मुलांमध्ये लहानपणापासून विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन रुजावा, त्यांना विज्ञानाच्या वाटेवरचे वाटसरू करून घ्यावे या हेतूने भारलेले अनेक विज्ञान वारकरी गावागावांत, मागास भागात जाऊन विज्ञान परिषदा, बालवैज्ञानिक स्पर्धा, विज्ञान प्रदर्शने अशा अनेक माध्यमातून मुलांपर्यंत पोहोचत आहेत. विज्ञानाची गोडी लागावी म्हणून झटताहेत. श्वेता नखाते, राजीव वर्तक आणि संजय पुजारी हे त्यांपैकीच एक.
‘‘चल चल गडय़ा रे चल चल गडय़ा शाळेमध्ये जाऊ..
गणिताची भाषा शिकून घेऊ..
विज्ञानाच्या वाटेवरचे वाटसरू होऊ..’’
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वप्नाळू पंतप्रधान म्हणून ओळखले जातात. त्यांना माहीत होतं की स्वप्नातून सत्याकडे जाण्याचा मार्ग विज्ञानाच्या वाटेवरूनच जातो म्हणूनच स्वातंत्र्यानंतर अनेक वैज्ञानिक संस्था उभ्या राहिल्या. मात्र सामान्य माणूस पूर्णपणे विज्ञाननिष्ठ बनला असे झाले नाही. विज्ञानाच्या वाटेवरचा वाटसरू बनला नाही. शाळेत शिकवलं जाणारं विज्ञानही अभ्यासक्रमात आणि परीक्षेत गुंतून पडलं. विज्ञानाचे संस्कार पुस्तकातील विज्ञानाला उपाययोजनांत बदलवू शकले नाहीत हे ज्यांना खटकलं त्यांनी मग वेगळे मार्ग शोधले. विज्ञान परिषदा, बालवैज्ञानिक स्पर्धा, विज्ञान प्रदर्शने. पण हे सारं अपुरं आहे असं वाटल्याने जे विज्ञानाचे वारकरी बनले, ज्यांनी मुलांना लहानपणापासून विज्ञानाच्या वाटेवरचे वाटसरू बनवण्याचा संकल्प केला अशा वारकऱ्यांना आज आपण भेटणार आहोत. आणि जमलंच तर त्यांच्या जथ्यात सामीलही होणार आहोत. या वारकऱ्यांपैकी पहिली श्वेता नखाते.
एका प्रदर्शनात श्वेताची ओळख झाली. वैज्ञानिक खेळणी आणि पुस्तके तिच्याकडे होती. अशी प्रदर्शनं ती शाळाशाळांत भरवते. तिचा पतीच याचं उत्पादन करतो आणि ती मार्केटिंग. आधी दादरला आणि आता पाल्र्याला तिचं दुकान आहे. ज्यात खेळण्याची लायब्ररी आहे. इथे मुलांसाठी छोटय़ा-छोटय़ा कालावधीचे विज्ञानावर आधारित उपक्रम चालवले जातात. मुलं इथे येतात, वैज्ञानिक प्रयोग करतात. खेळणी घरी नेतात. पाठांतरातून नव्हे तर अनुभवातून शिकतात.
राजीव वर्तक हे पण असेच एक विज्ञान वारकरी. १९७८-७९ पासून त्यांचा हा प्रवास सुरू आहे. सध्या त्यांच्या गटामध्ये १४-१५ जण काम करतात. मुंबई, पुण्यासारखे शहरी भाग, जव्हारसारखे मागास भाग यातील मराठी माध्यमाच्या शाळा, महानगरपालिका शाळा आणि गोव्यातील १००च्या वर शाळांतील विद्यार्थ्यांपर्यत ते पोचतात. विविध माध्यमांतून. प्रयोग, वैज्ञानिक खेळणी, उपकरणे, वर्कशॉपस्, नकाशा, ट्रीगनॉमेंटरी अशा विषयांची ऑलिंपियाडस्, ‘उमा’सारखे उपक्रम, आकाशदर्शन, पुस्तकं आणि आता व्हिज्युअल सीडीज आदी खरं तर अशा नुसत्या यादीपेक्षा मोजमापाची कार्यशाळा करताना सारी मुलं कसले तरी मोजमाप करत आहेत असे वाटते किंवा अपारंपरिक ऊर्जेच्या कार्यशाळेला मुलांचे पालकही आवर्जून उपस्थित राहतात हे पाहून वर्तक सर सुखावतात. आपणच बनवलेल्या सूर्यचुलीत आपणच बनवलेला शिरा, खिचडी मुलं आवडीने खातात. हे सारं बघणं खूप आनंदाचं असतं, असे ते म्हणतात.
वर्तक सरांचा विज्ञानाच्या वाटेवरचा खरा प्रवास सुरू झाला तो मराठी विज्ञान परिषदेपासून. मग त्यांना भेटले रमेश कचोरिया. गुजरातमधल्या छोटय़ा खेडय़ातून मुंबईत नशीब काढायला आलेला हा एक छोटा मुलगा. पुढे यशस्वी व्यावसायिक झाला. मुलं परदेशात स्थिरावली. मग त्यांनी ठरवलं ज्या मुंबईनं, तिथल्या मराठी माणसांनी मला इथपर्यंत पोचायला मदत केली त्याचं ऋण फेडण्याची वेळ आली आहे. त्यांनी वर्तक सरांना आर्थिक पाठबळ पुरवलं. आणि मग गणित विज्ञान, भूगोल सोप्या मनोरंजक पद्धतीने प्रयोग, निरीक्षण या माध्यमातून शाळाशाळांतून विनामूल्य पोचवायला सुरुवात झाली. महानगरपालिकेच्या शाळांसाठी त्यांनी सुरू केला उपक्रम ‘उमा’. म्हणजे ‘अंडरस्टँडिंग मॅथॅमॅटिक्स्’, एल अॅण्ड टी कंपनी, आय.आय.टी.चे तरुण इंजिनीअर्स यांनी या कामात मदत केली. गणितातील आकडेमोड, बेसिक क्रिया तत्त्वांचा परिचय यातून करून दिला गेला. आता होता पुढचा टप्पा मुलांनी स्वत:शी स्पर्धा करावी. स्वत: उत्तरं शोधावीत, आपण परिश्रम केले तर यश मिळवू शकतो यासाठीचे प्रयत्न. प्रथम शाळांतून दोन पानांच्या नोटस् दिल्या जातात. इयत्ता ८/९वीच्या विद्यार्थी त्या अभ्यासतात. त्यावर परीक्षा घेतली जाते. त्यात पास होणाऱ्यांना नोट्सचा ५-६ पानांचा सेट मिळतो. परत परीक्षा यातून ६ विद्यार्थ्यांची निवड होते. असे अनेक शाळांतील विद्यार्थी एकत्र येतात. त्यांच्यासाठी विज्ञानासंदर्भातील विविध कार्यशाळा घेतल्या जातात. अपेक्षा असते त्या विद्यार्थ्यांनी आपलं ज्ञान, माहिती शाळेतील इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोचवावी. या साऱ्या प्रवासात त्यांना जाणवत गेलं की शाळेत शिकवणारा, विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणाऱ्या शिक्षकालाच सक्षम केलं पाहिजे. म्हणून सध्या त्यांचा भर आहे शिक्षक प्रशिक्षणावर. सर आणि सरांचे सारे सहकारी विविध पुस्तकं. इंटरनेट यावरून परदेशात चालणारे प्रयोग अभ्यासतात. भारतीय वातावरणात ते कसे राबवता येतील हे पाहतात. प्रथम स्वत: मुंबईतील मराठी माध्यमांच्या शाळांत प्रयोग करतात आणि मग दूरवर पोचतात. अनेक पुस्तिकांची त्यांनी निर्मिती केली आहे. असंख्य ओपीएचच्या ट्रान्सपरन्सीज, शेकडो वैज्ञानिक खेळणी आणि सीडी यांच्या साह्य़ाने ते शिक्षकांसाठी प्रशिक्षण वर्ग घेतात. या साऱ्या कामात विज्ञाननिष्ठ होताना माणुसकीचं नातं जपण्याचा पुरेपूर प्रयत्न होतो. त्सुनामीत अनाथ झालेल्या मुलांसाठी सरांनी इथल्याच (मुंबई) मुलांकडून शेकडो वैज्ञानिक खेळणी बनवून घेतली आणि आंध्र, तामिळनाडूला पाठवली. सतत नवनवे प्रयोग चालूच असतात. त्यांच्याकडून परतताना आपण बरोबर घेऊन येतो प्रचंड उर्जा.
विज्ञानाचे वारकरी
मुलांमध्ये लहानपणापासून विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन रुजावा, त्यांना विज्ञानाच्या वाटेवरचे वाटसरू करून घ्यावे या हेतूने भारलेले अनेक विज्ञान वारकरी गावागावांत, मागास भागात जाऊन विज्ञान परिषदा, बालवैज्ञानिक स्पर्धा, विज्ञान प्रदर्शने अशा अनेक माध्यमातून मुलांपर्यंत पोहोचत आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 12-07-2014 at 02:10 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Science pilgrim