रुचिरा सावंत
‘पार्किन्सन्स’ किंवा ‘डिस्टोनिया’सारखे शरीराच्या अवांछित वा अनियंत्रित हालचाली होणारे आजार फारसे चर्चेत नसतात. या आजारांवर संशोधन करणाऱ्यांची संख्याही कमी आहे. अशा वेगळय़ा क्षेत्रात उतरलेल्या न्यूरॉलॉजिस्ट डॉ. चारुलता सावंत-संखला यांनी आज त्यातील संशोधिका म्हणून चांगलं नाव प्राप्त केलं आहे. रुग्णांबरोबर प्रत्यक्ष काम करताना शिकायला मिळणं, ते ‘मूव्हमेंट डिसॉर्डर्स’बद्दलचं संशोधन आणि पुन्हा त्याचा रुग्णांसाठी केला जाणारा उपयोग, असं वर्तुळ पूर्ण करणाऱ्या डॉ. चारुलता यांचा हा प्रवास.
मुंबईच्या दादरमधल्या ‘इंडियन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘किंग जॉर्ज’ शाळेत शिकणारी चारुलता. अबोल, थोडय़ाशा भित्र्या चारुलतासाठी शाळेत जाणं ही काही तशी फार आवडीची बाब नव्हती; पण ती विज्ञानाच्या अभ्यासात मात्र रमायची, शिवाय गणितातले अंकही तिला भुरळ घालायचे. त्यातली तार्किक विचारपद्धती तिची कळी खुलवायची. आपण गणिताचा साग्रसंगीत अभ्यास करावा, अभियंता व्हावं, असं बालवयात वाटणारी हीच चारुलता पुढे जाऊन एका आगळय़ावेगळय़ा विषयातली महत्त्वाची संशोधक झाली. ‘मूव्हमेंट डिसॉर्डर्स’ संदर्भात महत्त्वपूर्ण संशोधन करत अनेक रुग्णांच्या आयुष्यात आशेचं बीज पेरणाऱ्या देशातल्या आघाडीच्या डॉक्टर्सपैकी एक डॉ. चारुलता सावंत-संखला यांची ही गोष्ट. त्या मुंबईच्या इतिहासातल्या तिसऱ्या न्यूरॉलॉजिस्ट स्त्री ठरल्या, इतकंच नव्हे, तर त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर पार्किन्सन्स (कंपवात), डिस्टोनिया अशा चेतासंस्था वा मज्जासंस्थेशी संलग्न विकारांवर आघाडीचं संशोधन केलं आहे.
विश्वनाथ आणि सरोजिनी सावंत हे दाम्पत्य आपल्या परिवाराबरोबर मुंबईत चुनाभट्टी परिसरात राहायचं. विश्वनाथ हे व्यावसायिक, तर सरोजिनी पूर्णवेळ गृहिणी. आपल्या तिन्ही मुलांना सर्वोत्तम शिक्षण देण्याचा त्यांचा ध्यास होता. मुंबईतल्या तेव्हाच्या प्रसिद्ध ‘किंग जॉर्ज’ शाळेत आपल्या पाल्यांना शिकवता यावं या कारणासाठी त्यांनी शाळेपासून जवळ वडाळय़ाला राहायला जाण्याचा निर्णय घेतला. थोरल्या चारुलता आणि दोन भाऊ ही तिन्ही मुलं अभ्यासात हुशार. त्यांना शिक्षण देताना समान संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न पालकांनी केला. चौथीपर्यंत मराठी माध्यमात शिक्षण घेतल्यानंतर चारुलतांजवळ दोन पर्याय होते. मराठी माध्यम किंवा इंग्रजी माध्यम. तेव्हा चारुलता यांनी इंग्रजी माध्यमातून शिकण्याचा पर्याय निवडला. सुरुवातीची चार वर्ष मराठी माध्यम आणि मग अचानक मुलामुलींची संयुक्त शाळा, जिथे वेगळय़ा भाषेतला अभ्यास, नवं वातावरण, या सगळय़ांबरोबर जुळवून घेण्याच्या प्रयत्नांत गेली. ही एक प्रकारची कसरतच होती. विज्ञान आणि गणिताविषयी त्यांना असलेली आवड पाहाता दहावीनंतर इतर कोणता विषय अभ्यासण्याचा विचारही त्यांच्या मनात डोकावला नाही. ‘किंग जॉर्ज’पासून अगदी हाकेच्या अंतरावर असणाऱ्या ‘रुईया महाविद्यालया’त उच्च माध्यमिक शिक्षणासाठी त्यांनी प्रवेश घेतला. तिथे त्यांना जीवशास्त्र आणि गणित या दोन्ही विषयांसाठी सर्वोत्तम प्राध्यापक भेटले आणि या विषयांतली रुची वाढली. त्या वेळी वैद्यकशास्त्र आणि अभियांत्रिकी प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा असायची आणि वृत्तपत्रात येणारी बातमी आणि जाहिरात हा माहितीचा जवळपास एकमेव स्रोत असायचा. या वेळी ‘आयआयटी’साठीच्या प्रवेश परीक्षेविषयीची (जेईई अॅडव्हान्स) वृत्तपत्रातली माहिती दुर्लक्षित झाली आणि त्यांचं ती परीक्षा द्यायचं राहून गेलं. प्राथमिक सामायिक परीक्षा दिलेली असल्यामुळे वडिलांनी त्यांना वैद्यकशास्त्र ही शाखा निवडण्याविषयी सुचवलं. गणित आणि जीवशास्त्र दोन्ही आवडीचे विषय असल्यामुळे फार विचार करत न बसता चारुलता यांनी वैद्यकशास्त्राच्या अभ्यासासाठी मुंबईच्या ‘ग्रँट मेडिकल कॉलेज’ला प्रवेश घेतला. इथे सुरुवात झाली एका नव्या आणि अनपेक्षित प्रवासाची. त्यानं चारुलतांबरोबरच इतर कित्येक माणसांचं आयुष्य बदललं. वैद्यकशास्त्राचा अभ्यास आणि तिथल्या परिभाषा वेगळय़ा असतात. अगदी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनाही अनेकदा वैद्यकशास्त्राच्या पुस्तकातली भाषा व वैज्ञानिक लेखनशैली समजून घ्यायला वेळ जातो. त्यामुळे पहिलं वर्ष हे अभ्यासाचं आणि पाया मजबूत करण्याचं थोडंसं कठीण भासणारं वर्ष असतं, असं चारुलता म्हणतात. या वर्षांपासून चारुलता महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहू लागल्या. मित्रमैत्रिणींबरोबर रात्री पाहिलेले सिनेमे, दंगा आणि खूप अभ्यास, मेहनत, अशा शब्दांत त्या या आठवणींना उजाळा देतात. विद्यार्थ्यांसाठी नवं आणि समृद्ध करणारं ते वातावरण. घराची आठवण येत असल्यामुळे चारुलता आठवडय़ातून दोनदा घरी जायच्या.
शरीरशास्त्राची जाडजूड पुस्तकं आणि हाडांचा सांगाडा घेऊन त्या बसमधून घरी यायच्या. तो सांगाडा पाहून इतर लोक जवळ येणं टाळायचे. मग चारुलता आणि त्यांच्या दोस्तांनी बस, ट्रेनमध्ये सहज प्रवेश मिळावा, बसता यावं यासाठी सांगाडय़ाला बिनधास्त सोबत घेऊन प्रवास सुरू केला! दुसऱ्या वर्षी त्या गाडी चालवायला शिकल्या. ‘बेस्ट’च्या बसमागून गाडी चालवत, मुंबईचं ट्रॅफिक समजून घेत, संयम शिकत त्या गाडीतून प्रवास करत राहिल्या. याच काळात त्यांची तेव्हाचे वर्गमित्र आणि नंतर पती झालेले न्यूरोसर्जन डॉ. सुरेश संखला यांच्याशी ओळख झाली. एकाच क्षेत्रातला जोडीदार असल्यामुळे एकमेकांचं काम समजून घेणं, जबाबदाऱ्यांची जाणीव असणं सहज शक्य झालं. मज्जासंस्थेचा वैज्ञानिक अभ्यास करणाऱ्या शास्त्राला ‘न्यूरॉलॉजी’ म्हणतात. ‘एमबीबीएस’च्या काळापासूनच डॉ. चारुलता यांना या शाखेविषयी कुतूहल आणि आवड निर्माण झाली. गणितातली तार्किक विचारसरणी आणि ‘सिस्टीमॅटिक अॅप्रोच’ वैद्यकशास्त्रात सर्वात प्रभावी पद्धतीनं ज्या शाखेत वापरला जातो ती शाखा म्हणजे न्यूरॉलॉजी. न्यूरॉलॉजी विषयाबाबत माहिती मिळाली, हा विषय अभ्यासायला सुरुवात झाली, तेव्हाच आपण पुढे जे काही करू ते याच विषयात, यावर डॉ. चारुलता यांनी शिक्कामोर्तब केलं. या विषयात ‘एमबीबीएस’नंतर लगेच डॉक्टरेट करता येत नाही. त्याआधी ‘इंटर्नल मेडिसिन’ किंवा ‘पिडियाट्रिक मेडिसिन’ विषयात ‘एमडी’ केलेलं असणं आवश्यक असतं. या नियमामुळे डॉ. चारुलता यांनी ‘एमबीबीएस’नंतर इंटर्नल मेडिसिनमध्ये त्याच महाविद्यालयातून ‘एमडी’ केलं आणि त्यानंतर ‘बाँबे हॉस्पिटल’मध्ये आपल्या आवडत्या प्राध्यापकांकडे म्हणजेच प्रसिद्ध न्यूरॉलॉजिस्ट डॉ. बी. एस. सिंघल यांच्याकडे न्यूरॉलॉजी विषयात डॉक्टरेट करण्यासाठी प्रवेश मिळवला. ‘एमबीबीएस’च्या दिवसांत डॉ. सिंघल यांनी विद्यार्थ्यांना एक सादरीकरण करायला सांगितलं होतं.
डॉ. चारुलता यांनी त्या वेळी दिलेलं सादरीकरण पाहून ते खूप खूश झाले आणि त्यांचा संपर्क क्रमांक नोंदवून घेऊन ‘‘तू याच क्षेत्रात काम करायला हवंस. तू न्यूरॉलॉजिस्ट हो.’’ असं सांगत त्यांच्या स्वप्नांना बळ दिलं. त्या दिवशी आवडता विषय कार्यक्षेत्र म्हणून निवडण्याचा त्यांचा निर्णय पक्का झाला. अगदी शाळेच्या मुलांना समजावून सांगतात त्या गोडीनं हा विषय शिकवणारे डॉ. बी. के. मिश्रा, डॉ. सिंघल आणि त्या सगळय़ांचे गुरू असणारे डॉ. वाडिया यांसारखे गुरू त्या तरुण वयात भेटल्यामुळे या क्षेत्रात चांगलं काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळाल्याचं डॉ. चारुलता सांगतात.
भारतात काम सुरू झाल्यावर रुग्णालयातल्या रुग्णांबरोबर करायचं कामच इतकं जास्त होऊन जायचं, की संशोधन हा भाग थोडा बाजूला सारला जायचा. रुग्णांबरोबरच्या अनुभवाला असणारं महत्त्व आणि रुग्णांची संख्या बघता त्याचं महत्त्व हमखास जास्त होतं. न्यूरॉलॉजीमध्ये ‘एमडी’ करत असताना त्यांनी संशोधन प्रबंधासाठी ‘हृदयविकार’ आणि ‘मिस्थेनिया ग्रॅव्हिस’ या मज्जासंस्थेशी संलग्न आजारांवर काम केलं. त्यानंतर पुढील अभ्यासासाठी आणि अनुभवासाठी त्या लंडनमध्ये ‘रॉयल प्रीस्टन विद्यापीठा’त दाखल झाल्या. तिथे रुग्णांबरोबर काम करत असताना त्यांच्या मार्गदर्शकांनी त्यांना एका जर्नलसाठी धडा लिहायला सांगितला. मँचेस्टरला गाडी घेऊन जाऊन भव्य वाचनालयात संदर्भग्रंथ शोधणं, त्यांचा अभ्यास करणं आणि तो धडा लिहिणं हा एक अनोखा अनुभव होता. या अनुभवामुळे त्या संशोधनाकडे वळल्या. वैद्यक क्षेत्रात संशोधनवृत्ती किती महत्त्वाची आहे हे त्यांच्यासाठी अधोरेखित झालं.
लंडनमधून डॉ. चारुलता अमेरिकेत गेल्या. अमेरिकेत फिनिक्स इथल्या ‘बॅरो न्यूरॉलॉजिकल इन्स्टिटय़ूट’ इथे ‘एपिलेप्सी मॉनिटरिंग युनिट’मध्ये त्यांनी जवळपास एक वर्ष संशोधन केलं. तिथे सुरू असणारं संशोधन पाहून त्या भारावून गेल्या. रुग्णांना वापरायला सोईची, यूझर फ्रेंडली ईईजी यंत्रणा यांसारख्या प्रकल्पांवर तिथे काम सुरू होतं. अशा प्रकारचं संशोधन त्या पहिल्यांदाच प्रत्यक्ष अनुभवत होत्या. पुढील एक वर्षांसाठी ह्युस्टन इथल्या ‘बेलोर कॉलेज ऑफ मेडिसिन’ इथे त्यांनी डॉ. जॅनकोव्हिक यांच्या मार्गदर्शनाखाली क्लिनिकल संशोधन करण्यास सुरुवात केली. डॉ. जॅनकोव्हिक हे ‘मूव्हमेंट डिसॉर्डर्स’ या क्षेत्रातल्या जगातल्या पहिल्या तीन संशोधक तज्ज्ञांपैकी एक. त्यांच्या प्रयोगशाळेत मोठय़ा प्रमाणावर चिकित्सक संशोधन सुरू होतं. त्यांनीच डॉ. चारुलता यांना या विषयात संशोधन करण्यासाठी प्रेरणा दिली. भारतीय लोकांमध्ये पार्किन्सन, अल्झायमर यांसारखे विकार अमेरिका व युरोप देशांच्या मानानं तरुण वयात होतात, अशा आशयाचं एक संशोधन त्यादरम्यान डॉ. चारुलता आणि त्यांच्या मैत्रिणीनं केलं. त्या संशोधनाचा पुढील भाग म्हणून त्या धूम्रपानाचा, कॉफीसेवनाचा पार्किन्सन आजारावर काय परिणाम होतो याविषयी संशोधन करताहेत. त्या संदर्भात काही प्रबंधांचं लेखनही त्यांनी केलं आहे.
डॉ. जॅनकोव्हिक यांचं संशोधन सगळय़ा मूव्हमेंट डिसॉर्डर्सविषयी असलं तरी त्यांनी पार्किन्सन्स आणि डिस्टोनिया या विकारांवर लक्ष केंद्रित केलं. त्यातला डिस्टोनिया (स्नायूंच्या अनियंत्रित हालचाली होणारा आजार) हा दुर्मीळ आणि फारसा माहीत नसणारा आजार असून या दोन आजारांसाठीचं डॉ. जॅनकोव्हिक यांचं काम बघून डॉ. चारुलता यांना या विषयात चिकित्सक संशोधन करण्याची प्रेरणा मिळाली. भारतात, जिथे डिस्टोनियाविषयी फारशी माहितीसुद्धा उपलब्ध नाही, तिथे या विषयात संशोधन करणं एक प्रकारचं आव्हान आहे. डिस्टोनियाचे वेगवेगळे प्रकार, प्रकारानुरूप माणसाच्या जनुकांमध्ये होणारे बदल, त्यामुळे होणारे विविध त्रास आणि हे प्रकार प्रतिसाद देत असलेल्या पद्धती यावर डॉ. चारुलता सध्या संशोधन करताहेत. तो आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्यक पद्धतींविषयीचं संशोधनसुद्धा अगदी मूलभूत पातळीवर सुरू आहे. ‘डीप ब्रेन सिम्युलेशन’सारखी शस्त्रक्रिया काही प्रकारच्या डिस्टोनियामध्ये फार उपयुक्त ठरते. सध्या डिस्टोनियाच्या या प्रकारांचा डॉ. चारुलता अभ्यास करताहेत.
पार्किन्सन्स या आजाराबाबतीत तोल ढासळणं, कंप, या लक्षणांच्या आधी काही वेगळय़ा प्रकारची लक्षणं रुग्णांमध्ये काही वर्ष आधी दिसून येतात. झोपेत बोलणं, बद्धकोष्ठ, घ्राणेंद्रियांची क्षमता कमी होणं, अशा प्रकारच्या काही पूर्वलक्षणांचा अभ्यास आणि संशोधन त्या करताहेत. भारतात वैद्यकशाखेत आणि प्रामुख्यानं मूव्हमेंट डिसॉर्डर्ससाठी होणारं संशोधन हे चिकित्सात्मक आणि उपचारकेंद्री आहे, असं त्या सांगतात. जनुकीय विकृती असणाऱ्या रुग्णांना त्या आजारांचे परिणाम कायमस्वरूपी भोगावे लागतात. उपाय म्हणून त्याचा अनुभव सहन करण्याजोगा व कमी त्रासदायक व्हावा यासाठी प्रयत्न करता येतात. मानसिक त्रासाबरोबर डिस्टोनियासारखे विकार आणखी गंभीर होतात. या आजारांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि या रुग्णांना सहाय्य करण्यासाठी उभारण्यात आलेल्या ‘पार्किन्सन्स डिसीज अँड मूव्हमेंट सोसायटी ऑफ इंडिया’ या संस्थेच्या त्या संस्थापक सदस्य आहेत. ‘इंटरनॅशनल पार्किन्सन्स डिसीज अँड मूव्हमेंट डिसऑर्डर सोसायटी’च्या सभासद असणाऱ्या डॉ. चारुलता या क्षेत्रातल्या संशोधनाची निकड अधोरेखित करतात. अधिकाधिक तरुणांनी या क्षेत्रात काम करण्यासाठी जोडलं जावं यासाठी आवाहन करतात; पण हे सांगत असताना या विषयावरचं तुमचं प्रेम आणि रुग्णांचं आयुष्य चांगलं करण्याची इच्छा तुमच्याजवळ असायलाच हवी, असंही पुन:पुन्हा सांगतात.
आपल्या उपचारांमुळे आणि संशोधनामुळे फायदा झालेल्या, आता सामान्य माणसाप्रमाणे दैनंदिन क्रिया करू शकणाऱ्या आपल्या रुग्णांना पाहाणं हे माझ्या कामाचं सार्थक आहे, असं त्या लख्ख हसत सांगतात तेव्हा त्यांचं समाधानच त्यांच्या चेहऱ्यावर झळकत असतं.
postcardsfromruchira@gmail.com