आई – बाबा तुमच्यासाठी
‘‘ चुकांमधून माणूस जास्त चांगलं शिकतो. चूक म्हणजे गुन्हा नव्हे हे समजून घेतलं की पहारा न करता सावध कसं राहायचं तेही समजायला लागतं. वाईटाच्या भीतीनं दरवाजा बंद केला की चांगल्याचाही रस्ता बंद होतो..’’
वि क्रमादित्याने हट्ट सोडला नाही. वेताळाला खांद्यावर घेऊन तो पुन्हा चालू लागला. वेताळ म्हणाला, ‘‘नवीन गोष्ट तुझी वाटच पाहतेय राजा. बघ.’’
   * * *      
मोबाइलचा मेसेज-रिंगटोन वाजला. प्रोजेक्टसाठी नेटवर सìफग करणाऱ्या मितानं मेसेज वाचून हसतहसत वर पाहिलं तर तिला जान्हवीचा, तिच्या आईचा गंभीर चेहरा दिसला. ‘‘मला मेसेज आल्यावर एवढं टेन्शन का घेतेस आई तू? निमिषनं एकदम भारी जोक पाठवलाय. थांब, तुला वाचून दाखवते.’’ मितानं जोक वाचला तशी जवळच बसलेली ज्योती – जान्हवीची शाळेपासूनची मैत्रीण खळखळून हसली. जान्हवीच्या कपाळावर मात्र आठय़ा. ‘‘कसले फालतू जोक दिवसभर मेसेज करत असता गं, एकदा निमिष, एकदा अथर्व.’’
‘‘हो सई – प्रियापण पाठवतात,’’ मिता मजेनं म्हणाली.
‘‘हेच मला आवडत नाही मिता तुमचं. सारखा तो मोबाइल हातात. मेसेजेस काय, गाणी काय, काही नसेल तर नेटवर चॅटिंग. गप्पा पण फालतूच. कुणाचं कुणाशी ब्रेकअप झालं आणि कोण कुणाला काय म्हणालं.’’
‘‘झालं तुझं सुरू आई. त्याच जोकला ज्योतीमावशी किती हसली. तुला मात्र शंभर चिंता.’’
‘‘ मग काय करू बाई, पेपरात रोज काही ना काही भलतंच छापून येतं. तुम्ही मुलं सतत ऑनलाइन असता, कसल्या कसल्या साइट्स असतात.. काळजी वाटणारच ना आईला.. पण तुला कुठे फरक पडतो? मेसेज-चॅटिंग चालूच. मित्र आणि मैत्रिणीत काही फरकही करायचा नाही. कसला तो पीजे आणि तू खिदळतेयस. ज्योतीही तुलाच सामील..’’
‘‘जाऊ दे आई, किती वेळा सांगितलं तरी तुला नाहीच कळायचं. तुला माझं चॅटिंग दिसतंय, पण प्रोजेक्टसाठी केवढा मोठा डेटा गोळा केलाय ते नाही दिसत. आता मी तुला काही सांगणारच नाही. जोकपण नाही आणि आमच्या ग्रुपमधल्या गमतीपण नाही.’’ रागारागानं मिता क्लासला निघून गेली.

जान्हवी अस्वस्थपणे घर आवरत होती. ‘कसलीच फिकीर नाही. कशी ही आजची मुलं.’ तिची पुटपुट ऐकणारी ज्योती म्हणाली,
‘‘तुला आठवतंय जान्हवी, शाळेत असताना आपण मुलीमुली कधी एखाद्या कार्यक्रमाला जायचो, नाटकाच्या तालमी असायच्या, कधी एखादीच्या घरी राहायचो. असं काहीही असलं की तुझी आई शंभर चौकशा करायची. तू खरं सांगतेयस याची खात्री करून घ्यायची. किती वैतागायचीस तू.’’
‘‘..’’
‘‘आपल्या वर्गातल्या मनोजनं तुझ्याकडे नोट्स मागितल्याचं तू मोकळेपणी घरी सांगितलंस, पण त्यामुळे तुझ्या आईची काळजी आणि पहारा उलटा वाढलाच होता. तू म्हणायचीस, ‘आईनं कधी कॉलेजातला मोकळेपणा अनुभवला नाही. हिच्या मनात सतत शंका. माझ्यावर विश्वासच नाही तिचा.’ हळूहळू तुमच्यातला संवादच संपला.’’
‘‘का आठवलं हे तुला हे ?’’
‘‘मी आल्यापासून तुमचा मायलेकींतला संवाद पाहतेय आणि तुझ्या आईचीच आठवण येतेय मला. आईच्या सततच्या अविश्वासामुळे तुला किती गुदमरल्यासारखं वाटायचं, कशी चिडचिड व्हायची, तेच आठवतंय. परीक्षा झाल्या झाल्या तुझं लग्न झालं तेव्हा तू मला म्हणाली होतीस, की ‘माहेर सोडताना वाईट वाटतंय पण कैदेतून सुटल्याची भावना जास्त आहे.’ आता मिताशी तू काय वेगळं वागतेयस गं? तेव्हा तू घराबाहेर पडलीस की तुझ्या आईची भीती सुरू व्हायची, आता मिताच्या एसएमएस-चॅटिंगनं तुझी झोप उडवलीय. तुझ्या आईनं जसं कॉलेज पाहिलं नव्हतं तसंच तुलाही कॉम्प्युटरचं विश्व नवीन आहे. मनोजला तू ज्या सहजपणानं नोट्स दिल्या होत्यास त्याच सहजपणानं मिता निमिष-अथर्वशी चॅटिंग करत असू शकते. मिताच्या जागी जाऊन बघ, तुझं तुलाच जाणवेल की मिताला तुझ्या मनातल्या काळजीपेक्षा तुझा साशंकपणाच जास्त पोहोचत असेल. असंच चालू राहिलं तर तुमच्यातलाही संवाद संपेल जान्हवी.’’

 ज्योती तिच्या घरी गेली तरी जान्हवी दोन-तीन दिवस आपल्याच विचारांत होती. मिताचं वागणं खटकलं तरी ती गप्पच होती. मिता प्रोजेक्टसाठी सìफग करत होती. जान्हवी तिच्या जवळ गेली. आता नेहमीचाच संवाद होणार म्हणून मिता ताठरली. युद्धाच्या तयारीत. पण जान्हवीनं  तिच्या खांद्यावर हळुवारपणे हात ठेवला. त्या स्पर्शातली माया मिताला जाणवली. अपेक्षिलेल्या भांडणापेक्षा वेगळं घडल्यामुळे मिताच्या चेहऱ्यावर उमटलेलं प्रश्नचिन्ह राजाला स्पष्ट दिसलं.
जान्हवी मिताकडे बघून प्रेमानं हसली. ‘‘तुझ्याबद्दल संशय नसतो मिता खरं तर, पण माझ्या मनातली भीती झेपत नव्हती मला. ज्योतीनं आपल्या संवादाकडे त्रयस्थपणे पाहायला लावलं आणि मला जाणवलं की मी तुला खूप दुखावलं असणार.’’
मिताचा ताणलेला चेहरा सैलावला. ‘‘म्हणजे आता तुला माझी काळजी वाटत नाही का?’’
‘‘नाही गं. काळजी कशी संपेल? पण आता जाणवतंय की तुझ्यावर पहारा ठेवणं किंवा तुझ्या विश्वाला नावं ठेवणं हा माझ्या काळजीवरचा उपाय नाही. तुमच्या पिढीच्या आवडींना विरोध करून उलट मी लांबच जातेय तुझ्यापासून. आणि मी किती दिवस पहारा ठेवू शकणार आहे तुझ्यावर? त्यापेक्षा समोर आलेल्यातलं चांगलं-वाईट तुला निवडता येतंय ना, हे पाहायला हवं मला. ’’
मितानं आईला घट्ट मिठी मारली. ‘‘मीपण तुझ्याशी खूप भांडते कारण मला वाटतं की मी ना तुला आवडतच नाही. मी मित्रमंडळीत वाहवत जाते.  वाटतं, आपण सांगितलेलं हिला कधी कळणारच नाही. खूप असाहाय्य वाटतं. पण आता मीपण नाही चिडचिड करणार.’’ मिता आईच्या कुशीत शिरली. जान्हवीच्या प्रेमळ डोळ्यांवर फोकस होत दृश्य धूसर झालं.

‘‘राजा, या भांडणाऱ्या मायलेकींच्या स्वभावात अचानक एवढं परिवर्तन कसं झालं? हे समाधान कसं आलं? हा बदल तात्पुरता समजायचा की कायमचा? माझ्या प्रश्नांची उत्तरं तू दिली नाहीस तर तुझ्या डोक्याची ..’’
‘‘वेताळा, बदलाच्या या जादूची सुरुवात झाली ती आईमध्ये जागलेल्या सहसंवेदनेतून. आपल्या मुलीला चुकांपासून वाचवायचंय, जगापासून जपायचंय आणि या नव्या जगात मी कशी पुरी पडणार या भीतीतून तिचं सगळं वागणं घडत होतं. ज्योतीनं लहानपणीची आठवण दिल्यावर आईमधली सहसंवेदना जागी झाली. भीतीची जागा जाणिवेनं घेतली. मितासोबत घडणारी भावनांची देवाणघेवाण आईला स्पष्ट दिसली. आईनं काळजीच्या आवरणाखाली अविश्वास दिला की मिताचा आत्मसन्मान दुखावत होता आणि आईचा विश्वास मिळणारच नाही अशी मिताच्या मनातली भीती रागाच्या आवरणाखाली जागी होत होती.   
‘‘आईच्या सहसंवेदनेमुळे तिची नेहमीची प्रतिक्रिया बदलल्यानंतर त्या राग आणि भीतीची जागा आपलेपणाच्या, सुरक्षितेच्या भावनेनं घेतली. आईच्या विश्वासानं मिताची आत्मसन्मानाची गरज भागली. ताण संपला. ती मोकळी झाली. घरात नव्यानं पसरली ती समाधानाची भावना. विश्वास, सहसंवेदना आणि प्रेम यामध्ये विलक्षण जादू आहे राजा.’’
‘‘म्हणजे मिता कशीही वागली तरी आईनं विश्वास ठेवायचा का राजा? बंधनच घालायचं नाही? मिता लहान आहे. तिचे निर्णय चुकू शकतात.’’
‘‘हो, चुकू शकतात. पण म्हणून निर्णय घेण्याची वेळच आणायची नाही, त्यापासून पळूनच जायचं हा उपाय नाही. चुकांमधून माणूस जास्त चांगलं शिकतो. चूक म्हणजे गुन्हा नव्हे हे समजून घेतलं की पहारा न करता सावध कसं राहायचं तेही समजायला लागतं. वाईटाच्या भीतीनं दरवाजा बंद केला की चांगल्याचाही रस्ता बंद होतो वेताळा. जान्हवीला ते वेळेवर समजलं. या बदलाचं श्रेय तिघींनाही जातं. ज्योतीनं त्रयस्थपणे पण आपलेपणानं जान्हवीला काय घडतंय याचं भान दिलं. ज्योतीच्या बोलण्यावर समर्थनं देऊन आपलंच कसं बरोबर असं जान्हवी पटवत बसली असती तर हे घडलं नसतं. ज्योतीच्या म्हणण्यावर तिनं विचार केला हेही महत्त्वाचंच. आईच्या बदललेल्या देहबोलीला, समंजसपणाला मितानंही प्रतिसाद दिला. आपली चिडचिड मान्य केली, आईमधला स्वत:बद्दलचा विश्वास जागवला. त्यामुळे या घरात आनंद आणि समाधान जागलं. यापुढेही कधी तरी वादावादी, मतभेद होतीलच पण परस्परांच्या हेतूबद्दल शंका असणार नाही, संवादातून प्रश्न सुटतील, नाही का वेताळा?’’
‘‘ हो राजा, तुला गोष्टी सांगताना रात्र कशी गेली ते समजलंच नाही. आता उजाडायला लागलंय. मलाही जायला हवं. कालच्या रात्रीसारखी काळ-वेळ जुळून येईल तेव्हा पुन्हा भेटू. घराघरांतले संभ्रमात पाडणारे प्रश्न अजूनही शिल्लक आहेत.’’ असे म्हणत वेताळ अंतर्धान पावला. उगवत्या सूर्याच्या दिशेने राजा राजधानीकडे चालू लागला.
 (समाप्त)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा