-संकेत पै

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर थांबून आतापर्यंतच्या तुमच्या मोठया निर्णयांची पडताळणी करून पाहा. यातले किती निर्णय मनापासून घेतले होते? याचा विचार करा. आपल्यापैकी अनेकांना तर आपण इथवर कसे येऊन पोहोचलो, हेच समजत नाही. समाजानं निश्चित केलेल्या प्रवाहाबरोबर आपण वाहत राहतो. त्याविरुद्ध पोहणं अवघड आहे. पण आपली वाट आपणच शोधायची आहे, ही जीवनाबद्दलची स्वामित्व भावना जागृत झाली, तर पुढचं चित्र वेगळं असेल.

आधुनिक जीवनशैलीशी जुळवून घेण्याच्या कसरतीत आपण रोजच्या जगण्यातल्या अनेक अर्थपूर्ण आणि सुखद क्षणांच्या आस्वादाला मुकत चाललोय, हे आतापर्यंत तुमच्याही लक्षात आलं असेलच. भारंभार ई-मेल्स, समाजमाध्यमांवर व्यतीत होणारा वेळ, बरीच अत्यावश्यक आणि तातडीची कामं, यांत स्वत:ला अगदी गळयापर्यंत बुडवून घेताना आपल्याला आपल्याच अस्तित्वाचा विसर पडत चाललाय. आणि ही गोष्ट अगदी सहज, स्वाभाविक होऊन बसलीय. आपला सर्वसामान्य दिनक्रम काय असतो? उठा, दिवसभराची शर्यत पार पाडा, शेवटी झोपी जा! पुष्कळदा हे वर्षांच्या सुरुवातीला, जानेवारी महिन्यातच प्रामुख्यानं घडतं, की नव्या संकल्पपूर्तीच्या भरात ‘अमुक झालंच पाहिजे, अमुक केलंच पाहिजे,’ अशी तणावाची ओझी नव्या दमानं वाहायला आपण सुरुवात करतो. समाजाच्या अपेक्षा, सामाजिकदृष्टया असलेले यशस्वी जीवनाचे निकष पूर्ण करण्याच्या शर्यतीत सृष्टीचं सौंदर्य पाहणं आणि सजगतेनं जगणं, यांतली मजा हरवून बसतो.

हेही वाचा…अजूनही अदखलपात्र विधवांचे जिणे!

आपण नेहमी समाजाच्या दृष्टिकोनातून स्वत:ला यशाची मोजपट्टी लावत असतो. जर सामाजिक निकषांना आपण पात्र ठरलो, तरच आपलं यश हे समाजमान्य; अशी आपली मानसिकता झालेली असते. सामाजिकदृष्टया वयाच्या कोणत्या टप्प्यावर आपण कोणती गोष्ट मिळवणं आणि करणं अपेक्षित आहे, याचे काही मापदंड संशोधनातून समोर आले आहेत. उदा. अठराव्या वर्षी गाडी चालवण्याचा परवाना, साधारण सत्ताविसाव्या वर्षांपर्यंत लग्न, एकोणतिसाव्या वर्षांपर्यंत स्वत:चं पहिलं घर, तिशीच्या उंबरठयावर वरचढ उत्पन्न असणं आदी. आपल्या यशाच्या व्याख्याही त्यावरच आधारित असतात, अन्यथा अपयशी असल्याचा शिक्का आपल्यावर बसतो. हे आपल्या बाबतीत घडू नये, यासाठी याविरुद्ध जगण्याचं धाडस फारच कमी लोक करतात.

या सामाजिक दबावाला बळी पडून प्रवाहाबरोबर वाहत जाण्याचा परिणाम म्हणजे आयुष्याला येणारी कृत्रिमता किंवा यांत्रिकता! एक असं आयुष्य, ज्याच्यासमोर ना काही ठोस उद्देश आहे, ना विशिष्ट दिशा! आणि याच प्रवाहात वाहताना आपण आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात एका अशा टप्प्यावर जाऊन पोहोचतो, जिथे पोहोचणं हे आपलं उद्दिष्ट कधीच नसतं! तिथवर आपण कसे येऊन पोहोचलो याची आपल्याही कल्पना नसते, यालाच म्हणतात जीवनप्रवाहाबरोबर वाहत जाणं.

हेही वाचा…संघर्षांनंतरचं यश

आयुष्यात यशस्वी होण्याचा हा केवळ एकच सर्वमान्य सरधोपट मार्ग असतो अशा सामूहिक मानसिकतेला आपण बळी पडतो. जीवनप्रवाहाबरोबर अशा प्रकारे वाहत गेलो तर आपण स्वत:चं खरं सामर्थ्यच ओळखू शकणार नाही. केवळ प्रवाहपतित होऊन पुढे जात राहण्यामुळे निष्क्रियतेच्या दुष्टचक्रात अडकून पडू. त्यातून बाहेर पडून सक्रियतेनं पुढे जाणं आपल्यासाठी कठीण होऊन बसतं. आहे त्या परिस्थितीत समाधान मानून आपण एक सर्वसामान्य भौतिक आयुष्य जगत राहतो.

एक उदाहरण देतो, माझा परिचित संदीप देली गेली तीन दशकं एकाच कंपनीत काम करतो आहे. तो अशा अडकून पडण्याच्या स्थितीचं उत्तम उदाहरण आहे! करत असलेल्या कामाबद्दल तो असमाधानी आहे आणि पद आणि पगार यामध्ये त्याच्याबरोबरचे सर्वजण त्याच्यापुढे निघून गेले, ही सलही त्याच्याही मनात आहे. पण तरीही त्यानं यशस्वी होण्यासाठी दुसऱ्या नोकरीचा पर्याय का निवडला नाही, हे आजही त्याला स्पष्टपणे सांगता येत नाही. ‘मी प्रवाहाबरोबर फक्त वाहत गेलो,’ असं तो म्हणतो. काहीही विशेष न करता सर्वसामान्य आयुष्य जगत राहण्याचे फार दूरगामी परिणाम होतात.

हेही वाचा…‘एका’ मनात होती..! : ‘घरेलू’ म्हणून एकटीही?

काही संशोधनांतून असं आढळून आलंय, की नैराश्य आलं म्हणून औषध घेण्याचं प्रमाण चिंताजनकरीत्या वाढत चाललंय. किशोरवयीन मुलांमध्ये तर हे प्रमाण खूपच जास्त आहे. युनायटेड किंग्डममध्ये झालेल्या एका संशोधनांती असं आढळलं, की ३७ टक्के मुलांना नैराश्यावर उपचार करण्यासाठी औषधं सुरू आहेत. एवढंच नव्हे, तर भारतातदेखील हे प्रमाण २१ टक्क्यांच्या जवळपास आहे. समाजमाध्यमांच्या वाढत चाललेल्या व्याप्तीनं या समस्येला आणखी खतपाणी घातलं. ‘सोशल मीडिया’चं जग आभासी आहे हे माहीत असूनही आपण आपल्या वास्तव आयुष्याची तुलना त्या आभासी जीवनाशी करतो आणि दु:खी होतो. जागतिक पातळीवर शारीरिक समस्यांमध्ये प्रथम क्रमांकावर असलेल्या लठ्ठपणास मागे सारत या दशकाच्या अखेरीस नैराश्यानं प्रथम क्रमांक पटकावला तर मला यत्किंचितही आश्चर्य वाटणार नाही. मात्र हे भाकीत काळजीत टाकणारं आहे.

तुमच्या जीवनावरचा तुमचा अधिकार

परिस्थितीचे बळी म्हणून जगायची सवय अनेकजणांना नकळत अंगवळणी पडलेली असते. सर्वात मोठा विरोधाभास म्हणजे, आपल्याला इतरांकडून कारणं ऐकून घ्यायला अजिबात आवडत नाही, पण तीच गोष्ट जेव्हा आपल्या बाबतीत घडते तेव्हा आपण बेधडक एकापेक्षा एक कारणं देत सुटतो. असं करून आपण स्वत:ला ‘जगरहाटीचे निष्पाप बळी’ असल्याच्या भूमिकेतून पाहायला लागतो. मग आपोआपच आपल्याला होणाऱ्या त्रासाचं आणि दु:खाचं खापर आपण जगावर फोडतो आणि स्वत:च्या जबाबदाऱ्यांकडे सोयीस्करपणे आणि सातत्यानं दुर्लक्ष करतो.

हेही वाचा…स्त्री ‘वि’श्व : लढा.. लोकशाहीसाठी!

मीसुद्धा याच मानसिकतेचा बळी असल्याची जाणीव मला २००१ मध्ये झाली. त्यावेळी माझ्या हातात अभियांत्रिकीची पदवी आणि दोन नोकऱ्यांचे प्रस्ताव होते, मात्र त्याच वेळी आयुष्याला एक अनपेक्षित कलाटणी मिळाली. नव्वदच्या दशकाच्या शेवटी इंटरनेटसंबंधित कंपन्यांमधल्या मोठया गुंतवणुकीमुळे ‘डॉट कॉम’चा फुगा चांगलाच फुगला होता. २००० च्या दशकाच्या सुरुवातीलाच तो फुटला. त्याच काळात २००१ मध्ये ११ सप्टेंबरचा अमेरिकेतला दहशतवादी हल्ला घडला. या कारणांमुळे माझ्या दोन्ही नोकऱ्यांचे प्रस्ताव अनिश्चित काळासाठी प्रलंबित ठेवण्यात आले. मी नुकताच अभियांत्रिकीचा पदवीधर झालो होतो. आधी मी उल्लेख केलेले काही टप्पे आयुष्यात गाठले होते, पण आता हाती नोकरी नसल्यानं दिशाहीन अवस्था झाली. त्यामुळे मी फार अस्वस्थ झालो. अशा वेळी स्वत:ला परिस्थितीचा बळी म्हणवून घेणं फारच सोपं होतं. सर्व दोष परिस्थितीवर ढकलून असहाय्य भूमिकेत स्वत:ला पाहणं ही अगदी स्वाभाविक प्रतिक्रिया असू शकली असती. ही परिस्थिती आपण बदलू शकत नाही हे स्वत:ला आणि पालकांना पटवून देणंही अगदीच सोपं. पण मी वेगळा पर्याय निवडला. आर्थिक मंदीच्या काळात मी पुढील शिक्षणात पैसा आणि वेळेची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. याचा विचार मी पूर्वी केला नव्हता. माझ्या काही मित्रांनी आधीच अभियांत्रिकीची पदवी आणि पदव्युत्तर पदवी असा ‘सर्वमान्य यशोमार्ग’ निवडला होता. मी मात्र केवळ एक उत्तम पर्याय म्हणून याची निवड न करता, सजगतेनं घेतलेला निर्णय होता.

आपल्याकडून कळत-नकळत घडलेल्या प्रत्येक कृतीतूनच आपली ‘जीवनगाथा’ लिहिली जात असते. जाणीवपूर्वक घेतलेले निर्णय असोत वा सामाजिक अपेक्षा.. स्वत:च्या आयुष्याची ही कथा त्यामुळे प्रभावित आणि विकसित होत राहते. जे लोक आपल्या जीवनगाथेचं स्वामित्व घेत नाहीत, ते या आयुष्यरूपी प्रवाहाबरोबर केवळ वाहत राहतात. त्यांचं त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या कोणत्याही घटनेवर नियंत्रण राहत नाही. त्यांना नेहमी दुर्बल, पराभूत झाल्यासारखं वाटतं. मनापासून इच्छा नसतानाही केलेली प्रत्येक निवड, मनात दबा धरून बसलेली प्रत्येक भीती, जबरदस्तीनं घेतलेला प्रत्येक निर्णय आणि प्रत्यक्षात ‘नाही’ म्हणायचं असूनही ‘हो’ म्हणावं लागलेली प्रत्येक घटना हे सर्व घटक आपल्या आयुष्याच्या कथासंग्रहात नकोशा मजकुराची भर घालत असतात. वास्तविक तुम्ही स्वत:च आपलं आयुष्य घडवत असता; परिस्थितीचे बळी असल्याचा कितीही आव आणला तरीही!

हेही वाचा…इतिश्री : भरकटणारी भांडणं!

अमेरिकी उद्योगपती, गुंतवणूकदार वॉरन बफे यांचा एक किस्सा आहे. काही विद्यार्थ्यांशी बोलताना ते म्हणाले, ‘‘अशी कल्पना करा, की मी तुम्हाला तुमच्या स्वप्नातली चारचाकी गाडी घेऊन देणार आहे. तुम्हाला हव्या त्या गाडीची तुम्ही निवड करू शकता. कोणत्याही गाडीचं तुम्ही फक्त नाव सांगा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती गाडी तुमच्या दाराबाहेर उभी दिसेल! अट फक्त एकच, की तुमच्या संपूर्ण आयुष्यात हीच एकमेव गाडी तुम्हाला वापरायची आहे. आता ही गोष्ट माहीत झाल्यावर त्या गाडीला तुम्ही कसं हाताळाल?..’’ या उदाहरणाचा तुमच्या जीवनाच्या दृष्टीनं क्षणभर विचार करून पहा. तुम्हाला ही गाडी नेहमीच हवी होती आणि संपूर्ण आयुष्यात हीच एकमेव गाडी तुमच्याकडे असणार आहे म्हटल्यावर त्या गाडीचं संरक्षण करण्यासाठी, तिला पूर्णपणे सुस्थितीत ठेवण्यासाठी जे जे शक्य आहे ते सर्व तुम्ही करालच ना? सतत ‘या गाडीला अधिक चांगलं कसं सांभाळू?’ हाच विचार तुमच्या मनात घोळत राहणार ना? मग तुमचा कितीही जिवलग मित्र असला तरी त्याला तुम्ही ती गाडी चालवायला द्याल का? किंवा गाडीच्या देखभाल-दुरुस्तीसाठी कुठे घेऊन जायचं हे तुम्ही त्या मित्राला ठरवू द्याल का?..

जर तुमच्या स्वप्नातल्या गाडीची सर्वतोपरी जबाबदारी तुमचीच आहे हे तुम्हाला समजतं, तर तुमच्या एकदाच मिळणाऱ्या आयुष्याच्या कथेचे लेखकही तुम्हीच आहात, हे का बरं आपण लक्षात घेत नाही? ते लक्षात आलं, की ‘झालंच पाहिजे’, ‘केलंच पाहिजे,’ अशा आग्रही गोष्टी आपल्या खऱ्या इच्छांपासून वेगळया करणं अगदी सहज जमू लागतं. दुसऱ्या शब्दांत सांगायचं, तर यामुळे ‘झालंच पाहिजे’, ‘केलंच पाहिजे’च्या सामाजिक दबावाला बळी न पडता तुमच्या खऱ्या गरजा आणि इच्छा ओळखण्याची आणि त्यांचा पाठपुरावा करण्याची ऊर्जा मिळते.

हेही वाचा…‘भय’भूती : भीती सर्वव्यापी असते का?

‘आपल्या जीवनगाथेचे लेखक आपणच’ ही गोष्ट लक्षात येणं हे माझ्या आयुष्यातलं एक महत्त्वपूर्ण वळण होतं. माझ्या दृष्टिकोनात झालेल्या बदलामुळे इतरांच्या अपेक्षांच्या ओझ्यानं दबून न जाता माझ्या मूल्यांना आणि विचारसरणीला अनुसरून मी निर्णय घेऊ शकतो आणि माझ्या वेळेचा वापर कसा करायचा हे मोकळेपणानं ठरवू शकतो. विशेष म्हणजे यामुळे मला प्रसंगी जोखीम पत्करून पुढे जाण्याचा आत्मविश्वास आणि स्वत:चं दैव नशीब स्वत:च घडवण्याचं स्वातंत्र्य प्राप्त झालं.

तुम्हालादेखील ही जाणीव होवो! तुमचं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व पुढे आणणाऱ्या, तुमच्या जीवनाचे शिल्पकार होण्याच्या संधीचा दिलखुलासपणे स्वीकार करा. त्यासाठी अशाच पर्यायांची निवड करा, जे तुम्हाला तुमच्या खऱ्या ‘स्व’ला जोडून ठेवून एका आनंददायी प्रवासाला घेऊन जातील. त्यासाठी शुभेच्छा!

sanket@sanketpai.com

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanket pai s thoughts on take your own life decision by yourself and write a story of your life psg
Show comments