वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापनावर पीएच.डी. आणि स्वत:चा वृद्धाश्रम आहे असे समजल्यावर अनेक जण वृद्धाश्रम सुरू करायचा आहे त्यासाठी सल्ला मागायला येतात. त्यातले काही खरोखर समाजासाठी काहीतरी करावे अशी तळमळ असणारे असतात तर काही ‘मार्केट’ ओळखून सरसावलेले असतात. पण दोन्ही प्रकारांत एक गोष्ट समान असते ती म्हणजे वृद्धाश्रम म्हणजे डोक्यावर छप्पर असलं की झालं आणि वृद्धाश्रम काढला की पटापट लोक येतील राहायला, हा भ्रम!
चूक कोणाचीच नाही, कारण वृद्ध आणि त्यांच्या गरजा याचा अभ्यास कोणाचाच नसतो. निराधार, परावलंबी, हिंडते फिरते, अपंग, मुले असणारे, नसणारे, एकटे, मानसिक आजार असणारे सर्व उपचारांचा काहीही उपयोग नसल्यामुळे केवळ दिवस कंठणारे, आर्थिकदृष्टय़ा सक्षम असणारे, मुले परदेशात असणारे या प्रत्येक गटाच्या गरजा वेगवेगळ्या असतात म्हणून वृद्धाश्रम सुरू करतानाच आपल्याला कोणासाठी काढायचा आहे आणि समाजसेवा की व्यवसाय म्हणून वृद्धाश्रम काढायचा आहे याबाबत स्पष्ट विचार करावा लागतो. अनेक प्रकार एका छताखाली करून उपयोग नसतो. ज्यांना वृद्धनिवासाचा पर्याय शोधण्याची गरज निर्माण झाली आहे त्यांनीही आपण कोणत्या प्रकारच्या वृद्धनिवासात जाऊ इच्छितो अथवा शकतो याचा विचार सुरुवातीला केला पाहिजे.
वृद्ध हा घटक तसा गरीब आणि काही प्रमाणात असाहाय्य आहे, अशी जाणीव व्यावसायिकांना होऊ लागल्याचे जाणवते आहे आणि म्हणूनच वृद्धांबद्दल आणखीनच काळजी वाटते. या लेखाद्वारे वृद्धाश्रम म्हणजे नक्की काय असणे अपेक्षित आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. याचा उपयोग स्वत: वृद्धांना वृद्धाश्रमात काय सोयी असल्या पाहिजेत याची माहिती घेऊन गरज पडेल तेव्हा आणि ज्यांना गरज वाटते त्यांना योग्य वृद्धाश्रमाची निवड करता येईल. आणि ज्यांना वृद्धाश्रम काढायचा आहे त्यांना मार्गदर्शक ठरू शकेल.
वृद्धाश्रम ही संस्था म्हणजे एक प्रकारे लॉजिंग बोर्डिग (निवास-भोजन), रुग्णालय (वैद्यकीय सल्ला, उपचार), शाळा (नव्याने गोष्टी शिकाव्या लागतात) आणि कुटुंब (विस्तारित नाती आणि सामाजिक संबंध) अशा अनेक संस्थाप्रकारची वैशिष्टय़े एकत्र होऊन निर्माण झालेली व्यवस्था आहे. मी वृद्धाश्रमाची व्याख्या केली आहे ती अशी, ‘निवास, भोजन, वैद्यकीय सल्ला यांसारख्या सोयी उपलब्ध करून देणारी वृद्धाश्रम ही अशी संस्था आहे की जेथे वृद्धांना आवश्यक असणारी सुरक्षितता आणि मानसिक शांतता मिळते.’ वृद्धसहनिवासाचे अनेक प्रकार आहेत. कोण चालविते यानुसार सरकारी आश्रयावर चालणारे, धार्मिक, आध्यात्मिक संस्थांद्वारे चालविले जाणारे, ट्रस्टमार्फत चालविले जाणारे आणि व्यावसायिक संस्थांमार्फत चालविले जाणारे असतात. वृद्धसहनिवासामध्ये प्रवेशाच्या अटींवरून विचार केला तर फक्त पुरुषांसाठी, फक्त स्त्रियांसाठी किंवा दोघांसाठीही प्रवेश उपलब्ध असणारे, अंध, अपंग, मानसिक रुग्ण, हिंडते फिरते, परावलंबी अशा वेगवेगळ्या गटांसाठी पैसे घेऊन किंवा न घेऊन असे वृद्धसहनिवास आहेत.
ज्या व्यक्तींना वृद्धनिवासामध्ये राहायचे आहे त्यांनी वृद्धसहनिवासामध्ये असणाऱ्या सोयींची पण माहिती जरूर करून घेतली पाहिजे. निवासाची सोय स्वतंत्र की सामूहिक आहे, स्वच्छतागृह स्वतंत्र की सामूहिक आहे, पाहुण्यांसाठी तात्पुरते राहण्याची सोय आहे की नाही, जेवणासाठी भोजनगृह आहे की खोलीत आणून दिले जाते? स्वत: स्वयंपाक करायची सोय आहे अथवा नाही? शाकाहार की मांसाहारही उपलब्ध आहे? कपडे धुणे, खोलीची स्वच्छता इत्यादी गोष्टींची सोय आहे ना? वैद्यकीय मदत उपलब्ध आहे की गरज पडली की डॉक्टरांना बोलावले जाते? आजारी पडल्यावर ठेवून घेतात किंवा नाही? परावलंबी झालो तर सेवकवर्ग उपलब्ध आहे अथवा नाही? चालविणारी संस्था अथवा व्यक्ती कोण आहे? मासिक किती पैसे भरावे लागतात? अनामत रक्कम किती? ती परत मिळते अथवा नाही? हे काही ठळक मुद्दे अवश्य विचारात घ्यायला हवेत. याचबरोबर जवळपास बँक, औषध दुकान आहे का? नसेल तर यासाठी संस्थेमार्फत काही व्यवस्था केली जाते का? गावापासून लांब असेल तर वाहन कोणते मिळते? संस्थेचे वाहन आहे का? देऊळ, ध्यानमंदिर, करमणुकीच्या सोयी, ग्रंथालय यांसारख्या वेळ चांगला जाण्यासाठी काही नियोजन आहे का हे ही तपासून पाहणे फार महत्त्वाचे असते.
वृद्धनिवास म्हणजे फक्त राहायला जागा उपलब्ध करून दिली की झाले असे मुळीच नाही. त्यापेक्षाही महत्त्वाचे आहे ती त्यांची काळजी घेतली जाणे आणि त्यांचा आदर राखला जाणे. यासाठी इतर कोणत्याही संस्थाप्रकारांसाठी आवश्यक नसतील एवढी कौशल्ये वृद्धनिवासांसाठी लागतात. मनुष्यबळ, साधनसामग्री आणि पैसा याचा नीट वापर करण्यासाठी संस्थाचालकांना संघटन कौशल्य आणि व्यवस्थापनशास्त्राचे ज्ञान असायला हवे कारण सुरू केलेल्या संस्था चालल्या पाहिजेत. संस्थेत आलेला वृद्ध किती वर्ष राहील हे काही शाळेप्रमाणे निश्चित नसते.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहारशास्त्रांचे ज्ञान निश्चितपणे हवे. म्हातारपणी खावेसे वाटते तेच दिले गेले तर प्रकृती बिघडते. समतोल आणि ताजा आहार द्यावा लागतो. त्यातही वृद्धांना त्यांचे मधुमेह, रक्तदाब इत्यादीचा, दात नसणे या मर्यादेचा विचार करावा लागतो. गंमत अशी की वृद्धांचे जेवण हा त्यांचा वीक पॉइंट असतो. आनंदी तर ठेवायचे पण कुपथ्य होऊ द्यायचे नाही ही तारेवरची कसरत असते.
वृद्ध म्हटले की छोटे-मोठे आजार गृहीत धरावे लागतात. यासाठी प्रथमोपचार आणि सुश्रूषा यांचे प्रशिक्षण सेवकवर्गाला देणे आणि त्यानुसार वृद्धांची मने सांभाळून त्यांची सेवा करण्यासाठी त्यांच्यामध्ये आवश्यक तो बदल सेवकांना करायला शिकवावे लागते. संस्थाचालकांनी अॅम्ब्युलन्स, जवळचे हॉस्पिटल, वैद्यकीय तज्ज्ञ यांच्याशी संपर्कात असणे ही पण फार मोठी गरज आहे.
घर सोडून आपली माणसं सोडून व्यक्ती वृद्धनिवासात येते ही फार मोठी घटना असते. नाइलाजाने यावे लागणाऱ्यांची मन:स्थिती कठीण असतेच अशा वेळी त्यांच्या मानसिक स्थितीची जाणीव म्हणजेच वृद्धमानसशास्त्राचे किमान ज्ञान संस्था सुरू करण्यापूर्वी करून घ्यायलाच हवे. तशा सूचना सेवकांनापण द्यायला हव्यात. वृद्ध कधी चिडचिडे, आक्रमक, तक्रारखोर बनतात तर कधी घुमे, आतल्या आत धुमसणारे होतात. अनोळखी जागा, व्यक्ती आणि सार्वजनिक जनवास व्यवस्थेत आल्यामुळे बंदिस्त जीवनक्रम यामध्ये रुळण्यासाठी त्यांना मदतीचा हात देण्याची मानसिकता संस्थेमध्ये असणाऱ्या प्रत्येकाची असायलाच हवी. खूपदा काय होते समाजकार्य करतो आहोत या काहीशा उपकारकर्त्यांच्या भूमिकेतून वृद्धांकडे पाहिले जाते. तसे होऊ न देण्याची दक्षता घ्यायला हवी.
वृद्ध सर्वच चांगले, गरीब, गरजू वगैरे असतात असे मुळीच नसते. त्याबद्दल इथे जास्त लिहीत नाही. पण म्हणूनच संस्थाचालकांना वेगवेगळ्या कायद्याचे ज्ञान आवश्यक असते. अगदी हॉस्पिटलमध्ये दाखल करणे असू दे, निधनानंतरचे सर्व सोपस्कार असू देत किंवा वृद्धाजवळ असणारे पैसे किंवा मौल्यवान वस्तू या साऱ्याबाबत अत्यंत दक्ष असणे ही मोठी सावधगिरी बाळगायला लागते. वृद्धाला न विचारणारे नातेवाईक वृद्धाच्या निधनानंतर वारस म्हणून काय करतील, काय म्हणतील याचा मुळीच भरवसा नसतो. त्यासाठी प्रवेश अर्ज तयार करण्यापासून कायद्याचा आधार घ्यायला हवा किंवा कायदे सल्लागार नेमायला हवा. वेळोवेळी बदलणाऱ्या प्राप्तिकराबद्दल ज्ञान हवे.
शेवटी दोन सावधानतेच्या सूचना – वृद्धाश्रमाची निवड खूप सावधानतेने करावी. वृद्धाश्रम व्यवसाय म्हणून जरी चालविला जात असला तरी वृद्धांच्या असहायतेचा गैरफायदा घेतला जात नाही याची जबाबदारी वृद्धाश्रम चालकांनी जरूर घ्यायला हवी.
– डॉ. रोहिणी पटवर्धन
rohinipatwardhan@gmail.com
chaturang@expressindia.com