रुचिरा सावंत

मानवातली स्वभाववैशिष्टय़ं समजून घेण्यासाठी महत्त्वाची ठरणारी आनुवंशिकता आणि त्यामागचं जैवतंत्रज्ञान समजून घेण्यासाठी तो अभ्यासक्रम निवडण्याचा महत्त्वाचा निर्णय घेणारी पूर्णा. ही मुलगी म्हणजेच पुढे  ‘आय.आय.टी.’मध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रथम क्रमांकानं उत्तीर्ण झाल्यानंतर ‘पीएच.डी.’साठी ‘टाटा मूलभूत संशोधन संस्थे’मध्ये (टीआयएफआर) प्रवेश घेऊन ती पूर्ण करणाऱ्या, स्टेम सेल्समधील पेशी विभाजन अभ्यासणाऱ्या डॉ. पूर्णा गद्रे, हे आज आनुवंशशास्त्रात संशोधन करणाऱ्यांमधलं आघाडीचं नाव आहे. त्यांच्याविषयी..

लहान वयात आलेले अनुभव आणि मिळणाऱ्या संधी माणसांवर दूरगामी परिणाम करत असतात. माणसांचं आयुष्य आणि जगण्याची दिशा बदलण्याची ताकद त्यांच्यात असते. वयाच्या तेराव्या वर्षी असाच एक अनुभव पूर्णानं घेतला. आणि त्यांच्या आयुष्याला संशोधनाचं महत्त्वपूर्ण वळण मिळालं.

इयत्ता आठवी, म्हणजे खऱ्या अर्थानं विज्ञानातल्या नव्या संकल्पनांची ओळख होण्यास सुरुवात होण्याचे दिवस. या दरम्यान, पूर्णा गद्रेला आनुवंशशास्त्राविषयी माहिती देणाऱ्या एका सत्रात सहभागी होण्याची संधी मिळाली. प्रेक्षक म्हणून त्या वैज्ञानिकांना ऐकताना इयत्ता आठवीत शिकणारी ती मुलगी भारावून गेली. विज्ञानाचा आवाका ध्यानात येऊन थक्क झाली. आपण कसे दिसतो, कसे वागतो, आपली स्वभाववैशिष्टय़ं या साऱ्यामध्ये आनुवंशिकता महत्त्वाची भूमिका बजावत असते हे ती स्तिमित होऊन ऐकत होती. अशा प्रकारे हा विषय अभ्यासक्रमातही येण्याआधी तिचा त्याच्याशी परिचय झाला आणि पुढील पिढी, म्हणजे एकूणच मानवजातीविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी, येणाऱ्या पिढय़ांच्या भविष्याचा अंदाज लावण्यासाठी आनुवंशशास्त्राचाच अभ्यास करायचा असं तिनं मनोमन ठरवून टाकलं. 

शालेय दिवसांत अभ्यासाच्या जोडीनं पूर्णा अनेक विषयांत पारंगत होती. तिच्या अवखळ स्वभावाला अनुसरून ती वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवत असतानाच कला विषयातही मनसोक्त विहार करत होती. ती छान गाणं म्हणायची. नृत्य करायची. सुरेख चित्रं काढायची. सुरात कीबोर्ड वाजवायची. याबरोबरच ती मनसोक्त खेळाबागडायचीसुद्धा. प्रश्न विचारण्याच्या वृत्तीमुळे तिला दिसलेल्या, ऐकलेल्या प्रत्येक गोष्टीविषयी ती प्रश्न विचारायची. यामध्ये आजीनं सांगितलेल्या संत-महात्म्यांच्या गोष्टींपासून जास्वदांच्या फुलाच्या रचनेला समजून घेण्यासाठी केलेल्या विच्छेदनापर्यंत अनेक गोष्टींचा समावेश होता. चित्रकलेतल्या विशेष रुचीमुळे विज्ञान क्षेत्रातही जीवशास्त्राविषयीची ओढ निर्माण होण्यास हातभार लागला. वर्गातल्या इतर मित्र-मैत्रिणींना जीवशास्त्रातल्या आकृत्या काढणं कंटाळवाणं वाटत असताना पूर्णाला मात्र याच कारणामुळे जीवशास्त्र अधिकाधिक आवडू लागलं. इयत्ता आठवीत असताना आनुवंशशास्त्राचा अभ्यास करायचा असं ठरवल्यानंतर त्यासाठी पूर्णानं फार वेगळी अशी काही मेहनत घेतली नसली, तरी या क्षेत्राची निवड करण्याच्या निर्णयावर मात्र ती ठाम राहिली. जीवशास्त्र आवडत असल्यावर शक्यतो वैद्यकशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी प्रवेश घेण्याची परंपरा तिनं मोडली. इतकंच नाही, तर संशोधन क्षेत्रातलं कुणीच परिवारात किंवा निकटच्या वर्तुळात नसतानाही ही जोखीम तिनं स्वबळावर उचलली. अर्थातच यासाठी तिच्या पालकांची संपूर्ण साथ तिला लाभली. या क्षेत्राविषयी फारशी माहिती नसल्यामुळे धाकधूक होत असतानाही तिनं डॉक्टर व्हावं हा विचार त्यांनी बाजूला सारला आणि स्वप्नांच्या दिशेनं झेप घेण्यासाठी तिच्या पंखांना बळ दिलं. एका सत्रामुळे प्रेरित होऊन आनुवंशशास्त्र हा विषय निवडणाऱ्या पूर्णाचा ‘डॉ. पूर्णा गद्रे’ होण्यापर्यंतचा प्रवास रंजक आहेच, पण त्या जोडीनं त्यांच्या व्यक्तिमत्त्वासारखाच बहुरंगीसुद्धा. 

ठाण्याच्या सरस्वती महाविद्यालयातून शालेय शिक्षण घेतल्यानंतर जैवतंत्रज्ञानात पदवी घेण्यासाठी त्यांनी रुईया महाविद्यालयात प्रवेश केला. तेव्हा जैवतंत्रज्ञान विभाग लहान असल्यामुळे प्राध्यापक आणि इतर विद्यार्थ्यांबरोबर वैयक्तिक पातळीवर स्वत:ला जोडता आलं. प्रत्येक प्राध्यापकांशी असणाऱ्या ओळखीमुळे नातं बहरलं आणि प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या प्रवासात योग्य वाट निवडण्यासाठी मार्गदर्शन केलं. त्यांना स्वप्नं पाहायला प्रवृत्त केलं व ते सत्यात उतरवण्यासाठी प्रोत्साहन दिलं. त्यांच्या पहिल्या वर्षांला त्यांना शिकवणाऱ्या प्राध्यापिकेनं प्रत्येक विद्यार्थ्यांच्या कलानं घेत त्यांना मार्गदर्शन केलं होतं. संशोधनातली पूर्णा यांची रुची आणि प्रगल्भता पाहता त्यांनी एक फार महत्त्वाची गोष्ट पूर्णा यांच्या ध्यानात आणून दिली. आणि तो विचार पूर्णाच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या संदेशांपैकी एक ठरला. मुंबई विद्यापीठातून पदवी शिक्षणाचा अनुभव घेतल्यानंतर पुढील अनुभवासाठी पूर्णा यांनी आपल्या कक्षा विस्ताराव्यात असं त्यांचं सांगणं होतं. नव्या संस्थेत, विद्यापीठात घेतलेले अनुभव त्यांना आणखी समृद्ध करतील असं समजावणाऱ्या त्या प्राध्यापिकांनी पूर्णा यांना आत्मविश्वास दिला. कुणीही आदर्श समोर नसताना त्या पाहात असलेलं स्वप्न आणि त्यांचं उद्दिष्ट प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रेरणा दिली. शिक्षकांची विद्यार्थ्यांच्या आयुष्यातली भूमिका किती महत्त्वाची असते हे हा प्रसंग अधोरेखित करतो.

भारतीय तंत्रज्ञान संस्थेत (आयआयटी) जैवतंत्रज्ञानातील पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश परीक्षा घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. तेव्हा आयआयटीमध्ये रुरकी व मुंबई अशा दोनच ठिकाणी या विषयाचं शिक्षण उपलब्ध होतं. देशातून पहिल्या १५ मध्ये येणं, हा विचार तेव्हा त्यांना थोडा कठीण वाटला असला तरी या वेळीसुद्धा त्यांची आईच त्यांच्या मदतीला आली. ‘‘मला हे जमलं नाही तर काय होईल? असा विचार करण्यापेक्षा मला हे जमणार. मी हे करणार. मला हे शक्य आहे. असा विचार करून  संपूर्ण प्रयत्न कर,’’ असं सांगत आईनं त्यांना प्रोत्साहन दिलं. आणि पूर्णा यांनी ते लीलया करूनही दाखवलं. याच दरम्यान बंगळूरु येथील ‘नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्स’

(NCBS) येथे ‘एम.एस्सी.’-‘पीएच.डी.’ अशा संयुक्त पदवीसाठीच्या मुलाखतीसाठी त्यांची निवड झाली. या मुलाखतीआधीच आय.आय.टी., मुंबई येथील जैवतंत्रज्ञान विभागामध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी त्यांची निवड झालेली असल्यामुळे व आताच पीएच.डी.साठी संशोधनाचा विषय ठरवायचा नसल्यानं एन.सी.बी.एस.मधली ही मुलाखत केवळ अनुभव म्हणून त्या देत होत्या. इतर लोक अभ्यासात गुंतलेले असताना तिथल्या वैज्ञानिक वातावरणाचा आनंद त्या घेत होत्या. अनुभव घेण्यासाठी म्हणून दिलेली ती मुलाखत त्यांच्यासाठी अनेक अर्थानी महत्त्वपूर्ण ठरली. आजवरच्या त्यांच्या चर्चा या प्राध्यापकांपर्यंत सीमित होत्या. त्या दिवशी मात्र या मुलाखतीच्या निमित्तानं त्यांना पहिल्यांदाच वैज्ञानिकांबरोबर चर्चा करण्याची संधी मिळाली. विज्ञानातल्या विविध संकल्पना वैज्ञानिकांच्या दृष्टिकोनातून पाहता आल्या. तिथे त्यांना स्टेम सेल्ससंदर्भात एक प्रश्न विचारला गेला. स्टेम सेल्स या आपल्या शरीरातल्या मूळ पेशी असतात. कोणत्याही प्रकारच्या नवीन पेशींच्या निर्मितीसाठी त्या सक्षम असतात. यापूर्वी त्यांनी त्याचा फारसा अभ्यास केलेला नव्हता. पण आपली कल्पनाशक्ती तर्कशुद्ध पद्धतीनं मांडून त्या प्रश्नाचं उत्तर देण्याची मुभा त्यांना मिळाली. आणि गंमत म्हणजे त्यांनी केलेली कारणमीमांसा आणि दिलेलं उत्तर योग्य होतं. या मुलाखतीनं त्यांना विज्ञान व संशोधनातील सर्जनशीलता व कल्पनाशक्ती यांचा तर्कशुद्ध विचारसरणीसह मेळ घालण्याचं महत्त्व ध्यानात आलं. आजही आपल्या संशोधनात, प्रयोगशाळेत विविध विषय, नवं संशोधन, याविषयी चर्चा करताना, प्रयोग तयार करताना त्या या पद्धतीचा अंगीकार करतात.

आय.आय.टी.मधला शैक्षणिक अनुभव आजवरच्या अनुभवांपेक्षा वेगळा ठरला. तिथे घोकंपट्टी न करता उपलब्ध माहितीचा योग्य पद्धतीनं वापर करण्यासाठीची प्रेरणा मिळाली. उत्तरं माहीत नसलेल्या प्रश्नांची उकल करण्यासाठी जिज्ञासा निर्माण झाली. या काळात त्यांनी ‘बिडग यीस्ट’वर काम केलं. आपण शाळेत शिकल्याप्रमाणे ‘बिडग यीस्ट’चं प्रजनन हे अलैंगिक असतं. त्यामध्ये एकाचे दोन, दोनाचे चार अशा पद्धतीनं पेशींची विभागणी होत असते आणि नवीन जीव आकाराला येतो. या ‘बिडग यीस्ट’चं पोषण कमी केलं की त्यामध्येसुद्धा स्त्री आणि पुरुष जननपेशी तयार होतात. पूर्णा यांनी या यीस्टमध्ये ‘डी.एन.ए.’ची विभागणी होत असतानाचा अभ्यास केला. विभाजनादरम्यान डी.एन.ए.ची संख्या कशी राखली जाते हे समजून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यासाठी परिणामकारक आणि सहभागी प्रथिनांचा अभ्यास केला गेला. या अभ्यासामुळे पेशी विज्ञानातला त्यांचा रस वाढला आणि इथल्या वातावरणातच स्टेम सेल्सविषयीचं त्यांचं प्रेमही वृद्धिंगत झालं. आय.आय.टी.मधल्या या पदव्युत्तर अभ्यासक्रमांत त्या प्रथम क्रमांकानं उत्तीर्ण झाल्या.

पीएच.डी.साठी त्यांनी ‘टाटा मूलभूत संशोधन संस्थे’मध्ये (टीआयएफआर) प्रवेश घेतला. तिथे तीन वेगवेगळय़ा प्रयोगशाळेत त्यांनी तीन वेगवेगळे प्रयोग केले. झेब्रा माशाच्या संदर्भातला डीएनए विभाजनाचा अभ्यास, पेशींना कमी पोषण पुरवल्यावर होणारे बदल हे त्यांनी हाताळलेल्या संशोधन विषयांपैकी काही विषय. स्टेम सेल्समधील पेशी विभाजन हा कायमच त्यांच्या आवडीचा विषय. या अभ्यासासाठी त्यांनी चिलटांवर (ड्रिसोफीला) काम केलं. केळी आणि इतर फळांवर दिसणाऱ्या या चिलटांमध्ये वृषणांमधील (टेस्टीस) पेशी विभाजनाचा अभ्यास त्यांनी केला. स्टेम सेल्सपासून बालक पेशी (डॉटर सेल्स) तयार होतात. पुढे या पेशींचंही विभाजन होतं. या बालक पेशींना पेशी विभाजन कधी थांबवायचं आणि कसं थांबायचं हे लक्षात कसं येत असावं या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न डॉ. पूर्णा या संशोधनादरम्यान करत होत्या. हे पेशी विभाजन अगदी योग्य व्हावं लागतं. संख्या कमी झाल्यास अवयवांची योग्य वाढ होणार नाही, तर वाढल्यास कर्करोगजन्य परिस्थिती निर्माण होईल. यासाठीच पेशी विभाजनाचा दर (रेट ऑफ सेल डिव्हिजन) महत्त्वाचा असतो. चिलटांमध्ये एका पेशी विभाजनासाठी शक्यतो २४ तास लागतात आणि चार वेळा पेशी विभाजन होतं. प्रत्यक्ष निरीक्षण करायचं ठरवलं तर हे व्यावहारिकदृष्टय़ा शक्य नाही. यासाठी टीआयएफआरमधल्या गणित विभागाची त्यांनी मदत घेतली. गणित विभागातून प्रोफेसर नितीन नित्सुरे यांच्यासोबत एकत्र काम करून याचा खुलासा करणारं एक मॉडेल विकसित केलं. प्रोफेसर कृषाणू रे या आपल्या पीएच.डी. मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली विकसित केलेल्या या मॉडेलचा वापर करून पेशी विभाजनाचा दर बदलला तर काय परिणाम होतो हे लक्षात येईलच, पण सोबतच यकृत प्रत्यारोपणासारख्या अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर रिकव्हरी होण्यासाठी किती वेळ लागेल याचा अंदाजही बांधता येऊ शकेल. याबरोबरच त्वचेला इजा झाल्यानंतर ती भरून येण्यासाठीचा कालावधीसुद्धा ओळखता येऊ शकेल. या शक्यता भविष्यातल्या क्रांतिकारी बदल घडवून आणणाऱ्या शक्यता असून सध्या सुरू असलेलं संशोधन म्हणजे त्या भविष्यवादी संशोधनाचा पाया आहे. आणि म्हणूनच तो फार महत्त्वाचा आहे.

सुरुवातीला विषयाची फारशी माहिती उपलब्ध नसल्यामुळे पूर्णा यांना ज्या समस्यांना सामोरं जावं लागलं, भविष्याविषयीची जी भीती त्यांच्या पालकांच्या मनात निर्माण झाली, तसा अनुभव इतरांना येऊ नये म्हणून त्या प्रयत्नरत आहेत. या क्षेत्रात आवड असणाऱ्या लहान मुलांना, तरुणांना त्याविषयी माहिती देण्याचं, त्यांच्या शंकांचं निरसन करण्याचं आणि या क्षेत्राची दारं त्यांच्यासाठी खुली करण्याचं काम त्या नेमानं न कंटाळता करतात. याचीच परिणती म्हणू हवं तर, पण यामुळे आता त्यांची लहान मामेबहीणही रुळलेली वाट न निवडता आनुवंशशास्त्रात संशोधन करणार आहे.

शास्त्रज्ञांनी आपल्या संशोधनाच्या आणि उत्तराच्या प्रेमात न पडता प्रश्नाच्या प्रेमात असावं असं त्या सातत्यानं सांगतात. संशोधन क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या तरुण मुलामुलींना ही तरुण वैज्ञानिका केवळ पदवी ग्रहण करण्यासाठी हे क्षेत्र नाही, असं आवर्जून सांगते. हे क्षेत्र आपल्याला नव्या प्रश्नांची उकल करण्याचं आणि आपल्या मर्यादांची चाचणी घेण्याचं समाधान देतं यावर त्यांचा विश्वास आहे. विज्ञानानं त्यांना आपण प्रत्येकाकडून शिकू शकतो हा धडा दिलाय. त्यासाठी आपल्याला केवळ निरीक्षणशक्तीची गरज असते. टीआयएफआरमधल्या ‘ओपन डे’च्या निमित्तानं त्यांना भेटणाऱ्या लहान मुलांबरोबर हा अनुभव त्यांनी घेतलाय. त्यांच्याकडून फार शिकता आल्याचं त्या सांगतात.

वैज्ञानिका म्हणून तटस्थ भूमिकेचा पुरस्कार करण्यासाठी आग्रही असणाऱ्या डॉ. पूर्णा पदोपदी वैज्ञानिक, तर्कशुद्ध विचारसरणी व सर्जनशीलतेचा संगम साधतात आणि संशोधनातल्या सर्जनाचं महत्त्व अधोरेखित करतात.

postcardsfromruchira@gmail.com

Story img Loader