या शाळेतही आता वेगळा विचार करून पालक बैठका होतात. प्रत्येकजण उपस्थित असतो. ठरावीक वेळेत सगळ्यांचे टी.व्ही. बंद असतील, असं पालकांनी एकमुखानं सांगितलं. खाऊला पैसे देणं बंद हीही गोष्ट ठरवली. प्रत्येक वर्गाची एक पालक बैठक आणि सगळ्यांची मिळून एक पालक बैठक जमू लागली. समस्यांवर तोडगा निघू लागला..
शाळा आपल्या मनाशीच बोलत होती. पूर्वीसारखी ती आता उदास दिसत नसे, एकाकी पडत नव्हती. कारण आता तिच्यात प्राण येऊ लागले होते. हे सारं मुलांमुळे घडत होतं. एकदा का या मुलांनी काही करायचं ठरवलं की मग काय विचारता! नुसता प्रचंड उत्साह, प्रचंड ऊर्जा. ही ऊर्जा योग्य त्या कारणासाठी नि योग्य त्या ठिकाणी वापरली जाण्यासाठी संधी फक्त आपण उपलब्ध करून द्यायची. मग ते घर असेना का! अगदी मनापासून मुलं वर्गाबाहेर रांगोळी काढायची, ‘कुतूहल घरात’ शिरून मनातले प्रश्न तिथल्या वहीत नोंदवायची, आपले अनुभव व्यक्त करायची. यातून अनेक वाईट घटना सुरुवातीला मांडल्या जायच्या, पण मग कुणीतरी सुचवलं की अवतीभवती चांगलंही घडत असतं तेही मांडलं जावं.. खरंच विचार केला तर कितीतरी गोष्टी आहेत. शिवाय जसं प्रत्येक मूल वेगळं तसं अशा मुलांनी बनलेली प्रत्येक शाळा वेगळी असलीच पाहिजे.
   शाळा एकदा शिक्षक कक्षात जाऊन म्हणाली, ‘‘असं काहीतरी करायला मुलांना सांगितलं पाहिजे.. म्हणजे त्यांना तो अभ्यास वाटणार नाही, पण तो अभ्यास असेल. मुलांना येणाऱ्या कंटाळ्याला पर्याय असेल. शिवाय सतत काही तरी करायला नाही सांगायचं. मध्ये मध्ये ब्रेकपण पाहिजे.. जे केलं जातंय त्याचे परिणाम जाणण्याची जाणीव निर्माण झाली पाहिजे. यावर मुलांचं मत अजमावलं पाहिजे..’’
 शिक्षक म्हणाले, ‘‘सारखं मुलांचं मत घेत बसलं तर विचारायला नको. मुलं डोक्यावर बसतील. शिवाय पालकपण वैतागतील..’’
शाळा म्हणाली, ‘‘माझ्या ठिकाणी घडणाऱ्या अनेक गोष्टी अशा आहेत ज्यांचा अर्थ कुणालाच कळलेला नसतो. शाळेचा जो अर्थ पालक घेतात तो त्यांचा त्यांनी लावलेला असतो. त्यांच्याशी बोललं पाहिजे या विषयावर..’’
‘‘पालक कुठले यायला! त्यांना वेळ नसतो म्हणे!.. तू बघतेस किती पालक उपस्थित असतात ते! तुला माहितेय तुझ्यासारख्या तुझ्या श्रीमंत बहिणींकडे पालक गर्दी करतात. तू मध्यमवर्गीय पडलीस.’’
 ‘‘हे सारं आपण घडवत आणलंय आणि तसाही जमाना आता प्रेझेंटेशन वगैरेचा आहे.. तुम्ही सांगा जाहिरातीलाच लोक भुलतात. खोटी फुलं किती खरी वाटतात. ती टिकण्याचा प्रश्नच नसतो. कारण त्यात प्राण नसतो.. काहीही घडेल. अगदी काहीही..’’
आज शाळा आणि शिक्षक यांच्यातही चर्चा चांगलीच रंगली होती. शिक्षकांना रिकामपण होतं थोडं! काहीतरी बडबडत बसण्यापेक्षा काहीतरी विषय देऊ या. या विचारानेच शाळेने या मुद्दय़ाला हात घातला होता. ‘‘काही मिळतं तिथं जग जमतं हे मान्य आहे ना तुम्हाला!’’ शाळेच्या या बोलण्यानं शिक्षक अंतर्मुख झाले, आधी तसे सगळे उडवूनच लावत होते. पण शाळेने ठरवलं होतं, आज तसं सोडायचं नाही. पूर्वी गर्दी होत होती. आज गर्दी दुसरीकडे गेली. पुन्हा इकडे येईल..’’
 ‘‘म्हणजे करायचं काय?’’
 ‘‘सगळं कुणीतरी सांगायचं आणि आपण करायचं अशी सवय झालीय तुम्हाला. तीच मुलांनाही..’’ शाळा जरा रागानेच बोलली. पण त्यात तळमळ होती.
 संध्याकाळी शाळेला तिच्या गावाकडच्या मैत्रिणीचा फोन आला. ‘‘बरेच दिवस तुझ्याशी बोलायचं ठरवतेय. वेळच होईना. कशी आहेस?.. ऐक ना! आज एक सुंदर अनुभव सांगण्यासाठी मी तुला फोन केला.. अनुभव आहे पालकांचा!..’’
 ‘‘काय योग आहे? त्यावरच मी आमच्या शिक्षकांशी बोलत होते. माणसामाणसात नातं जोडलं जायला हवं.. बरं! तू सांग आधी काय ते आणि वर्षभर तुला माझी आठवण झाली नाही का गं?..’’
‘‘आता ऐकणारेस का?.. हे बघ. अगं, पालकांनी शाळेपर्यंत यावं म्हणून खूप प्रयत्न केले. पालकांना इतर गोष्टी करायला वेळ आहे नि माझ्या विकासासाठी वेळ नाही.. आमच्या शिक्षकांनी एक आराखडा तयार केला. शाळेत किती वाडय़ांतून, किती गावांतून मुलं येतात त्याचा नकाशा तयार केला. प्रत्येक शिक्षकानं एकेक गाव वाटून घेतलं आणि हा शिक्षक त्या त्या गावातील प्रत्येक मुलाच्या घरी गेला. निमित्त नसताना, कधी निमित्ताने. शाळा, अभ्यास सोडून घरोब्याच्या गप्पा मारू लागला. गावाचं नि त्याचं एक नातं जुळलं. अनेक समस्यांवर तोडगा निघू लागला.. आणि मग वर्षांतून एकदा जर शाळेत जायचं तर जाऊ या. या विचारानं पालक शाळेत आले. तुला सांगू? पालक शाळेत आले नाहीत तर मी पालकांच्या घरी गेले. त्या शिक्षकाच्या रूपानं!.. मला वाटतं मुलं शाळेत आली नाहीत तर शाळा मुलांपर्यंत गेली पाहिजे हेच खरं..’’
‘‘अगदी माझ्या मनातला विषयच मांडते आहेस बघ. कदाचित गावागावांत हे शक्य आहे. पण शहरात?..’’
‘‘अगं, प्रत्येक जण जर स्वतंत्र, वेगळं असेल तर असं जसंच्या तसं कॉपी नाही करता यायची!.. पण ही गरज आहे. कुठलंसं काहीसं ऐकून पालक उगाचंच कधी कधी अपुऱ्या माहितीनं आपल्यावर टीकास्त्र सोडतात. त्यांच्या शंका दूर झाल्या पाहिजेत. खरं तर दर महिन्याला पालकांनी जमायला हवं..’’
‘‘तुझ्याकडे येतात पालक असे?’’
‘‘हो. येतात. आणि आश्चर्य वाटेल असे निर्णयही घेतात.. हे अचानक नाही घडत. प्रत्येक मुलाचा मूल म्हणून वेगळा अहवाल हवा आपल्याकडे! लेखाजोखा. पालकांनी तरी आपल्या मुलांना कुठे ओळखलेलं असतं पूर्णत:! किती ओझं पेलेल मूल? याची त्यांना तरी कुठे जाणीव असते!.. ही जाणीव आम्ही करून दिली. खूप वेगळी नोंदवही तयार केली आम्ही! प्रगतिपुस्तक म्हण हवं तर!..’’
 ‘‘वेगळं म्हणजे?’’
 ‘‘वेगळंच असतं. श्रेण्या येतात त्यात. नोंदी येतात. शक्तिस्थानांच्या नि कमकुवतपणाच्या. आम्ही काय केलं, मूल शाळेत येताना त्याचा अभ्यास करून नोंदी केल्या. मूल जेवढे वर्ष शाळेत तेवढी वर्षे नोंदी येत गेल्या. एखादी उणीव असतेच. उणीव असणं हा गुन्हा नाही ना! उणीव दूर करण्यासाठी संधी निर्माण केली. नोंद बदलली. मार्कासारख्या औपचारिक गोष्टीबरोबर या माणूस म्हणून वेगळ्या नोंदी आल्या.’’
 ‘‘आज तू बोलते आहेस. मला खूप बरं वाटतंय. आपल्या आपल्यात, पण अशी देवाणघेवाण झाली पाहिजे.’’
 या शाळेनं त्या शाळेच्या प्रत्यक्ष घरी जाऊन पाहिलं. आणि त्या साऱ्या गोष्टी तिनं शिक्षकांसमोर मांडल्या. अगदी शांतपणे! तेव्हापासून या शाळेतही आता वेगळा विचार करून पालक बैठका होतात. प्रत्येकजण उपस्थित असतो. ठरावीक वेळेत सगळ्यांचे टी.व्ही. बंद असतील, असं पालकांनी एकमुखानं सांगितलं. खाऊला पैसे देणं बंद हीही गोष्ट ठरवली. प्रत्येक वर्गाची एक पालक बैठक आणि सगळ्यांची मिळून एक पालक बैठक जमू लागली. समस्यांवर तोडगा निघू लागला नि घराघरासंदर्भात काही गोष्टी ठरवल्या गेल्या. इतरांना हे सारं पाहून नवल वाटू लागलं. अशक्यच मानल्या गेलेल्या गोष्टी सहज शक्य होतात यावर विश्वास बसू लागला. तक्रार-आरडाओरडा-अधिकार याऐवजी समजूतदार संवाद घडून येऊ लागला. आपल्या मुलातील उणिवा पालक स्वीकारू लागले. कारण प्रत्येक घर शाळेला आता माहीत झालं होतं नि ‘आलं मास्तर दारोदार फिरायला’ असं म्हणून बंद होणारे दरवाजे आदराने उघडले जाऊ लागले.
त्यामुळे उस्कटलेली वीण आता छान गुंफली गेलीय. विनाकारण निर्माण झालेला ताण सैल झालाय. ‘हे मूल आपल्या सर्वाचं आहे’ या भावनेनं काम सुरू झालंय. म्हणूनच मुलं कोंबलेल्या नि मुलांची नावंही माहीत नसलेल्या इतर शाळांना आता स्वत:बद्दल आशा वाटू लागलीय, ‘कधी तरी मी मुलांच्या घरात जाईन नि मुलांचं घर इथे येईल.’
ही शाळा मात्र आता रात्रीही एकटी नसते. कारण मुलं आता शाळेतच येऊन आपलं काम करतात. मग तो कधी अभ्यास असतो, कधी प्रकल्प, कधी वाचन, कधी लेखन, कधी मस्त गप्पा. तसं थोडा वेळ आता एकटं राहणं शाळेला जड वाटत नाही. एवढय़ा मोठय़ा आपल्या वास्तूचा चांगला उपयोग होतोय या आनंदात तिला रात्री छान स्वप्न पडतात.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा