ज्या विचारात पुन्हा पुन्हा अडकून मन अस्वस्थ राहात असेल; ताण, थकवा येत असेल, ते विचार तात्पुरते दडपले तरी पुढे कधीतरी उसळी मारून वर येतात. त्यासाठी संवाद टाळणं हा उपाय नक्कीच नाही. ‘भला हुआ मेरी मटकी फूट गयी, मै तो पनिया भरन से छूटी रे’.. हाही मनाचा खेळच. आहे ते स्वीकारण्यासाठी मन उघडं, खुलं हवं. तरच सुटका होते त्यातून..
‘फेसबुक’ची ओळख झाल्यावर जुन्या मित्र-मैत्रिणींना शोधून काढायचं गौरीला व्यसनच लागलं. अशीच एकदा तिला मानसी ‘सापडली.’ शाळेपासून कॉलेजपर्यंत ग्रुपमधली जवळची मैत्रीण, पण नंतर संपर्क तुटलेला. योगायोगानं तीही याच शहरात होती. फोन-पत्ते घेऊन दोघी कडकडून भेटल्या. जुनी जोडी पुन्हा जमली. चालू राहिली.. एकदा आठवणीत रमत गौरीनं विचारलं,
‘‘मानसी, तुला आपल्या चौथीच्या वर्गातला ‘रोहित’ आठवतो? माझ्या शेजारी राहायचा?’’
‘‘तो गोरा गोरा निळ्या डोळ्यांचा ना. चांगला आठवतो. त्याच्याशिवाय निळ्या डोळ्यांची दुसरी व्यक्ती मला आजपर्यंत भेटलेली नाहीये. तुला भेटला का तो नंतर कधी?’’ गौरी क्षणभर गप्प बसली. मग म्हणाली, ‘‘फेसबुकवर मध्यंतरी मी त्यालाही शोधलं. हैदराबादला असतो.’’
‘‘तुम्ही एकत्र यायचात शाळेत. म्हणून चिडवायचे सगळे तुम्हाला दोघांना. मग, फेसबुकवर ‘बचपन की मुहब्बत को..’ झालं का?’’ मानसीनं चिडवायची संधी सोडली नाही.
‘‘चौथीत कसली गं ‘बचपन की मुहब्बत?’ त्याच्या निळ्या डोळ्याचं कुतूहल अख्ख्या वर्गाला, मुलग्यांनासुद्धा होतं. तुलाही इतक्या वर्षांनी त्याचे निळे डोळे पहिल्यांदा आठवले. वर्गात मुलांनी त्याच्यावरून चिडवल्यावर मला गंमत वाटायची, पण किती निरागस नातं होतं तेव्हा.’’
‘‘रोहित माझ्याही आठवणीत होता, पण त्याला कधी शोधावंसं नाही वाटलं मला.’’
‘‘शेजारी असल्यामुळे आम्ही एकत्रच असायचो. खूप घट्ट मैत्री होती आमची. झाडावरच्या कैऱ्या पाडायच्या, चिंचा, आवळे, चिक्की आम्ही दोघं मिळूनच खाणार. वर्गात ओरडा बसला तर एकमेकांची समजूत घालायची, रात्री गच्चीवरून मृग, सप्तर्षी ओळखायचे..खूप आठवणी.. माझा ‘सखा’ होता तो. चौथीची परीक्षा झाल्यावर मी सुट्टीत मामाकडे गेले होते, तेव्हाच त्याच्या वडिलांची कुठेतरी लांब बदली झाली. परतल्यावर त्यांचं रिकामं घर पाहून खूप रडले होते. रोहितच्या आठवणीसोबत ते रिकामं घर आणि ‘न भेटताच गेला.’ ची रुखरुख, एक अधुरी भावना कायम मनात राहिली. त्याच्यासारखी मैत्री नंतर कुणाशी झालीच नाही.
‘‘खरं आहे. अपुऱ्या राहिलेल्या गोष्टी मन जास्त लक्षात ठेवतं.. बरं, पुढे..?’’
‘‘पुढे.. तो सापडल्यावर मला खूप आनंद झाला. दोन-तीन दिवस चॅटिंग केलं, आठवतील त्या सर्वाच्या चौकशा झाल्या, नंतर नंतर त्याच्या मेसेजेस्ना वेगळे अर्थ असावेत असं वाटायला लागलं. पण मनात आलेली शंका मी टिकू दिली नाही. कारण ‘माझा रोहित असा असूच शकत नव्हता.’ एके दिवशी मात्र स्पष्ट मेसेज, ‘‘पुढच्या महिन्यात मुंबईला येणार आहे. तूही दोन दिवस काढून येशील? एकत्र राहू.’’
‘‘माय गॉड.’’
‘‘मी संतापले, भांडले. तर त्यावर ‘एवढय़ा वर्षांनी मला शोधलंस ते काय उगीच?’ असा त्याचा निर्लज्ज प्रश्न. ताबडतोब ‘गुड बाय’ म्हणून त्याला ब्लॉक केलं आणि विषय संपवला. पण इतके दिवस झाले तरीही मनातली खदखद संपत नाहीये. अजूनही रोहितचा प्रचंड राग येतोय.’’
‘‘फक्त रोहितचा राग आहे की आणखीही काही होतं त्या अस्वस्थतेच्या मागे?’’
‘‘..खूप चीप वाटलं. रोहितनं आपल्याला ‘असं’ बोलवावं? किळसच वाटली सगळ्याची. स्वत:चाही राग आला, पण माझ्याकडून खूप नॉर्मल संवाद होता गं, त्यातून काहीही गैर अर्थ निघत नव्हते, तरीही असं का व्हावं? मला माणसं ओळखता येत नाहीत का? की बावळटासारखी कोणासमोरही जास्तच मोकळेपणाने बोलते?’’
‘‘मला नाही वाटत असं. तुझ्या संवादात थोडी एक्साइटमेंट असू शकते, पण काही चीप नसणार. रोहितनं ते तसं घेतलं. तरीही स्वत:ला अपराधी समजून तू ‘माझं काय चुकलं?’ च्या चक्रात पुन्हा पुन्हा फिरतेयस.’’
‘‘काहीतरी चुकलंच ना म्हणजे?’’
‘‘चूक की बरोबर ठरवण्यापेक्षा तुला नक्की काय सलतंय? ते शोधू या का गौरी?’’
‘‘रोहितच्या चॅटिंगमधली गडबड जाणवल्यानंतर देखील मी दुर्लक्ष केलं. माझ्या मनातल्या लहानपणीच्या हळव्या चित्रातच रमले. वेळेवर जागी कशी झाले नाही? याचा त्रास होतोय.’’ गौरी विचार करत म्हणाली.
‘‘तेव्हाच्या निरागस मैत्रीला आता पंचवीस-तीस र्वष उलटलीत, हा नवा रोहित कदाचित पूर्णपणे वेगळा, अनोळखी पुरुष असू शकतो हे सुचलंच नाही तुला. तो भेटल्याच्या अतिआनंदामुळे बेसावध राहिलीस.’’
‘‘हो. कारण माझ्यासाठी तो माझा ‘सखा’ होता. कदाचित एवढी वर्षे मनातल्या सख्याचा निरागस चेहरा त्याचाच होता. फक्त आपलेपणाची, स्त्री-पुरुष नातं विरहित भावना होती ती. पण निळ्या डोळ्यांमागून अनपेक्षितपणे समोर आला तो एक ‘पुरुष’, माझ्या मनातही त्याच्याबद्दल ‘ती’च अपेक्षा आहे असं गृहीत धरणारा. अठ्ठावीस वर्षे जपलेली निळ्या डोळ्यांच्या मित्राची फँटसी फक्त आठ दिवसांत पार फाटून तुटून संपली गं.’’
‘‘खरं आहे. अपेक्षाभंगाचा हा धक्का अवघडच होता. तरीही थोडं तटस्थपणे पाहा ना गौरी. गृहीत तर तूही धरलंस, त्याच्याही मनात तशीच हळवी भावना असेल असं? फक्त दोघांची गृहीतकं-पर्सेप्शन्स वेगवेगळी. त्याच्या वडिलांची दर तीन वर्षांनी बदली व्हायची. तो एवढा गुंतत नसेलही मैत्रीत. तू तिथेच अडकलीस, तो पुढे गेला. ’’
‘‘खरंच की गं, मी त्याला शोधायलाच नको होतं. चुकलंच.’’
‘‘असं नाहीये ग. ‘रोहित न भेटताच गेला’ ही व्याकूळ भावना तुझ्या मनात वर्षांनुर्व्ष अडकून बसली होती. अशा ‘अपुऱ्या राहून गेलेल्या’ गोष्टींमधून सुटण्यासाठी एकदा तरी संवाद, भेट काहीतरी संपर्क व्हायलाच हवा. मनातलं आवर्तन पूर्ण झालेलं बरं. यातून चांगलं घडण्याची शक्यताही होतीच की..’’
‘‘रोहित ‘फेसबुक’वर सापडला तेव्हा ते चक्र पूर्ण झाल्यासारखं वाटलं होतं खरं. पण आता ही विचित्र अस्वस्थता मागे लागली..’’
‘‘एवढा अस्वस्थ ताण फक्त रोहितच्या धक्क्यामुळेच असेल असं नाही बरं का. साचून राहिलेल्या भावनाही असू शकतात.’’
‘‘म्हणजे?’’
‘‘कधी कधी आपण काही हेतूने एखादी गोष्ट करतो, पण समोरची व्यक्ती त्यातून वेगळाच अर्थ काढते. गैरसमजामुळे समान पातळीवर येऊन दोघांत संवाद होत नाही. ‘माझ्या हेतूबद्दल त्यांनी विनाकारण गैरसमज करून घेतला आणि मला त्याबाबत काहीच करता येत नाही’ ही दुखावणारी, हतबल भावना अस्वस्थ करते.’’
‘‘हो. खूपदा होतं असं. नातं जवळचं असेल तर त्याचा त्रास फारच होतो.’’
‘‘व्यक्ती आणि प्रसंग कुठलेही असले ना, तरी ती हतबल भावना सारखीच असते. त्यामुळे प्रसंग विसरला तरी अबोध मनात त्या भावनेचे थर साठत जातात. रोहितबाबत तेच घडलं तेव्हा मात्र अनेक थर एकत्र येऊन त्या भावनेनं टोक गाठलं. इतका त्रास झाला कारण तिथे तू फार हळवी होतीस. त्याच्या जागी दुसरा कुणी असता तर एवढा धक्का बसलाही नसता.’’
‘‘हो गं. पटतंय. एका छोटय़ा मुलीची हळवी फँटसी आणि मनात राहून गेलेल्या अपुरेपणामुळे अंतर्मनात किती उलथापालथ झाली. अपेक्षाभंग, गृहीतकं, भावनेचे थर.. कुठे कुठे फिरून आलो आपण. मनात अशा साचून राहिलेल्या गोष्टींतून बाहेर पडण्यासाठी दरवेळी एवढा कीस पाडावा लागेल का गं?’’
‘‘दरवेळी नाही लागत. पण एखाद्या विचारात पुन्हा पुन्हा अडकून मन अस्वस्थ राहात असेल, ताण, थकवा येत असेल तर त्यातून सुटका हवीच. ते विचार तात्पुरते दडपले तरी पुढे कधीतरी उसळी मारून वर येतात. त्यासाठी संवाद टाळणं हा उपाय नक्कीच नाही. मात्र आपल्याला अपेक्षित असलेल्या पद्धतीनेच निराकरण होईल असंही नाही. प्रत्येकाच्या मनाचा खेळ निराळा त्यामुळे जे निघेल ते स्वीकारण्यासाठी मन उघडं,खुलं हवं. तरच सुटका होते त्यातून. मला कबीराचा एक दोहा आठवतोय गौरी..
‘भला हुआ मेरी मटकी फूट गयी
मै तो पनिया भरन से छूटी रे’
दोहा ऐकून गौरीला हसू आलं. ‘‘खरं आहे गं. सगळे मनाचे खेळ. एखाद्या खेळात घागर फुटू शकते, एखाद्या खेळात ‘आता पाणी भरणं पुरे’ असं पक्कं ठरवूनही सुटता येईल, किंवा एखाद्या खेळात ‘आपल्याला वाटलं तसं ते नव्हतंच’ असं लक्षात आल्यावर काल्पनिक घागर अदृश्य होऊन पाणी भरण्यातून सुटका होत असेल नाही का?’’
‘‘अर्थात. खेळ मना मनाचा म्हणजे निवडही ज्याची त्याची.’’ एकमेकींना टाळी देत दोघी मैत्रिणी प्रसन्न हसल्या.
– नीलिमा किराणे