आज सदर थांबवताना ज्यांच्यावर लिहिलं नाही, त्यांचा मेळा दृष्टीपुढून सरकतो आहे. गरीबदास आणि सुंदरदास, त्यागराज आणि पोतन्ना, अखा भगत आणि नरसी मेहता, चेरुश्शेरी नंपुतीरी आणि पुन्तानम् नंपुतीरी, वागीश आणि कुलशेखर, आळवार संत आणि नयनार संत, दरिया आणि बाबा फरीद, रामानंद आणि वल्लभाचार्य, दरियाबाई आणि मीरा-सगळ्या भारतभूमीवर आसेतुहिमाचल भक्तांची एक महायात्राच निघालेली दिसते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
वर्ष संपत आलं. दर पंधरा दिवसांनी एकदा एकेका अमराठी संताविषयी लिहिणं झालं. आज सदर थांबवताना ज्यांच्यावर लिहिलं त्यांच्याइतकाच, ज्यांच्यावर लिहिलं नाही, त्यांचा मेळा दृष्टीपुढून सरकतो आहे. ज्यांचे शब्द आठवले, त्यांच्याइतकेच न आठवले-आळवलेले शब्द-स्वर कानावर येत राहिले आहेत. गरीबदास आणि सुंदरदास, त्यागराज आणि पोतन्ना, अखा भगत आणि नरसी मेहता, चेरुश्शेरी नंपुतीरी आणि पुन्तानम् नंपुतीरी, वागीश आणि कुलशेखर, आळवार संत आणि नयनार संत, दरिया आणि बाबा फरीद, रामानंद आणि वल्लभाचार्य, दरियाबाई आणि मीरा-सगळ्या भारतभूमीवर आसेतुहिमाचल भक्तांची एक महायात्राच निघालेली दिसते.
वेगवेगळ्या साधनामार्गावरून निघालेल्या लहान लहान दिंडय़ा. काळ वेगळा, प्रांत वेगळे, भाषा वेगळी आणि तत्त्वविचारही सूक्ष्मपणे वेगळे. अंतिम गंतव्य मात्र एकच. सर्व भेदाभेदांपलीकडे असणारा सर्वव्यापी, सर्वात्मक असा परमात्मा. जवळ जवळ एक हजार वर्ष अविरत चाललेली महायात्रा. या यात्रेत चालणाऱ्यांच्या पावलांचे ठसे अजून वर्तमानाच्या धुळीत उमटलेले आहेत. विचारी माणसांच्या आंतर अवकाशात अजून त्या यात्रेत उमटणारा ईश्वराच्या आदिरूपाचा गजर निनादत येतो आहे. स्वत:ला सन्मुख होणाऱ्या प्रत्येकाला अजून त्या यात्रेत उडणाऱ्या अबीर-बुक्क्यासारखा चित्शक्तीचा स्पर्श होतो आहे आणि माणसाच्या भल्यासाठी झगडणाऱ्या प्रत्येकाच्या थकल्या आयुष्याचा शीण त्या यात्रेसोबत वाहणाऱ्या तीर्थजळासारख्या शांत-निर्मळ स्नेहभावानं आपोआप दूर होतो आहे.
संत आणि भक्त या यात्रेत वेगळे दिसले नाहीत. दोन्ही एकच होऊन गेले. संत हे खरं तर ‘सत्’चं एक रूप आहे. सत् म्हणजे अस्तित्त्वबोधक आणि सत् म्हणजे सत्यवाचकही. म्हणून सत्याविषयी संपूर्ण आस्था असलेलं अस्तित्व म्हणजे संत. ज्ञानात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक अशी तीनही प्रकारची सत्याची अनुभूती ज्याला पूर्णता देते, तो संत! मग तो सगुणोपासक असो किंवा निर्गुणोपासक असो.
भारतात भक्तिभावनाच मुळी दोन रूपांत स्वीकृत झाली आहे. सगुण रूपात आणि निर्गुण रूपात. दोहोंचा प्राणस्वर मात्र एकच आहे. दोन्हीही संतांनी एका सार्वभौम, नैतिक अशा मानवधर्माचा स्वत:च्या व्यक्तिगत अनुभवांतून प्रसार केला आणि त्या अनुभवातून स्फुरलेल्या व्यावहारिक, सर्वजनसुलभ अशा धर्ममार्गाचा उपदेश केला. अर्थात या उपदेशांची हळूहळू बांधणी झाली. मूलतत्त्व एक असूनही साधनेतल्या सूक्ष्म भेदांवर आधारलेले वेगवेगळे पंथ किंवा संप्रदाय निर्माण झाले आणि संप्रदायप्रियताही वाढीला लागली. पण आपली दृष्टी खिळून राहते ती त्या सांप्रदायिक भेदांपलीकडे उभ्या राहिलेल्या भव्य, उज्ज्वल आणि नि:संग अशा व्यक्तिमत्त्वांवर. त्यांनी त्यांच्या काळाला दिलेल्या निश्चित आणि दिलासादायक अशा आश्वासनांवर.
संतांनी-बहुतांश संतांनी केलेला उपदेश त्यांना सर्व प्रकारच्या मर्यादांपलीकडे नेणारा आहे. काळाच्या, समाजधारणांच्या, कला आणि साहित्याच्या प्रस्थापित परंपरांच्या, व्यवस्थेच्या आणि धर्मविचारांच्या समकालीन मर्यादांपलीकडे संत सहज गेले. सामंतांना आवडणारं संस्कृत साहित्य एकीकडे निर्माण होत असताना अगदी आठव्या शतकापासून तेराव्या-चौदाव्या शतकापर्यंतचं लोकवाङ्मय आणि विशेषत: नाथ-सिद्धांचं वाङ्मय संतांनी आपलंसं केलं. नाथ-सिद्धांनी जसे, तसेच त्यांनीही शास्त्रग्रंथ दूर सारले. षड्दर्शनं बाजूला ठेवली आणि कर्मकांडाची उपेक्षा करत, प्रसंगी त्यावर कडवी टीका करत देव आणि भक्तांच्या सहज-सरल एकात्म भावाचा उच्चार केला.
भारतीय धर्मसाधनेत भक्तिमार्गाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. केवळ धर्मच नव्हे तर समाजजीवन, संस्कृती, कला, साहित्य-सर्वच क्षेत्रांना व्यापून टाकणारा आणि अनेक शतकं त्यावर प्रभाव गाजवणारा मार्ग म्हणजे भक्तिमार्ग! भारतीय समाज आणि संस्कृतीला दीर्घकाळ दिशादर्शन करून स्थायी स्वरूपाचं एक कल्याणकारी वळण देण्याचं काम भक्तिमार्गी संत सत्पुरुषांनी केलं आहे. देशभाषांचा स्वीकार करून त्यांनी केलेली सरल- सरस अशी साहित्यनिर्मिती हा संपूर्ण भारतीय साहित्य परंपरेचा फार मोठा आणि आनंदवर्धक अंश आहे. खरं तर भक्तिभावनेचा आढळ भारतीय धर्मपरंपरांमध्ये प्राचीन काळापासून होतो. पण
रा. गो. भांडारकरांसारखे विद्वान त्या भक्तिभावनेचा भक्तिआंदोलनापर्यंतचा क्रमविकास अचूक दाखवतात, तेव्हा इसवी सन पूर्व पाचवं शतक गीतारचनेचं महत्त्वपूर्ण शतक म्हणून त्यांच्या समोर येतं. एकेश्वरवादाचा आधार घेत धर्मसुधारणेचा प्रयत्न करणारा वैष्णव धर्म हळूहळू भागवत धर्म म्हणून प्रसारित होताना त्यांना दिसतो. बालकृष्णाचं चरित्र इसवी सनाच्या पहिल्या शतकानंतर आभीरांनी निर्माण केलं आहे. संतकवींच्या भक्तिभावनेचा तो पुढे मोठाच ध्यानबिंदू बनला आहे. रामानंदांसारख्या संतांनी गुप्तकाळापासूनच व्यापक बनवलेला आणि श्री संप्रदायाच्या आचार्यानी बळकट केलेला रामचरित्राचा आणि रामोपासनेचा संप्रदाय पुढेही अनेक भक्त-संतांमुळे वैष्णव संपदायाला घट्ट जोडला गेला. महाराष्ट्रात नामदेव- ज्ञानदेवादी संतांनी विठ्ठल भक्तीची अगदी वेगळी, वैशिष्टय़पूर्ण धारा त्यातून विकसित केली. गौडीय वैष्णवांनी कृष्णोपासना तर रसमय केलीच पण राधाभावाची मधुरताही त्यात मिसळून दिली. साहित्यात किंवा खरं तर भक्तिपरंपरेत नसली तरी राधाप्रधान रासलीला लोकमानसात प्राचीन काळापासून रंगलेली होती. भागवत पुराणाच्या रचनेनंतर राधासंप्रदायाचा जोरकस उठाव झाला. शक्तीच्या प्राचीन उपासनेला तांत्रिकांनी वेगळा आयाम दिला आणि भक्तीचे नानाविध रंग वेगवेगळ्या संप्रदायांमधून उल्हसितपणे प्रकट होत राहिले. लोकवेदाच्या आधारे उच्च ज्ञानाचा भार पेलणारं साहित्य या भक्तिधारांमधून निर्माण होत राहिलं.
अधिकांश भारतीय राजवंश धार्मिकदृष्टय़ा सहिष्णू होते. कधी वैष्णव, कधी शैव, कधी बौद्ध तर कधी जैन धर्माचा स्वीकार करणाऱ्या सत्ताधीशांनी आपापल्या सत्ताक्षेत्रात आपापल्या धर्माला समृद्ध आश्रय दिला. त्यातून अनेक मंदिरं आणि तीर्थस्थळं उभी राहिली. धर्मसंघटन आणि प्रसार यांची ती उत्तम महाकेंद्रं बनली.
शैव परंपरेचा मोठा प्रभाव दक्षिणभूमीवर दिसून आला. काश्मिरी शैवांच्या उपासनेत मधूनच सूफी संतांची धून ऐकू येत गेली आणि सूफी संतांच्या गाण्याला शैवांचं भस्म लागलं. दक्षिणेत आळवार भक्तांची परंपरा नयनार भक्तांप्रमाणेच उत्कट समर्पण भावनेनं गाजती राहिली आणि त्यातून सारी दक्षिणभूमी सिंचित होत असतानाच काही प्रज्ञावंत भक्तांचा उदय झाला. भक्तिआंदोलनाची विखुरलेली शक्ती संघटित करणारे हे शैव आणि वैष्णव आचार्य उत्तर आणि दक्षिणेच्या भक्तिआंदोलनाला जोडणारे दुवे ठरले.
संपूर्ण भारतभर परकीय आक्रमण, राज्याराज्यांमधले परस्पर संघर्ष आणि राज्यांतर्गत विद्रोह यांनी अस्थिर आणि प्रजाहितविन्मुख बनलेलं राजकारण, बहुजनांच्या विचारापासून दूर गेलेलं कर्मकांड आणि धर्मासह अनेक सार्वजनिक संस्थांमधून होत असलेलं सर्वसामान्यांचं शोषण या पाश्र्वभूमीवर संतांचा उदय झाला. समाजाच्या तळागाळातून वर येत त्यांनी माणुसकीचा मंत्रघोष सुरू केला आणि माणसाला जगण्यासाठी चेतना देणाऱ्या शुद्ध-सरल भक्तीचा नवा श्वास दिला. अज्ञानात आणि अन्यायात पिचलेल्या, तडफडणाऱ्या माणसांना भावाचा आश्वासक ओलावा दिला. भारताची भावात्मक एकता ही तर भक्तिआंदोलनाची सर्वात सुंदर देणगी आहे.
aruna.dhere@gmail.com
(सदर समाप्त)