सुवर्णा गोखले

महिला आरक्षणामुळे स्वाती शिळीमकर पुणे जिल्ह्य़ातल्या कुरुंगवडीच्या (भोर तालुका)सरपंच झाल्या खऱ्या, पण त्यांनी नामधारी सरपंच होणं नाकारलं आणि ग्रामस्थांच्या हितासाठी कंबर कसली. गावात नळपाणी योजना, रस्ते, गटारांचे काम आदी विविध योजनांची अडीच कोटी रुपयांची कामे केली. हे सगळं करताना सरपंचपदाचा आबही राखला आणि राष्ट्रध्वजाचाही.

The prices of gold and silver have steadily increased
सोने-चांदी अजून झळकणार की झाकोळणार?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Nirav Modi Letter of Understanding bank Business |
हिरा है सदा के लिये! – उत्तरार्ध
drop in gold and silver prices before Diwali
दिवाळीपूर्वीच सोने- चांदीच्या दरात घट… हे आहे आजचे दर…
Ajit Pawar, Niphad assembly constituency, election 2024
अजित पवार गटाकडून ‘निफाड’ मतदारसंघातील रहस्य कायम
Gold will cross the mark of 85 thousand in Diwali
दिवाळीत सोने ८५ हजारांचा टप्पा ओलांडणार! आजचे दर बघून ग्राहकांमध्ये…
gjc efforts to implement one nation one gold rate across the country
देशभर सर्वत्र सोन्याच्या एकसमान दरासाठी प्रयत्न
Gold prices today, market
सुवर्णवार्ता! सोन्याच्या दरात प्रथमच घसरण, हे आहेत आजचे दर…

राजकारणी घरातल्या शिळीमकरांची सून असणारी स्वाती मर्यादा सांभाळून होती. ‘डोक्यावरचा पदर हालता कामा नाही’ अशा वातावरणातच वाढलेली होती. खाऊनपिऊन सुखी असलेल्या घरातल्या स्वातीचं ‘राजकारणात ठसा उमटवणारं काम करू या’, ‘गावाचं सरपंच होऊ या’ असं कधी स्वप्नच नव्हतं. एरवी गावात फिरताना ग्रामपंचायतीच्या कार्यालयाकडे वळून पाहायचीसुद्धा तिला कधी गरज वाटली नव्हती. अशा स्वातीला महिला आरक्षण आले म्हणून गावाने एक होऊन ग्रामपंचायतीच्या सदस्य पदावर बिनविरोध निवडून दिले. निवडणुकीशिवायच स्वाती सदस्य झाली आणि सरपंचपदाला महिला आरक्षण असल्यामुळे सरपंचही झाली.

सर्वाच्या संमतीने ग्रामपंचायतीत स्वातीला सरपंच म्हणून पहिला अडीच वर्षांचा काल मिळणार होता. ती या पदाला योग्य आहे असे गावातल्या जाणत्या माणसांना वाटले. कारण तिचे बचत गटाचे काम त्यांनी पाहिले होते. स्वाती घराबाहेर पडली ती ज्ञानप्रबोधिनीच्या बचत गटामध्ये सहभागी होण्यासाठी. गटाची प्रमुख झाल्यामुळे ती आयुष्यात पहिल्यांदा बँकेत गेली होती. स्वातीच्याच शब्दात सांगायचं तर, ‘आमच्यात बाईला तशी घरातून बाहेर पडायचीच परवानगी नव्हती. पण बचत गट फक्त बायकांचे होते म्हणून बचत गटात आले नि सारं बदलून गेलं. हळूहळू मला उंबऱ्याबाहेरचं जग काय आहे त्याची ओळख व्हायला लागली. ‘मला वाटायचे मी ही अशी ९ वी नापास, शिक्षण नाही, याचं खूप वाईट वाटायचं. पण काय करणार? तेव्हाच ज्ञानप्रबोधिनीच्या ताईंनी यशवंतराव मुक्त विद्यापीठातून पुढे शिकता येईल, असं एका बैठकीत सांगितलं नि मी त्या बैठकीतल्या इतर मैत्रिणींसोबत परीक्षेला बसलेसुद्धा.

धडधडत होतं.. दोन पोरं शाळेत जात असताना मी पुन्हा शिकण्याचा विचार करत होते. पण जमलं मला. आता मी ग्रॅज्युएट होते आहे.’ ही स्वातीची धमक गावाने पूर्वीही पाहिली होती. सरपंच होण्यापूर्वी गावात ज्ञानप्रबोधिनीच्या वतीने स्त्रियांसाठी काम चालायचे. त्यात स्त्री आरोग्यासाठी वैयक्तिक संडास बांधायचे काम करायचे होते. तेव्हा काही बायकांना प्रश्न होता की पुढाऱ्यांच्या आधी आम्ही कसे संडास बांधायचे? पण त्याला उत्तर म्हणून काही जणींनी गटातून कर्ज घेऊन एकत्र सामान खरेदी केले आणि आपापले संडास बांधले. अशा गावातल्या पहिल्या १० जणींमध्ये स्वाती एक होती. जिने संडासासाठी घेतलेले कर्जही चोख फेडले होते.

तर स्वाती अशा अनुभवावर सरपंच झाली. तिचे गाव कुरुंगवडी, पुणे जिल्ह्य़ातलं भोर तालुक्यातलं गाव. स्वातीच्या आधीसुद्धा एक स्त्री सरपंच गावाने पाहिली होती, पण ती स्वातीइतकी प्रभावी नव्हती. स्वातीसाठी पुरुषधार्जिण्या समाजात स्वत:चे स्थान निर्माण करणे तेवढे सोपे नव्हते. सुरुवातीचे जवळजवळ सहा महिने सगळं जुळवून घेण्यात गेले, मग लोकांना कळले की स्वाती फक्त नावाची सरपंच नाही, कामाची सरपंच होणार आहे. मग मात्र सगळे मदत करू लागले. स्वाती सांगत होती, ‘मला कुठे काय कळत होते? मी तर निवडून आल्यावरच पहिल्यांदा ग्रामपंचायतीत गेले.’ ग्रामसेवकाकडून काम करून घ्यायचं पण दमादमाने, कारण ‘बाई’च्या हाताखाली काम करायची त्यालाही सवय नव्हती. पण तिने जमवलं. ग्रामपंचायतीतल्या सर्व सदस्यांना विश्वासात घ्यायचे ठरवले. जाणत्या सदस्यांच्या विरोधात जायचे नाही असा सोपा नियम मनात ठेवला आणि त्यामुळे तिची ताकद वाढली. तिने कायम सगळ्या सदस्यांच्या संमतीनेच काम करायचे ठरवले. ग्रामपंचायत सदस्यांच्या नियमित बैठका घेऊन एकत्र सगळ्यांनी निर्णय करायचे असे त्यांनी ठरवले. मग मात्र गावात ठसा उमटवणारे काहीतरी घडणार हे नक्की झाले.

स्वातीने मनोमन ठरवले होते की आपण महिला आरक्षणातून निवडून आलो म्हणून स्त्रियांच्या भल्यासाठी काहीतरी भरीव काम करायचे. कुठल्याही स्त्रीला विचारले की काय अडचण आहे? तर म्हणायची ‘पाणी भरण्यात दिवस जातो’ स्वातीलाही हे अनुभवातून माहिती होतेच की साधे घराचे शेणाने सारवण करायचे ठरवले तर पाण्याच्या चार खेपा जास्त माराव्या लागतात. असे ज्या दिवशी जमेल त्याच दिवशी सारवण करता येते. यामुळे तिने पाण्याचा प्रश्न सोडवायचं ठरवलं. उपसरपंच आणि सदस्यांच्या मदतीने सतत जिल्हा परिषद सदस्यांचा, आमदारांचा पाठपुरावा करून गावाच्या विकासासाठी निधी आणला. काही कोटी रुपयांची मदत गावासाठी सगळ्यांकडून मिळून उभी केली आणि गावात नळपाणी पुरवठय़ाची योजना राबवली.

स्वाती सांगत होती, ‘ऐन जत्रेच्या दिवशी, पौषी पौर्णिमेला घरोघरी पाणी पुरवणारी नळ योजना गावात राबवली होती त्याचे उद्घाटन झाले. त्या दिवशी गावातली पोर ओरडत होती ‘पाणी आले, पाणी आले’ ते ऐकून आयुष्य सार्थकी लागले असेच वाटले.’ परिणाम असा झाला की कामाच्या सुरुवातीला आठदहा बायकांना गोळा करू शकणारी स्वाती अडीच वर्षांच्या कामानंतर शंभर स्त्रियासुद्धा गरजेला जमवू शकणारी बनली. कारण बाईच्या गरजेचे काम तिने केले होते.

स्वातीच्या काळात केलेले अजून एक स्त्रियांसाठीचे महत्त्वाचे काम म्हणजे ग्रामपंचायतीतील जमलेल्या पैशांपैकी १० टक्के रक्कम केवळ स्त्रियांसाठी वापरायची असा शासकीय नियम आहे. हा निधी स्त्रियांसाठीच वापरला. पूर्वी हा निधी फक्त अंगणवाडीला दिला जायचा. या निधीतून गावाचे स्त्रियांसाठी संक्रांतीचे हळदीकुंकू केले, वस्तू लुटली. हा उपक्रम स्त्रिया एकत्र यायला उपयोगी पडला. त्याला धरूनच नसरापूर आरोग्य केंद्राच्या मदतीने तेथील स्त्रियांची आरोग्य तपासणी केली. गावात तेव्हा स्त्री भ्रूणहत्या विषयावर जाणीव जागृतीचे कार्यक्रम घेतले. याशिवाय गावात ‘महिला ग्रामसभा’ होतील असे पाहिले. त्यात या सगळ्याजणी बोलतील यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. ज्ञानप्रबोधिनी व इतर संस्थांची जी तालुक्याच्या ठिकाणी प्रशिक्षणे झाली, त्यातून स्वाती शिकत गेली. एकदा एका हॉटेलने ग्रामपंचायतीत अर्ज केला. त्यांना गावाचे ना हरकत प्रमाणपत्र हवे होते. मग महिला बैठक बोलावली. परवानगी देण्यावर चर्चा केली. या सभेला सुमारे १५० जणी आल्या होत्या. सगळ्या म्हणाल्या, ‘नाही द्यायची, कारण हॉटेल म्हटले की दारू आलीच’ मग परवानगीदार म्हणाला, ‘हॉटेलात दारू नाही विकणार’ मग परवानगी दिली गेली.

पाण्याच्या कामाने सुरुवात झाली. त्यानंतर गाव विकासाचे काम म्हणजे रस्ते करणे, रस्त्याच्या कडेने गटारांचे काम करणे हे सारे काम स्वातीच्या कालावधीत झाले. एवढेच काय, पण पावसाळ्यात अंत्यसंस्कार करता येण्यासाठी स्मशानभूमीचे कामही केले. अशी वेगवेगळी कामे मिळून एकूण २.५० कोटी रुपयांची कामे केली. ही कामे एकटय़ा स्वातीने करणे शक्यच नव्हते. स्वातीसोबत उपसरपंच आणि बाकी सदस्याही तेवढय़ाच ताकदीने उभ्या होत्या, केवळ म्हणूनच हे जमले. एखाद्या योजनेचा पाठपुरावा करून तालुक्यातून किंवा जिल्ह्य़ातून निधी आणणे सोपे नाही, पण सोबत सगळी जणं उभी राहिली म्हणूनच हे जमले.

असे काम करताना घराच्या कामावर अनेकदा ताण पडायचा, पण तिच्या जावांनी कधी तसे मानले नाही, तिला सासरेसासूबाई साऱ्यांची साथ होती. नवराही सोबत होताच. कधी रात्री कुठे जावे लागले तरी सोबत कोणीतरी असायचेच. त्यांचे एकच म्हणणे होते की गरिबाच्या फायद्याचं काहीतरी झालं पाहिजे. ते तर मनात होतंच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं होतं ते अनुभव नसतानाही स्वातीने केवळ ‘नामधारी’ राहायचे नाही असे ठरवून कामाला लागणे. सरपंच असताना प्रबोधिनीने काढलेल्या सहलीसोबत ती दिल्लीला गेली होती. ‘दिल्ली’ म्हणजे केंद्र सरकार कसं चालतं हे बघितलं. सगळ्या योजना ‘वरून येतात’ हे ऐकलं होतं. पण ‘वरून’ म्हणजे कुठून हे काही समजायचं नाही. दिल्ली पाहिल्यावर सगळा उलगडा झाला. त्यामुळे तिला काहीतरी महत्त्वाचं कळलं असं वाटायला लागलं. परिणामत: तिचा आत्मविश्वास वाढला. दिल्लीतून पुण्याला येताना विमानातून प्रवास केला. कधी विमानातून प्रवास करेन असं तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं. तिच्या ओळखीत कोणी स्वत:च्या पैशानं असा विमानाने प्रवास केला नव्हता. अशा काही गोष्टीमुळे तिला वाटायला लागलं की ‘आजपर्यंत तिनं काही केलं नाही कारण तशी संधीच मिळाली नाही. पण यापुढे संधी मिळाली तर मला जमेल.’ आणि तिनं संधीचं सोनं केलं.

काम करताना कुठे अवघडायला झाले का यावर आम्ही गप्पा मारत होतो तर स्वाती म्हणाली, ‘ताई वडिलधाऱ्या माणसांसमोर खुर्चीवर बसताना मनातून खूप संकोच व्हायचा. नात्याने सासरे सासू लागणारी मंडळी खाली बसलेली असताना त्यांच्यापुढे मला जेव्हा खुर्चीवर बसावं लागलं तेव्हा मनाला ताण यायचा. कोणी काही बोलायचं नाही, माझं पदच तसं होतं.. तरी..’ पण असंही व्हायचं की एखाद्या कार्यक्रमाला एखादा महत्त्वाचा पुढारी उशिरा यायचा, असे झाले तर मीच खुर्चीवरून उठून त्यांना माझी खुर्ची द्यायची, तेव्हा मात्र मनात विचार यायचा जर माझ्या जागी पुरुष सरपंच असता तर अशी स्वत:ची खुर्ची सोडून खाली बसला असता का? नक्कीच नाही. मी मनाला लावून घ्यायची नाही, पण तरी खटकायचं. काहीही म्हणा खुर्चीवर बसायला धाडसच करावे लागते.

गप्पात स्वाती अनुभवाचे शहाणपण सांगत होती, ‘गावाने निवडून दिले याचा अर्थ सगळ्या वेळी मदत होईलच असे नाही. एखाद्या कामाला गावात विरोध करायची वेळ आली तर चार लोकं न बोलावता एकत्र येतात, पण काम करायची वेळ आली की आपण एकटेच असतो तेव्हा कोणी येत नाही. काम झाले की बघायला येतात आणि मग चुका काढतात. अगदी एखादे काम कंत्राटदाराला दिले तर कामावर नुसतं लक्ष ठेवायला कोणाला वेळ नसतो. पण त्याला भेटून कोणी किती पैसे खाल्ले हे तपासायला मात्र लोक आवर्जून वेळ काढतात. गावातला सगळ्यांना उपयोगी पडणारा रस्ता केला तेव्हासुद्धा उगीच चूक व्हायला नको म्हणून मी उन्हातान्हाची बिगारी लोकांसोबत उभी रहात होते. हे सरपंचपद म्हणजे नुसती खुर्ची नाही त्याला जबाबदारीसुद्धा आहे. मग सणासुदीचा दिवस आहे का मग आधी घरातले बघू असे काही म्हणता येत नाही..’ तिचे हे वाक्य ऐकताना ‘आधी लगीन कोंढाण्याचे’ म्हणणाऱ्या तानाजीची आठवण होत होती. झोकून दिल्याशिवाय यश मिळत नाही हेच खरे. स्वातीच्या शब्दात सांगायचे तर ज्याचे जळते त्यालाच कळते, असे होते.

गप्पागप्पात मी स्वातीला विचारलं, ‘सगळ्यात जास्त आनंद कधी गं झाला?’ तर अगदी तिनं सहज उत्तर दिलं, ‘माझ्या हातानं २६ जानेवारी २०१३ ला पहिल्यांदा ग्रामपंचायती पुढे सर्वासमोर झेंडा फडकवला तेव्हा.’ पूर्वी बांबूला झेंडा अडकवला जायचा. मग मी ठरवलं की त्यात झेंडय़ाचा सन्मान नाही, मग ग्रामपंचायतीसमोर ध्वजस्तंभ बसवून घेतला आणि पुढच्या वेळी अभिमानाने झेंडा फडकवला!’.. बोलता बोलता बोलून गेली, ‘उगाच का बघतो टीव्हीवर.. ते पाहून तसं नेटकं करायला नको?’ मी करून घेतलं. १९५९ आमची ग्रामपंचायत स्थापन झाली, पण एवढय़ा वर्षांत कोणाला ध्वजस्तंभ उभारावा असं वाटलं नव्हतं, ते मी करून दाखवलं.’ गोष्ट अगदी छोटी होती, पण ते सांगताना गावात अभिमानाची गोष्ट तिच्या आग्रहामुळे झाली याचं यथार्थ समाधान तिच्या बोलण्यात होतं.

म्हणता म्हणता तिचा कार्यकाळ संपला. आज कार्यकाळ संपून ३.५ वर्षे झाली. पण अजूनही ती गावासाठी कामाला उपलब्ध आहे. सरपंच असताना तिनं ‘श्रावणबाळ योजने’त निराधार स्त्रियांना शासनाकडून दरमहा ६०० रुपये मिळतील याची योजना केली. आजही अशा निराधार स्त्रियांचे शासकीय काम स्वाती करते आहे. आणि आजही बचत गटाचे नियमित काम करते आहे. या प्रवासात ती खूप शिकली आहे आणि अजूनही त्याच उत्साहात शिकतेच आहे.

तिच्या मुलाला व मुलीला आईचा अभिमान आहे. ती सांगत होती, ‘‘आता मी नसरापूरला राहते. गावातल्या एखाद्याला दवाखान्यात अ‍ॅडमिट करायची वेळ आली तर ते आधी मला फोन करतात, मग रुग्ण दवाखान्यात पोचायच्या आधी मी तिथे पोचते नि डॉक्टरांशी बोलून मार्गी लावते.’’ आता समाजासाठी काम हे तिचे सहज झाले आहे, त्यात कुठलेही दडपण येत नाही. पूर्वी ती लोकांकडे जायची, आता लोक तिच्याकडे येतात. आता त्यांना तिची गरज लागते, ती त्यांच्यासाठी आहेच याचे तिला जास्त समाधान आहे.

suvarna.gokhale@jnanaprabodhini.org

chaturang@expressindia.com