डॉ. रोहिणी पटवर्धन rohinipatwardhan@gmail.com

ज्येष्ठांच्या संस्था अनेक वर्षांपासून आहेत. त्यांची स्थापना, व्यवस्थापन काटेकोरपणे कायद्याच्या कक्षेत राहून केलं जातं. या संस्था ज्येष्ठांची ‘श्वसनकेंद्रे’ आहेत, पण ज्येष्ठांच्या जगात त्यांचा प्रभाव फारसा लक्षणीय नाही. यामागचे कारण शोधणे आवश्यक आहे. ज्येष्ठांच्या गरजा काय आहेत; त्यांच्या अडचणी काय आहेत, त्या दूर करण्यासाठी काय करायला हवे, याचा सखोल आणि गंभीरपणे विचार करायची वेळ येऊन ठेपली आहे.

ज्येष्ठांची संख्या वाढते आहे तशा ज्येष्ठांच्या संघटनाही निर्माण होत आहेत. आवडीनुसार त्यांचे विविध प्रकार आहेत. ज्येष्ठ नागरिक संघ, महिला मंडळे, योगसाधना मंडळे, भजनी मंडळे, हास्य संघ, वाचकमंच या प्रामुख्याने ज्येष्ठांची संख्या जास्त असणाऱ्या संघटना आहेत.

सर्वसामान्यत: संस्था निर्मितीमागच्या प्रेरणा या आवड जोपासणे, आरोग्य सांभाळणे आणि त्या त्या संस्थांच्या सभासदांच्या कल्याणासाठी काम करणे अशा असतात. पुण्यामध्ये काही संस्था आदर्श वाटाव्यात अशा आहेत. त्या कशा चालविल्या जातात, विकसित केल्या जातात त्याचा अभ्यास केल्यानंतर लक्षात आले की, सभासद लांब लांब राहतात हे लक्षात घेऊन त्यांना पायी जाता येईल किंवा एक कि.मी.च्या अंतरात राहणाऱ्यांचे एक एक गट केले. ते गट दररोज अथवा आठवडय़ातून किमान ३ वेळा भेटतात. सभासद संख्या मर्यादित असल्याने परस्पर संवाद आणि परस्पर सहकार्याची भावना तयार होते. त्यामुळे अडीअडचणी सोडविणे सहज शक्य होते. महिन्यातून एकदा मध्यवर्ती संस्थेमध्ये सगळे एकत्र येतात त्यावेळी प्रत्येक छोटा गट आपला रिपोर्ट सादर करतात. त्यामधून इतर गटांना प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळते. प्रत्येकाला संधी मिळत असल्याने कार्यक्रमाचे आयोजन सूत्रसंचालन आणि वृत्तांत लेखन व सादरीकरण अशा विविध भूमिका पाडायची सवय होऊन आत्मविश्वास वाढतो.

या साऱ्याचे वार्षिक नियोजन संस्थेचे अध्यक्ष पदाधिकारी करतात. स्वत: निरपेक्षपणे काम करून वेळोवेळी छोटय़ा गटांना भेट देऊन मार्गदर्शन व प्रोत्साहन देतात. संस्थेच्या माध्यमातून औषध पेढी, गरीब मुलांना शिक्षणासाठी मदत, देहदान, नेत्रदान अवयवदान इत्यादीबद्दल मदत केंद्र असे उपक्रम राबवितात. खरं सांगायचं झालं तर ज्येष्ठांच्या संस्था खूप जुन्या आहेत. अनेक वर्षांपासून आहेत. त्यांची स्थापना, व्यवस्थापन काटेकोरपणे कायद्याच्या कक्षेत राहून केलं जातं. या संस्था ज्येष्ठांची ‘श्वसनकेंद्रे’ आहेत, असे निश्चितपणे आहे. असे असूनही ज्येष्ठांच्या जगात त्यांचा प्रभाव फारसा लक्षणीय आहे असे जाणवत नाही. यामागचे कारण शोधणे आवश्यक होते. त्याचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा काही ठळक गोष्टी किंवा मर्यादा म्हणू या हवं तर लक्षात आल्या.

संघ काय करू शकतो ही एक मोठी शक्ती आहे. मानवी भांडवल (ह्य़ुमन कॅपिटल किंवा सोशल कॅपिटल) आहे याची त्यांना जाण नसते त्यामुळे दळण दळावे तसे सण, वाढदिवस, वर्धापन दिन, सहल, व्याख्याने, करमणुकीचे कार्यक्रम यातच वर्षांमागून वर्षे घालविली जातात. नाही तर सरकारकडे, कॉपरेरेशनकडे मागामागी करत राहायचे. जागा मागणे हे गरजेचे आहे, पण प्रचंड मोठय़ा शेकडो फ्लॅटच्या सोसायटीच्या हॉलमध्ये जागा राखून ठेवण्यासाठी तितकेसे प्रयत्न केले जात नाहीत.

ज्येष्ठांच्या खऱ्या गरजा काय आहेत; त्यांच्या अडचणी काय आहेत, त्या दूर करण्यासाठी काय करायला हवे, याचा सखोल आणि गंभीरपणे विचार करायची वेळ येऊन ठेपली आहे. प्रत्येकालाच संघ आपला वाटला पाहिजे, संघाचा आधार वाटला पाहिजे असा विश्वास, अशी भावना संघांनी निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

अशी भावना निर्माण करण्यासाठी त्यासाठी ज्ञान मिळवून प्रत्यक्षात उतरविण्यासाठी संघांच्या पदाधिकाऱ्यांसाठी वयाची अट ही ७०पेक्षा कमी वयाचे अशी असावी. संघाच्या जुन्या जाणत्या वयस्क लोकांचे सल्लागार मंडळ असावे.

दुसरी नेहमीचीच पण अत्यंत गंभीर गोष्ट म्हणजे ज्येष्ठांनी संघ काही करू शकेल यासाठी चांगले आर्थिक सहाय्य करावे. संघाने योजना जाहीर करून त्याचा तपशील जाहीर केल्यावर त्या त्या योजनेसाठी ठरावीक रक्कम द्यावी. हिशेब घ्यावा, पण बहुतेक वेळा योजना मांडली किंवा काही करायचे असेल तर पैसे देण्यासाठी ज्येष्ठ मुळीच पुढे येत नाहीत, हे सत्य मी अनेक वेळा अनेक संदर्भात मांडले आहे. तेच पुन्हा मांडते आहे (काय करणार?) आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी की, संस्था स्थापन करणे, त्या चालविणे, सभा घेणे, सभा नीट घेणे हे एक स्वतंत्र शास्त्र आहे याची जाणीव ज्येष्ठांना अभावानेच असते असे लक्षात येते.

कोणत्याही संघटनेचा उगम हा एखाद्या व्यक्तीच्या वेगळ्या विचारांमुळे किंवा समाजाबद्दल वाटणाऱ्या सहानुभूतीमुळे निर्माण होत असतो. स्थापनेचे मूळ ती व्यक्ती असल्यामुळे साहजिकच सुरुवातीच्या काळात ती व्यक्तीच संघटना चालवत असते आणि ते एका प्रकारे योग्यही असते. विचार पटल्यामुळे काही काळानंतर संघटनेमध्ये इतर लोकही सामील होतात आणि मग त्या संघटनेचे कार्य विस्तारत जाते. पण जसजसे दिवस जातात तसतसे सामील झालेले लोकही सक्षम होत जातात. त्यांना काही नवीन विचार, नवीन कल्पनाही सुचतात, परंतु मूळ संघटना स्थापन करणाऱ्या व्यक्तीला ते विचार पटतातच असे नाही किंवा त्यात काही बदल करावा असेही वाटत नाही. परिणामी संघटनेचे कार्य थांबल्यासारखे होते.

संस्था म्हणजे पर्यायाने कार्य पुढे चालण्यासाठी विचारांची आवश्यकता तर निश्चितच असते, पण त्याचबरोबर आवश्यक असते ते संघटनाकौशल्य. असे कौशल्य संस्था सुरू करणाऱ्यांमध्ये असतेच असे नाही, पण संस्था चालवताना संघटनकौशल्य असणारी व्यक्ती मात्र आवश्यकच असते. परिणामी ज्या वेळेला कार्य पुढे न्यायचे असते, त्यावेळेला ते संघटनेच्या माध्यमातूनच म्हणजे सभांमध्ये आपले विचार व्यक्त करून, लोकांना ते विचार पटले तरच योजलेले कार्य पुढे जाते. पण विचार मांडण्यासाठी वातावरण निर्मिती करणे आवश्यकच असते. अनेकदा सभा सुरू झाल्यानंतर नक्की सभेचा हेतू काय आहे, ते न कळल्यामुळे विचार पोहोचत नाहीत.

यासाठी सभा कशा घ्याव्यात, त्याची पूर्वतयारी कशी करावी, त्याची कल्पना सभासदांना पुरेशी आधी कशी द्यावी, त्यांना विचारासाठी आणि कृतीसाठी उद्युक्त कसे करावे, याची माहिती प्रत्येक संस्थेच्या अध्यक्ष किंवा पदाधिकाऱ्याला असणे आवश्यक असते. अनेक सभांना उपस्थित राहिल्यानंतर मला स्वत:ला प्रकर्षांने एक उणीव जाणवते ती म्हणजे बहुतेक वेळेला सभेबाबत त्यामध्ये काही नियम पाळायचे असतात, याबाबत कोणालाच माहिती नसते पदाधिकाऱ्यांनाही नसते. खरं तर सभा कशा घ्याव्यात यासाठी किमान तीन तासाची कार्यशाळा घेणे आवश्यक आहे.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बहुतेकदा संस्था म्हणजे एकखांबी तंबू असतात. एकाच व्यक्तीच्या अध्यक्षपदाखाली अनेक वर्ष संस्था असतात. खरंतर संस्था टिकवायच्या असतील तर आपल्याबरोबर सम विचारांची माणसे असणे आणि त्याचबरोबर आपल्या दुसऱ्या स्तरावरच्या नेतृत्वाची तयारी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, मात्र असे क्वचितच होते. अध्यक्षांनी अनेक लोकांना आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचे अनुभव घेण्याची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे आणि संस्थेत काम करणाऱ्यांनीही स्वत:हून पुढाकार घेऊन नवीन शिकण्याची तयारी ठेवली पाहिजे. अनेकदा कार्यकर्त्यां स्त्रिया आणि अध्यक्ष पुरुष असेच आढळते. संस्थेमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष एक स्त्री आणि पुरुष याप्रमाणे असले तर दोघांमध्ये असणाऱ्या वैशिष्टय़ांचा संस्थेला फायदा होतो

तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण वर्षांचा विचार करून वर्षभराच्या कार्यक्रमाचे नियोजन केले पाहिजे आणि प्रत्येक कार्यक्रमाची जबाबदारी संघटनेतल्या वेगवेगळ्या व्यक्तींना दिली पाहिजे. कार्यक्रमाचा वृत्तांतही तयार करत राहिले पाहिजे. वक्त्यांना निमंत्रित करण्यासाठी वेगवेगळ्या व्यक्तींना पाठविले पाहिजे. प्रत्येकाच्या आवडीनुसार जर जबाबदारी दिली तर ती व्यक्ती ते काम अधिक चांगल्या रीतीने करू शकते.

एकूणच काय जर संस्था आणि पर्यायाने कार्य जर पुढे चालू ठेवायचं असेल, तर देणारा आणि घेणारा, शिकवणारा आणि शिकणारा किंवा गुरू आणि शिष्य दोघांचीही तयारी असणे हाच सगळ्यात कळीचा मुद्दा आहे. प्रत्येकाने आपापल्या भूमिकेनुसार त्यात रस घेतला पाहिजे.

chaturang@expressindia.com

Story img Loader