मुलांची झोप पुरेशी व्हावी म्हणून राज्यपाल रमेश बैस यांनी काही दिवसांपूर्वी शाळांच्या वेळा बदलण्याचा विचार व्हावा, अशी सूचना केली होती. शाळांच्या सकाळच्या व दुपारच्या अशा दोन्ही सत्रांचे आपापले फायदे-तोटे आहेत. मात्र मुलांची झोप पूर्ण होऊन त्यांनी मरगळलेपणानं, उपाशी पोटानं नव्हे, तर ताजंतवानं राहून शाळेत यावं, शिवाय संध्याकाळी त्यांना खेळायला आणि अभ्यासाला पुरेसा वेळ मिळावा, यासाठी सुवर्णमध्य शोधावा लागणार आहे; मुख्य म्हणजे पालकांच्या आचारविचारांत बदल करावा लागणार आहे.
‘‘मी पक्की निशाचर आहे! सकाळी लवकर उठायचं म्हटलं की जिवावर येतं, कारण शाळा कायम दुपारची होती, त्यामुळे सकाळी लवकर उठायची सवयच नाही. रात्री कितीही वाजेपर्यंत जागून काम करू शकते..’’ एक मॅडम सांगत होत्या, थोड्याशा खेदानं.
हेही वाचा – कौटुंबिक जखमेवरची मलमपट्टी
‘‘अगं, डॉक्टर झोपू नको म्हणालेत दुपारी. हल्ली तब्येत बिघडायला लागलीय; पण दुपारी झोप आवरतच नाही काही केल्या. लहानपणापासूनची सवय आहे ना.. आमची शाळा कायम सकाळचीच असायची.’’ माझी एक मैत्रीण अगतिकपणे सांगत होती. दोन्ही विधानं हल्लीच ऐकली मी. त्यानंतर लगेचच शाळा सकाळी असाव्यात की नसाव्यात यावर चर्चा सुरू झाली आणि दोन्ही विधानं मला ठळकपणे आठवली. विचार सुरू झाला, कोणती वेळ सोयीची? इतरांचं मतही विचारलं. त्यानंतर तौलनिक हिशेबही चालू झाला, की सकाळी शाळा असेल तर कसं असेल आणि दुपारी असेल तर कसं? वगैरे.
मी स्वत: विद्यार्थिदशेत असताना दुबार शाळा, सकाळ सत्रातली शाळा आणि दुपार सत्रातली शाळा अशा तिन्ही प्रकारच्या अनुभवातून गेलेय.(अनेक शाळांमध्ये जावं लागल्याचा एक फायदा!) दुबार शाळा म्हणजे सकाळी ७.३० ते १०.३० आणि दुपारी २.३० ते ५.३० अशी शाळा असायची. दुपारी निवांतपणे घरी जेवता यायचं हा फायदा असायचा या शाळेचा; पण चारदा शाळेत जाणं-येणं होत असल्यानं लांबच्या विद्यार्थ्यांची ‘शिंगरू मेलं हेलपाट्यानं’ अशी गत व्हायची. नंतर शाळा बदलली आणि शाळेची वेळही. शाळा दुपार सत्रातली- म्हणजे १०.३० ते ५.३० वाली. एकंदर चांगलं चाललं होतं या शाळेत. शिष्यवृत्ती वगैरेचे जादाचे तास शाळेच्या वेळेच्या आधी होत असत. शाळेत शेवटचे तास कला, क्रीडा वगैरेंचे असत आणि शाळा सुटल्यावरही खेळायची चैन होतीच. त्यानंतरची शाळा होती सकाळ सत्रातली. ७.१५ ते १२.१५ वाली. ही शाळा म्हणजे लवकर उठण्याची सवय लावणारी, सकाळी ताजंतवानं असताना अभ्यास करून घेणारी; पण जे शाळेपासून लांब राहायचे, त्यांचं अवघड होतं. त्यांना खेळायला शाळेच्या मैदानाचा उपयोग शक्यच नसायचा.
हे झालं शालेय आयुष्यात अनुभवलेल्या शाळांच्या वेळांबाबत. पुढे ‘बी.एड्.’ झाल्यावरही अनेक शाळांचा अनुभव पदरात पडला. शाळेच्या वेगवेगळ्या वेळांचा एक शिक्षिका म्हणून माझ्यावर, माझ्या सहकारी शिक्षकांवर, विद्यार्थ्यांवर आणि संपूर्ण कुटुंबावर नेमका काय परिणाम होतो, याचं निरीक्षण करण्याची संधी मिळाली. शिक्षक म्हणून मला पहिली शाळा मिळाली होती एकदम सकाळी भरणारी! तिथे गेल्यावर खरी अडचण जाणवायची ती उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांची. काही ना काही कारणानं ‘एस.टी.’ बसला उशीर व्हायचा, काही वेळा घरून निघायलाच उशीर व्हायचा, कधी उठायला उशीर व्हायचा, त्यामुळे विद्यार्थी उशिरानं शाळेत यायचे. त्यांना पूर्ण वर्गाबरोबर आणायचं, हे शिक्षिका म्हणून माझ्यासमोर आव्हान असायचं. उशिरानं वर्गात येऊन वर्गाशी एकरूप व्हायचं हे त्या विद्यार्थ्यांसमोरचं आव्हान असायचं. त्याचबरोबर घरातून बाहेर पडताना अनेक विद्यार्थ्यांना उपाशीपोटी बाहेर पडावं लागणं, घाई झाल्यानं खायला वेळच न मिळणं, त्यामुळे वर्गात लक्ष न लागणं, मुलांना चक्कर येणं, वगैरेही साधारणत: घडायचं. काहींच्या डब्यात तर वडापावसदृश निकृष्ट पदार्थही असत. तेव्हा पोषण आहार सुरू झाला नव्हता. त्यामुळे मुलांची अशा प्रसंगी भुकेनं वाईट अवस्था व्हायची. काही जागरूक पालक त्यांच्या मुलांना मधल्या सुट्टीच्या आधी डबा आणून देत असत, त्यामुळे त्या मुलांची नाश्त्याची सोय होत असे आणि पुढील तासिकांच्या अभ्यासाकडे नीट लक्ष देणं त्यांना शक्य होत असे. असं करता येणं शक्य आहे हा पर्याय त्यामुळे अनेकांना कळला.
त्यानंतर काही शाळांमध्ये काम केलं, त्यांची वेळ ११ ते ५ आणि ११.४० ते ५.३० अशी होती. ही मुलं सकाळी सगळं निवांत आवरून, व्यवस्थित नाश्ता वगैरे करून, दुपारचा डबा घेऊन येत किंवा जेवायला घरी जात. सकाळी मिळालेल्या वेळेत ती गृहपाठ पूर्ण करून आणत, त्यामुळे सकाळच्या शाळेतल्या मुलांप्रमाणे गृहपाठ केला नाही. आता शिक्षा होईल का? हा ताण नसायचा. शाळा दुपारची असेल, तर घरी फार वेळ मिळत नाही हे खरं असलं तरीही अभ्यास, कला, क्रीडा वगैरेंची तयारी जर का शाळेतच होत असेल, तर घरी फार रिकामा वेळ असण्याची गरज नाही. नंतर मी ज्या शाळेत शिकवत होते, ती शाळा सकाळी ७ वाजता भरत असे. त्यावेळी बसमधून येणारी मुलं अक्षरश: पेंगुळलेली आणि वैतागलेली मी स्वत: पाहिली आहेत. मुलांनी घराजवळच्या १ ते ३ किमी परिघातल्या शाळेत प्रवेश घ्यावा, ज्यामुळे ती शाळेत चालत जाऊ शकतील आणि शाळेत चालत जाणं हाही एक जीवनानुभव आहे, वगैरे जरी पुस्तकांमध्ये लिहिलं जात असलं, तरी ‘चांगल्या’ शाळेसाठी मुलांना सकाळी उठवून दूरवर पाठवणं वर्तमानकाळातील अपरिहार्यता ठरली आहे. या माझ्या नोकरीच्या काळात या अपरिहार्यतेमुळे सकाळी सकाळी मरगळलेल्या अवस्थेत शाळेत येणारी, मधल्या सुट्टीत शाळेच्या उपाहारगृहात खाणारी आणि दुपारी ३ वाजता तशाच मरगळलेल्या चेहऱ्यानं घरी जाणारी मुलं मी जवळून पाहिली आहेत. बरं, ही शाळा कायम विनाअनुदानित आणि ‘सीबीएससी’ बोर्डाची, इंग्रजी माध्यमाची होती. त्यामुळे तिथे पोषण आहाराची वगैरे सोय नाहीच. शाळेच्या उपाहारगृहात खाणं किंवा आईनंच दोन किंवा तीन डबे करून देणं हाच पर्याय. यात पहिला पर्याय रोज उपयोगी नाहीच आणि दुसरा पर्याय विचारात घेतला, तर त्या माऊलीच्या कष्टांची कल्पनाच केलेली बरी! यासाठी खरं तर घरातल्या प्रत्येकाचा एकत्रित सहभाग असणं आवश्यक आहे, पण विचारात कोण घेतो?
माझी पहिली नोकरी आणि ही नोकरी यात साधारण दीड तपाहून जास्त काळ गेला होता. त्यामुळे अनेक मुलं अपरिहार्यपणे मोबाइल वापरत होती. त्याचं वाढतं अवलंबन त्रस्त करीत असे. तसंच कमावत्या दुहेरी पालकांचं प्रमाण वाढलं होतं. मुलं आणि आई-बाबा एकमेकांना रात्री उशिरा भेटत असत. त्यामुळे मुलांना झोपायला उशीर होत असे आणि ती शाळेत पेंगुळलेली असत.
वाढत्या शहरीकरणामुळे, जीवनशैलीमुळे होणारे हे बदल कितीही बदलू म्हटलं तरी बदलणारे नाहीत हे वास्तव आहे. आपल्या पाल्यानं चांगल्या शाळेत जावं म्हणून आईनं मुलांबरोबर काही वर्षांसाठी घर सोडून शहरात येऊन राहणं, यासारखे प्रयोगही काही कुटुंबांत घडत आहेत. सकाळ सत्रातील शाळांमध्ये मलमूत्र वगैरेंचा आवेग दाबून धरल्यामुळे मुलांना शारीरिक त्रास होतात हे सातत्याने सांगितलं जातंच, पण बरोबरीनं हा प्रेमाचा आवेग दाबून धरल्यानं होणाऱ्या कुटुंबाच्या त्रासाचं काय?
हेही वाचा – स्त्री हिंसाचारमुक्त कधी होईल?
मुख्याध्यापक म्हणूनही मला मोठी कसरत करावी लागत होती, ती शारीरिक शिक्षणाच्या तासिका आणि नृत्य, नाट्य वगैरे स्पर्धाची तयारी करताना. शाळेसमोर विस्तीर्ण मैदान होतं. तिथे अनेक खेळ खेळण्याची आणि अॅथलेटिक्सची सोय होती; पण सकाळी मुलांना त्यासाठी पाठवलं, तर पुढील तासिकांना त्यांचं लक्ष लागत नसे. नंतरच्या तासिकांना पाठवावं म्हटलं, तर उन्हाचा कडाका आणि एकदा का क्लाससाठी मुलं शाळेबाहेर पडली की त्यांना खेळासाठी परत शाळेत आणणं कठीणच. तीच गोष्ट स्पर्धाच्या तयारीची. दुपारी दीड वाजता पोटात भुकेचा डोंब उठला असताना कोण थांबणार आणि कोण थांबवणार सरावासाठी?
खरं तर शाळेची वेळ कोणती असावी, या प्रश्नामागे पालकांची भूमिका ही सर्वात महत्त्वाची आहे. शिस्त, मग ती स्वत:मधली असो की आपल्या पाल्यामधली, तिचं पालन करणं हे कुटुंबाच्या हिताचंच आहे. मुलांना मिळणारी शांत व पुरेशी झोप आणि पौष्टिक व पुरेसा आहार हे मुलांच्या वाढीसाठी अत्यंत गरजेचं आहे. हे दोन्ही व्यवस्थित मिळाल्यावर अभ्यास नीट होणारच. त्यासाठी आवश्यक शिस्त पालकांनी प्रेमानं, प्रसंगी कठोरपणे स्वत:मध्ये आणि मुलांमध्येही आणली पाहिजे. मोबाइलचं वाढतं आकर्षण, टीव्हीवरचे कार्यक्रम, पाहुणे-नातेवाईक-मित्रपरिवार तसेच कौटुंबिक कार्यक्रम, समारंभ या शाळेच्या दरम्यान येणाऱ्या गोष्टींना फाटा दिलाच पाहिजे आणि वेळच्या वेळी गृहपाठ, पुरेसे मैदानी खेळ मुलं खेळतील याकडेही पालक म्हणून लक्ष दिलं पाहिजे. मुलं ऐकत नाहीत (वाढत्या वयातील) आणि वेळेचं नियोजन हीसुद्धा आजच्या पालकांसमोरची मोठी समस्या जाणवते आहे. त्याचाही विचार व्हायला हवा.
महत्त्वाचं काय? तर शाळेच्या वेळा या मुलांचा सर्वांगीण विकास लक्षात घेऊनच असायला हव्यात. तेच जास्त महत्त्वाचं.
joshimeghana.23@gmail.com