसं, बेचव काही तरी देतेस, मी उपाशीच असते, तू समजून घेणारच नाहीस हे माहीतच होतं.. काहीही. एक तर स्वत:ची चूक, त्यात खोटारडेपणा आणि वर निर्थक आरोप. किती बेशरम. संताप झाला माझा. आता मी तिचं मुस्काट फोडेन अशी भीती वाटली, म्हणून घराबाहेर पडले तर रडायलाच यायला लागलं. नवरा बाहेरगावी.. आता करू काय? कुणाला सांगू?’’
‘‘म्हणून थेट समुपदेशन? आपली ओळखही नाही.’’
‘‘मी ओळखते तुम्हाला. तुमची पाटीही येता-जाताना बघते. आज एवढय़ाशा प्रसंगानं मनातली भणभण वाढून तोल गेल्यावर मात्र तुम्हाला भेटलंच पाहिजे असं वाटलं.’’ ती स्वत:च्या भावनांबद्दल जागरूक होती. आवेग संपल्यावर झटकन नॉर्मलला येऊ  शकत होती. तरीही एवढय़ाशा प्रसंगानं तोल जाण्यात काही तरी चुकतंय, त्यासाठी मदत घेतली पाहिजे हे कळणं विशेष होतं. मुलीशी वादावादीच्या निमित्ताने मनातले असे काही ट्रिगर दाबले गेलेत, जे ती फार दिवस सहन करतेय आणि आता आटोक्याबाहेर गेलेत हे उघड होतं.
तिच्या नवऱ्याची फिरतीची नोकरी. त्यामुळे स्वत:ची उत्तम नोकरी सोडून ती स्वेच्छेनं पूर्णवेळ गृहिणी झाली होती. गप्पा, भिशी, टाइमपास यात रस नव्हता. वाचनाची आवड होती.
‘‘मी खूप पर्टिक्युलर आहे. मला घोळ, खोटं बोलणं सहनच होत नाही. याउलट नवऱ्याचा कारभार भोंगळ. विचार न करता काहीही विकत घ्यायचं, कुठेही पैसे गुंतवायचे, कुणी अडचण सांगितली की पटकन विश्वास ठेवायचा, स्वत: नुकसान सोसूनही दुसऱ्याला मदत करायची असला बावळटपणा मला न सांगता चालू असतो. माझ्यापासून लपत नाहीच, तेव्हा काही तरी खोटं सांगतो. पण मी विचारलेल्या प्रश्नांना धड उत्तरंही देता येत नाहीत. मग माझ्यावरच चिडतो, भांडतो. बारा र्वष झाली लग्नाला. आता सहन होत नाही.’’
‘‘आज कशामुळे तोल गेला एवढा? एवढी असाहाय्य भीती कशाची वाटली?’’
‘‘भीती कसली? मला तर राग आला होता..’’ बोलता बोलता एकदम गप्प होऊन ती विचारात गढली.
‘‘..बरोबर आहे तुमचं. भीतीच वाटली. माझी एवढीशी मुलगी मलाच दोष देते. नवरा म्हणतो, ‘तुझ्यामुळेच ती उद्धट झालीय.’ मी नोकरी सोडून घरात बसले कशासाठी? माझी बडबड फक्त दिसते, हेतूची कुणालाच पर्वा नाही. आपलं चुकलंय, खोटं बोललोय तर मान्य करायला कधी शिकणार हे बापलेक? हे आयुष्यभर कधीच बदलणार नाही अशी खोल भीती वाटली. म्हणून असाहाय्य वाटलं.’’
‘‘कुणी थोडंसंही खोटं बोललेलं तुला सहन होत नाही ना? खोटय़ाचा इतका अनावर राग कुठून आलाय?’’
‘‘माझ्या माहेरी खोटेपणा अजिबात चालत नाही, तसे संस्कारच नाहीत. लहानपणी क्षुल्लक खोटं बोलल्याबद्दल एवढे फटके खाल्लेत बाबांचे, आईनं कितीदा उपाशीसुद्धा ठेवलंय. आई-बाबांचा संताप, घरातला आरडाओरडा, उलटतपासणी सगळ्यामुळे खोटय़ाबद्दल तिडीकच बसलीय.’’
‘‘तू मोठेपणी कधीच खोटं बोलली नाहीस?’’
‘‘कधीच नाही. अंऽऽ, एकदा थोडंसं बोलले. नणंदेची एक अंगठी माझ्याकडून घरातच कुठे तरी ठेवली गेली. पण मी तिला हरवलेली सांगितली नाही. ‘मला ती अंगठी खूप आवडलीय, आपण थोडे दिवस अदलाबदली करू’ असं सांगून माझी एक अंगठी तिला दिली. तिची अंगठी सापडल्यानंतर पुन्हा अदलाबदल केली.’’
‘‘त्या वेळी खोटं बोललेलं कसं चाललं तुला?’’
‘‘खरं सांगितल्यावर ती मला वेंधळी समजली असती. ‘मी एवढय़ा विश्वासानं घालायला दिली आणि तू हलगर्जीपणा केलास’ असं म्हटली असती. एवढय़ाशासाठी मी का तिची बोलणी खाऊ?’’
‘‘पण वेंधळेपणा झालाच होता.’’
‘‘हो.. पण.. अंगठी सापडेपर्यंतच.. काही दिवसांपुरतंच..’’
‘‘अगं, पण खोटं ते खोटंच ना? तुझ्या नवऱ्याकडेही असंच काही तरी कारण असेल तुला मोकळेपणी न सांगण्याचं? का खोटं बोलावंसं वाटत असेल त्याला? त्याच्या जागी जाऊन पाहा बरं.’’
ती विचारात पडली. ‘‘माझ्या प्रश्नांच्या सरबत्तीला घाबरत असेल. तो एकदा म्हणाला होता, तुला पटलं नाही की जिभेचा पट्टा सुरू करतेस. उलटतपासणी घेतेस, टोमणे मारतेस. तुझ्या आविर्भावामुळे खुन्नस येते. तुझं बरोबर असेल तरी विरोध करावासा वाटतो.’’
‘‘मग स्वत:च्या वागण्याचा तटस्थपणे विचार केलास का?’’
‘‘मी खवळलेच तेव्हा. स्वत:ची चूक मान्य न करता मलाच दोष देतोस म्हणून भांडले. माझा मुद्दा बरोबर होता आणि हेतू चांगलाच होता तर मी का विचार करायचा? त्यानं करावा.’’ तिच्या आवाजाला धार आली.
‘‘मुद्दा चूक की बरोबर एवढंच ठरवायचं आणि हेतूवर फोकस करायचा यात एक सोय असते. आपली देहबोली आणि भाषा कशी आहे ते बाजूलाच पडतं. ‘खोटं बोलणं चूक आहे आणि ढिलेपणा तर माझ्या डोक्यातच जातो’ अशी स्वत:बद्दलची लाडकी कल्पना लहानपणापासून तुझ्या मनात घट्ट रुजलीय. त्यात तू एवढी गुरफटली आहेस की तसं घडल्याबरोबर तू बिथरतेस. तुझ्या शब्दांना धार येते. स्वत:च्या इतक्या लहान मुलीबाबत ‘पितळ उघडं पडलं, बेशरमपणा, मुस्काट फोडीन’ असे शब्द तू वापरलेस. नवऱ्यावर बावळटपणाचा शिक्का तर मारलेलाच आहेस, रागाच्या भरात आणखीही बोचरं बोललं जात असणार. ही बोलण्याची पद्धत  कदाचित तुझ्या आई-वडिलांच्या अनुकरणातून आली असेल, आता तुझी मुलगी तेच करतेय. नीट आठवून बघ तुमचे संवाद.’’
‘‘असू शकेल. लहानपणी आईबाबांची उलटतपासणी मलाही असह्य़ व्हायची पण आता मीही तेच करतेय.. लक्षातही आलं नाही..’’ ती बऱ्याच वेळानं म्हणाली.
‘‘आत्मसन्मान प्रत्येकाला असतो गं आणि तो जपण्यासाठी प्रत्येकाची एक स्व-संरक्षण यंत्रणा असते. खोटं बोलणं अनेकदा त्यातूनच येतं, हे समजून घ्यायला हवं. जशी तू नणंदेशी अर्धवट खोटं बोललीस तसंच.’’
‘‘पण म्हणजे खोटं बोलण्यात काही चूकच नाही?’’
‘‘तसं नाही. चूक आणि गुन्हा यात फरक करता आला पाहिजे. क्षुल्लक चुकीसाठी जवळच्यांना गुन्हेगारासारखं वागवल्यावर तेही तुझ्यातले दोष शोधून हल्ला करणार. ‘खोटं’ असं मनात आल्याबरोबर तुझे दरवाजेच बंद होतात. ही तुझी ‘आपली’ माणसं आहेत हे विसरतेस. यातून दुरावा वाढतो, संवाद संपतो. दुर्दैवानं हे वर्षांनुर्वष घडतंय.’’
‘‘पण हे बदलायचं कसं?’’
‘‘त्यासाठी त्यांच्या वागण्यामागचा हेतू तुलाही समजून घ्यायला हवा. तुला न आवडणारं वागणंदेखील तुझ्याशी शेअर करण्याचा विश्वास घरच्यांना वाटला पाहिजे.’’
‘‘हं. पटतंय मला, तरी एवढय़ा वर्षांची सवय बदलायला जमेल?’’
‘‘आई-बाबांनी उलटतपासणी घेतल्यावर तुला लहानपणी जसं वाटायचं ते आठवलंस तरी जमेल ते. खोटं बोलण्यामागची मुलीची/ नवऱ्याची गरज काय असेल?’ ती शोधलीस तरी बरंच उलगडेल. गोष्टी डोक्यात जाणं कमी होईल. संवादाचा नवा समंजस पॅटर्न आपोआप अंगवळणी पडेल.’’
‘‘फक्त मी बदलून काय उपयोग? त्यांनी पण मला फटकळ म्हणणं सोडलं पाहिजे.’’
‘‘तू त्यांना समजून घेशील, स्वीकारशील तसतसा ‘तू बदलतेयस’ हा विश्वास वाढेल. तुझ्यावर हल्ला करावासा वाटणार नाही. पण इतक्या वर्षांची सवय बदलायला काही आठवडे तरी हवेत?’’
त्या दिवशी ती विचार करत घरी गेली. कधी कधी शंका विचारायला येते. मुलीसोबत, नवऱ्यासोबत जाता-येताना दिसते. तिच्या चेहऱ्यावरचा ताण हळूहळू निवळला. तिघांचेही मोकळे, आनंदी चेहरे विश्वास देतात, स्वत:च्या वागण्याकडे, मनातल्या गाठींकडे त्रयस्थपणे पाहणं तिला जमलंय.

Milind Gawali
“त्या मावशींनी मला शिव्यांची लाखोली…”, ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींनी सांगितला किस्सा
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Reserve Bank,
“मी लष्कर-ए-तोयबाचा सीईओ बोलतोय, तुमच्या मागचा रस्त्यावर…”; रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन!
Navjot Singh Sidhu
“अर्चना पूरन सिंगच्या जागी मी पुन्हा यावं…” नवज्योत सिंग सिद्धूंचे वक्तव्य; कपिल शर्मा शोमध्ये परतणार का?
Anshula Kapoor talks about parents Boney Kapoor Mona Kapoor divorce
“माझे आई-वडील वेगळे झाल्यावर…”, पालकांच्या घटस्फोटाबाबत पहिल्यांदाच बोलली जान्हवी कपूरची सावत्र बहीण
"Worked Overtime": Gen Z Employee's Excuse For Coming Late The Next Day Boss and employee chat viral on social media
PHOTO: “मी उद्या उशीराच येणार…” कर्मचाऱ्यानं बॉसला मेसेज करत थेटच सांगितलं; चॅट वाचून नेटकरी म्हणाले “बरोबर केलं जशास तसं”
devendra fadnavis criticize uddhav thackeray for making video of bag checking
“त्यांच्या आधी माझी बॅग तपासली, केवळ भांडवल…”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे टीकास्त्र
Supriya Sule criticizes Mahayuti over Uddhav Thackeray bag checking case Pune news
उद्धव ठाकरे यांच्या बॅग चेक प्रकरणावर सुप्रिया सुळे यांच मोठ विधान…..

-नीलिमा किराणे