अश्विनी भिडे आणि त्यांचे पती सतीश भिडे यांचं सहजीवन सकारात्मकतेवर फुललं आहे. अश्विनी सांगतात की, ‘‘आम्हा दोघांमध्ये मैत्री खूप घट्ट आहे. आम्ही चर्चाही खूप करतो. त्यामुळे कामाची धावपळ असेल, त्याविषयीची धोरणं असतील किंवा घरामध्ये मुलांबरोबर कोण कधी राहणार याचा प्रश्न असेल, तरी प्रत्येक वेळी आम्ही एकमेकांसोबत असतोच. आपण एखादी भूमिका घेतल्यानंतर ती बरोबर आहे हा दिलासा देणारं कोणीतरी हवं असतं. आम्ही एकमेकांसाठी ही गरज पूर्ण करत राहिलो.

सारखीच कौटुंबिक पाश्र्वभूमी, विचार करण्याची साधारण सारखीच पद्धत, आवडी-निवडीही जुळणाऱ्या, करिअरच्या निवडीपासून ते थेट वाचन आणि चित्रपटापर्यंत. त्यातच आयएएसची बॅचही एकच. प्रेमात पडून आयुष्य एकत्र घालवण्याचा निर्णय घेण्यासाठी इतकं पुष्कळ होतं. १९९५ ते ९७ या कालावधीत मसुरीमध्ये ‘लाल बहादूर शास्त्री अकादमी’मध्ये प्रशिक्षण सुरू असताना सतीश आणि अश्विनी यांचा परिचय झाला. प्रेमात पडून पुढे लग्नाचा निर्णयही घेतला गेला. दोघेही निरीश्वरवादी असल्यामुळे कोणत्या कर्मकांडावर विश्वास नव्हताच. त्यामुळे पत्रिकेतले किती गुण जुळताहेत हे पाहण्यापेक्षा वास्तवातले गुण जुळणं दोघांसाठीही महत्त्वाचं होतं.

navra maza navsacha 2
Video: ‘नवरा माझा नवसाचा २’ची जोरदार सक्सेस पार्टी, सचिन पिळगांवकरांनी सुप्रिया यांच्यासह ‘सत्या’ चित्रपटातील गाण्यावर केला जबरदस्त डान्स
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Bank of baroda recruitment 2024 bank of baroda is conducting the recruitment for 592 Vacancies
BOB Recruitment 2024: बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी; ५९२ जागांसाठी अर्ज करा अन् घ्या घसघशीत पगार
Deepti Devi
घटस्फोटानंतर पुन्हा रिलेशनशिपचा विचार केला नाहीस का? दीप्ती देवी म्हणाली, “मला परत स्वत:ला…”
mrinal kulkarni mother dr veena dev passed away
“शेवटपर्यंत ती त्याच फुलांप्रमाणे…”, आईच्या निधनानंतर मृणाल कुलकर्णींची भावुक पोस्ट; साहित्य विश्वावर शोककळा
devendra fadnavis and dawood
Nawab Malik : नवाब मलिकांचा भाजपा नेत्यांना इशारा; म्हणाले, “दाऊदशी संबंध जोडणाऱ्यांविरोधात…”
sangeet manapman teaser release
Video : दिवाळीच्या मुहूर्तावर ‘संगीत मानापमान’चा टीझर प्रदर्शित, ‘या’ तारखेला सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Pam Kaur appointed as Chief Financial Officer at Hong Kong and Shanghai Banking Corporation
पाम कौर… ‘एचएसबीसी’च्या सीएफओ

‘‘अश्विनी सांगलीची, तर मी साताऱ्याचा. आम्ही दोघेही मध्यमवर्गीय कुटुंबातले. दोघांचेही वडील स्टेट बँकेत नोकरीला होते, त्यामुळे २-३ वर्षांनी बदली व्हायची. आमचं दोघांचंही शिक्षण मराठी माध्यमातून झालं. दोन्ही घरांमध्ये शिक्षणाला महत्त्व होतं आणि आम्हाला आमचे निर्णय घेता आले. १९९९ मध्ये आम्ही लग्न केलं. लग्नाच्या वेळी मी नंदूरबारला जिल्हाधिकारी होतो, तर अश्विनी सिंधुदुर्गला जिल्हा परिषदेची मुख्य कार्यकारी अधिकारी होती. लग्नानंतर मला कोल्हापूरला जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली मिळाली. आमचे जिल्हे शेजारी असले तरी विभाग मात्र वेगवेगळे होते. सिंधुदुर्ग जिल्हा कोकण विभागात, कोल्हापूर जिल्हा पुणे विभागात. शनिवारी-रविवारी एकमेकांकडे जायचं ठरवलं तरी अनेकदा मंत्र्यांचे दौरे असायचे, बैठका असायच्या. त्यामुळे जवळपास ६ महिने आम्हाला एकमेकांसाठी फारसा वेळ देता आला नाही. दोघांसाठीही आपापलं काम महत्त्वाचं होतं. त्यात कधी तडजोड केली नाही. नंतर आम्ही एकत्र बदलीसाठी विनंती केली आणि ती मंजूरही झाली. आम्हा दोघांनाही नागपूरमध्ये बदली, पद मिळालं. २०००-०३ या कालावधीमध्ये आम्ही नागपूरला होतो. त्याच काळात आमच्या मुलांचा, जान्हवी आणि मल्हारचा जन्म झाला. त्यानंतर आम्हाला लवकरच म्हणजे २००३ मध्ये मुंबईला यायची संधी मिळाली.’’ इति सतीश.

अश्विनी भिडे यांच्या कामाचा आलेख पाहिला तर आधी एमएमआरडीए आणि आता एमएमआरसी मधल्या जबाबदाऱ्या ठळकपणे उठून दिसतात. त्याविषयी सतीश सांगतात, ‘‘एमएमआरडीएची र्वष खूप धावपळीची, ताणतणावाची होती हे खरंच. या काळात अनेक प्रकल्प सुरू झाले आणि तिच्याच काळात ते पूर्णही झाले. मुंबईकरांसाठी महत्त्वाचे ठरलेले इस्टर्न फ्री वे, सहार एलेव्हेटेड रोड अशांसारखे महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण होताना तिला बघायला मिळाले. हे काम करताना छान वाटतच होतं. पण त्याही आधी राज्यपालांच्या उपसचिव म्हणून तिने खूप महत्त्वाची कामे केली. त्यामध्ये बौद्धिक कामांचा बराच समावेश असायचा. सर्वात महत्त्वाचं काम होतं विदर्भ आणि मराठवाडय़ाचा अनुशेष भरून काढण्याचं. विदर्भ आणि मराठवाडय़ाला त्यांच्या वाटय़ाचा निधी मिळावा यासाठी अश्विनीनं अगदी ठाम भूमिका घेतली आणि पारही पाडली.’’ अनुशेषाचा प्रश्न राजकीयदृष्टय़ा अगदीच संवेदनशील, अशा वेळी राजकीय दबाव आला नाही का? या प्रश्नावर सतीश सांगतात, ‘‘आपापल्या विभागाला निधी मिळावा यासाठी राजकीय दबाव असतोच, शिवाय ती खुद्द पश्चिम महाराष्ट्राची असूनही अशी भूमिका कशी काय घेते असे प्रश्नही तिला त्यावेळी विचारण्यात आले. काही निर्णयांना न्यायालयात आव्हानही देण्यात आलं. पण न्याय्य भूमिका हे आम्हा दोघांच्या कामाचंही सूत्र राहिलं आहे. महाराष्ट्राचं राजकीय नेतृत्वही प्रगल्भ आहे. अधिकारी प्रामाणिकपणे आणि निष्पक्षपातीपणाची भूमिका घेत आहेत असं त्याच्या कामातून स्पष्ट झालं तर राजकीय दबावही फार उरत नाही. त्याचा अनुभव आम्हाला आला आहे. आम्हीही पुढच्या परिणामांचा विचार न करता, कुठलं पद मिळू शकतं याकडे लक्ष न देता आपापलं काम करण्यावर लक्ष केंद्रित केलं.’’

‘‘प्रशिक्षणानंतर अश्विनीचं पहिलं पोस्टिंग इचलकरंजीला होतं. तिथे ती साहाय्यक जिल्हाधिकारी होती. तिथं कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न होते. पण ते तिनं कौशल्यानं हाताळले. अरुण भाटिया तेव्हा विभागीय आयुक्त होते. त्यांनीसुद्धा अश्विनीच्या कामाबद्दल कौतुक केलं होतं. नागपूर जिल्हा परिषदेची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करत असताना तिनं विकासकामांवर भर दिला. कमी खर्चात सूक्ष्म जलसिंचन करणारे रानजाई पद्धतीचे बंधारे उभारण्यावर भर दिला. त्याला चांगलं यश मिळालं. खात्यामध्ये गैरप्रकार करणाऱ्या इंजिनीयरवर कारवाई केली. महिला अधिकारी म्हणून काही भेदभाव, प्रशासकीय पातळीवर नाही पण व्यवहारात, अनुभवाला येतोच. पण त्याकडे फार लक्ष न देता स्वत:च्या अधिकारांचा योग्य वापर ती करते.’’

२०१४-१५ या एका वर्षांत शिक्षण खात्याच्या सचिव पदाचं काम सर्वात आव्हानात्मक होतं असं अश्विनी भिडे मानतात, ‘‘प्रकल्पांवर कामं केली की ती दिसतात. पण आरोग्य, शिक्षण ही खाती अतिशय गुंतागुंतीची आहेत. त्याचा व्याप मोठा असतो. शिक्षण विभागाबद्दल सांगायचं तर २ कोटी मुलं, १ लाख शाळा, ५ लाख शिक्षक, शिक्षक मतदारसंघातले ५ आणि पदवी मतदारसंघातले ५ असे एकूण १० आमदार, आणि वार्षिक ३८ हजार कोटी रुपयांचं बजेट, इतका प्रचंड व्याप शिक्षण खात्याचा आहे. त्यावेळी कोणताही निर्णय घेतला की, कोणता ना कोणता घटक नाराज व्हायचाच. माध्यमंही खूप टीका करतात. पण विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळणं हे या विभागाचं मुख्य काम आहे, हे लक्षात घेऊन कामाला सुरुवात केली. त्यासाठी चांगले शिक्षक, चांगलं काम करणाऱ्या संस्था, शिक्षण संस्था, राजकीय नेतृत्व या सगळ्यांना एकत्र आणलं. सीएसआरअंतर्गत अनेक ठिकाणी शिक्षणासाठी निधी दिला जायचा, पण त्यामध्ये समन्वय नव्हता, तो आणला. निर्णय घेताना ठामपणा, कणखरपणा हवाच; पण त्याच वेळेला सहकाऱ्यांवर विश्वास ठेवणं, चांगल्या सहकाऱ्यांचं कौतुक करणं, स्वत: काम करणं याचबरोबरच कटुता येणार नाही याचीही काळजी घेणं महत्त्वाचं असतं. खरं तर प्रशासकीय भ्रष्टाचाराची चर्चा होत असली तरी प्रशासनामध्ये वरिष्ठांबरोबरच कनिष्ठ पदांवरही चांगलं काम करणारे खूप लोक आहेत. मात्र, समाजाने त्यांच्या चांगल्या कामाची दखल घेतली पाहिजे. त्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. सतत नकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर भविष्यात प्रशासनामध्ये चांगले लोक मिळणार नाहीत. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. खासगी क्षेत्र फक्त नफ्यासाठी काम करतं. सरकार हे नफा-तोटा न बघता प्रत्येक दुर्गम ठिकाणी असतं. त्यामुळे प्रशासनात चांगले लोक आले पाहिजेत.’’

आता स्वत:चा व्यवसाय करणारे सतीश २०१२मध्ये सरकारी क्षेत्रातून पूर्णपणे बाहेर पडले, मात्र तोपर्यंत दोघंही एकाच क्षेत्रामध्ये कार्यरत असल्यानं एकमेकांच्या कामाचा ताण माहिती असायचा. त्याबद्दल अश्विनी सांगतात की, ‘‘आम्हा दोघांमध्ये मैत्री खूप घट्ट आहे. आम्ही चर्चाही खूप करतो. त्यामुळे कामाची धावपळ असेल, त्याविषयीची धोरणं असतील, किंवा घरामध्ये मुलांबरोबर कोण कधी राहणार याचा प्रश्न असेल, तरी प्रत्येक वेळी आम्ही एकमेकांच्या सोबत होतोच. आपण एखादी भूमिका घेतल्यानंतर ती बरोबर आहे हा दिलासा देणारं कोणीतरी हवं असतं. आम्ही एकमेकांसाठी ही गरज पूर्ण करत राहिलो. घरगुती पातळीवरही या सामंजस्याचा उपयोग झाला. मुलं लहान असताना मी राज्यभवनात होते. ते माझ्यासाठी सोयीचंही झालं होतं. कारण घर आणि कार्यालय एकाच ठिकाणी असल्यानं मुलांची वेगळी काळजी नव्हती. त्या काळात सतीश मुंबई महापालिकेचा सहआयुक्त होता. तो त्याच्यासाठी धावपळीचा काळ होता. माझ्या सासूबाई सतत आमच्यासोबत राहिल्या. त्यामुळे मी, सतीश किंवा सासूबाई यांच्यापैकी कोणी ना कोणी एकजण मुलांबरोबर कायम असेल याची आम्ही खबरदारी घेतली. कामाची आखणीही तशीच करायचो. मुलं लहान असताना मला आणि सतीशला दोन महिन्यांसाठी प्रशिक्षणासाठी परदेशात जावं लागलं होतं. त्यावेळी आमचे भाऊ-बहीण, त्यांचे कुटुंबीय मदतीला आले. कोणी ना कोणी २-३ दिवस मुलांसोबत राहून जायचं. त्यामुळे मुलांना एकटं वाटलं नाही. कोणासमोरही कोणतीही अडचण असली तरी आम्ही सगळे नातेवाईक एकमेकांच्या मदतीला असतो, हा आमच्यातला अलिखित नियमच आहे.’’

एकमेकांना सांभाळून घेणारे नातेवाईक असल्यामुळे बऱ्याच अडचणींमध्ये मदत होते, हे जितकं खरं आहे तितकंच सणावारांच्या दिवशी अपेक्षा वाढतात हेही तितकंच खरं आहे. अशा वेळी त्यासाठी कसा वेळ काढला जातो? त्याबद्दल सतीश आणि अश्विनी दोघेही सांगतात, ‘‘आम्हा दोघांचाही  धार्मिक कर्मकांडांवर विश्वास नाही आणि आमच्या घरच्यांनीही ते स्वीकारलं आहे. त्यामुळे आम्ही कोणते उपवास किंवा व्रतवैकल्ये करत नाही म्हणून त्याबद्दल कोणी नाराज होत नाही. पण वर्षांतून एकदा आम्ही कुठे ना कुठे भेटतो. गेटटुगेदरसारखे कार्यक्रम करतो. शिवाय तंत्रज्ञानाचाही आम्ही पुरेपूर वापर करून घेतो. भौतिक उपस्थिती नसली तरी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने एकमेकांच्या सतत संपर्कात राहणं शक्य झालं आहे.’’

मसुरीमध्ये पुस्तकांची आणि चित्रपटांची उत्तम ग्रंथालयं होती. तेथे शिवराम कारंथ यांच्या एका कन्नड पुस्तकाचा उमा कुलकर्णी यांनी केलेला अनमुवाद ‘अशी ही धरतीची माया’ दोघांनीही वाचलं आणि दोघांनाही प्रचंड आवडलं. दोघांमध्ये मैत्री फुलण्यासाठी या पुस्तकानं महत्त्वाची भूमिका बजावली म्हणा ना. ‘‘तिथेच आम्ही दोघांनी अनेक उत्तम इंग्रजी चित्रपट बघितले, जे आम्हाला सातारा-सांगलीमध्ये सहज बघायला मिळाले नसते. आम्हा दोघांमध्ये खूप गोष्टी समान आवडीच्या आहेत. वाचन, फिरणं, निरीश्वरवाद, सकारात्मकता, बुद्धीप्रामाण्यवाद, गटसंघटक असणं या गोष्टी आम्हाला बांधून ठेवतात. आमच्या मुलांनाही त्यामुळे वाचनाची चांगली सवय लागली आहे. वेळेचा चांगला उपयोग केला की बऱ्याच गोष्टी साध्य होतात’’, अश्विनी दोघांच्या एकत्रित प्रवासाविषयी सांगतात. तर सतीश यांचा सकारात्मकतेवर ठाम विश्वास आहे. ‘‘वृत्तपत्रामध्ये रोज नकारात्मक बातम्या दिसत असल्या तरी जगाची प्रगती होत आहे. आयुर्मान वाढत आहे. आपला देशही प्रगत करत आहे आणि जगही चांगल्याच दिशेने जात आहे.’’ स्वत:वर विश्वास ठेवताना, इतरांवरही आणि चांगुलपणावरही तितकाच विश्वास ठेवला तर जग अधिक सुंदर होण्याचा विश्वास प्रत्यक्षात नक्की येतोच, असं म्हटलं पाहिजे.

निमा पाटील nima_patil@hotmail.com

Story img Loader