डॉ. नंदू मुलमुले

म्हाताऱ्या आईवडिलांशी अत्यल्प संपर्क ठेवणाऱ्या वा संपर्कच न ठेवणाऱ्या मुलांविषयी ऐकल्यावर आपसूक कपाळावर आठी उमटते. पण अशा प्रकरणांत केवळ मुलांचाच दोष असतो का? जगातल्या कोणत्याही नात्याला भावनेचा ओलावाच मिळाला नाही, तर ते फुलणार कसं? सुमेधा वहिनींची गोष्ट अशीच. जवळच्या नात्यांची रोपं त्यांना कधी रुजवताच आली नाहीत. आयुष्याची संध्याकाळ एकाकी असणार, की कुटुंबीयांच्या प्रेमाच्या सहवासात, हे तुम्ही आयुष्यभर त्यांच्याशी कसे वागलात यावरच अवलंबून असतं, हे त्यांना कधी कळलंच नाही…

hya goshtila navach nahi 3
नितांतसुंदर दृश्यानुभूती
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Loksatta balmaifal The fun of sharing kid moral story
बालमैफल : शेअरिंगची गंमत
Father daughter kanyadan emotional video goes viral father daughter bonding video
“हा क्षण का असतो मुलींच्या आयुष्यात?” लग्न ठरलेल्या प्रत्येक मुलीनं आणि तिच्या वडिलांनी पाहावा असा VIDEO
Loksatta chaturang Along with sensible profound partner family
इतिश्री: समंजस, प्रगल्भ सोबत
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
Loksatta chaturanga Parent Nature Confused Psychologist
सांधा बदलताना : संसार शांतीचा झरा…
Fear, man behaviour, courage,
‘भय’भूती : …तर भयमुक्ती होईल

वयाच्या मावळतीला नव्या पिढीबरोबर जे नातेसंबंध उरतात, तो असतो आयुष्यभर तुम्ही त्यांच्याबरोबर कसे वागलात याचा लेखाजोखा. नातेसंबंध रोपांसारखे जपावे लागतात, तेव्हाच त्याचे वृक्ष होऊन त्याला गोड फळं लागतात. अन्यथा ती रोपं वाढतंच नाहीत. खुरटतात, हे ओळखणं गरजेचं.

वयाची सत्तरी उलटलेल्या सुमेधा वहिनींना हे अखेरपर्यंत उमगलं नाही. न केलेल्या उपकाराच्या परतफेडीची वाट पाहात, नवऱ्याच्या माघारी त्यांचं उर्वरित आयुष्य एकाकी गेलं. आपलं काही तरी चुकलं असावं, याची त्यांना जाणीवही होऊ नये हे आश्चर्याचंच. झाली असेल कधीतरी… पण तोवर आयुष्य थकल्या शरीराला गहाण पडलं होतं.

आणखी वाचा- ‘एका’ मनात होती : पुरुषी एकटेपण

जुन्या काळच्या प्रथेप्रमाणे विशीच्या आतच त्यांचं लग्न झालं. नवरा एकत्रित कुटुंबातला, त्याला दोन भाऊ आणि चार बहिणी. कहाणी अर्थात पन्नास वर्षांपूर्वीची… कारण इतकी अपत्यं होण्याचा काळ आता कालबाह्य झालेला! सुमेधा वहिनींचं लग्न प्रभाकर दादांशी झालं आणि त्यांनी पुजारी घराण्यात पाऊल ठेवलं, तेव्हाच हे कुटुंब नसून कबिला आहे याची त्यांना जाणीव झाली! हा दहा-पंधरा लोकांनी भरलेला नातेसंबंधांचा पसारा, त्यात येणारे-जाणारे पै-पाहुणे, सणवार असेल तर शेजाऱ्यापाजाऱ्यांची भर. सुमेधा वहिनींचं माहेर तीन भावंडांचं, तुलनेनं आटोपशीर. त्यात दोन्ही कुटुंबांतले आर्थिक स्तर वेगळे. प्रभाकर दादांच्या पुजारी कुटुंबाचा डोलारा थोरल्या भावाच्या पगारावर. स्वस्ताई होती, मात्र दहा-बारा जणांचं खाणंपिणं, कपडेलत्ते, शिक्षण, प्रसंगोपात्त आजारपण, यात पगार निघून जाई. राहणी मध्यमवर्गीय. खाण्यापिण्यात कमतरता नव्हती, पण वरखर्च शक्य नव्हता. याउलट सुमेधा वहिनींचं माहेर तुलनेनं सुखवस्तू. महागातल्या साड्या, डिझायनर सॅण्डल्स, त्यात तमाम स्त्रीवर्गाला गार करून टाकणारी शृंगार-साधनसामग्री. मेकअपचं सामान म्हणजे फक्त पावडर, काजळ आणि अत्तर, एवढंच ज्ञान असलेल्या त्याकाळच्या नणंदवर्गाला हे सारं नवीनच.

सुमेधा वहिनींचं काम नेटकं होतं. अक्षर मोत्यासारखं, रांगोळी सुबक काढत. स्वयंपाकात क्वचित भाग घेत. एखादाच पदार्थ करत, पण तो सजवत छान! नटून तयार होत आणि दिवसभर अलिप्तपणे वावरत. सासू-सासरे, मोठे दीर-भावजयी यांना मान देत, मात्र नणंद-पुतण्या आणि एकूणच धाकट्या मंडळींच्या हास्यविनोदात सहभागी होत नसत. आग्रह केला तर येऊन बसत, पण मोटारमालकानं बंद खिडकीच्या काचेतून रस्त्यावरचा डोंबाऱ्याचा खेळ पाहावा तसं! लहान मुलांचे लाड करत, तेही दुरून. कपड्यांची घडी बिघडू नये याची दक्षता घेत. त्यांच्या चापचोप दर्शनानं, पहिल्यांदा सर्कस पाहणाऱ्या पोरानं समोरच्या झगमगत्या कसरती पाहून आईस्क्रीमसाठी रडणं विसरून जावं, तशी पोरं शांत होत. क्वचित बोलत, अन्यथा आवाज फक्त प्रभाकरदादांसाठी राखून ठेवलेला. नवऱ्याला बायकोच्या सौंदर्याचं, शिस्तीचं, तिनं समस्त पुजारी कुटुंबीयांवर टाकलेल्या प्रभावाचं कौतुक आणि जरबही. सुमेधा वहिनींचा आबच तसा होता. त्याचा त्यांना एक प्रकारचा अभिमानही होता. दुर्दैवानं त्यात नात्यांची, आपलेपणाची ऊब नव्हती. रडणारं पोर जिला आपली मानतं, तिच्या कुशीत अधिक रडतं! हक्कानं रडतं. हे सुमेधा वहिनींना कधी कळलं नाही.

दरम्यान, प्रभाकरदादांची बदली दूर बंगळूरुला झाली. गावाशी, मराठी मुलुखाशी संपर्क सुटला. एका अर्थानं दोघंही त्या काळचे ‘एनआरआय’ झाले! मुलीचं लग्न करताना कोसावरचा विचार करणारे ते लोक! पंचक्रोशी हाच ज्यांच्या विश्वाचा परीघ, त्यांना बंगळूरु अमेरिकेएवढंच दूर! सुमेधा वहिनींनी या महानगरात आपल्या मनाजोगतं घर घेतलं. आपल्या कलात्मक आवडीनं सजवलं. आपल्या कलेचं चीज करीत चित्रकला शिक्षिकेची नोकरीही मिळवली. त्या ‘सोशलाइट’ झाल्या. राजा-राणीचा संसार सुरू झाला. यथावकाश अपत्याची भर पडली. मध्यंतरी प्रभाकर दादांची बढती झाली, पगार वाढला. सुमेधा वहिनींचा वॉर्डरोब वाढू लागला. समस्त पुजारी कुटुंबीयांतल्या बंदिस्त स्त्रियांच्या असूयेचा विषय झाला. ‘एकच मुलगा, तोही शामळू. आज्ञाधारक, बापासारखा!’ अशी कुजबुज चाले. वांझ चर्चा. त्याची झळ ना सुमेधा वहिनींना, ना प्रभाकर दादांना.

आणखी वाचा- माझी मैत्रीण : अस्पष्ट रेषा!

श्री हा सुमेधा-प्रभाकर यांचा एकुलता एक मुलगा. तो जन्मापासूनच अबोल म्हटलं तरी चालेल इतका मितभाषी. हुशार, सदैव अभ्यासात बुडालेला. त्याला खगोलशास्त्राचा ध्यास. त्याच्या शालेय वाटचालीत आई-वडिलांचा सहभाग जवळपास शून्य. शिक्षिका असूनही आईनं क्वचितच त्याचा अभ्यास घेतला असेल. चीफ अकाउंटस् ऑफिसर म्हणून पदोन्नती मिळालेल्या वडिलांनाही वेळ नव्हता. सुमेधा वहिनी दिवसाचा जेमतेम एखादा तास शिकवूनही शाळेतून येईपर्यंत थकून जात. शनिवार-रविवारी त्यांच्या मैत्रिणींची सहल निघे. पोरानं तसंही आईला आपल्या अभ्यासापासून हातभार दूरच ठेवलं होतं. अभियांत्रिकी महाविद्यालयात तो नेमका कुठला विषय घेऊन शिकतो आहे याची त्यांना गंधवार्ताही नव्हती. त्यानं संगणक अभियंताव्हावं, असं बापाचं म्हणणं, कारण त्यात उत्तम पॅकेज मिळू शकतं असं त्यांनी ऐकलं होतं. ते श्रीने नाकारलं, एवढ्यावरून बापलेकात अबोला झाला, तो कित्येक वर्षं तसाच राहिला.

सुमेधा वहिनी आणि पोरात आधीच फार संवाद नव्हता. न बोलणाऱ्या लोकांतही दोघांना जोडणारा एक भावनिक धागा असतो. ‘कनेक्ट’ असतो. मुलाच्या आजारपणात त्याचे लाड करणं, त्याच्या परीक्षेला सोबत जागणं, यशापयशात साथ करणं, मुख्य म्हणजे त्याच्याबरोबर वेळ घालवणं, हे सारं जरुरी. सुमेधा वहिनींना ते कधी जमलं नाही. त्यांना त्याची कधी गरज वाटली नाही. सारं कशासाठी? मुलानं नीट परीक्षा पास कराव्यात, त्याचं आयुष्य मार्गी लागावं यासाठी! ते तो न सांगता करतोच आहे की. किंबहुना, त्याला आपल्या उपस्थितीची लुडबुड वाटते, मग कशाला? असं त्यांचं मत.

पुजारी घराण्यातलं कोणी बंगळूरुला गेलं तर त्याचं कोमट स्वागत होई. अजूनही सुमेधा वहिनी गावाकडच्या इतर नातेवाईकांपेक्षा आपलं सामाजिक स्थान वरचढ असल्याचं समजत. गेलेला पुतण्याही दबकूनच राही, चार दिवसांचा मुक्काम दोन दिवसांतच संपवून गावी परत जाई किंवा इतरत्र हलवी. जिथे प्रत्येकजण जुजबी चौकशी करून आपापल्या खोलीत जातो, तिथे आलेला पाहुणा बैठकीत एकटा बसून काय करणार?

दिवस सरत गेले. प्रभाकर दादांची बढती होत गेली, पगार अधिक वाढत गेला. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या होस्टेलवरून श्री सरळ कानपूरच्या ‘आयआयटी’ला गेला आणि तिथून पदव्युत्तर शिक्षण घ्यायला जर्मनीला. आधी वर्षातून एकदा येई, दोन दिवस घरी राहून एकटाच त्याच्या नव्यानंच आवड निर्माण झालेल्या जंगलभ्रमंतीला निघून जाई. खगोलशास्त्रात कमी पगाराची संशोधनवृत्ती घेऊन आधीच त्यानं बापाला नाराज केलं होतं, त्यामुळे त्या दोघांचा संवाद फारसा नव्हताच. तो सुरू ठेवण्याची गरज दोघांनाही वाटली नाही. जिथे बापाला नाही, तिथे आईलाही नाही!

आणखी वाचा- माझी मैत्रीण : जीव लावणारी ‘ती’

प्रभाकर दादा निवृत्त झाले. सुमेधा वहिनींनी आधीच दगदग होते म्हणून नोकरी सोडून दिली होती. तशीही त्या ती ‘टाइमपास’ म्हणूनच करत होत्या. श्री लग्नाचा झाला. ‘आता मुलगी शोधली पाहिजे,’ असं म्हणेपर्यंत त्यानं कानपूरच्या आपल्या हिंदीभाषक मैत्रिणीशी लग्न ठरवून टाकल्याची बातमी दिली. सणसमारंभ याची फारशी आवड नसणाऱ्या पोरानं नोंदणी विवाह केला. तिच्या व्हिसाची काही अडचण म्हणून दोघंही दिल्लीला गेले आणि तिथून जर्मनीला. सासू-सुनेची भेट एअरपोर्टवर झाली तेवढीच. प्रभाकर दादा आणि सुमेधा वाहिनी घरी परतले.

आता एकेक दिवस मावळतीचा सूर्य घेऊनच उगवू लागला. प्रकृतीच्या तक्रारी उद्भवू लागल्या. डॉक्टर झालेल्या पुतण्याची चौकशी सुरू झाली. दीर-भावजयीला फोन केल्यावर ‘या एकदा दक्षिण भारत सहलीला,’ असा संभाषणाचा समारोप होऊ लागला. त्यातही फार आग्रह नव्हता, फक्त ग्रह फिरल्याच्या पुसट खुणा होत्या. प्रभाकर दादा थोरल्या भावाच्या भेटीसाठी वर्षाकाठी एखादी चक्कर मारायचे, आता सुमेधा वहिनी सोबत करू लागल्या. दुर्दैवानं पुजारी कुटुंब काळाच्या ओघात विस्कळीत होऊन गेलं होतं. जुनी पिढी संपली होती, नवी पिढी नवी क्षितिजं शोधत जगभर विखुरली होती. संपन्न झाली होती. सुमेधा वहिनींच्या नेटकेपणाचं, सौंदर्याचं कौतुक करणारे उरले नव्हते, जे उरले त्यांना कौतुक उरलं नव्हतं.
श्री जर्मनी सोडून अमेरिकेला गेला. तिथे बरं वाटलं तर कायम राहीन म्हणाला. नाही वाटलं तर? ज्याला आपण अस्थिरता म्हणत आलो, तीच नव्या पिढीची स्थैर्याची कल्पना, ही गोष्ट प्रभाकर दादांच्या पचनी पडेना. फक्त पोरानं आपल्याला सर्वस्वी अनोळखी अशी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे, हे त्यांनी ओळखलं. तो आता आपल्याला कायमचा दुरावला, याचीही फार उशिरा जाणीव झाल्याची बोचणी त्यांच्या मनाला लागली. सुमेधा वहिनींना तीही पुरती झाली नव्हती.

प्रभाकर दादांना पक्षाघात झाला. श्री भारतात येऊन गेला. अत्याधुनिक इस्पितळात भरती करून गेला. पुढल्या घटना व्हायच्या तशाच होत गेल्या. आजारी नवरा एक दिवस मरण पावणार, याचा सुमेधा वहिनींनी कधी गांभीर्यानं विचार केला होता की नाही कोण जाणे. प्रभाकर दादांनीही काही नियोजन केलं नसावं किंवा ते करायला हवं ही जाणीव होईपर्यंत ते जाणीव हरपून बसले असावेत. सगळे पुजारी कुटुंबीय जमले. विधी यथासांग पार पडले. नुकताच येऊन गेल्यानं श्री काही लगेच पुन्हा येणं शक्य नव्हतं, ते सगळ्यांनी समजून घेतलं. पंधरा दिवस संपले. जो-तो आपल्या कामाला लागला. आपल्या बंगल्यात सुमेधा वहिनी एकट्या उरल्या. मुलानं ‘ये’ म्हटल्याशिवाय जायचं कसं? आता सुमेधा वहिनी नातेवाईकांची यादी करू लागल्या. एकेक नाव लिहीत आणि काही क्षणांनंतर स्वत:च त्यावर काट मारत. कुणाला पुढाकार घेऊन विचारणं हेही त्यांच्या स्वभावाविरुद्ध होतं. व्यक्तिमत्त्वाला पडलेले पीळ कितीही वय झालं तरी सुटत नाहीत.

एकदा सहज त्यांनी त्यातल्या त्यात जवळच्या मैत्रिणीला फोन केला. तिनं भेटीला बोलावलं. पत्ता होता- ‘चैतन्य ओल्ड एज होम, जेपी नगर’! सुमेधा वाहिनी तेथे पोहोचल्या. मैत्रिणीबरोबर चहापान झालं. गप्पा झाल्या. काहीसा विचार करून त्यांनी व्यवस्थापकाकडून प्रवेश-फॉर्म मागवला. सारे तपशील भरले.एक रकाना राहिला- आपत्कालीन संपर्क नंबर, व्यक्ती?सुमेधा वहिनींनी पेनशी चाळा केला. त्यांना काही सुचेना. मैत्रीण पाहात होती. शेवटी ती म्हणाली, ‘‘लिही माझं नाव.’’ सुमेधा वहिनींनी तिचं नाव लिहिलं. रकान्याला मजकूर मिळाला, बस्स!

nmmulmule@gmail.com