अडीच तासांचं नाटक ९० मिनिटांपर्यंत कमी कसं करायचं? कलाकारांच्या हालचालीतून रंगभूमीवर ताण कसा निर्माण करायचा? अशक्य वाटतील असे वादविवाद स्टेजवर कसे चमकवायचे? प्रत्यक्षात तुम्ही ५० वर्षांच्या असताना वय वर्ष १८ ची भूमिका कशी रंगवायची? हे सगळं शिकवणारं सत्यदेव दुबे यांचं ‘अँटीगनी’ दरम्यानचं काम म्हणजे खरोखरच एक ‘मास्टरक्लास’च होता.
सत्यदेव दुबेंना मी प्रथम भेटले तेव्हा १० वर्षांची होते; त्यांच्याबरोबर पहिलं नाटक केलं तेव्हा माझं वय होतं १८ आणि त्यांच्याबरोबरचं शेवटचं नाटक ‘अँटीगनी’ (Antigone)केलं तेव्हा मी जवळपास पन्नाशी गाठली होती. यादरम्यान दुबेंनी मला स्वत:ला शोधण्याच्या, अभिनेत्री म्हणून पुढे जाण्याच्या असंख्य संधी दिल्या. आम्ही एकत्र १० नाटके केली, त्यातली काही माझ्या आतापर्यंतच्या प्रवासात मैलाचे दगड म्हणावेत अशी आहेत.
‘अँटीगनी’ हे नाटक केलं, तोपर्यंत अशा प्रकारची भूमिका पेलण्यासाठी जी कौशल्यं, भावनेची खोली लागते, ती मी कमावली होती. तालमींमध्ये दिग्दर्शक म्हणून दुबेंचं मला चमच्यानं भरवणं बंद झालं होतं. ‘अँटीगनी’ ही मूळची सोफोक्लीझनी (Sophocles) लिहिलेली ग्रीक शोकांतिका. फ्रेंच नाटककार जाँ आनुई (Jean Anouilh) यांनी केलेलं त्याचं नाट्यरूपांतर प्रसिद्ध आहे. एटिओक्लीझ आणि पॉलिनाइसीझ या दोघा भावांची बहीण अँटीगनी आणि तिचा काका- थीब्जचा राजा क्रेऑन. ही दोन या नाटकातली प्रमुख पात्रं. त्यांच्यातल्या नाट्यपूर्ण, तणावानं भरलेल्या संवादांवर भर देऊन दुबेंनी तुलनेनं अनावश्यक गोष्टी बाजूला केल्या. नेपथ्य नेहमीप्रमाणे साधं. नटांचा वावर त्यांनी असा बसवला होता, की त्या कथेतलं गंभीर वातावरण, टोकाच्या परस्परविरोधी विचारांचा तणाव आणि त्यात शेवटी अँटीगनीची काय गत होणार आहे, हे नाटकाच्या सुरुवातीपासूनच स्पष्ट दिसत होतं.
तालमी सुरू झाल्या तेव्हा मी ४९ वर्षांची होते आणि अँटीगनी आहे १८ वर्षांची! चित्रपटात हे असं काही करणं अशक्य असतं. पण नाटकात नटांना वय लपवणं तुलनेनं सोपं असतं. शिवाय या नाटकात नटांना जगरहाटी, मानवी स्वभावाची जाण असणं अपेक्षित होतं. ते अगदी कमी वयात आपल्याकडे नसतं. तरीही ‘टीनएजर’च्या भूमिकेसाठी ५० वर्षांच्या बाईला निवडण्याचा प्रकार फसण्याची शक्यता होती. असा वेडेपणा दुबेच करू शकतात आणि मीसुद्धा काही खळखळ केली नाही! मात्र माझ्या लक्षात आलं, की १८ वर्षांची मुलगी ‘दिसणं’ हे खरं आव्हान नव्हे. पण ते वय उलटून इतकी वर्षं झाल्यानंतर त्या मुलीची मानसिकता आपल्यात आणणं, तिच्यासारखा विचार करणं, हे अवघड आहे. जाँ आनुई यांच्या नाटकातली अँटीगनी फक्त बंडखोर नाहीये; ती अगदी मूर्तिमंत बंडखोरीच आहे! आंधळ्या, भ्रमिष्ट वडिलांबरोबर वणवण फिरण्याची वेळ तिच्यावर आलीय. दोन्ही लाडक्या भावांनी सिंहासनासाठी एकमेकांचा जीव घेतलाय. त्यातल्या एकावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झालेत, दुसऱ्याच्या नशिबी ते नाहीत. त्याचा देह राजवाड्याच्या दाराबाहेर केविलवाण्या स्थितीत पडलाय.
तिचा काका क्रेऑननं राज्य आपल्या ताब्यात घेतलंय. राजकुमार पॉलिनाइसीझच्या देहावर जो कुणी अंत्यसंस्कार करेल, त्यालाही यमसदनी पाठवलं जाईल, अशी घोषणा क्रेऑननं केलीय. नाटकाच्या पहिल्याच प्रसंगात अँटीगनीनं तो आदेश धुडकावून लावलाय. त्यामुळे तिला शिक्षा होणार आहे. आमच्या नाटकात क्रेऑन आणि अँटीगनीमधल्या वादविवादावर भर दिला होता. राज्यात सुव्यवस्था हवी असेल, तर काही गोष्टी कराव्या लागतात, हा त्याचा मुद्दा तर ‘माझं मन मला जे सांगतंय, ते करण्याचा मला हक्क आहे,’ हे तिचं म्हणणं. व्यक्तीचे हक्क विरुद्ध समाजाच्या अपेक्षा, हा न संपणारा संघर्ष. अँटीगनीला प्रतिवाद करणं फार अवघड जातंय. कारण क्रेऑन सांगतो की, जेव्हा समाजात मोठी उलथापालथ होत असते, तेव्हा विशिष्ट पदांवर असलेल्या व्यक्तींना विशिष्ट निर्णय घ्यावे लागतात. अँटीगनीचं वागणं बालिश आणि अशक्य भाबडेपणाचं आहे, हे त्याचं म्हणणं. त्यांच्यातली ही खडाजंगी नाट्यमय, मार्मिक आहे. भव्यदिव्य नाट्यानुभवाची संधी त्यात आहे. तो संघर्ष मला कळत होता, बुद्धीनं व्यक्त करता येत होता, पण त्यातल्या भावना समोरच्याला खऱ्या कशा वाटतील, हे आव्हान होतं. असं माझ्याबाबतीत नेहमी होतं. नाटकाचा अर्थ मला लावता येतो, पण दोन वाक्यांच्या मधला अर्थ वाचताना व त्या व्यक्तिरेखेतलं, प्रसंगातलं सत्य शोधताना मी अडखळते. यावेळीही मला कळत होतं, की अँटीगनीचं वागणं, तिचे विचार खूप ठळकपणे आणि पटतील अशा पद्धतीनं मला दाखवावे लागतील. पण कसं?…
एके दिवशी माझी एक मैत्रीण आणि तिची १४ वर्षांची मुलगी तालीम बघायला आल्या. या मुलीला मी लहानाची मोठी होताना पाहिलं होतं. ती तिची मतं कशी स्पष्टपणानं मांडते हे पाहिलं होतं. पहिलाच प्रसंग सुरू होता आणि माझी नजर तिच्यावर पडली. अँटीगनीसारखा प्रसंग तिच्यावर गुदरलाय अशी मी कल्पना करू लागले आणि अँटीगनीची सगळी परिस्थिती मला पूर्णत: पटू लागली. आपल्या भावाला-पॉलिनाइसीझला मिळालेल्या वागणुकीने ती का एवढी हादरलीय, तिनं जे काही केलं ते का केलं, हे मला दिसू लागलं. आपण हाती घेतलेली गोष्ट तडीस न्यायचं धैर्य दिसू लागलं. एका क्षणात मी आतून अँटीगनी झाले! अपेक्षांच्या विरोधात जाण्याची आणि मला जे योग्य वाटतंय त्यासाठी उभं ठाकण्याची इच्छा असलेली ती मुलगी मी या नाटकात होऊ शकतेय, हे समोर स्पष्ट दिसलं आणि अँटीगनी माझ्यासाठी एकदम जिवंत झाली.
आता मला क्रेऑनकडे माझा शत्रू म्हणून बघायचं होतं. माझा नवराच (नसीरुद्दीन शाह) क्रेऑनच्या भूमिकेत आहे, ही बाब इथे गैरलागू होती. आता मी आमचं नातं आणि आम्ही करत असलेल्या भूमिकांची गल्लत न करणं शिकले होते. खरं तर माझ्यासमोर नसीर होता हे चांगलंच होतं. मी त्याच्यावर पूर्ण विश्वास टाकू शकत होते. ‘क्रेऑन’चा तिरस्कार करताना ‘नसीर’ कुठे मध्ये येणार नव्हता. एका प्रसंगात अँटीगनीचा हट्ट सहन न होऊन क्रेऑन रागाने तिचा गळा धरतो. असे प्रसंग अवघड असतात. खरी झटापट होताना दाखवायची असते, स्वत:ला आवरू न शकणाऱ्या अभिनेत्यांकडून त्यापूर्वी यांसारख्या प्रसंगांत मला दुखापत झालेली होती. नसीरबरोबर ती भीती नव्हती आणि प्रत्यक्ष इजा न होताही प्रसंग वठणार याची मला खात्री होती. त्यामुळेच या नाटकातला खटल्याचा प्रसंग जिवंत झाला; कारण आम्हाला दोघांनाही आपापली भूमिका पक्की कळली होती, एकमेकांवर वार करणं आणि चुकवणं जमत होतं. दुबेंना रंगमंचावर असे कडवे मतभेद घडवणं फार आवडत असे. पण त्यात नाटकाचा आशय ते हरवू देत नसत. त्या नाटकात प्रत्यक्ष जितकं नाट्य होतं, तशाच नाट्यपूर्ण चर्चा तालमींच्या वेळी झडत.
रंगीत तालमीच्या दिवशी मला तरीही थोडं अस्वस्थ वाटत होतं. मी वेशभूषा केली, दोन वेण्या घातल्या आणि रंगभूषेत काय करता येईल याचा विचार करू लागले. तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझ्या भुवया पूर्वीपेक्षा बऱ्याच विरळ झाल्यात. अर्थात, आता मी ५० वर्षांची होते! मग मी दाट-जवळपास जुळलेल्या भुवयांचा मेकअप केला. त्या भुवयांनी माझं रूपच बदललं. एवढंच नाही, तर मला आतून त्या भूमिकेबद्दल जे काही वाटत होतं तेही बदललं.
त्या दिवशीचा धडा हा, की मेकअप सुंदर दिसण्यासाठी, त्रुटी लपवण्यासाठी किंवा ग्लॅमर आणण्यासाठी नाहीये! मेकअप करून आरशात पाहिलं, की अभिनेत्याला कुणी तरी वेगळं दिसायला हवं! ‘ग्रीन रूम’मधला आरसाच अभिनेत्यांचा खरा मित्र आहे!