रुचिरा सावंत

विविध गुंतागुंतीच्या प्रणालींमध्ये होणाऱ्या गोंधळाविषयी अंदाज वर्तवण्यासाठी ‘रिझव्‍‌र्हायर काँप्युटिंग’चा वापर करण्यासंबंधीचं संशोधन करणाऱ्या युवा संशोधक राशा शानास. सध्या जगात जे मोजकेच वैज्ञानिक या विषयात संशोधन करत आहेत, त्यातल्या त्या एक. लहान शहरातून आलेल्या आणि विज्ञानात मोठं काही करण्याची स्वप्नं बाळगणाऱ्यांना प्रेरणा देणाऱ्या राशा यांची ही गोष्ट.

loksatta kutuhal artificial intelligence and research in mathematics
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि गणितातील संशोधन
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Govt Issues New Rules To Stop Misleading Ads By Coaching classes
विश्लेषण : शिकवणी वर्गांच्या जाहिरातींना चाप?
loksatta kutuhal artificial intelligence in decision making
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने निर्णयांची अंमलबजावणी
loksatta kutuhal artificial intelligence for good governance
कुतूहल : उत्तम प्रशासनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : नीतिशास्त्र, सचोटी  आणि नैसर्गिक क्षमता
The little boy was studying in the light of the street lamps
याला म्हणतात चांगले कर्म! रस्त्यावरील दिव्यांच्या प्रकाशात अभ्यास करत होता चिमुकला, इन्फ्लुअन्सर तरुणाने केले असं काही… VIDEO एकदा पाहाच

तमिळनाडूमधील राजपलायम या लहानशा शहरातील एका उदारमतवादी मुस्लीम कुटुंबात राशाचा जन्म झाला. ‘ए.के.डी. धर्मराजा कन्याशाळे’त अभ्यासात रमणाऱ्या, शाळा खूप मनापासून आवडणाऱ्या आणि खूप प्रश्न पडणाऱ्या आपल्या एकुलत्या एक लाडक्या लेकीला आईवडिलांनी अगदी पोषक वातावरण दिलं. त्यांच्या या मेहनतीचं, प्रयत्नांचं फळ म्हणता येईल किंवा राशाची दुर्दम्य आंतरिक इच्छाशक्ती.. पण एका लहानशा, रुढीबद्ध वातावरण असणाऱ्या शहरात वाढलेल्या या मुलीनं एकविसाव्या शतकात अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ‘मशीन लर्निग’ या विषयात संशोधनासाठी पाय रोवले. ही मुलगी म्हणजे आज मानवाचं वर्तमान व भविष्य बदलण्यासाठी आपलं योगदान द्यायला सज्ज झालेल्या संशोधक राशा शानास.

राजपलायमसारख्या छोटय़ा शहरात राहूनही राशा यांचे पालक अवतीभवतीच्या पारंपरिक, कट्टर मुस्लिम कुटुंबांपेक्षा वेगळे होते, ते त्यांच्या उदारमतवादी, आधुनिक विचारसरणीमुळे. वडील निसार बँकेत नोकरी करणारे, तर आई वाहिधा वस्त्रांच्या कलात्मक रचना करण्यात रमणारी. त्यांनी आपल्या मुलीला एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून वाढण्यासाठी प्रोत्साहन दिलं. राशा शाळेत मनापासून रमायच्या, पण सुरूवातीला त्या प्रयोग वगैरे करून विज्ञानात रमणाऱ्या मुळीच नव्हत्या. त्यांचा विज्ञानाच्या दिशेनं झालेला प्रवास रंजक आहे.

   राशा यांना लहानपणी समाजशास्त्र या विषयाबद्दल प्रचंड जिव्हाळा होता. या विषयाची आवड आणि भूगोलाविषयी असणारं ममत्व या जोरावर ‘मी पुरातत्त्वशास्त्रज्ञ होणार’ असं त्यांनी तेव्हा जाहीर करून टाकलं होतं. मध्येच कधीतरी अवकाश विज्ञानही त्यांना खुणावू लागलं आणि दोहोंपैकी कशाची निवड करायची हा गोंधळ मनात निर्माण झाला. इयत्ता पाचवीमध्ये असताना त्यांना वृत्तपत्रातून रसायनशास्त्र विषयाला वाहिलेल्या प्रश्नमंजुषेविषयी समजलं. त्या प्रश्नमंजुषेमधील प्रश्नांविषयी, उत्तरांविषयी राशा यांना तेव्हा मुळीच कल्पना नव्हती, पण ते जग त्यांना खुणावू लागलं. काहीच माहिती नसणाऱ्या त्या क्षेत्राविषयी सगळं जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली. आता त्या आपल्या अवतीभवतीच्या सगळय़ा गोष्टींकडे रसायनशास्त्राच्या दुर्बिणीतून पाहू लागल्या. साबणाचे फुगे पाहाताना त्यांचं पारदर्शी असणं, ऋतूमानानुसार झाडांच्या बदलणाऱ्या रंगांचं गुपित, अशा नानाविध गोष्टी पाहाताना यासाठी कोणत्या रासायनिक प्रक्रिया कारणीभूत असतील हाच प्रश्न त्यांच्या मनात डोकावू लागला. सगळीकडे त्यांना रसायनशास्त्रच दिसू लागलं. नवनव्या गोष्टी शिकण्यात, त्यांची वैज्ञानिक कारणमीमांसा करण्यात मौज वाटू लागली. त्यांचा विज्ञानाप्रति असणारा हा उत्साह त्यांच्या पालकांनी आणि शिक्षकांनी जोपासला.

अशातच शाळा संपली आणि उच्च माध्यमिक अभ्यासासाठी त्यांनी विज्ञान शाखेत प्रवेश मिळवला. या सगळय़ा प्रवासात त्यांना भौतिकशास्त्र या विषयाचं मात्र फारसं आकलन होत नव्हतं. त्यामुळे या विषयात रसही नव्हता. मात्र बारावीत एक निर्णायक टप्पा त्यांच्या आयुष्यात अनपेक्षितपणे आला, तो त्यांचे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक एल. कार्तिकेयन यांच्या रूपानं. विद्यार्थ्यांमध्ये ‘एल. के. सर’ म्हणून प्रसिद्ध असणारे हे प्राध्यापक भौतिकशास्त्र शिकवताना वेगवेगळे प्रयोग करायचे. विचित्र प्रश्न विचारणाऱ्या मुलांना इतर प्राध्यापक जेव्हा कंटाळायचे, तेव्हा हे सर मात्र त्या मुलांना असे प्रश्न विचारत राहाण्यासाठी प्रोत्साहन द्यायचे. राशा यांना या प्राध्यापकांच्या वेगळय़ा शिकवण्याच्या निमित्तानं या विषयात अनेक प्रश्न पडू लागले आणि ते लाज न बाळगता विचारण्यासाठी पोषक वातावरणही मिळालं. भौतिकशास्त्र आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे, असं आता वाटेनासं झालं. एकदा एल. के. सर वर्गात ‘विद्युत’ हा विषय शिकवत होते. त्यांनी अगदी सहजतेनं विषयाचा उलगडा केला आणि तोच राशा यांच्या जीवनातला ‘युरेका क्षण’ ठरला. ‘संपूर्ण जगाचा मला त्या दिवशी अर्थ लागू लागला. जगात प्रत्येक गोष्टीमागे भौतिकशास्त्र आहे, असं मला त्या क्षणी जाणवलं आणि याविषयी आणखी अभ्यास आपण करायला हवा हेही त्याच क्षणी अधोरेखित झालं,’ असं राशा सांगतात. जीवनात चांगल्या शिक्षकाचं, मार्गदर्शकाचं महत्त्व सांगताना त्या हे आठवणीनं नमूद करतात.

पदवी शिक्षणासाठी आपलं पहिलं प्रेम रसायनशास्त्र निवडावं की नव्यानं गवसलेलं भौतिकशास्त्र, असा प्रश्न पडला तेव्हा नव्यानं सापडलेलं प्रेम जिंकलं. राशा यांनी भौतिकशास्त्राची निवड केली आणि त्या मदुराईच्या ‘लेडी डॉक महाविद्यालया’त दाखल झाल्या. आईवडिलांच्या सुरक्षित पंखांखाली वाढलेल्या त्यांच्या या राजकन्येसाठी घरापासून दूर राहाण्याची परवानगी मिळवणं, मोठय़ा शहरात वसतिगृहात राहाणं सोपं नव्हतं, पण शांत व समंजस राहून त्यांनी ते करून दाखवलं. इथल्या शिक्षणाच्या काळात वैज्ञानिक म्हणून त्या घडल्याच, पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वालाही आकार आला. ‘आज मी स्वत:ची मतं असणारी, विचार मांडू शकणारी, मोकळय़ा व पुढारलेल्या विचारधारेची मुलगी म्हणून समाजात वावरते, याचं संपूर्ण श्रेय महाविद्यालयातील माझ्या या दिवसांना आहे,’ असं त्या नेहमी सांगतात.

एकदा महाविद्यालयातील एक प्राध्यापिका वर्गात न्यूटनचे तीन नियम शिकवत होत्या. त्या नियमांना त्यांनी ज्या पद्धतीनं एकमेकांशी जोडलं, त्यांचं महत्त्व गतीच्या संकल्पनेच्या सहाय्यानं मांडलं, तेव्हा राशा यांना पुन्हा आपण भौतिकशास्त्राच्या प्रेमात अखंड बुडालो आहोत असं वाटलं! त्या नोट्सची वही त्यांनी आजही जपून ठेवली आहे. ‘भौतिकशास्त्र म्हणजे माझ्यासाठी प्रेमाची व्याख्या झालीय,’ असं त्या आता मिश्किलपणे सांगतात.

पदवीच्या शेवटच्या वर्षांला असताना महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. ब्युला राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी त्यांचा पहिला संशोधन प्रकल्प केला. विषय होता, ‘शाळांमधील ध्वनिप्रदूषण व त्याचा विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम.’ पदव्युत्तर अभ्यासादरम्यान त्यांनी दोन संशोधन प्रकल्पांवर काम केलं. बंगळूरुच्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅस्ट्रोफिजिक्स’मध्ये डॉ. मौसमी दास यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करण्याची संधी त्यांना त्यांच्या पहिल्या इंटर्नशिपनं दिली. बालपणापासून अवकाश विज्ञान या विषयात असणारी गोडी या निमित्तानं थोडय़ा प्रमाणात का होईना, पण त्यांना जपता आली.  वश् दीर्घिकांचे शेजारी शोधणं व त्यांच्यातील ताऱ्यांच्या निर्मितीचा अभ्यास करणं, हे ते संशोधन होतं.

पदव्युत्तर अभ्यासाच्या पहिल्या वर्षी भौतिकशास्त्रातल्या ‘नॉन लीनिअर डायनॅमिक्स’ या विषयाबद्दल त्यांना फारसा आपलेपणा वाटत नव्हता. त्या विषयाची जरा भीतीच वाटायची. पण आपल्याला कुणाचीच आणि कशाचीच भीती वाटता कामा नये, या बाण्यातून त्यांनी या विषयाच्या एका कार्यशाळेत प्रवेश घेतला. तिथे त्यांना त्यातले मोठे वैज्ञानिक भेटले. त्यांपैकी एक होते चेन्नईच्या ‘अण्णा विद्यापीठा’तील

डॉ. के. मुरली. या कार्यशाळेनं त्यांना या विषयाबद्द्ल विश्वास दिला. मग त्यांनी आणखी थोडा अनुभव घेण्याच्या उद्देशानं डॉ. मुरली यांच्याकडे उन्हाळी इंटर्नशिपची परवानगी मागितली. त्या भल्या, अनुभवी वैज्ञानिकानं राशा यांना ती संधी देऊ केली आणि पहिल्यांदाच प्रयोग करत त्यांनी संशोधन प्रकल्प हाताळला. तो अभ्यास त्यांना आवडू लागला. खगोलशास्त्रात काम करण्याची खूप इच्छा असतानाही ते विद्यापीठ राजपलायमपासून फार दूर असल्यामुळे तिथे पुढील शिक्षणासाठी जाण्याची घरून परवानगी मिळाली नव्हती. मग नव्यानं ेसापडलेल्या या विषयाला आणखी एक संधी देण्यात काहीच वावगं नाही, असा विचार करून त्यांनी ‘सिंपल केऑटिक ऑसिलेटर’ची उभारणी करून त्याच्या चलनशास्त्राच्या अभ्यासाची आपली उन्हाळी इंटर्नशिपच  पद्वय़ुत्तर अभ्यासासाठीचा संशोधन प्रकल्प म्हणून पुढे नेली. त्रिचीच्या ‘भारतीदासन विद्यापीठा’तून डॉ. मृगानंदम् यांच्या मार्गदर्शखाली ‘नॉन लीनिअर इलेक्ट्रॉनिक सर्किट’मध्ये ‘रिझव्‍‌र्हायर काँप्युटिंग’चा वापर करण्याविषयीचा अभ्यास करत त्यांनी

‘एम. फिल.’ ही पदवी संपादन केली. आता त्या विविध गुंतागुंतीच्या व्यवस्था व प्रणालींमधील गोंधळ शोधण्यासाठी वापर करता येणाऱ्या ‘रिझव्‍‌र्हायर काँप्युटिंग’चं ‘पीएच.डी.’ साठी संशोधन करत आहेत. गुंतागुंतीच्या व्यवस्था म्हणजे काय, याची उदाहरणं घ्यायची झाली, तर वातावरण, हवामानातला बदल, वादळ अशी सोपी उदाहरणं घेता येतील. ‘रिझव्‍‌र्हायर काँप्युटिंग’चा वापर करून या गुंतागुंतीच्या व्यवस्थांमध्ये होऊ शकणाऱ्या गोंधळांविषयी अंदाज वर्तवण्यासंबंधीचं हे संशोधन आहे. सध्या जगभरात मोजकेच वैज्ञानिक या विषयात संशोधन करत आहेत. भविष्यात भूगोलाच्या आपल्या आवडीची व सध्याच्या संशोधनाची सांगड घालून हवामानशास्त्र, वातावरण, जागतिक तापमानवाढ अशा महत्त्वाच्या विषयांवर राशा यांना काम करायचं आहे.

  सध्या ‘मशीन लर्निग’ हा ‘बझ वर्ड’ होत आहे. प्रत्येक जण मला या विषयात काही तरी करायचंय, असं म्हणत असताना आपल्या आजवरच्या अनुभवाच्या आधारे राशा एक खूप महत्त्वाचा मुद्दा मांडतात. या विषयाचा आवाका आणि क्षमता प्रचंड असल्यामुळे जिथे आवश्यकता आहे तिथेच याचा विचारपूर्वक वापर होणं आवश्यक आहे. सहज सोडवता येणाऱ्या प्रश्नांसाठी हे माध्यम वापरून त्याचं गांभीर्य व महत्त्व आपण कमी करता कामा नये, असं त्या म्हणतात.

   करायचं ठरवलं, की सगळं शक्य आहे आणि प्रत्येक कमतरतेला दुसऱ्या संधीची आणि संयमाची आवश्यकता आहे, हे राशा यांचं सांगणं आहे. प्रामुख्यानं छोटय़ा शहरांतल्या, मोठी स्वप्नं पाहाणाऱ्या तरुण मित्रमैत्रिणींना त्या शोध घेण्याची वृत्ती अंगी बाणवण्याचा संदेश देतात. न थकता प्रयत्न करत राहाण्याला पर्याय नाही, असं सांगत पुढच्या भविष्यदायी संशोधनाच्या कामात आपल्या प्रयोगशाळेत व्यग्र होतात.

postcardsfromruchira@gmail.com