मनातल्या गृहीतकामुळेच परिस्थिती मनाविरुद्ध बदलूही शकते हे भान विसरलं जातं. त्यामुळे उगीचच आक्रमक होऊन, खोटं वागून मनातलं ‘बिचारेपण’ आपण लपवायला बघतो. या ताणामुळे गुदमरायला होतं आणि त्याने भावना अनावर होतात. हे दुष्टचक्र थांबवायचं असेल तर मनाचं विझलेपण संपायला हवं, कम्फर्ट झोन ओळखून तो मोडायला हवा. त्यातून बाहेर पडायला हवं.’
रविवारी एका मित्रासोबत कट्टय़ावर आलेल्या दीपकला पाहून, त्यानं स्वेच्छानिवृत्ती घेतल्याला चार महिने झाल्याचं मानसला आठवलं. नेहमीच्याच गप्पा चालू होत्या तरी दीपक थोडा आक्रमक, उगाचच तावातावानं मुद्दे मांडतोय, फार जोरात हसतोय असं त्याला वाटून गेलं. थोडय़ा वेळाने मित्र म्हणाला, ‘‘निघतो रे. दीपकसारखा ‘आजाद पंछी’ नाही मी. आजही एक मीटिंग आहे.’’
मित्राच्या शब्दांमुळे अस्वस्थ होत दीपक म्हणाला, ‘‘सगळ्यांना मी आता रिकामटेकडा वाटत असणार ना मानस? कंपनीचं पॅकेज चांगलं असलं, तरी ‘देतोय ते घ्या आणि निघा’ अशी सक्तीची निवृत्तीच होती ती. राहून राहून संताप होतो, माझ्यासोबतच असं का घडावं?’’
‘‘इतरांना तुझ्याबद्दल काय वाटतं? यापेक्षा ‘तुला काय वाटतं?’ ते महत्त्वाचं. कंपनीची परिस्थिती बिघडतेय, स्टाफ कमी करताहेत हे तू दोन वर्षांपासून सांगतोयस. त्यामुळे मनाची तयारी असणार.’’
‘‘शक्यता माहीत होती, तरीही अन्याय झाल्यासारखं वाटतंच. इमानेइतबारे काम केल्याचं काय फळ मिळालं? मी कधीही घडय़ाळ पाहून काम केलं नाही. ‘आमच्याकडे, घराकडे तुमचं लक्षच नसतं’ म्हणून बायको-मुलं कायम नाराज असायची. माझ्या आयुष्यात पाहिलं स्थान कंपनीचं, तरीही ऑफिसातल्या प्रांतिक लॉबीनं माझ्या बेअक्कल ज्युनिअर मॅनेजरला ठेवून मला हाकललं. कधी तरी कळेल कंपनीला माझी किंमत..’’ बोलता बोलता दीपकचा आवाज चढला, भावना अनावर झाल्या, डोळ्यांत पाणी आलं. त्याला शांत व्हायला थोडा वेळ देऊन मानसनं विचारलं,
‘‘तुझी तगमग मला समजू शकते दीपक. दु:ख, त्रास होणारच. पण ‘अजूनही’ एवढा त्रास होणं, त्यातच अडकून पडणं गंभीर वाटतं रे, रक्तदाब वाढवून घेशील. नक्की काय खदखदतंय मनात?’’
‘‘कंपनीची पॉलिसी काहीही असली तरी माझं काम आणि रॅपो पाहता, ‘माझ्यावर’ ती वेळ येणार नाही असं वाटत होतं. आता रिकामटेकडं आयुष्य निर्थक वाटतंय. सगळ्या मित्रांचं नीट चाललंय मग ‘माझ्याच बाबतीत असं का?’ एवढंच वाजत असतं सतत मनात. जळायला होतं, हरल्याची भावना येते. कुठेही गेलो तरी उपरं वाटतं. लोक मला ‘बिचारा’ म्हणत असतील असं वाटतं. रक्तदाब वाढलाच आहे.’’
‘‘कंपनीच्या अवघड परिस्थितीतही तू दोन र्वष टिकलास. तुझ्यासमोर एवढय़ांना काढलं गेलं तरीही तूच कसा बिचारा? कंपनीनं काढेपर्यंत थांबण्याचा निर्णय तुझाच होता.’’
‘‘ते कळतं रे, पण घरी बसणं अशक्य होतंय. कुणाला न सांगता मी जॉबसाठी बाहेरगावचे काही इंटरव्ह्य़ूपण दिले गुपचूप, पण तुमच्या अनुभवाएवढा मोबदला आम्ही देऊ शकत नाही, असं सांगतात. शिवाय मी कॉम्प्युटर वापरू शकत असलो तरी नव्या तंत्रज्ञानासाठी कम्फर्टेबल नाही. आमच्या क्षेत्रात कन्सल्टिंगला फारसा स्कोप नाही आणि प्रशिक्षण देणं मला जमत नाही..’’
‘‘याला संधी समजून नवीन काही शिकलास तर?’’
‘‘या वयात कुठे लहान मुलांसोबत शिकायचं? स्पर्धा करायची? या एवढय़ाशा कालच्या पोरांचा आगाऊ स्मार्टनेस पाहूनही चीड येते.’’ दीपकचा आवाज पुन्हा तापला.
‘‘तुझ्या मनातल्या खऱ्या त्रासापर्यंत पोहोचल्याशिवाय ही तगमग थांबणार नाही दीपक. मन स्थिर झाल्याशिवाय नवीन काही सुचणंही अवघड. लॉबी वगैरे कारणांचं पांघरूण घेतोयस पण ‘इतका’ राग कशाचा आहे? रागाच्या मागे काय आहे? जरा तपासून बघशील?’’
‘‘..रागाच्या आधी.. मनातून रिकामपणाची खूप भीती वाटतेय, रडावंसं वाटतं. खरं तर माझ्याकडे स्वत:चं घर आहे, पुरेशी सेव्हिंग्ज आहेत, बायको कमावतेय, तरीही कमावता हात थांबल्यावर कुटुंबप्रमुख म्हणून आपला सन्मान संपणार असं वाटतं, स्वत:चीच कीव येते, चीड येते.’’
‘‘स्वाभाविक आहे. वस्तुस्थिती बदलणं तुझ्या हातात नाही म्हणून असाहाय्य वाटत असेल, यापुढे पद किंवा पगाराबाबत कदाचित एक-दोन पायऱ्या खाली उतरावं लागेल ही जाणीव नकोशी होत असेल.’’
‘‘अगदी असंच होतंय. हे सगळं कंपनीमुळे झालं म्हणून मॅनेजमेंटचा राग येतोय, नव्यानं सुरुवात करायला भीती वाटली की स्वत:चा राग आणि या अनिश्चिततेची सवय नसल्यामुळे आख्ख्या जगाचाच रागराग..’’
‘‘हं, थोडक्यात तू ‘कम्फर्ट झोन’मध्ये पुरता अडकलायस. ‘तेच आणि तसंच’शिवाय दुसरं काही स्वीकारता येत नाहीये. कायम मनासारखं मिळत गेल्यामुळे सगळं आयुष्य आपल्याला हवं तसं, अडथळ्याशिवाय सुरळीतच जाईल असं तू गृहीत धरायला लागला होतास. हो ना?’’
‘‘असेल, त्यामुळे काय फरक पडतो?’’
‘‘मनातल्या त्या गृहीतकामुळेच परिस्थिती मनाविरुद्ध बदलूही शकते हे भान विसरलं जातं. मग तो धक्का झेलणं अवघड होतं. त्यामुळे ‘माझ्याकडे अनुभव, क्षमता असूनही मला भोगावं लागतंय, माझ्यावर अन्याय होतोय’ हे समर्थन तू धरतोस. उगीचच आक्रमक होऊन, खोटं वागून तू मनातलं ‘बिचारेपण’ लपवायला बघतोस. ‘जॉब शोधतोय’ हे मित्रांनासुद्धा सांगायची लाज वाटते. या दडपून ठेवण्याच्या ताणामुळे गुदमरतोस आणि तुझ्या भावना अनावर होतात. हे दुष्टचक्र थांबवायचं असेल तर मनाचं विझलेपण संपायला हवं, कम्फर्ट झोन ओळखून मोडायला हवा दीपक.’’
‘‘तो’ आदर, प्रतिष्ठा यापुढे कधीच मिळणार नाही असं वाटलं की माझ्याच मनातून मी उतरून जातो रे.’’ दीपकचा आवाज कातर झाला.
‘‘ते गेलेलं आयुष्य म्हणजेच सर्व काही, ते नसेल तर तुझा अनुभव, क्षमता सर्व काही निर्थक’ अशी समजूत पक्की धरलीयस आणि ‘बिचारेपण’ तुझं तूच गळ्यात घालून घेतलंयस असं नाही वाटत तुला? तुझा आत्मसन्मान फक्त नोकरी, पगार याच्यात आहे की तुझ्या मनात आहे?’’
‘‘..’’
‘‘तुझ्या क्षमता तर तुझ्यापाशीच आहेत. ‘जॉब शोधतोय’ हे दहा जणांना सांगून ठेवलंस तर तुझा कुठला तरी अनुभव कुणाला तरी उपयोगी असेलच. प्रोफाइल बदलण्याचा विचारही करू शकतोस. अनुभव हा ड्रायव्हिंगसारखा असतो. एकदा शिकलं की कोणतीही गाडी चालवता येते. फक्त अंदाज घेण्यात, सवय होण्यात थोडा वेळ जातो इतकंच. ‘तीच गाडी हवी’चा हट्ट कशाला? वेगळी गाडी वापरून बघ. अनोळखी तंत्रज्ञानाची गाडी असेल तर थोडं प्रशिक्षण घ्यायचं. सवय होईपर्यंत ‘ही फेज आहे’ असं लक्षात घेतलं की अपेक्षा बाजूला पडतात, शिकण्यातला आनंद घेता येतो. बदल एन्जॉय करायचा रे. भ्यायचं काय त्यात?’’
‘‘खरंच रे. या सगळ्याचा विचारही टाळतोय म्हणूनच जुनी गाडी गेल्याबद्दल मी निराश होतोय बहुतेक.’’
‘‘तुला माहितीय? पंधरा वर्षांपूर्वी तुला पटापट चांगल्या नोकऱ्या, बढत्या मिळत होत्या, तेव्हा मी माझ्या बॉसला, कामातल्या एकसुरीपणाला कंटाळून दोन उत्तम नोकऱ्या सोडून व्यवसायात पडलो होतो. जळायचो मी तुझ्यावर तेव्हा.’’
‘‘काय सांगतोस?’’
‘‘हो. सुरुवातीच्या धडपडीच्या काळात नोकरीतल्या घसघशीत पगाराची आठवण यायची, मित्रांशी तुलना व्हायची, स्वत:चाच राग यायचा. पण आपला पिंड नोकरीचा नाही हे एकदा स्वीकारल्यावर मात्र ‘आता काही तरी करूनच दाखवेन’ या दिशेनं मी त्या रागाला वेगळ्या मार्गाने नेलं. त्यामुळे व्यवसायाचे टक्केटोणपे जड गेले तरी टिकून राहिलो. अनिश्चित परिस्थिती झेलायला मला त्या दिवसांनी शिकवलं. वस्तुस्थितीचा स्वीकार आपण जेवढा लवकर करू तेवढी दिशा लवकर सापडते हे आज स्वानुभवानं सांगतो.’’
‘‘वस्तुस्थिती स्वीकारणंच जमत नाहीये ना रे..’’
‘‘जमवावं लागेलच ना? आपल्या विझण्याला कुरवाळत, कारणं शोधत बसायचं नाही रे, स्वत:ला सामोरं जाऊन प्रश्न विचारायचे. उदाहरणार्थ, ‘परिस्थिती विपरीतच आहे, पण ती किती आणि कशी चुकीची आहे हे पुन्हापुन्हा उगाळत बसल्यामुळे भूतकाळ परत येणार आहे का? नव्या जगाला सामोरं जायच्या भीतीत मी उरलेली २५-३० र्वष काढू शकतो का?’, ‘मीच स्वत:ला ‘बिचारा’ समजलो तर लोकांनी ‘बिचाऱ्याला सन्मान’ का द्यावा?’, ‘जागच्या जागी चीडचीड करत त्याच त्या भोवऱ्यात फिरण्यातून रक्तदाब, नैराश्य सोबतीला आले तर ती जबाबदारी कंपनीची की माझी स्वत:ची?’, ‘आणखी पाच वर्षांनी हे घडलं असतं तर नवं शोधण्याची उमेद किती असती?’, ‘सध्याची मोकळ्या काळाची फेज मी चिडचिडीत काढावी की स्वत:साठी, कुटुंबासाठी वेळ देण्याची संधी म्हणून त्याकडे पाहावं?’ या प्रश्नांची तुझ्या मनात उमटणारी उत्तरंच तुझी भीती घालवतील, हिम्मत देतील दीपक. तुझ्यातली ठिणगी प्रज्वलीत होईल.’’
‘‘..खरं आहे रे. माझ्याच मनातल्या बिचारेपणानं आतली ठिणगी कधी विझवली? आत्मविश्वास संपवण्याएवढा कम्फर्ट झोन मोठा कधी झाला? ते कळलंच नव्हतं. खूप मोकळं वाटलं. मी स्वस्थ बसणारा माणूस नाहीच. काही तरी शोधेनच.’’ दीपकने उत्साहाने ‘आणखी दोन कटिंग’ची ऑर्डर दिली.
नीलिमा किराणे
neelima.kirane1@gmail.com