चांगल्या शाळा मुलांचं स्वातंत्र्य, स्वाभिमान, व्यक्तिमत्त्व, प्रतिष्ठा जपतात, त्यांना स्वावलंबी बनवतात, आत्मसन्मान नाहीसा करत नाहीत, त्यांच्यावर संपूर्ण विश्वास टाकतात, मुलांचं पाहुण्यांबरोबर प्रदर्शन मांडत नाहीत. मुलांना शाळेत जायला मजा यायला हवी..
नऊ-दहा वर्षे झाली त्या अनुभवाला. केरळमधल्या वायनाड भागात आम्ही ‘कनवू’ नावाची शाळा पाहायला गेलो होतो. श्रीयुत बेबी नावाचे गृहस्थ ती शाळा चालवत होते. शाळेत पन्नासेक आदिवासी मुलं शिकत होती. शाळेत वर्ग, बाक, फळा असं काहीच नव्हतं. शाळेत एक व्यायामशाळा, एक स्वयंपाकघर, एक मोठं ग्रंथालय, राहायला मोठा हॉल आणि आजूबाजूला शेती होती. मुलं सकाळी उठून आळीपाळीनं साफसफाई, स्वयंपाक, शेती करत. कळरी नावाचा केरळी व्यायाम करत. जेवणं झाली की ग्रंथालयात जात. मोठी मुलं लहानांना लिहा-वाचायला शिकवत. पाच वाजले की, सर पेटी वाजवायला लागत. मुलं त्यांच्याभोवती बसून गाणी म्हणत. अनेक भाषांमधली गाणी. आम्हाला त्यांनी ‘नाच रे मोरा’ म्हणून दाखवलं. मग ती सगळी नाच करत. नाच त्यांच्या अंगातच होता.
मुलं हा व्यायाम, गाणी, नाच यांचा सराव उगाचच करत नसत. वर्षांतून एक महिनाभर वेगवेगळय़ा ठिकाणी जाऊन ते आपली कला सादर करत आणि एक-दोन लाख रुपये मिळवत. त्या आधारावर वर्षभर शाळा चालायची. या शाळेतून मुलं स्वावलंबी होत. पुढे काही जण वेगवेगळय़ा महाविद्यालयांत गेली. तिथे ती कष्ट करून शिकली, कारण जवळ पसे नव्हतेच. काही परदेशात जाऊनही शिकली. युरोपात तर त्यांनी तिथल्या प्रथेप्रमाणे रस्त्यावर अंगातली कला सादर करून शिक्षणासाठी पसे मिळवले. काही वर्षांपूर्वी बेबी सरांच्या आई आजारी होत्या. त्यांची सेवा करण्यासाठी बेबी निवृत्त झाले आणि शाळा मोठय़ा मुलांच्या हाती सोपवली.
आणखी एक वेगळी शाळा, अल्मोडाच्या पुढे कौसानी गाव आहे तिथे वसलीय. गांधीजींच्या प्रेरणेनं तिथे सत्तर-पंचाहत्तर वर्षांपूर्वी लक्ष्मी आश्रमाची स्थापना मीराबहन यांनी केली. त्या मुळातल्या जर्मन. या आश्रमात वेगवेगळय़ा वयांच्या मुली राहतात. पुस्तकी शिक्षणापेक्षा जीवनाचं कौशल्य शिकण्यावर इथे भर आहे. मुली पाचला उठतात, लाकडं गोळा करतात, पाणी भरतात, गाई-म्हशीचं करतात, भाज्यांची शेती करतात, झाडांवरून नासपती तोडतात, चरख्यावर सूत काढतात, कापड विणतात, शिवण शिवतात, स्वयंपाक करतात, दोनला शाळा भरते. समाज, पर्यावरण याबद्दल शिक्षण घेतात. संध्याकाळी पाचला संध्याकाळच्या जेवणाची तयारी सुरू होते. चिपको आंदोलनातल्या कार्यकर्त्यां इथेच घडल्या.
अंतोन मकारेन्को रशियाचे शिक्षणतज्ज्ञ. एकोणिसशे सतराच्या रशियन क्रांतीत खूप लोक मारले गेले. हजारो मुलं बेघर झाली, ती बिघडू लागली, चोऱ्या करू लागली. सरकारच्या आग्रहानं मकारेन्कोंनी सुधारगृह काढलं. एक चौदा वर्षांचा मुलगा चोऱ्या करून अनेकदा तुरुंगात गेला होता. सगळे त्याला चोर, लफंगा म्हणत, पण मकारेन्कोंनी त्याच्यावर विश्वास टाकला. त्याला पिशवी, दोनशे रुपये आणि सामानाची यादी दिली. योग्य वातावरणात मुलं बदलतात, असा त्यांना विश्वास होता. तसंच घडलं.
अमेरिकेत साठ वर्षांपूर्वी ज्यूलिया वेबर गॉर्डनची शाळा होती. एकच खोली, पसे नाहीत, पहिली ते आठवी एकच शिक्षिका. मुलांनी वाया गेलेल्या वस्तूंमधून विज्ञानाची साधनं केली. सुताराच्या मदतीनं बाहुलीघर केलं. जिल्हा वाचनालयातून सातशे पुस्तकं आणून वाचली. पसे कमी पडत नाहीत, दृष्टी कमी पडते. बाहेरच्या मोठय़ा समाजाचं शाळा हे एक अंग असलं तर मुलं शिकतात. समाजापर्यंत शाळा पोचली आणि शाळेने परिणाम केला तर ते खरं शिक्षण.
चांगल्या शिक्षकाला अनेक कौशल्यं ज्ञात हवीत. ज्यूलिया पेटी वाजवत असे, लोकनेतृत्व करत असे, गाणी म्हणत असे, कठपुतळय़ा बनवणे, अंकांचे खेळ करणे, कागदाची भिरभिरी तिला येई. ती चित्रं काढायची, गोष्टी सांगायची, झाडं, पक्षी, दगड ओळखायची, स्वयंपाक करायची, कापड विणायची, मातीची खेळणी करायची, मुलांबरोबर काम करणं – चुकणं आणि शिकणं रोजचंच होतं. मुलांना जंगलात, तळय़ाकाठी आवडायचं तिथेच वर्ग भरत असे.
डेन्मार्कला कोपनहेगन शहरात छोटी शाळा आहे. तिथे पंचाऐंशी मुलं शिकतात. ती शाळेला येतात, कारण त्यांना शाळेत खूप मजा येते. शाळा गरीब आहे. काही चांगली पुस्तकं, कोडी, खेळणी, पियानो, गिटार, माशांचा टँक, सुतारकामाचं साहित्य एवढंच शाळेतलं सामान. तिथे अभ्यासक्रम नाही. शिकवलं जात नाही. दिवसभर मूल मासे बघत बसलं तरी चालतं.
इथल्या शिक्षकांना अनेक कौशल्यं येतात. ते पेशानं शिक्षक नाहीत. कोणी नर्स, तर कोणी मेकॅनिक आहेत. शाळेला एकदा दोनशे लाकडी क्रेट्स मिळाले. मुलं रोज वेगवेगळय़ा रचना करून त्यातून वर्ग बनवतात. शाळेत काहीच तयार, पूर्ण असं नसावं. अगदी इमारतसुद्धा पूर्ण नसावी असं इथलं तत्त्व आहे. मुलं रोज नव्या रचना करतात.
दिल्लीला योगी अरिवदांच्या शिक्षणविचारांनी चालणारी मिराम्बिका स्कूल आहे. त्यांचं सांगणं असं होतं की, कोणीही दुसऱ्याला शिकवू शकत नाही. स्वत: शिकता येतं. शाळेत पक्षी असा विषय अभ्यासाला असला तर मुलं ग्रंथालयातून पक्ष्यांवरची पुस्तकं आणून बघतात, पक्षी अभयारण्यात जातात; भाषा, गणित, विज्ञान, भूगोल, कला अशा अनेक अंगांनी पक्ष्यांचा अभ्यास करतात. स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांचा मार्ग पृथ्वीगोलावर दाखवतात, नकाशांमधली पक्षी अभयारण्यं शोधतात, कागदाच्या चिमण्या करतात, पक्ष्यांवर कविता करतात, निबंध लिहितात आणि खूप आनंदाने माहिती मिळवतात.
न्यूझीलंडमध्ये सिल्विया अ‍ॅष्टन वॉर्नर नावाच्या शिक्षिकेनं मावरी आदिवासी जमातीसाठी शाळा सुरू केली. मुलांचे स्वत:चे शब्द समजून घेऊन त्यातून वाचायला- लिहायला शिकवलं. तिचं ‘टीचर’ नावाचं पुस्तक मराठीत अनुवादित झालं आहे. ती म्हणत असे, ‘‘मुलाच्या आत ज्वालामुखी असतो. प्रेमानं त्याला स्पर्श केलात तर मुलाची सर्जनशीलता बाहेर येईल.’’ तिनं मुलांच्या अनुभवांना अभ्यासक्रमाचं एक अंग म्हणून जोडून घेतलं. ती म्हणत असे, ‘‘शाळेतलं सर्व साहित्य दर पाच वर्षांनी नष्ट केलं पाहिजे, त्याशिवाय शिक्षकांना नवीन काय करावं ते सुचणार नाही.’’
सुमारे सत्तर वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये समरहिल नावाची शाळा सुरू झाली. ए.एस. नील यांनी ती सुरू केली. मुलांवर कोणतीही बंधनं नाहीत. मुलं हवं तर वर्गात जातात नाही तर मजा करत िहडतात- खेळणी तयार करतात, फुलपाखरं पकडायला जातात, वर्कशॉपमध्ये ठाकठोक करतात. उद्योगी, उपद्व्यापी मुलं खूप येत. एकदा एक मुलगा रागावलेला होता. त्याने काचा फोडल्या. अकरा काचा फोडल्यावर थांबला. नीलच्या चेहऱ्याकडे पाहू लागला. नील यांनी एक दगड उचलला काच फोडली आणि त्याचं हृदय जिंकलं. नील म्हणत असत, चांगले शिक्षक असाल तर मुलांना उपदेश करू नका. मुलांची बाजू घ्या. त्यांच्यावर प्रेम करा.
अशा अनेक शाळांबद्दल, शिक्षणतज्ज्ञांच्या विचारांबद्दल का वाचायचं? तर आपण ज्याला शिक्षण म्हणतो आहोत ते खरोखर किती परिणामकारक, उपयोगी आहे ते समजावं म्हणून. शिक्षणाची प्रक्रिया सतत बदलत असते, त्यामुळे जगभर शिक्षणाच्या क्षेत्रात काय चाललंय ते समजून घ्यायला हवं. पन्नास-साठ वर्षांपूर्वीपासून शिक्षणतज्ज्ञ सांगतायत, ‘स्कूल इज डेड’.
पाउली फ्रिअरे यांनी ‘डेंजर स्कूल’ लिहून शिक्षण कसं धोकादायक आहे ते सांगितलं. जॉन होल्ट यांनी पालकांनी १०-१५ मुलांच्या शाळा स्वत चालवाव्यात, असा आग्रह धरला. रवींद्रनाथांनी शिक्षणातलं कलांचं महत्त्व, निसर्गाचा सहवास अत्यावश्यक मानला. जपानमधल्या ‘तोमोई’ स्कूलबद्दलचं ‘तोतोचान’ हे पुस्तक अमर आहे.
हे सगळं का वाचायचं, तर सध्याच्या शाळांचा पोकळपणा लक्षात यावा म्हणून. खरं तर परीक्षा नसाव्यातच आणि घेतल्या तर किमान त्यात सचोटी तरी दिसावी. जणू काही मुलांविरुद्ध ते युद्धच असतं. ज्या मुलांना अभ्यासात गती नसते ते मूल जन्मत: काही विशेष गुण घेऊन जन्माला आलेलं असतं. ते ओळखण्याची संधी प्रत्येक शिक्षकानं, आई-बाबांनी घ्यायला हवी. शाळेसाठी मुलं अयोग्य नसतात, तर शाळा मुलांसाठी अयोग्य ठरत आहेत. मुलं आहेत म्हणून शिक्षक आहेत. शिक्षक आहेत म्हणून शाळेचं व्यवस्थापन आहे. अशा वेळी सर्वात कमी किंमत मुलांना, हे बंद व्हायला हवं. आपलं प्रत्येक मूल मौल्यवान आहे, अमोल आहे. त्याचा आत्मविश्वास वाढवणं शाळेचं काम आहे. याला अभ्यास जमत नाही, पण इतर दहा गोष्टी जमतात, त्यांच्या जोरावर ते मूल स्वत:च्या पायावर उभं राहील हा विश्वास शाळेनं, शिक्षकांनी दाखवायला हवा.
चांगल्या शाळा मुलांचं स्वातंत्र्य, स्वाभिमान, व्यक्तिमत्त्व, प्रतिष्ठा जपतात, त्यांना स्वावलंबी बनवतात, आत्मसन्मान नाहीसा करत नाहीत, त्यांच्यावर संपूर्ण विश्वास टाकतात, मुलांचं पाहुण्यांबरोबर प्रदर्शन मांडत नाहीत. मोठाल्या इमारती बांधत सुटत नाहीत. चांगल्या शाळांना साधी शैक्षणिक साधनं पुरतात. मुलांना शाळेत जायला मजा यायला हवी. शाळेत त्यांना सुरक्षित वाटायला हवं. अशा ठिकाणीच खऱ्या अर्थानं शिक्षण होतं, नाही तर हजारो मुलं, शेकडो वर्ग, शिक्षकांची अपुरी तयारी यांचा गाडा हाकता हाकता फक्त खरं शिक्षण होत नाही एवढी एकच अडचण होते.
कुसुमाग्रजांच्या कवितेप्रमाणे देव देव्हाऱ्यात नसला तरी देव्हाऱ्याचंच महत्त्व अंतिम ठरतं. त्याप्रमाणे पसे वाढत राहतात, इमारती होत राहतात, मुलांना शिक्षण तेवढं मिळत नाही आणि वंचित मुलांना शिक्षणाचा हक्कदेखील मिळत नाही! शाळा समजा बदलल्या नाहीत तरी निदान पालक म्हणून आपण बदलू शकतो की नाही?
शोभा भागवत – shobhabhagwat@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा