डॉ. नंदू मुलमुले
जुन्या पिढीने वापरलेल्या वस्तू नव्या पिढीला आपल्या वाटत नाहीत कारण आधुनिक वस्तूंचे आकर्षण नवीन पिढीला असते, याचा अर्थ जुन्या वस्तू कालबाह्य होतात का? तर नाही, कारण जुन्या पिढीसाठी त्या केवळ वस्तू नसतात तर त्यांच्यासाठी भूतकाळातील आठवणींची ती उबदार गोधडी असते, कधीही कालबाह्य न होणारी. आप्पांचंही घर तेच, पण नव्या पिढीने ‘रिनोव्हेट’ केलेल्या या ‘भवनातील’ त्यांच्या दोन पिढ्यांमधील संघर्षाचे सूर नवे तराणे कसे झाले असतील?
एके काळी आवश्यक असलेल्या अनेक गोष्टी आधुनिक जगात कालबाह्य होताना दिसतात. डायलिंगचा जुना फोन, काळ्या कापडाचे ऐसपैस लुगडे नेसलेली लांब काड्यांची छत्री, खापराची तबकडी नांगरून गाणे बाहेर काढणारा, सुपाएवढा कर्णा असलेला ग्रामोफोन, एक ना दोन.
प्रश्न असा की, कालबाह्य कसं ठरवायचं? नव्यात जुनं की जुन्यात नवं? वस्तू जुन्या होतात म्हणून टाकाऊ की केवळ नव्या आल्यात म्हणून टाकाऊ? वस्तू काय आणि माणूस काय, टाकाऊ ठरवणार कोण हा प्रश्नच. आता आप्पांची गोष्ट सांगायची तर नातवाचं नवं कोरं गिटार आणि आप्पांची दात पिवळे पडलेली हार्मोनियमची पेटी, काय कालबाह्य? किंवा पोराने आणलेली ‘गोदरेज इंटेरिओची लक्झरी चेअर’ आणि आप्पांची झोळणा झालेली ‘आरामखुर्ची’, कोण कालबाह्य? आप्पांना गाण्यांची आवड. गळा जेमतेम, मात्र पेटीवर बोटे कुशलतेने चालत. नोकरीत असताना संध्याकाळी कचेरीतून आले की, हातपाय धुऊन पेटी वाजवायला बसत. यमन कल्याणचे सूर छेडत. मेहदी हसन त्यांचा आवडता. त्यामुळे कधी ‘गुलों में रंग भरे, बादे नौबहार चले’ गुणगुणत. ‘चले भी आओ के गुलशन का कारोबार चले’ म्हणताना ‘चले भी आओ’ असे काही आळवत की लीलाताईंना, त्यांच्या पत्नीला कॉलेजमध्ये आप्पांचा ‘कारोबार’ चालवणारी कुणी होती की काय याची शंका यावी.
आप्पांची अर्धा-पाऊण तास सुरांशी छेडखानी झाली की, लीलाताई पेटीला गवसणी घालत आणि ती आरामखुर्चीखाली ढकलून देत, मग त्या खुर्चीवर मागे रेलत आप्पांची समाधी लागे. आता निवृत्त झाल्यावर काय, वेळच वेळ. मुलगा प्रशांत आणि सून लीना दोघेही कामावर. नातवाची शाळा दूर, त्यामुळे तो जो सकाळचा निघायचा तो संध्याकाळी साडेपाचला थकूनच परतायचा. सुनेचं बोलणं-वागणं दोन्ही काहीसं तुटक.
आणखी वाचा-माझी मैत्रीण : ‘आम्ही मैत्रीवर प्रेम करतो’
ती घरची एकुलती एक, आर्थिकदृष्ट्या नवऱ्यापेक्षा संपन्न घरातली. साहजिकच लग्न होऊन नव्या घरी आल्यावर तिला आप्पांच्या जुन्या दाराच्या उंबरठ्यालाच ठेच लागली. हे कुठलं नवं घर? बैठकीत बांबूचं सालपटं निघालेलं फर्निचर, दारांना जुनाट मळखाऊ पडदे, न्हाणीत डोक्याला शंभर पोचे पडलेला तांब्या, वायरची ठिगळे जोडलेला मिक्सर या साऱ्या गोष्टी खटकू लागल्या. ‘‘घराचं रिनोव्हेशन करू या, हे सगळं किती आउटडेटेड झालंय, आपल्याकडे एखादी पार्टी वगैरे करायची तर किती वाईट दिसेल हे,’’ तिने प्रशांतच्या मागे टुमणं लावलं. प्रशांतलाही मित्रांची घरे पाहून तसं वाटत होतंच. पण हे सगळं ‘जुनाट, कळकट’ म्हणायला त्याची जीभ धजत नव्हती. पण मग लीनाचा युक्तिवादही त्याला पटायचा. आता जमाना ‘वापरा आणि टाकून द्या’चा आहे. आयुष्यात बदलता येणाऱ्या गोष्टी बदलत राहिलात तर नावीन्य टिकून राहील. तुझी आई सुटसुटीत गाऊन घालते ना? मोबाईलवर लेकीशी तिच्या सासूच्या कागाळ्या ऐकत तासंतास बोलते ना? आणि नंतर त्याच विहिणीशी व्हीडिओ कॉलवर हसून गप्पा करते ना? आप्पा प्रवासात बिसलेरी पाणी पितात, चाकाची सुटकेस घेतात ना? साधा टूथब्रश, पेस्ट, टॉवेल ‘मिळेल की हॉटेलला’ म्हणतात ना? लीनाच्या फैरीपुढे प्रशांत निरुत्तर होई.
शेवटी एकदाचं इंटीरिअरवाल्या बाईला घरात आमंत्रण देण्यात आलं. तिने आल्याबरोबर घरातल्या साऱ्या असुविधांचं विच्छेदन केलं. घरात फोडतोड सुरू झाली. जुन्या कपाटांचे कोथळे बाहेर आले. भिंतीचं फेशियल सुरू झालं, फरशीचं पेडिक्युअर करण्यात आलं. डोक्यावरचं छत कृत्रिम झालं. नवा रंग, नवे दिवे, चोहीकडे नवा उजेड पडला. जुन्या टाकाऊ वस्तूंचा ढिग जमला. गंजकी विळी, मातीची सुगडी, मागल्या दिवाळीतल्या पणत्या, लाकडी रवी, जुने अभ्रे, जुने पडदे, लाकडी पेट्या कोण विकत घेणार? फुकट नेणाऱ्यानं रिक्षाभाडं नाही मागितलं म्हणजे झालं.
शेवटी दोनच वस्तू उरल्या; तीन पिढ्यांचे तीन सप्तक पोटात घेतलेली हार्मोनियम पेटी आणि साठ वर्षांचा चढउतार पचवून बारा बाळंतपणं झाल्यासारखी आरामखुर्ची. त्याआधी आप्पा आणि लीलाताईंना महिनाभराच्या गुजरात यात्रेवर पाठवण्यात आलं. प्रभास, सोमनाथ, अक्षरधाम, बडोदा करीत सुरतमार्गे ते घरी परतले. सुंदर तोरण लावलेलं दार, खाली स्वागतार्थ नवं मखमली पायपुसणं. आप्पांना त्यावर चप्पल काढवेना. घरात लख्ख उजेड, रंगसंगतीनं नटलेल्या नव्या भिंती, नवे कपडे चढवलेला सोफा, खिडकीतली अडगळ जाऊन त्याची जागा सुबक कुंड्यांनी घेतलेली. आप्पा सारं घर फिरले. हरखले.
लीलाताई स्वयंपाकघरातला बदल पाहून खूश झाल्या. खिडकीच्या काचा स्वच्छ केलेल्या, सारे धान्य, जिनसा एका आकाराच्या पारदर्शक डब्यांमध्ये ओळीनं रचलेल्या. डबे? लग्नात आहेर मिळालेले स्टीलचे डबे कुठे गेले? ‘‘कुणीच घ्यायला तयार होईना, शेवटी कामवाली बाई कशीबशी तयार झाली,’’ सुनेने हसत सांगितलं.
‘‘अगं त्याच्यावर नावं होती टाकलेली,’’ लीलाताईंना काही सुचेना. सुनेने खांदे उडवले आणि ती किचनच्या बाहेर पडली. रात्री तिने नवऱ्याकडे तक्रार केलीच, ‘‘एवढी मेहनत घेऊन आपण हे सारं रिनोव्हेट केलं, त्याचं कौतुक गेलं कुणीकडे, त्या वाकड्यातिकड्या डब्यांमध्ये यांचा जीव.’’
आणखी वाचा-जिंकावे नि जगावेही: विचारांची सदाबहार फुलबाग
नवरा काहीच बोलला नाही. त्याला बायकोचं पटत होतं. फक्त तिनं आईच्या कानावर आधी टाकायला हवं, किमान विचारायला हवं होतं, असं त्याला वाटून गेलं.
इकडे कात टाकलेल्या घराचं नवं रूप पाहून आप्पांना आपण बडोद्याच्या बड्या हॉटेलमध्ये असल्यासारखं वाटत होतं. त्यात आप्पांचं संगीतप्रेम आठवून प्रशांतने फॉल्स सिलिंगमध्ये बसवलेले महागडे स्पीकर्स. त्यातून झिमझिमणारा शिवकुमार शर्माचा ‘भटियार’. आप्पांना भजन आठवलं, ‘कोई नही है, अपना…ये जग रैन का सपना…’ त्यांची बोटे हवेत पेटीवर फिरू लागली.
‘‘पेटी? पेटी कुठे गेली?’’ त्यांनी विचारलं. ‘‘ती माळावर टाकली बाबा, इथे कुठल्याच खोलीत फिट बसत नव्हती.’’
आप्पा बसकण मारायला खाली बसू लागले. खुर्ची? आरामखुर्ची? ‘‘ती घेतली कबाडवाल्याने आनंदानं! आपण ‘पेपरफ्राय’चे महागाचे सोफे आणलेले आहेत आप्पा, त्याच्यावर कसं कम्फर्टेबल वाटतं बघा तुम्हाला.’’
आप्पा न बोलता बसले. खूप मऊ, आरामदायी. पण कुठेतरी भंगारवाल्याच्या दुकानात कोपऱ्यात पडलेली आरामखुर्ची त्यांना दिसायला लागली आणि अपराधी वाटू लागलं. ओझं झालेल्या आजारी मुलाला दूर जाणाऱ्या अनोळखी रेल्वेत बसवून पसार व्हावं तसं. किती जीव अडकवावा माणसानं निर्जीव वस्तूंमध्ये? काय चुकलं पोराचं? आप्पांनी कढ दाबून टाकला.
प्रशांतला ते त्याक्षणी जाणवलं. क्षणभर, पण तो सावरला. ‘‘किती दिवस आप्पा, लीलाताईंचा संसार करायचा आपण?’’ त्याला बायकोचं बोलणं आठवलं, मनोमन पटलं.
दिवस असाच गेला. संध्याकाळी आप्पा लीलाताईंना घेऊन सोसायटीच्या बागेत गेले. खूप वेळ नुसते अंधार बघत बसले. माणसाला खूप बोलायचं असतं तेव्हा काहीच बोलावंसं वाटत नाही. लीलाताई त्यांचं ते न बोलणं ऐकत राहिल्या. मग शेवटी एकच वाक्य प्रकट बोलले, ‘‘आपण कालबाह्य झालो आहोत का या घरात? सगळीच माणसं कालबाह्य आहेत का या युगात?’’
लीलाताईंची भावना काहीशी तशीच होती. पण त्यांच्या लक्षात आलं, नवऱ्याला सावरायला हवं. ‘‘या जगात कुणीच कालबाह्य नाही. पण मुलांच्या आनंदासाठी आहे ना सारी धडपड, मग घेऊ देत त्यांना आनंद.’’
‘‘मग आपला जुन्याला चिकटून बसण्याचा हट्ट अनाठायी आहे का?’’
आणखी वाचा-स्त्री-शोषणाचा जातपंचायतीचा विळखा
‘‘जुनं त्यांच्यासाठी. आपल्यासाठी ते आपल्या वयाचं, आपल्या वयाबरोबर वाढत गेलेलं. हातपाय कधी जुने होतात का? बायकांसाठी लग्नातला शालू कधी जुना होतो का? त्यांच्या भावना, आठवणी विणलेल्या असतात त्यात,’’ लीलाताई क्षणभर थांबल्या. ‘‘पण सूनबाई दुसऱ्या घरातून आलेली. तिच्यासाठी तिच्या लहानपणीच्या वस्तू प्रिय असतील. आपल्या पेटी-खुर्चीबद्दल तिला आस्था वाटणं शक्य नाही हे विचारात घ्यायला हवं.’’ आप्पा कौतुकानं आपल्या बायकोनं दाखवलेल्या समंजसपणाकडे पाहात उभे राहिले. मात्र घरात आल्यावर तोडलेल्या झाडाकडे पक्ष्याने घिरट्या माराव्या तसे ते पेटी-खुर्ची ठेवत असलेल्या कोपऱ्यात बघत राहिले.
आप्पांचा उतरलेला चेहरा प्रशांतने टिपला. त्याने मनाशी काही निर्णय घेतला. ऑफिस आटोपल्यावर भंगारवाल्याचं दुकान शोधून काढलं. सुदैवानं आरामखुर्ची कुणी घेतली नव्हती. ती परत घेऊन, साफ करून त्यानं बैठकीत उन्हाचा कवडसा येईल अशा ठिकाणी स्थानापन्न केली. एका रविवारी माळावर चढून पेटी काढली, एका छोट्या टेबलावर ठेवली. त्यावर एक मखमली कापड पांघरलं.
प्रशांतने ‘अडगळ’ हुडकून परत आणून भरती केलेली पाहून लीना संतापली. ‘‘तुला माहिताय ना माझ्या ऑफिसमधल्या मैत्रिणींची पार्टी आहे शनिवारी? एवढे पैसे खर्च करून आपण इंटीरिअर केलं. त्यात ही जुनाट आरामखुर्ची टाकून माझ्या मैत्रिणींसमोर कळकट प्रदर्शन करायला ठेवणार आहेस का?’’
‘‘लीना, हे बघ,’’ प्रशांत म्हणाला, ‘‘ही आप्पांची आवडती खुर्ची आहे. जीव आहे हिच्यात त्यांचा. लागली तर पॉलिश करू, पण आप्पांच्या भावना जपू. कालबाह्य कोण? आप्पांची खुर्ची की त्याभोवतालचं हे इम्पोर्टेड फर्निचर?’’
‘‘ते काय व्हिंटेज आहे जपायला?’’
आणखी वाचा-सांदीत सापडलेले…! मालक कोण?
‘‘होईल एक दिवस. ‘व्हिन्टेज व्हॅल्यू’ सगळ्या गोष्टींना येते. माणसांनाही, ते गेल्यावर. लीना, वृद्धपणी जुन्या वस्तूंवर आठवणींच्या वेली चढतात. तो दुवा असतो त्यांचा, भूतकाळातील सुखदु:खांशी. जुनी गोधडी आजीची माया पांघरते अंगावर, ती हजारो रुपयांच्या महागड्या क्विल्टमध्ये कशी येणार? येईल, तिच्या कुशीत सुखदु:खाचे क्षण घालवल्यावर. आप्पांची बोटे पेटीवर नाही फिरत, भूतकाळावर फिरतात. आप्पांची खुर्ची त्यांना पुन्हा आईच्या गर्भाशयात नेते, निजू घालते. बघतेस ना कसे गुरगुटून झोपायचे ते खुर्चीत?’’ लीनाने शस्त्र टाकलं. तिला ‘मातृत्वा’ची भावना स्पर्शून गेली होतीच. आपली आवडती खुर्ची पोराने पुन्हा आवर्जून आणल्याचे पाहून आप्पा सुखावले. खुर्चीसाठी नाही, तर पोराच्या, सुनेच्या समजूतदारपणासाठी त्यांची बोटे पुन्हा पेटीवर फिरू लागली. संवादिनी ती, संवाद पुन्हा सुरू करून गेली. आप्पांच्या या ‘रिनोव्हेटेड भवना’त दोन पिढ्यांमधील संघर्षाचे जुनेपुराणे गीत आळवले गेले नाही, तर नवे सूर अन् नवे तराणे विहरले.
nmmulmule@gmail.com