गौरी ब्रह्मे
‘‘माझ्याशी लग्न करशील का?’’
राहुलनं मला कोणतेही आढेवेढे न घेता थेट विचारलं होतं. तेही आम्ही भेटल्याच्या अवघ्या चौथ्या दिवशी! मला पटकन उत्तर देता आलं नव्हतं.
‘‘काय झालं? मी पसंत नाही?’’
‘‘नाही, तसं नाही. पण..’’
‘‘पण काय? पैसा, नोकरी, घर, गाडी, पगार यातलं काही नाही माझ्याकडे. ते मिळवीन. पण आधी तुझा होकार हवा.’’
‘‘ते कारण नाही. पण आपली..’’
‘‘आपली काय? जात, राहणीमान, आवडनिवड? हे कारण आहे का? काय असेल ते स्पष्ट सांग. चार दिवस भेटल्यानंतर मी हे नक्कीच सांगू शकतो, की आपल्या दोघांत यातले कुठलेही भेद फारसे मॅटर होणार नाहीत.’’
‘‘तसं नाही. आपली उंची अगदी एकसारखी आहे! नवरा थोडा तरी उंच हवा ना बायकोपेक्षा? लक्ष्मीनारायणाचा जोडा म्हणतात ना तो आयडियल! तसे नाही आहोत आपण.’’
हे कारण ऐकून तो खो खो हसला होता. मग तो विषय हसण्यावारीच गेला. यथावकाश मी त्याला होकार दिला. आमचं लग्न झालं. लग्नानंतर मी प्रत्येक फोटोत बारकाईनं आम्ही विजोड तर दिसत नाही ना, हे पाहात असे. बालिशपणाच म्हणा हवं तर माझा! वर्ष जात राहिली तसं समजत गेलं, की निवड जरी बाह्यरूपावर अवलंबून राहून केलेली असली, तरी संसार जुळवण्याचं काम मनाचंच असतं. प्रत्येक जोडी लक्ष्मीनारायणाची नसते.. नसावी. पण ती एकमेकांना पूरक साथ देणारी जरूर असावी. आपल्या जोडीदारात काय आहे, त्यापेक्षा त्याच्यात जे नाहीये ते मी भरून काढून आमचं सहजीवन सुखी कसं करता येईल, या निकषावर लग्न करावं. आपले गुण-अवगुण आपल्याला स्वत:ला व्यवस्थित माहीत असतात. माहीत नसतील तर ते माहीत करून घ्यावेत. आपण स्वत:च जर ‘आयडियल’ नाही, तर आयडियल जोडीदार ही अपेक्षा फोलच ठरेल. नाही का?
आम्हा दोघांची कामाची क्षेत्रं पूर्णत: वेगळी आहेत. मी शिक्षण क्षेत्रात, नवरा ‘आयटी’त. (गमतीत त्याला ‘ऐटीत’ असंही म्हणलं जातं. काही कंपन्या घरून किती काम करून घेतायत, ही नक्की कसली खोटी ऐट आहे, हे मी गेली दोन वर्ष प्रत्यक्ष पाहाते आहे! करोनाकाळात नवऱ्याचं काम इतक्या जवळून पाहायची माझी पहिलीच वेळ होती.)
आम्ही दोघंही एकमेकांच्या कामात, मित्रमैत्रिणींत फारसे ढवळाढवळ करणारे नाही. अनेकदा आम्हाला फार महत्त्वाच्या वगळता एकमेकांच्या कामाच्या बाबतीतल्या फार कमी गोष्टी माहीत असतात. याचं मला अजिबात वाईट वाटत नाही. नवराबायको असलात तरी सतत एकमेकांना बांधील नसावं. ज्याचं त्याला स्वातंत्र्य असावं. तरच या नात्यात गोडी राहते. याची एक लंगडी बाजू अशीही असते, की तुम्ही एकमेकांच्या कामातल्या अडचणींबद्दल बोलू शकत शकत नाही. पण त्यावरही उपाय सापडतात. गेली अनेक वर्ष माझ्या क्लासच्या बॅचेसच्या वेळा फक्त सकाळच्या असतात. तरीही राहुल मला अनेकदा विचारतो, ‘‘संध्याकाळी तुझा क्लास असतो ना?’’ मला हसावं की रडावं समजत नाही! हे एका जोडप्याच्या दृष्टीनं चांगलं की वाईट ते माहीत नाही, पण अजूनपर्यंत तरी आमचं बरं सुरू आहे म्हणायचं!
करोनाकाळात मी राहुलचं ‘वर्क फ्रॉम होम’ जवळून पाहिलं. सकाळपासून कॉल्सचा जो रामरगाडा सुरू व्हायचा, तो संध्याकाळपर्यंत अव्याहत सुरू असायचा. मधूनच ‘‘दार बंद करा. किती आवाज करता? भांडी आत्ताच लावायची आहेत का?’’च्या समिधा टाकणं सुरू असायचं! कधी कधी दुपारी जेवायलाही वेळ नाही इतकं काम असायचं. ‘इकडून अपडेट घे, तिकडे मेल कर, याला ‘एस्क्लेट’ कर (हो, मी पण शिकले आहे आता!), त्याला कॉलवर घे, याचं तिकीट इश्यू कर, हा रिलीज (भयंकर शब्द!) आहे..’ डोक्याची मंडई होत राहायची. दोन वर्षांपूर्वी तो हे सगळं काम करून परत दीड तास पुण्याच्या ट्रॅफिकला तोंड देत घरी यायचा हे आठवून माझ्या पोटात क्षणभर कालवाकालव झाल्याशिवाय राहात नाही. बायकांना तर त्यानंतर घरी येऊन अजून शंभर कामं असतात, तो एक आणखी वेगळाच विषय आहे. पण ‘तुम्ही काय बाबा, आयटीवाले!’ असे मत्सरयुक्त टोमणे मारताना लोकांनी आधी दहा वेळा विचार करावा असं आता निश्चितच वाटतं. नवऱ्याच्या ‘वर्क फ्रॉम होम’मुळे माझा त्याच्याबद्दलचा आदर नक्कीच दुणावला. हे थोडं उशिरा झालेलं ‘रिअलायझेशन’ असेल, पण ते झालंय हे मान्य करण्यात कमीपणा नाही.
हे उलटपक्षीही घडलं. मी ऑनलाइन काही शिकवत असले, की राहुल हमखास मागे हळू आवाजात म्हणत असे, ‘‘अशाच अमुच्या बाई असत्या, आम्हीही सुंदर घडलो असतो..’’ वगैरे! हा अर्थात गमतीचा भाग झाला. पण मी कामात असले की घरातल्या लोकांना शांत राहायला सांगणं, कुकर लावणं, स्वयंपाकाची तयारी करून ठेवणं, मुलांचा अभ्यास पाहाणं या गोष्टी त्यानं आपसूक केल्या. अनेकदा माझं लेक्चर सुरू असताना, व्हिडीओ ऑन असतानाही मला चहाचा कप हातात आणून दिला. माझ्या अनेक विद्यार्थिनी ‘हाऊ स्वीट मॅम’चे उसासे टाकताना तेव्हा दिसल्या. अशा प्रसंगांनी खूप आनंद दिला. सध्या ऑरगॅनिक/ जैविक पदार्थाचा बोलबाला आहे. मला वाटतं, आपल्या जवळच्या नात्यांची वाढही जैविक असावी. त्यात कोणताही कृत्रिमपणा नको. तरच ते नातं नीट वाढतं, फुलतं, बहरतं.
माझ्या पाहाण्यात एकमेकांच्या कामाप्रति आदर असणारी जोडपी फार कमी आहेत. प्रेम असतंच, पण एकमेकांबद्दलचा आदर हादेखील प्रेमाचं ‘एक्स्टेंडेड’ रूपच आहे. काम हे काम असतं, मग ते कुठलंही असो. कोणतंही काम छोटं नाही की मोठं नाही. घरकाम हे तर सर्वात मोठं काम आहे. जो ते करतो तो निश्चित कोणतंही काम लीलया करू शकतो.
नवराबायकोनं एकमेकांच्या कामाप्रति आदर ठेवला, तर नात्यातला जिव्हाळा, प्रेम आणि एकमेकांना ‘सहन’ करण्याची शक्ती टिकून राहायला मदत होते. त्यांच्या नात्याची जैविक वाढ होते आणि त्यांच्या पुढील पिढय़ांना ‘नातं कसं असावं?’ याचं मूल्यशिक्षण आपसूक घरातच मिळतं. आज अनेक घरं, संसार पटापट मोडताना दिसतात. लग्न टिकवण्यासाठी, आदर्श संसाराची कोणतीही एक रेसिपी नाही. पण मुख्य घटक प्रेम असेल आणि त्याचबरोबर एकमेकांबद्दल आदर, सहभावना, आकर्षण आणि व्यक्तिस्वातंत्र्य असेल, तर ते लग्न बऱ्यापैकी यशस्वी होतं. याला प्रारब्धाची जोडही हवी! भांडण, मतभेदही असावेत, पण ते फोडणीप्रमाणे किंवा चवीपुरते असावेत. शेवटी इतकंच सांगावंसं वाटतं, प्रत्येक लग्न एकसारखं नसतं. आपल्या नात्याची इतरांशी तुलना करू नये, पण आपल्या नात्याचा आलेख दरवर्षी वर कसा जाईल याकडे नवराबायको दोघांनीही अवश्य लक्ष द्यावं. एक जैविक नातं आपोआप फुलेल! gaurirbrahme@gmail.com