डॉ. नंदू मुलमुले

‘‘जनमेजय राजाचा दरबार भरला होता. आस्तिक ऋषींच्या तपानं सर्पयज्ञाची सांगता झाली. सापांची आहुती थांबली. व्यासांचे शिष्य वैशंपायन ऋषींनी जमलेल्या प्रजाजनांना महाभारताची कथा सांगायला प्रारंभ केला. कुरुवंशाची कथा. जनमेजयाच्या पूर्वजांची कहाणी. शंतनू, विचित्रवीर्य, धृतराष्ट्र, पांडू, त्यांचे पुत्र कौरव-पांडव आणि त्यांच्यात झालेले महाभारताचे भीषण युद्ध. ते संपून युधिष्ठिर हस्तिनापुराच्या सिंहासनावर विराजमान झाला…’’ आप्पा वनिताताईंना ‘महाभारत’ वाचून दाखवत होते. सोबत शेजारचे नाना होते.

नवऱ्याने वेळ घालवण्यासाठी हा उपक्रम सुरू केलाय, अशी वनिताताईंची समजूत. आप्पांच्या मनात मात्र काही वेगळंच होतं. मुलगा-सून नोकरीला, नातू-नात शाळेत. नुकतीच सुनेची बहीण, तिचा नवरा जवळच राहायला आलेले, त्यांच्या सरबराईत आप्पा-वनिताताईंना बाजूला पडल्यासारखं वाटू लागलं. आत्तापर्यंत जेमतेम ठीक असलेल्या सासू-सुनेच्या नात्याला चरे पडू लागले. नेहमीच्या गोष्टी. वनिताताई बडबडायच्या, ‘‘तिची बहीण, मेव्हणा आले की, ती आपल्याला अडगळीत टाकते. नको असलेले आगंतुक अशा नजरेनं पाहते. तुम्हाला चहा तरी करून देते का? माझं नको करूस पोरी, पण सासऱ्याला अशी वागणूक देतेस?’’ रोजच्या लहानसहान कटकटी. आप्पांना त्याचं काही फारसं वाटत नसे, पण बायकोने त्यांची ‘इभ्रत’ हा तिच्या आणि सुनेच्या द्वंद्वात महत्त्वाचा मुद्दा केला होता. एरवी तिला त्यांच्याबद्दल खरंच एवढं वाटत होतं की नाही, हा मुद्दा वेगळा.

‘‘अगं जाऊ दे. छोट्या छोट्या गोष्टी, कशाला वाढवायच्या? त्याने पोराच्या डोक्याला ताप होईल ना? आता आपण लक्ष काढून घेतलं पाहिजे यातून.’’ असं म्हटलं की वनिताताई उसळायच्या, ‘‘तुम्ही नेहमी तिचीच बाजू घेता. संतपदी पोहोचलात ना तुम्ही. मला नाही जमणार.’’

आणखी वाचा-‘भय’भूती: मम भय कोण वारिते?

आता याच्यात संतपदी पोहोचण्याचा काय संबंध? साधा सारासार विचार, जो प्रत्येक ज्येष्ठाने वयाच्या या टप्प्यावर करायला हवा, आप्पांना वाटायचं. किती दिवस अडकून ठेवायचा जीव या सांसारिक गुंत्यात?

… त्यांनी पान उलटलं. नाना हातातल्या काठीशी चाळा करीत ऐकू लागले. ‘‘युधिष्ठिर सगळ्या ज्येष्ठांची उत्तम काळजी घेत होता. मात्र भीमाच्या मनात धृतराष्ट्राने केलेल्या अन्यायाची चीड अजून धगधगत होती. काकाला ऐकू जाईल अशा आवाजात तो दुर्योधनाचा आपण कसा नि:पात केला याचे मित्रांसमोर त्वेषपूर्ण शब्दात वर्णन करी. यामुळे धृतराष्ट्र, गांधारी अस्वस्थ होत असे. अखेर एके दिवशी विदुराने त्यांना उपदेश केला, ‘‘ज्या पुतण्यांशी तुम्ही वाईट वागलात, त्यांचाच पाहुणचार घेत आहात, मग भीमाची निर्भर्त्सना ऐकून घ्यावी लागेल. आता भोग सोडा, वनाचा मार्ग धरा. या वयात वानप्रस्थाश्रम सांगितला आहे पूर्वजांनी. किती दिवस संसारात लक्ष घालाल?’’ हे वाचत असताना आप्पांनी वनिताताईंकडे एक कटाक्ष टाकला.

‘युधिष्ठिराला निरोप गेला. तो त्वरित आला. तात लहानपणीच गेले, तेव्हापासून तुम्ही मातृ-पितृस्थानी. तुम्ही निघून गेलात तर आम्हाला ज्येष्ठांचे मार्गदर्शन कसे मिळेल? धृतराष्ट्राने आपल्या निर्णयाचे तात्कालिक कारण सांगितलं नाही, अन्यथा दोन्ही भावांमध्ये कलह निर्माण झाला असता. तो एवढंच म्हणाला, ‘‘राजन, आपल्या पूर्वजांनी सांगितलेले चार आश्रम आहेत. ब्रह्मचर्य (विद्यार्थी), गृहस्थ आणि आता वानप्रस्थ, मग संन्यस्थ. आजवर आम्ही पुरेसा गृहस्थाश्रम उपभोगला आहे. आता वनात जावे हे बरे. तुझी सेवा पुत्रवत आहे, पण मन विरक्त झाले आहे. मी, गांधारी, विदुर आणि सोबत संजय, वनात प्रस्थान करणार. कधीही मदत लागलीच तर तू वनात येऊ शकतोस. तीही तुझीच भूमी आहे!’ सोबत कुंतीही निघाली, तेव्हा मात्र पांडूपुत्र हादरले. धृतराष्ट्र-गांधारीचे सारे पुत्र मरण पावले होते, त्यांचे वनप्रस्थान करणे साहजिक होते. मात्र आपली आई? राजमाता कुंती? तिचे पुत्र दिग्विजयी ठरले होते. सत्तेवर तिचा हक्क होता. आयुष्यभर हालअपेष्टा, अवहेलना सहन करून झाली होती. आता वैभव भोगण्याचे दिवस आले असताना त्याग? भीमाने आईला आठवण करून दिली. ‘द्रौपदीच्या मानमर्यादेची विटंबना होत असताना काकांनी आपले कर्तव्य पार पाडले नाही, ते आपल्या धर्माला जागले नाहीत, याची तुला आठवण करून द्यावी का? त्यांना आपल्या पापाची फळे भोगू देत, तू का जाते आहेस?’’

आणखी वाचा-सांदीत सापडलेले…! मैत्री

‘‘बलश्रेष्ठ पुत्रा.’’ कुंती तिच्या लाडक्या मुलाला समजावू लागली, ‘‘ते चुकले असतील, पण कुंती आपल्या कर्तव्याला चुकली असं तुझ्या आईविषयी उद्या बोललं जाईल, ते तुला आवडेल का? घटना घडत असतात, त्यांचे ओरखडे उमटतात, माणूस जखमांनी विद्ध होतो हे खरं. पण जखमा कालांतरानं भरतात हेही खरं. ते विवेकानं वागले नाहीत म्हणून मीही अविवेकी होणं कृष्णाला तरी पटलं असतं का?’’

भीमाने तरीही आपली बाजू सोडली नाही. ‘‘माते, आमचा जन्म वनातच झाला. तेथेच आम्ही खेळलो, मोठे झालो, तारुण्य प्राप्त करते झालो. तात गेले, माता माद्री गेली. तू आम्हाला वनातून हस्तिनापुरात घेऊन आलीस. पुढचा सारा इतिहास घडला. आम्ही द्यूतात हरलो. इंद्रप्रस्थ गेले, वैभव गेले, चौदा वर्षे वनवास घडला. पुन्हा तू आम्हाला हस्तिनापुरी घेऊन आलीस. त्यातून संघर्ष उद्भवला. युद्ध झालं. प्रचंड नरसंहार झाला. आता युद्धांना पूर्णविराम मिळाला असताना, वैभव उपभोगण्याचे दिवस आले असताना तू वनात जाते आहेस?’’
कुंतीने आपल्या बुद्धिमान पुत्राकडे बघितलं. त्याचा युक्तिवाद बिनतोड होता. पण युक्तिवादाने सभेतील वाद जिंकता येतात, आयुष्याचं वास्तव बदलत नाही.

‘‘मी खूप राजवैभव उपभोगलं आहे रे पुत्रांनो. मी दिग्विजयी, महापराक्रमी पांडूची पत्नी होते. पांडू आजारी पडले, त्यांना वनात जावं लागलं, म्हणून तुम्ही वनात जन्माला आलात. पण सिंहाचे बछडे तुम्ही, आपल्या पित्याचा वारसा विसरू नये, आपला न्याय्य हक्क प्राप्त करावा, वैभव प्राप्त करावं यासाठी वनातून हस्तिनापुरात घेऊन आले. मला वैभवाचं आकर्षण कधीच नव्हतं.’’

भीम निरुत्तर झाला. कुंती बोलू लागली, ‘‘पराक्रम गाजवण्याचे, वैभव भोगण्याचे तुमचे दिवस आहेत. तरुण वयात कुणी वैराग्याची भाषा बोलू लागला तर ते जितकंअस्थानी ठरेल, तेवढेच वृद्धाने उपभोगाची, ईर्ष्या-मत्सराची भाषा करणं विपरीत ठरेल.’’

‘‘पण दुर्योधनाने, शकुनीने केलेल्या कपट-नीतीला धृतराष्ट्राने साथ दिली ना? अशा लोकांसाठी तू आपल्या मुलांना दु:खात लोटून जाते आहेस?’’ भीमाने पुन्हा मातेचं मन वळवण्याचा प्रयत्न केला.

आणखी वाचा-सांधा बदलताना : या भवनातील गीत पुराणे?

‘‘तो त्यांच्या राजकारणाचा भाग होता. पुत्रप्रेमाने ते खरोखरीच अंध झाले होते. डोळे फक्त प्रतिमा पाहतात, दृष्टी मनाची असते. त्यांच्या मनावर पुत्रप्रेमाचा पडदा पडला होता. त्या वेळी मीही तुम्हाला लढायला उद्युक्त केलं. अश्वत्थामा मेला तो ‘द्रोणाचार्यांचा पुत्र की हत्ती, हे माहीत नाही’ सांगणं हे राजकारण, कर्णावर रथाचे चक्र बदलताना शस्त्र चालवणं ही युद्धनीती, पितामह भीष्मांवर शिखंडीच्या आडून शरवर्षाव करणं हेदेखील युद्धाचे डावपेच. युद्ध संपलं. जीवनाचं समरांगण शांत झालं. माणूस आयुष्यभर लढू शकत नाही. लढूही नव्हे. शरीराची लढाई संपत जाते तसं राहुटीत परत जावं. आता उरतात फक्त नाती. माणसामाणसांतली. हे तर माझे रक्तातल्या नात्याचे. त्यांना सोडून मी राजवैभव उपभोगणं माझ्या मनाला पटेल का?’’

भीम निरुत्तर झाला. सारे शोकमग्न झाले. कुंती बोलू लागली. ‘‘तुमचा शोक मला माझी पुढली वाट दाखवतो आहे. जोवर मी तुम्हाला कुठल्याही स्वार्थाशिवाय हवी आहे, तोवर मी आपली वाट वेगळी केली पाहिजे. प्रेमाचे धागे सुखद स्मरणाच्या तंतूंनी गुंफलेले असावेत, तेव्हा ते वियोगाच्या जाणिवेने अधिक घट्ट होतात. भोजनातील अखेरचा घास, प्याल्याचा अखेरचा घोट आणि संवादातील अखेरचे शब्द मधुर असावेत तर ते चांगली आठवण ठेवून जातात. कुरुवंशातील स्त्रियांनी नेहमीच आपली कर्तव्ये निर्धारानं पूर्णत्वाला नेली आहेत. कधी राजसिंहासन सांभाळून, कधी त्याचा त्याग करून. मग ती गंगा असो, सत्यवती असो, गांधारी वा कुंती. तीच परंपरा पांचाली पुढे चालवेल. तेज, आप, वरुण या पंचमहाभूतांनी माझ्या माध्यमातून तुम्हाला या जगात आणलं. त्याच निसर्गाच्या शक्तीकडे मी परत जाते आहे. क्षत्रिय आपले ऋण बाकी ठेवत नाही. तेव्हा मला आनंदाने निरोप द्या.’’

आणखी वाचा-स्वभाव, विभाव : एकाकीपणातली असुरक्षितता

आप्पा थांबले. ग्रंथाची पाने फडफडली. नानांची दृष्टी तिकडे गेली, आप्पांच्या पुढ्यातले पान कोरे होते! अन् वनिताताई कथेत हरवून गेल्या होत्या… ‘‘वाचा ना पुढे.’’

आप्पांनी घसा खाकरला. त्यांनी ‘वाचायला’ सुरुवात केली, ‘‘तेवढ्यात तेथे ब्रह्मर्षी नारद पोहोचले. त्यांनी कुंती, धृतराष्ट्र आदींना शुभेच्छा दिल्या. युधिष्ठिराने नारदमुनींना विचारले, ‘‘ब्रह्मर्षी, कृष्णाच्या मृत्यूने कलियुगाचा प्रारंभ झाला आहे. आता यापुढे स्वार्थी वृत्ती वाढीला लागेल, माणसांमधील नाती तुटत जातील. निसर्गावरील अतिक्रमण वाढत जाईल, तशी वनेही नष्ट होत जातील. मग वानप्रस्थाश्रम कुठला?’’

नारदमुनी सांगू लागले, ‘‘राजन, तरुण पिढीला आपल्या अनुभवाचा अनुग्रह केल्यानंतर मावळत्या पिढीने वनातच जायला हवं असं नाही. अंतर राखून असणं महत्त्वाचं. ते भौतिक अंतर असेल किंवा मानसिक. त्याला ‘मन:प्रस्थाश्रम’ म्हणा हवं तर. वनात जाणं म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात जाणं. निसर्ग नि:संग असतो. तो वृक्ष, लता-वेली, पशु-पक्षी-प्राणी यांनी व्याप्त असतो, मात्र त्यांच्या विकारांपासून अलिप्त असतो. ‘मन:प्रस्थाश्रमा’त मनुष्यानं मनानं वनात जावं. सांसारिक व्यापतापांत राहूनही त्यापासून अलिप्त असावं. दुसरा मार्ग नाही. आज धृतराष्ट्र, गांधारी, विदुर, कुंती जात आहेत. उद्या परीक्षिताच्या हाती राज्य सोपवून तुम्ही जाल. हे जीवनाचं चक्र आहे. झरे नदीत आणि नदी सागरात विलीन होणे, या निसर्गक्रमाचा स्वीकार करा.’’

युधिष्ठिर स्तब्ध झाला. गांधारीला आधार देत वनाकडे प्रस्थान करणाऱ्या आपल्या आईकडे, राजमाता कुंतीकडे पाहत राहिला. आप्पाही थांबले. वनिताताईंच्या डोळ्यात आत्मस्वीकाराचे अश्रू होते. नानांनी सहेतुक आप्पांकडे पाहिलं. त्यांच्या शांतीपर्वानं वनिताताईंच्या मनात समंजस मन:प्रस्थाश्रमाची वाट दिसेल हा आश्वासक सूर होता.

nmmulmule@gmail.com