अंतर्वस्त्रांच्या वैविध्य किंवा सुखदायी अनुभवांविषयी बोलण्याविषयी आजही दुराग्रह बाळगले जातात. अगदी अमेरिकेसारख्या प्रगत देशातही दोन-तीन दशकांपूर्वी अंतर्वस्त्रांच्या निर्मितीत स्त्रियांच्या सोयीसुविधा आणि कम्फर्टचा फार विचार झाला नव्हता. अशा वेळी सारा ब्लेकलीने ‘स्पॅन्क्स’ या अंतर्वस्त्रांसाठीच्या ब्रॅण्डची निर्मिती केली. स्त्रियांसाठी तो ‘कम्फर्ट झोन’चा विषय तर झालाच, पण तिने जगभरातील सर्वात तरुण अब्जाधीश होण्याचा मान मिळवला.

‘स्त्रि यांनी चांगलेच दिसले पाहिजे. कारण तो त्यांचा हक्क आहे आणि समाजाने लादलेल्या कुठल्याही बंधनापलीकडे जाऊन त्यांनी स्वत:च्या सोयीचा (कम्फर्ट) विचार केला पहिजे. जी वस्त्रे/ पोशाख त्यांना परिधान करण्यास सोपा वा सुखकारक वाटत नाहीत, तो घालण्याची सक्ती त्यांच्यावर कोणी करू नये. उगाच अतितंग कपडे घालून त्रास सहन करण्यात किंवा अतिढगळ कपडे घालून बेडौल दिसण्यात काय हशील?’’ अगदी तरुण वयात स्वकर्तृत्वाने, अब्जाधीश बनलेल्या अमेरिकेतील सारा ब्लेकलीचे हे उद्गार तिच्या उद्योगाचा प्रेरणास्रोत आहेत.
अंतर्वस्त्रांच्या निर्मितीच्या क्षेत्रातील ‘स्पॅन्क्स’ या जगप्रसिद्ध कंपनीची सारा संस्थापक तसेच सीईओ आहे. सर्वसाधारण समाजमान्य चौकटीच्या पलीकडे जाऊन विचार करणारी म्हणूनच सारा व्यवसाय जगतात आणि मीडियातही परिचित आहे. आपल्याला मनापासून जी गोष्ट करावीशी वाटते तिचा पाठपुरावा केला तर आपल्या हातून काहीतरी उत्कृष्ट घडते. सारे अडथळे दूर होत, रस्ता आपोआप दिसू लागतो. एवढेच नव्हे तर जगातील सर्वाधिक प्रभावशाली लोकांच्या यादीतही आपण झळकू शकतो. ही अतिशयोक्ती नाही. सारा ब्लेकली याचं ताजं उदाहरण आहे.
‘स्पॅन्क्स’ या अंतर्वस्त्रांसाठीच्या ब्रॅण्डची ती निर्माती आहे. तिचं झपाटलेपण, आपल्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्याची तिच्यातली जिद्द, एकापाठोपाठ एक उद्दिष्टांना पादाक्रांत करीत सर्वोच्च शिखराकडे होणारी तिची आगेकूच! तिचा आतापर्यंतचा जीवनपट अचंबित करणारा आणि तेवढाच प्रेरणादायीही आहे.
साराचे वडील ट्रायल अटर्नी तर आई व्यावसायिक कलाकार, पण आर्थिक स्थिती यथातथाच होती. अशा सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेली सारा, आज अब्जावधी डॉलर्सची मालकीण आहे. प्रतिष्ठेच्या ‘टाइम’ मासिकाच्या २०१२ सालच्या जगभरातील सर्वाधिक प्रभावशाली १०० व्यक्तींच्या यादीत, वयाने सर्वात लहान असलेल्या साराने स्थान पटकावले आहे. तसेच ‘फोब्र्ज’ मासिकानेही उद्योजिकांच्या यादीत जगभरातील सर्वात तरुण अब्जाधीश म्हणून २०१४ साली तिचा गौरव केला आहे.
फ्लोरिडातील क्लिअर वॉटर शहरात २१ फेब्रुवारी १९७१ ला साराचा जन्म झाला. तिथेच तिचे सर्व शिक्षण पार पडले. फ्लोरिडा स्टेट विद्यापीठातून ‘कम्युनिकेशन्स’ मध्ये तिने पदवी मिळवली. या शिक्षणावर तिला ‘वॉल्ट डिस्ने वर्ल्ड’मध्ये जेमतेम पार्ट टाइम नोकरी मिळाली. उरलेल्या वेळात सारा दारोदार जाऊन फॅक्स मशिन्स विकत असे.
अंतर्वस्त्रे निर्मितीच्या क्षेत्राचीच निवड का केली याचे उत्तर सारा देते, ‘‘मी जेव्हा ‘डांका’ या कंपनीसाठी सेल्स गर्ल म्हणून काम करत होते, तिथे आम्हाला अतिशय तंग पोशाख घालून दारोदार फिरावे लागे. हे गैरसोयीचे आणि कधी कधी वेदनादायी व्हायचे. पन्नास वर्षांपासून चालत आलेले अंतर्वस्त्रांचे तेच ते पारंपरिक, गैरसोयीचे डिझाइन्स माझी पिढीही वापरत होती आणि मला ते अजिबात आवडत नव्हतं. सगळ्यांची कंबर एकाच मापाची कशी असू शकेल? सर्वानाच एकसारखा पोत असणारे कापड कसे सूट होणार? तेच ते भुरकट आणि करडे कंटाळवाणे रंग. हे बदलायला हवे असे मला सतत वाटायचे. एकदा तिरीमिरीत माझ्या ‘पॅन्टीहोस’चाच काही भाग कापून मी मला सोयीची होणारी आणि सहज कुठल्याही फिकट किंवा अगदी पांढऱ्या पॅन्टखाली सहज आणि निर्धोकपणे वापरता येईल अशी पॅन्टी घरीच बनवली. बहुदा ‘स्पॅन्क्स’ची ही सुरुवात होती असे म्हणायला हरकत नाही.’’
अंतर्वस्त्रांच्या वैविध्य किंवा सुखदायी अनुभवांविषयी बोलण्याबाबत आजही दुराग्रह बाळगले जातात. अंतर्वस्त्रांच्या विक्रीबाबत आज भारतातील चित्र किमान मोठय़ा शहरांतून बरेच बदललेले असले तरी दोन-तीन दशकांपूर्वी मात्र अंतर्वस्त्रांच्या खरेदीबाबत (विशेषत: महिलांच्या) संकोचाचेच वातावरण होते. पण अमेरिकेसारख्या प्रगत देशातही त्या काळात अंतर्वस्त्रांच्या निर्मितीत महिलांच्या सोयीसुविधा आणि कम्फर्टचा एकंदरीतच फार विचार झाला नव्हता! फ्लोरिडातील हवामान अनेकदा उष्ण आणि दमट असल्याने अंतर्वस्त्रे सदैव घामेजून जात. त्यामुळे जंतुसंसर्गाचाही धोका असे. त्या वेळी बाजारात उपलब्ध असलेली अंतर्वस्त्रे अतिशय गैरसोयीची आहेत, हे साराने जाणले आणि आपल्या हवेला अनुकूल अशी अंतर्वस्त्रे स्वत: डिझाइन करत परिपूर्ण अंतर्वस्त्रांच्या निर्मितीचा श्रीगणेशा केला. साराप्रमाणे तिच्या पिढीच्या इतर स्त्रियाही अंतर्वस्त्रांच्या गैरसोयीबद्दल तक्रार करत होत्या, पण साराने आपल्या विचारांना एक निश्चित दिशा दिली. आणि या क्षेत्रात क्रांती घडवून आणली.
जवळजवळ दोन वर्षे ती केवळ आपल्या या उत्पादनांवर काम करत राहिली. यासाठी आपल्याजवळ जमा असलेली ५०,००० डॉलरची पुंजी साराने वापरली आणि तिच्या या उत्पादनाचे ‘मार्केटिंग’ करण्यासाठी साराने थेट अटलांटा गाठले. अटलांटामध्ये अनेक अंतर्वस्त्र निर्मात्यांना ती भेटली. एखादी तरी ‘डील’ नक्की करायचीच या उद्देशाने अटलांटाला गेलेल्या साराला सुरुवातीचे काही दिवस निराशाच पदरी पडत होती. पण तिच्या वडिलांनी तिला नेहमीच धीर दिला. ते म्हणत, ‘‘जीवनात अपयश आवश्यक आहे. अपयशातून तुम्ही काय शिकता यावर तुमचे यशस्वी होणे अवलंबून असते, अपयश जेवढे मोठे तेवढे अधिक त्यांतून शिकत येते.’’ साराच्या या धडपडीला पहिल्यांदा यश कसे आणि केव्हा मिळाले याविषयी ती सांगते, ‘‘सॅम कॅप्लन या हायलॅन्ड मिल्सच्या मालकाला मी भेटले. माझ्या उत्पादनाचा नमुना त्यांना दाखवला पण ती संकल्पना फार चालेल असे त्यांना वाटले नाही. पण त्यांच्या दोन तरुण मुलींनी मात्र माझ्या नमुन्यांना झटकन पसंती दिली आणि कॅप्लन यांनी २००० मध्ये मला पहिली ऑर्डर दिली.’’
आपल्या उत्पादनाच्या ब्रॅण्डनेमसाठीही साराने बराच विचार केला. स्त्रीचा देह सुडौल दिसण्यासाठी जे अंतर्वस्त्र परिधान केले जाते त्याला ‘स्पॅन्क्स’ म्हटले जाते. म्हणून साराने याच नावाने आपली उत्पादने बाजारात आणली. मैत्रिणीच्या कॉम्प्युटरवर ‘स्पॅन्क्स’चा लोगोही तिने स्वत:च डिझाइन केला. ‘ट्रेड मार्क’ मिळवण्यासाठी जी कायदेशीर प्रक्रिया करावी लागते त्याकरिता अटर्नीची फी भरायला पुरेसे पैसेही साराजवळ नव्हते. इंटरनेटवर या विषयाचा अभ्यास करून ट्रेडमार्कसाठीचा अर्जही तिने स्वत:च तयार केला आणि तो ट्रेडमार्क मिळवला. लवकरच ‘निमन मार्कस स्टोर्स’ या विपणन साखळी दुकानांपैकी सात ठिकाणी ‘स्पॅन्क्स’ला स्थान मिळाले. आज अंतर्वस्त्रांसोबतच अनेकविध उत्पादने या ब्रँडखाली जनतेच्या पसंतीस उतरली आहेत.
साराने आपल्या राहत्या घरातून आपले उत्पादन ‘स्पॅन्क्स’ नावाने लाँच केले. आज जवळ जवळ सर्व हॉलीवूड अभिनेत्रींचा हा लाडका ब्रॅण्ड आहे. बाहेरून कुठलीही आर्थिक गुंतवणूक न घेताही साराचा व्यवसाय दरवर्षी २५० दशलक्ष डॉलर्सहून अधिक पर्यंत पोहोचला आहे. यासाठी जाहिरातींऐवजी एक शक्कल लढवली. ‘ऑप्रा विन्फ्रे शो’ मध्ये विजेत्यांना देण्यासाठी म्हणून तिने आपले उत्पादन मोफत पाठवणे सुरू केले. आणि अतिशय लोकप्रिय उत्पादन म्हणून ऑप्रा विन्फ्रेने जेव्हा उघडपणे आपल्या शोमध्ये सांगितले त्यानंतर साराचा ‘ब्रॅन्ड’ एकदम सुपरहिट झाला.
सुरुवातीला सारा एकटीच आपल्या व्यवसायाच्या उत्पादन, विपणन आणि लॉजिस्टिक्स आदी विभाग हाताळत असे. नंतर काही काळाने तिने तिच्या आरोग्य सल्लागार असलेल्याला आपला व्यावसायिक भागीदार म्हणून घेतले. २००८ मध्ये साराने प्रसिद्ध रॅप गायक जेसी इझ्लर याच्याशी विवाह केला.
एवढय़ा लहान वयात इतके उत्तुंग यश मिळवलेल्या साराचे पाय मात्र जमिनीवरच आहेत. ‘सारा ब्लेकली फाऊंडेशन’च्या माध्यमातून महिलांसाठी शैक्षणिक तसेच रोजगारविषयक अनेक उपक्रम ती चालवते. ‘गिव्हिंग प्लेज बिल गेट्स’ आणि ‘वॉरन बफे प्लेज’अंतर्गत आपली अध्र्याहून अधिक संपत्ती गरजूंसाठी दान करणाऱ्या श्रीमंतांच्या यादीतही ती आहे.
साराची एकूणच वाटचाल लक्षात घेतली तर ‘धोपट मार्ग सोडू नको’, अशांसारख्या म्हणी कालबाह्य़ वाटू लागतात. अप्रचलित वाटांवरच्या खाचखळग्यांचा फार बाऊ न करता हिमतीने पुढे जाणाऱ्यांना यशाच्या पाऊलखुणा दिसतात हेच साराच्या जीवनाचे सार म्हणायला हवे.

Story img Loader