|| डॉ. रोहिणी पटवर्धन
‘केअरर’ हा स्वतंत्र गट गेल्या काही वर्षांत समाजात निर्माण होतो आहे, कारण माणसं खूप वर्षे जगायला लागली आहेत. सर्व समाजांत, सर्व देशांत, जाती-धर्मात आढळणारी गोष्ट ही की, ‘केअरर’ म्हणजेच काळजी घेणारी ९० टक्के ही स्त्रीच असते. म्हणूनच प्रत्येक स्त्रीने आपल्या आयुष्यात बजावाव्या लागणाऱ्या जबाबदाऱ्यांच्या यादीमध्ये आपल्याला केअरर-काळजीवाहकाची भूमिका बजावावी लागणारच आहे याची आधीपासूनच शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्याच्या संदर्भात तयारी करणे आवश्यक आहे.
काळजी – हा शब्दच मुळी काळजातून, हृदयातून आलेला आहे. जन्म घेतो त्या क्षणापासून ते शेवटचा श्वास घेतो त्या क्षणापर्यंत तो आपल्या बरोबर असतो. लहानपणी आपले आई-वडील आपली काळजी घेतात. आपल्याला समज येते तेव्हा आजूबाजूला आपली काळजी घेणारी माणसे आहेत या विश्वासावरच आपण निश्चितपणे वावरतो. आयुष्य पुढे सरकत जाते, आपल्या भूमिका बदलत जातात. स्वतंत्र कर्तृत्ववान व्यक्ती म्हणून आपण जरी होतो तरी कुठे तरी मनामध्ये आपल्या वडीलधाऱ्या माणसाला आपली काळजी आहे, हा आधार आपल्याला आश्वासित करीत असतोच.
काळजी व्यक्त होते ती कधी शब्दांतून, कधी कृतीतून, कधी स्पर्शातून, तर कधी नजरेतूनसुद्धा! काळजी घ्यायची असते, घेतली जाते, तर कधी काळजी केली जाते. काळजीची रूपे अनेक. त्याच्या अभिव्यक्तींची माध्यमेही नानाविध असतात. तो एक वेगळा विषय आहे. मात्र एक गोष्ट नक्की; काळजी घेणारी व्यक्ती आणि काळजी ज्या व्यक्तीची घेतली जाते ती व्यक्ती; अशा दोन स्वतंत्र बाजू या ‘काळजी’ प्रकरणाला असतात. वाढत जाणाऱ्या वयाबरोबर या भूमिकांमध्ये अदलाबदलीची प्रक्रिया सुरू होते आणि साधारणपणे साठोत्तरीच्या टप्प्यावर त्यामध्ये लक्षणीय असा बदल होतो, तो म्हणजे काळजी ज्याची घेतली जात असते तोच आता ज्याने त्याची आत्तापर्यंत काळजी घेतली त्याच्याच भूमिकेत जातो. अगदी स्पष्ट सोप्या शब्दांत मांडायचे तर मुलगा वडिलांच्या भूमिकेत जातो. दुसऱ्या बालपणात त्यांचे वडील होतो. मुलगी आईची काळजी घ्यायला लागते. म्हणजे मुलगी केअरर होते. (केअरटेकर ही संज्ञा इथे मुद्दाम वापरत नाही, कारण सामान्यत: पैसे देऊन सेवा देणाऱ्यासाठी ही संज्ञा वापरली जाते.) काळजी घेणारा/घेणारी ती केअरर.
‘केअरर’ हा एक स्वतंत्र असा गट गेल्या काही वर्षांत निर्माण होतो आहे, कारण माणसं खूप वर्षे जगायला लागली आहेत. काळजी घेणाऱ्याला काळजी घेताना तीन वेगळ्या टप्प्यांतून जावे लागते हेसुद्धा कोणालाही बहुधा माहीत नसते.
१) भावनिकतेचा टप्पा – घरातले मोठे कोणी जेव्हा आजारी पडते तेव्हा साहजिकच आपण हलून जातो. आपल्याला ज्यांचा आधार वाटतो तो माणूस आजारी पडला हे आपल्याला नवीनच असते. त्या भावनिक धक्क्याच्या भरात आपण तन, मन, धन अर्पून खूप मनापासून सेवा करतो, काळजी घेतो, जपतो; पण आजारपणाचा कालावधी जसजसा वाढत जातो तसतसे सर्व गोष्टी पूर्वीच्याच तत्परतेने काळजीने करणे शक्य होत नाहीसे होते. कधी रजेचा प्रश्न असतो, वेळेचा असतो, त्यामुळे ही जबाबदारी निभावताना कुठे तरी आपोआप त्यातली सुरुवातीची भावनिकता उतरणीला लागते. ते साहजिकही आहे.
२) कर्तव्यपूर्तीचा टप्पा – भावनिक भाग कमी होतो आणि मुलगी, सून, मुलगा, जावई म्हणून आपले कर्तव्य आहे आणि ते आपण करायलाच हवे या एक प्रकारच्या व्यावहारिकतेच्या पातळीवर काळजी घेण्याचे काम सुरू राहाते. मग जबाबदाऱ्यांची वाटाघाटी सुरू होते. तेही अपरिहार्य आहे म्हणा ना.
३)अपरिहार्यतेचा टप्पा – नाइलाज, हताशपण, दमणूक, अपरिहार्यता यांसारख्या भावना मनात यायला सुरुवात होते. पहिल्या दोन टप्प्यांतून जाताना होणारी दमछाक डोके वर काढायला लागते. आपल्या दिनक्रमात येणारा तोचतोचपणा जाचू लागतो. एकटे वाटायला लागते. घुसमट वाढू लागते, हेसुद्धा होणे निसर्गप्राप्तच आहे.
सर्व समाजांत, सर्व देशांत, जाती-धर्मात आढळणारी गोष्ट म्हणजे आजारपणात काळजी (कोणत्याही किंवा प्रत्येक टप्प्यावरची म्हणा ना) घेणारी ९० टक्के ही स्त्रीच असते. हे अगदी उघडउघड सर्वाना सहज लक्षात येणारे सत्य आहे. त्यामुळे इथून पुढचा विचार किंवा विवेचन हे काळजी घेणारी स्त्री असते हे लक्षात ठेवूनच करीत आहे. हजारात एखाददुसरासुद्धा पुरुषच ती काळजी घेतो. मग ते स्वत:चे आई-वडील असले तरी काळजीवाहकाची भूमिका संपूर्णपणे स्वत:च्या खांद्यावर घेत नाहीत. त्यामुळे विशेषत: स्त्रियाच काळजी घेणाऱ्या भूमिकेत असतात हेच सूत्र पुढे न्यावे लागते.
तर गोष्ट अशी आहे की, प्रत्येक स्त्रीने आपल्या आयुष्यात बजावाव्या लागणाऱ्या जबाबदाऱ्यांच्या यादीमध्ये आपल्याला केअरर-काळजीवाहकाची भूमिका बजावावी लागणारच आहे याची शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्याच्या संदर्भात तयारी करणे आवश्यक आहेच. या काळजी घेण्याच्या बाबतीत खूप मोठी तयारी ही अर्थ नियोजनाशीसुद्धा संबंधित आहे हे जरूर लक्षात घ्यावे.
घरातल्या मोठय़ांची प्रत्यक्ष काळजी स्वत: घेणे ही त्याची एक बाजू आहे. त्याची सुरुवात होते ती अमुक एका वयानंतर त्यांना एकटे ठेवता येत नाही. मग मुले जवळ असोत की नसोत; पण बरेचदा दोघांपैकी एका वेळी एकालाच घराबाहेर पडणे शक्य होते यापासून होते. माणूस थकल्यावर मदतनीस घेतला जातो तेव्हासुद्धा मदतनीसावर घर सोडायला लागलेच तर वेगळेच ताण असतात. घर न सोडता त्याच्याबरोबर अॅडजेस्ट करणे ही मोठी कठीण गोष्ट असते. त्यातही ‘ब्युरो’ नामक संस्थेकडून पुरवल्या जाणाऱ्या मामा/मावशा, त्यांचे स्वभाव, लागणारी कौशल्ये, त्यांच्या बदल्या (पुन्हा एका स्वतंत्र लेखाचा विषय!!!) सारे सांभाळणे ‘असून अडचण नसून खोळंबा’ या धर्तीवरच असते.
परावलंबित्व आल्याचा कालावधी काही भाग्यवान वगळता, किमान २-३ वर्षांचा असतो असे लक्षात येते; पण तो काही दशकांचासुद्धा होतो हेही लक्षात घ्यायला हवे. एकदा का परावलंबित्वाची कल्पना आली की, सुरुवातीपासूनच काही गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. सर्वात प्रथम एक गोष्ट लक्षात घ्यायची ती म्हणजे आजारी व्यक्तीचे सर्व काम एकटय़ाने कधीच करू नये. त्याला कारणे दोन. एक तर एकीचीच दमणूक होते हे तर आहेच; पण त्या म्हाताऱ्या माणसाला त्याच व्यक्तीची इतकी सवय होते की, ते माणूस नसले तर एखाद्या हट्टी लहान मुलासारखे ती व्यक्ती त्रागा करते असे अनेक अनुभव आहेत.
एकूण कामांपैकी कामांची वाटणी सुरुवातीपासूनच करावी. दोघांनीही कामे वाटून घ्यायलाच हवीत; पण हे अचानक घडणारं नाही. पुरुषप्रधान संस्कृतीचा इतका पगडा आहे की, बायकोचीसुद्धा कदर केली जात नाही. यासाठी घरातल्या स्त्रीने वयाच्या किमान ५५व्या वर्षांपासूनच सहभाग, कामाच्या विभागणीचा विचार सतत पुढे कणाकणाने नेत राहिला पाहिजे. याबाबतीत कधी कधी बायकाच आपल्या नवऱ्याला कामे करू देत नाहीत आणि नंतर अचानक त्यांनी बदलावे, मदत करावी अशी अपेक्षा करतात. साहजिकच अपेक्षा पूर्ण होत नाहीत. मग चिडचिडय़ा होतात. दिवसातले किमान दोन ते तीन तास काळजी घेणाऱ्या स्त्रीने परावलंबी व्यक्तीपासून दूर घालवले पाहिजेत. त्याबाबतीत मनात अपराधी वाटून घेता कामा नये. मुख्य म्हणजे त्या काळात जी व्यक्ती थांबणार आहे त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा. सारख्या सूचना देऊ नयेत.
दुसऱ्या बाजूने व्यक्ती आजारी पडली तर घरामध्ये आवश्यक त्या सुधारणा किंवा बदल करून घ्यावे. आजारी व्यक्तीची खोली/जागा त्यापासून बाथरूम, टॉयलेटचे अंतर,आधाराला बार. आजारी व्यक्तीची कॉट, त्या जवळचे बेडस्विच पंखा आणि दिव्याची, टी.व्ही.ची जागा (अगदी जवळ असावी), तांब्या-भांडे सोयीच्या ठिकाणी ठेवावे आणि त्या व्यक्तीला स्वत:च स्वत:चे करू द्यावे. जेव्हा अगदीच हालचाल बंद होईल तेव्हाच आपण करावे. असे केले नाही तर आजारी व्यक्ती आपल्याजवळ माणूस यावे म्हणून सारखे दिवा लाव, बंद कर यांसारखी कामे काढतात.
खरं तर प्रत्येक ज्येष्ठांनी भविष्यकाळाच्या हाका नीटपणे ऐकल्या पाहिजेत, समाजभान निर्माण केले पाहिजे.
rohinipatwardhan@gmail.com
chaturang@expressindia.com