रुचिरा सावंत

‘युनूस अँड यूथ फेलोशिप’, ‘ओबामा लीडर’ असे आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त करणाऱ्या युवा वास्तुविशारद समीरा चुक्कपल्ली. नैरोबीमध्ये ‘यू. एन. हॅबिटाट’च्या माध्यमातून झोपडपट्टीसाठी रचना तयार करणं, दक्षिण कोरियातल्या सीऊल इथं हवा प्रदूषणासाठी काम करणं, अशा अनेक उपक्रमांमध्ये त्यांनी महत्त्वाचा वाटा उचलला. पुस्तकाच्या बाहेर जाऊन वास्तुस्थापत्य समजून घेणाऱ्या, ‘नीड लॅब’ ही संस्था सुरू करणाऱ्या समीरा यांच्या आगळय़ा संशोधनवाटेविषयी..

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

बालपण म्हटलं की एका राज्यातून दुसऱ्या राज्यात, या शहरातून त्या शहरात आपल्या आईबाबांबरोबर प्रवास करणारी लहान मुलगीच समीराला ठळक आठवते. शालेय वयात इतर अनेक सामान्य विद्यार्थ्यांपैकी एक असणारी आणि ‘डिस्लेक्सिया’ मुळे वाट थोडी आणखी अवघड झालेली ही मुलगी पुढे आंतरराष्ट्रीय ख्यातीची वास्तुविशारद होते आणि ‘ओबामा लीडर’सारखे अनेक मानाचे तुरे आपल्या शिरपेचात अगदी तरुण वयात अदबीनं मिरवते. ही अत्यंत प्रेरणादायी गोष्ट आहे समीरा चुक्कपल्ली यांची.

समीरा यांचे वडील व्यंकट चुक्कपल्ली हे केंद्र शासनाचे कर्मचारी. वन अधिकारी असणाऱ्या वडिलांच्या बदल्यांमुळे हे त्रिकोणी कुटुंब सातत्यानं फिरतीवर. समीराची आई माधवी कला विषयाच्या शिक्षिका. वडिलांकडून निसर्गाविषयीचं प्रेम आणि संवेदनशीलता समीरानं अंगीकारली, तर कलेची आवड आणि कल आईकडे पाहत, तिचं निरीक्षण करत रुजला. सततच्या प्रवासामुळे समीरा यांना विविध जीवनपद्धती, समुदाय, भाषा, प्रथा यास एकाच वेळी अनुभवता आलं. यातूनच पुढील जीवनात सातत्यानं जगभरातल्या सोळाहून अधिक देशात आपलं संशोधनात्मक काम पोहोचवत असताना त्या फार सहजपणे लोकांना समजून घेऊ शकल्या, त्यांच्याबरोबर काम करू शकल्या.   

 राज्यागणिक बदलणाऱ्या भाषा आणि त्यांचा अभ्यास, हे समीरांसाठी सर्वात कठीण आव्हान होतं. समोर दिसणारी अक्षरं आणि त्यांचा ध्वनी यात त्यांना कोणताही संबंध सापडायचा नाही. ती अक्षरं आपल्यासमोर नृत्य करताहेत असं वाटायचं. यावर त्यांनी आपल्या पद्धतीनं उपायही शोधले. फारसा तणाव न घेता जितकं जमतंय तितकं आणि जसं जमेल तसं आवडीने करणं, ही एक पद्धत त्यांनी अवलंबली होती. नाठाळपणा करून समीरा अभ्यासाकडे दुर्लक्ष करताहेत असं शिक्षकांना आणि काही वेळा पालकांना वाटायचं. पण शालेय दिवसांत अभ्यासात फारशी उत्तम कामगिरी न करणाऱ्या आपल्या या मुलीला पालकांनी कोणतंही बंधन घातलं नाही. भारतीय शिक्षणपद्धतीमध्ये दहावीचे गुण फार महत्त्वाचे असतानाही समीरा यांनी केलेली सर्वसामान्य कामगिरी पाहून त्याबद्दल बोल न लावता आवडी जपत अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन दिलं.

उच्च माध्यमिक अभ्यासासाठी समीरांनी म्हैसूरच्या ‘सद्विद्या प्री युनिव्हर्सिटी महाविद्यालया’त प्रवेश घेतला. इथे इतर विषयांबरोबर त्यांनी ‘इलेक्ट्रॉनिक्स’ विषय निवडला होता. हा विषय शिकवणाऱ्या प्राध्यापिका सुमा एस. यांनी समीरांच्या जीवनप्रवासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. इलेक्ट्रॉनिक्सच्या प्रयोगशाळेत होत असलेले प्रयोग समीरा यांच्या आवडीचे. अधिक वेळ देऊन त्या प्रयोगशाळेत त्या प्रयोग करत बसायच्या. अभ्यासात यथातथाच कामगिरी करणाऱ्या या मुलीच्या आकलनाची पद्धत वेगळी आहे हे तिच्या प्राध्यापिकांनी ओळखलं. समीरा यांच्या ‘फोटोजेनिक’ स्मरणशक्तीला लक्षात घेऊन प्राध्यापिकांनी त्यांच्यासाठी चित्रं असणारी पुस्तकं आणून शिकवायला सुरुवात केली.  लॅबची चावी प्रयोग करायचे असल्यास समीरा यांच्या स्वाधीन करू लागल्या. समीरांना स्वत:विषयी विश्वास वाटू लागला. याच काळात त्यांना डिस्लेक्सिया असल्याचं त्यांच्या ध्यानात आलं आणि भाषा आणि लेखनाशी असलेल्या गमतीशीर नात्याचं कारण समजलं. याच काळात एका इलेक्ट्रॉनिक्ससाठीच्या मोठय़ा स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायची संधी त्यांना मिळाली. त्या स्पर्धेत त्यांना बक्षीस मिळालं.

 कलेची उपजत आवड, व्यक्त होण्याचं माध्यम आणि वैज्ञानिक कारणमीमांसा, यांची सांगड घालणाऱ्या क्षेत्रात समीरांना काम करायचं होतं. ‘विकिपीडिया’च्या अगदी सुरुवातीच्या त्या दिवसांत समीरांच्या बाबांनी त्यांना अनेक लोकांना भेटायला नेलं. त्यांच्या क्षेत्रांविषयी माहिती मिळवून त्यातले खाचखळगे समजून घ्यायला मदत केली. बांधकाम व्यवसायातही दूरच्या नातेवाईकांमध्येही कुणीच नसणाऱ्या त्या कुटुंबानं अनेकांशी बोलणं केल्यावरच समीरांसाठी त्यांच्या आवडीच्या गोष्टींची सांगड घालणाऱ्या वास्तुविद्येचं क्षेत्र निवडलं. एकदा ही निवड झाल्यावर समीरांनी या क्षेत्रात झोकून देऊन अभ्यासाला सुरुवात केली.  बंगळूरुच्या ‘बी.एम.एस. कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग’मध्ये वास्तुकलेच्या अभ्यासासाठी समीरांनी प्रवेश घेतला. विज्ञान आणि वास्तुकलेचा संबंध तेव्हा त्यांना प्रकर्षांनं जाणवला. बांधकाम साहित्य, मृदा, वातावरण, हवामान, उष्णता, नव्या साहित्याची निर्मिती, बांधकाम करायच्या ठिकाणचं पृथ्वीवरील स्थान, अशा वास्तुकलेच्या अभ्यासाचा पाया असणाऱ्या विषयांमधलं विज्ञान त्यांना महत्त्वाचं वाटतं. 

विद्यापीठात अभ्यासाला असणारे विषय मात्र समीरांना नव्या काळाला अनुसरून वाटले नाहीत. दहा वर्षांनी अभ्यासक्रमात होणारे फेरफार सातत्यानं बदलणाऱ्या वास्तुकलेच्या क्षेत्रासाठी उपयोगाचे नाहीत, असं वाटून प्राध्यापकांना अभ्यासक्रम बदलण्याविषयीच्या किंवा त्या वेळच्या नवीन गोष्टी शिकवण्यासाठीच्या अनेक विनंत्या समीरा यांनी कधी नम्रतेनं, तर कधी वैतागून केल्या. एका प्रणालीमध्ये बदल आणणं सहज शक्य नाही, हे ध्यानात आल्यावर वेगळी वाट शोधायची ठरवली. नव्या आणि त्या वेळी उदयाला येऊ लागलेल्या गोष्टी, संशोधनं याविषयी माहिती मिळवण्यासाठी महाविद्यालयाव्यतिरिक्त इतर ठिकाणी जायला त्यांनी सुरुवात केली. संयुक्त राष्ट्र तसंच काही आंतरराष्ट्रीय संस्थांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त असं नवं साहित्य, पद्धती निर्मितीवर काम सुरू केलं होतं. या काळात समीरा हे सगळं त्या संस्थांमधून शिकल्या.

पदवीच्या पाच वर्षांत सुट्टय़ांमध्ये केलेले कोर्सेस, विविध अभ्यास, यातून अभियांत्रिकी, मूलभूत विज्ञानाच्या अभ्यासासाठी जशा प्रयोगशाळा असतात, तशा प्रयोगशाळा वास्तुशास्त्राच्या अभ्यासासाठी का नाहीत, हा प्रश्न समीरांना सतावू लागला. त्यांना विविध साहित्याचा, त्याच्या रचनांचा अभ्यास करायचा होता. त्यावर संशोधन, वेगवेगळे प्रयोग करायचे होते. त्यासाठी प्रयोगशाळा अत्यावश्यक होत्या. यातूनच संशोधन व अभ्यासासाठी अमेरिकेतल्या विद्यापीठांची शोधमोहीम सुरू झाली. उन्हाळी सुट्टीत समीरांनी अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया विद्यापीठात प्रवेश मिळवला. तिथे एक मार्गदर्शक भेटले, ज्यांनी वास्तुशास्त्राकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलला. प्रोफेसर रोनाल्ड राइल त्यांचं नाव. आधुनिक पद्धतीचं बांधकाम हा त्यांच्या संशोधनाचा विषय. जेव्हा ‘थ्री डी प्रिंटिंग’ ही संकल्पनाही अगदी नवीन होती, तेव्हा थ्री डी प्रिंटिंग पद्धतीनं कागद, माती, वाळू यांचा वापर करून बांधकाम करण्याविषयी त्यांनी काळापुढील संशोधनात्मक काम केलं. त्या उन्हाळी शाळेमध्ये समीरांना थ्री-डी प्रिंटिंगची ओळख झाली. तिथून परतण्यापूर्वी त्या सुतारकाम, बांधकामाचं तंत्रज्ञान, साहित्यनिर्मिती अशा अनेक गोष्टी स्वत: विश्वासानं करू लागल्या होत्या. समीरा परतल्या तेव्हा त्यांच्या इतर वर्गमित्रांनी विटेलाही हात लावलेला नव्हता. हा समीरांसाठी मोठा बदल होता. याच काळात बांधकाम साहित्यनिर्मिती आणि त्यांच्या रचनेतील समीरांची रुची लक्षात आली. या क्षेत्रातल्या संशोधनाकडे वाटचाल होण्यात उन्हाळी कार्यशाळेची महत्त्वाची भूमिका होती.

कॅलिफोर्नियामध्ये समीरांच्या प्राध्यापकांनी पुढील शिक्षणासाठी स्पेनमधल्या  IAAC म्हणजे ‘इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅडव्हान्ड्स आर्किटेक्चर ऑफ कॅटालोनिया’चं नाव सुचवलं. स्वत:चा अभ्यासक्रम स्वत: ठरवण्याची मुभा असणारं हे विद्यापीठ. तिथे लागलीच प्रवेश मिळवण्यासाठी समीरा तेव्हा लहान होत्या. म्हणून पदवी शिक्षणावेळी इंटर्नशिपसाठी स्पेनला जायचं त्यांनी ठरवलं. त्या विद्यापीठातल्या प्राध्यापकांच्या कंपन्या व डिझाईन स्टुडिओ समीरांनी शोधले आणि तिथे अर्ज करायला सुरुवात केली. दोन कंपन्यांमध्ये सलग इंटर्नशिप करून, प्राध्यापकांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवत त्यांच्याकडून समीरा बरंच शिकल्या. रिसर्च प्रोजेक्ट्सवर काम करायला त्यांनी सुरुवात केली. स्पेनमधल्या इंटर्नशिपनंतर समीरा व्हिएतनाममधल्या एका आर्किटेक्ट कंपनीमध्ये रुजू झाल्या. तिथलं वातावरण आणि अनुभवानं आजच्या व्यक्तिमत्त्वाला आणि मूल्यांना आकार दिला, असं त्या सांगतात. जगातल्या सर्वोत्तम दहा वास्तुविशारदांपैकी एक असणाऱ्या समीरांच्या बॉस आणि गुरूंनी या नव्या फळीच्या वास्तुविशारदांबरोबर जमिनीवर बसून अनेक प्रयोग केले. शाश्वत आणि पर्यावरणस्नेही संशोधनात्मक व प्रायोगिक बांधकाम करण्यासाठीची प्रेरणा आणि विश्वास समीरांना इथे मिळाला. इथे काम करत असतानाच्या काळात वास्तुविशारदांपेक्षा बांधकाम कारागिरांबरोबर समीरांनी अधिक वेळ घालवला, त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकून घेतल्या, ज्या एका खोलीत बसून कधीच समजल्या नसत्या. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी समीरा IAAC मध्ये रुजू झाल्या. पदव्युत्तर शिक्षणानंतर समीरांनी त्यांच्या मूल्यांवर आधारित अशी ‘नीड लॅब’ ही संस्था सुरू केली. 

संशोधन करून बांधकाम करत असतानाच तरुणांना वास्तुशास्त्राचं अनुभवावर आधारित शिक्षण देणं, समुदायातील लोकांना कामाच्या संधी उपलब्ध करून देणं, कौशल्यं विकसित करणं, असा समाजाचा वास्तुकलेच्या माध्यमातून बहुआयामी विकास करण्याचा प्रयत्न ही संस्था करते. ज्या ठिकाणी बांधकाम करायचं आहे, त्या भागातलं उपलब्ध नैसर्गिक साहित्य, त्यावर विविध घटकांचे होणारे परिणाम, यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून प्रदेशात उपलब्ध असलेल्या घटकांचा वापर करून बांधकाम, हे संस्थेचं वैशिष्टय़ आहे. केनियामधल्या नैरोबी इथे ‘यू. एन. हॅबिटाट’च्या माध्यमातून घनदाट लोकवस्ती असणाऱ्या झोपडपट्टीसाठी समीरांनी तयार केलेल्या रचना, दक्षिण कोरियामधल्या सीऊल इथं सरकारबरोबर काम करून हवा प्रदूषण कमी करणं, ही त्यापैकी मोजकी उदाहरणं.  २०१८ मध्ये नोबेल पारितोषिक विजेत्या मोहम्मद युनूस यांच्या संस्थेमार्फत तरुण सामाजिक उद्योजकांना दिली जाणारी ‘युनूस अँड यूथ फेलोशिप’ समीरांना मिळाली. इथूनच बराक ओबामा यांच्या ‘ओबामा युरोप लीडर’साठी नामांकन मिळालं. पुढे ‘ओबामा लीडर’ म्हणून निवडही झाली. ओबामांबरोबर काम करण्याचा अनुभव खूप शिकवणारा होता. ओबामांमधलं सातत्य आणि चिकाटी पाहून समीरांना आपल्या वडिलांचीच आठवण झाली, असं त्या सांगतात. ओबामा फेलो म्हणून आलेल्या अनुभवाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे इतर ओबामा फेलोंशी झालेली भेट.   

  आता वास्तुशास्त्राच्या क्षेत्रात स्त्रियांचं प्रतिनिधित्व वाढावं यासाठी त्या काही नव्या उपक्रमांवर सध्या काम करताहेत.  जग छान आहे आणि ते अधिक सुंदर करता येऊ शकतं, या विश्वासातून प्रयत्न करण्यासाठी आवाहन करतात.

Story img Loader