हृदयाचं पावित्र्य आणि शुचित्व केवळ सत्यानंच राखलं जातं, असं नि:संदिग्धपणे सांगणारा वल्लुवर, जो उपदेश करतो तो हितकारक, सौम्य आणि आस्थेवाईक. दोन हजार वर्षांपूर्वीचा हा उपदेश वाचताना आज त्याचं तिरु म्हणजे थोर – ‘तिरुवल्लुवर’ हे बिरूद सार्थ वाटतं, त्याची ‘कुरल’ ही अद्वितीय कृती तमिळ वाङ्मयात वेदांची प्रतिष्ठा पावली आहे.

त्या चं नाव वल्लुवर म्हणजे वल्लुव जमातीतला. तामिळनाडूमधली ही एके काळी तळातली जात समजली जात होती. दवंडी देण्याचं आणि निरोप्याचं काम ही जात पिढय़ान्पिढय़ा करत आली होती. त्या जातीत वल्लुवर जन्माला आला आणि आपल्या श्रेष्ठ कर्तृत्वानं ‘तिरू’ म्हणजे थोर, पूज्य अशी उपाधी त्यानं प्राप्त केली. तिरुवल्लुवर म्हणूनच तो ओळखला जातो. देशाच्या दक्षिण टोकाला ऐन समुद्रात ज्याचा एक भव्य पुतळा उभारला गेला आहे, तो हा संत. जवळजवळ दोन हजार वर्षे तिरुवल्लुवर तमिळ माणसांच्या काना-मनावर अधिराज्य करीत आला आहे आणि त्याची ‘कुरल’ ही अद्वितीय कृती तमिळ वाङ्मयात वेदांची प्रतिष्ठा पावली आहे.
जवळजवळ दोन हजार वर्षांपूर्वीचा काळ. बहुधा चोल घराण्यातला सहावा राजपुरुष जेव्हा राज्य करत होता, तेव्हा म्हणजे इसवी सनाच्या पहिल्या शतकात याचा जन्म झाला. घर देवभक्ताचं होतं आणि व्यवसाय विणकराचा होता. भगवान आणि आदि हे त्याचे आई-वडील आणि वासुकी ही पत्नी. तिच्या पातिव्रत्याच्या कथाही तामिळनाडूमध्ये प्रसिद्ध आहेत.
‘कुरल’ हा वल्लुवराचा प्रख्यात ग्रंथ. धर्म, अर्थ आणि काम या तीन पुरुषार्थाचं विवेचन करणाऱ्या तेराशेपेक्षाही अधिक अशा कविता यात आहेत. दोन चरणी रचनांमधून जीवनाच्या विविध अंगांचा परामर्श घेत उत्तम रीतीनं जगण्याचा आणि ऐहिकाकडून हळूहळू पारलौकिकाकडे जाण्याचा बोध ‘कुरल’मधून त्यानं घडवला आहे.
‘कुरल’च्या जन्मामागे एक कथा आहे. असं म्हणतात, की एकदा आपलं विणलेलं कापड घेऊन वल्लुवर बाजारात बसलेला असताना एक उद्दाम सावकारपुत्र तिथे आला. त्यानं त्याचं एक कापड उचललं आणि किंमत विचारली. वल्लुवरनं किंमत सांगितली. मग सावकाराच्या मुलानं ते कापड मधोमध टरकावलं आणि विचारलं, ‘आता याची किंमत किती?’ वल्लुवर रागावला नाही. त्यानं किंमत सांगितली. सावकारपुत्रानं त्या तुकडय़ांचे आणखी तुकडे केले आणि आणखी तुकडे केले. वल्लुवर दरवेळी न रागवता शांतपणे किंमत सांगत राहिला. शेवटी सावकाराचा मुलगाच थांबला आणि त्यानं कापडाचे मूळचे पैसे वल्लुवरला देऊ केले. ‘आता हे कापड मला काही उपयोगाचं नाही, पण तुझे पैसे घे.’ तो आढय़तेनं म्हणाला. वल्लुवरनं ते पैसे घेतले नाहीत. तो म्हणाला, ‘आता हे कापड तुझ्याच काय, पण कुणाच्याच उपयोगाला येणार नाही. कापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांपासून ते विणणाऱ्या आणि विकणाऱ्यापर्यंत कितीतरी जणांचे कष्ट यामागे आहेत. ते सगळे वाया गेले. तू किंमत दिलीस तरी कापड वाया गेलं ते गेलंच. त्यामागचे अनेकांचे श्रमही व्यर्थ झाले. हे नुकसान कसं भरून येणार?’
वल्लुवरच्या या बोलण्याचा परिणाम सावकारपुत्रावर फार झाला. तो वृत्तीने मूळचा चांगला असला पाहिजे. त्यानं स्वत:ची चूक चटकन कबूल केली. वल्लुवर त्याला म्हणाला, ‘अरे, हे कापड फाटलं तर पुन्हा विणता येईल. पण आयुष्य वाया घालवशील, तर ते पुन्हा पुन्हा दुरुस्त करत नव्यानं जगता येणार नाही. तेव्हा शहाणा हो. पुन्हा अशी चूक करू नकोस.’
मुलगा घरी गेला आणि दुसऱ्या दिवशी वडिलांना घेऊनच आला. आपल्या मुलाला सुधारू शकेल, शहाणा करू शकेल असा हाच माणूस असल्याचा विश्वास बाळगून वडिलांनी मुलाला वल्लुवरकडे सोपवलं आणि त्या मुलाला शिकवता शिकवता ‘कुरल’ निर्माण झालं. नाना प्रकारचे दृष्टान्त देत नीतिमूल्यांचं शिक्षण देणारा एक थोर ग्रंथ निर्माण झाला.
‘कुरल’ ही अनेक अर्थानी अद्वितीय अशी रचना आहे. मानवकल्याण हा तिचा गाभा आहे. त्या गाभ्यातल्या विचारभावांची स्फुरणं मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करीत विस्तारतात. काळाची मर्यादा या कृतीला फार ओझरता स्पर्श करते. एरवी देश-काल-परिस्थितीच्या पैल जात, मानवजातीच्या शाश्वत हिताचाच विचार प्रकट होताना दिसतो. तिरुवल्लुवरची वचनं ऐकताना-वाचताना आपल्याला त्याच्यानंतर दीडएक हजार वर्षांनंतर जन्मलेल्या समर्थ रामदासांची आठवण वारंवार येते.
ज्ञान हे असते वाळूमधल्या झऱ्यासारखे
अधिक स्वच्छ, अधिक उत्तम पाणी असते,
जितके खोल खणाल, तितके
असं तो ज्ञानाचं लक्षण सांगतो. सज्जनसंगतीचं महत्त्व सांगताना तो म्हणतो,
थोरांची मैत्री म्हणजे जणू काही ग्रंथांचं अध्ययन
जितकं शिराल अंतरंगात,
तितकं गोड अधिक आणि तितकं अधिक देखणं
तिरुवल्लुवर म्हणतो, की माणसाला मिळालेलं आयुष्य अनमोल आहे. त्याचा उपयोग योग्य प्रकारे करायला माणसानं शिकलंच पाहिजे. शिकला पाहिजे संयम आणि शिकली पाहिजे कृतज्ञता. लोभापासून, परनिंदेपासून, मत्सरापासून, अन्यायापासून, अशुद्ध वर्तनापासून दूर राहण्याचे इशारे देतो तो. तो विनय आणि मधुर वाणीचा आग्रह धरतो. दयामय अंत:करणालाच खरी संपत्ती मानणारा, चराचरावर प्रेम करण्यातच मुक्ती मिळते असं घोषित करणारा, हृदयाचं पावित्र्य आणि शुचित्व केवळ सत्यानंच राखलं जातं असं नि:संदिग्धपणे सांगणारा वल्लुवर जो उपदेश करतो तो हितकारक, सौम्य आणि आस्थेवाईक उपदेश वाचताना आज त्याचं ‘तिरुवल्लुवर’ हे बिरूद अगदी सार्थ वाटतं.
असं म्हणतात, की तिरुवल्लुवरचं गृहस्थ जीवन फार समाधानाचं होतं. कुणी एक साधू त्याच्या दांपत्य जीवनाची परीक्षा घ्यायला आला आणि दोघा पती-पत्नींमधलं अद्वैत अनुभवून खजील होत त्यांना आशीर्वाद देऊन गेला. तमिळ वाङ्मयात ‘कुरल’ची असामान्य भर घालणाऱ्या या संताची पत्नी तशीच थोर होती. तिच्या मृत्यूनंतर तिरुवल्लुवरला संसारात गोडी उरली नाही. त्याचं मन गृहस्थाश्रमात रमेनासं झालं. त्यानं संन्यास घेतला आणि संन्यासाश्रमात आपले अखेरचे दिवस व्यतीत करून एक दिवस देह ठेवला.
मागे उरलं ते त्याचं नाव, त्याच्या संतपणाची कीर्ती आणि त्याचं ‘कुरल’. आजवर ‘कुरल’चे अनेक अनुवाद झाले आहेत. ‘देवी सरस्वती म्हणते की माझा नित्यनिवास ‘कुरल’मध्येच आहे,’ अशी समकालीनांकडून त्याची स्तुतीही झाली आहे. तमिळ माणसाच्या किती एक पिढय़ा तिरुवल्लुवरच्या ऋणाईत आहेत.
‘हजारो यज्ञ करण्यापेक्षा प्राण्यांची हिंसा न करणं श्रेष्ठ आहे, मांस न खाणं श्रेष्ठ आहे.’ ‘ज्या वक्तृत्वानं मित्र अधिक निकट येतात आणि शत्रूही मित्र होतात, ते खरं वक्तृत्व.’ ‘जो गृहस्थाश्रमातली आपली कर्तव्यं चोख पार पाडतो आणि सदाचारानं कुटुंब सांभाळतो, तोच खरा परमार्थ मार्गावरचा साधक. मुमुक्षूंमध्ये त्याचं स्थान पहिलं आहे.’ ‘ज्या घरात सद्वर्तन आहे आणि ज्या घरात उदंड प्रेम आहे ते घर धन्य होय’ ‘मृत्यू म्हणजे विनाश नव्हे, ती जणू एक गाढ झोप आहे आणि नवा जन्म म्हणजे त्या झोपेतून जागं होणं.’ ‘न्यायी आणि निलरेभी विद्वानांची योग्यता जाणून लक्ष्मी स्वत:च त्यांना शोधत येते.’
– तिरुवल्लुवरची अशी वचनं सुभाषितांसारखी तमिळ भूमीवर प्रसिद्ध आहेत. भारतीयांच्या उदार, सहिष्णू आणि सदाचारसंपन्न अशा जीवनधर्माची श्रीमंती पाहावी ती ‘कुरल’मध्ये. म्हणून तर तिरुवल्लुवरप्रमाणे ‘कुरल’ही ‘तिरुक्कुरल’ म्हणून गौरवलं गेलं आहे. अवघ्या मानव समाजाच्या कल्याणाच्या उत्कट भावनेतून निर्माण झालेली ही श्रेष्ठ कृती म्हणजे भारतीय साहित्याचंही भूषण आहे.
डॉ. अरूणा ढेरे – aruna.dhere@gmail.com

Manmohan Singh resume dr Manmohan Singh CV
Manmohan Singh Resume : प्राध्यापक, आरबीआय गव्हर्नर, अर्थमंत्री ते पंतप्रधान…; मनमोहन सिंग यांचा बायोडाटा होतोय व्हायरल, नेमकं त्यात लिहिलंय काय, वाचा
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Manmohan Singh launched the Technology Mission on Citrus for orange growers in Vidarbha
डॉ.मनमोहन सिंग, नागपूरची संत्री आणि ‘मिशन सिट्रस’
77 lakh fraud by cyber thieves, lure of investment ,
पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांकडून ७७ लाखांची फसवणूक
Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
IND vs AUS Pitch Invader At The MCG Tried to Hug Virat Kohli and Dances on Ground in Melbourne Test Watch Video
IND vs AUS: विराटच्या खांद्यावर ठेवला हात अन् मग केला डान्स, मेलबर्न कसोटीत अचानक मैदानात घुसला चाहता; VIDEO होतोय व्हायरल
Story img Loader