शिल्पा परांडेकर
‘सोलापूर म्हणजे शेंगदाण्याची चटणी आणि कडक भाकरी, हे समीकरण बहुतेकांना माहिती आहे. मला मात्र सोलापुरात फिरताना इतरही अनेक पदार्थ सापडले, जे सोलापूरबाहेरच्या व्यक्तींना तितकेसे ज्ञात नाहीत. चमन भेळ, डिस्को भजीसारख्या ‘स्ट्रीट फूड’पासून लांबोटी चिवडा, हुग्गी, कडबा आणि पेंडपाल्यापर्यंतचे पदार्थ चाखताना मला इथल्या अशा काही सुगरण स्त्रिया भेटल्या, ज्यांनी आपलं पाककौशल्य आपल्यापुरतंच न ठेवता इतर गरजू स्त्रियांच्याही हाताला काम देऊन त्यांना सक्षम व्हायला मदत केली आहे.’
खाद्यसंस्कृती जाणून घेण्याच्या माझ्या प्रवासात मी अनेक स्त्रियांना भेटते. कधी काळी कोणाशीही फारशा न बोलणाऱ्या, घराबाहेर न पडलेल्या स्त्रिया, जर त्यांना थोडं मार्गदर्शन आणि संधी मिळाली तर किती उंच भरारी घेतात, हे मी सोलापूरच्या प्रवासात अनुभवलं. वनिता ताई, रुक्मिणी आजी, लक्ष्मी मावशी यांच्या माध्यमातून खाद्यसंस्कृतीचा एक वेगळा आयाम, वेगळा विचार मला जाणवला.
अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये एकटय़ा स्त्रीनं खंबीरपणे एक यशस्वी उद्योग उभा करणं, आपल्या घरगुती पदार्थाना मोठय़ा आदरानं व्यवसायाभिमुख बनवणं, आपल्यासारख्या इतरही स्त्रियांना स्वावलंबी बनवणं, अडल्या-नडलेल्या, अपंग व्यक्तींना हाताशी धरून वाटचाल करणं.. व्यवसाय उभा राहिला तरी आपली पाळंमुळं न विसरता व्यवसायासाठी झटणाऱ्या या स्त्रिया खूप शिकवतात. ‘‘माझा गाव हा ‘महिला उद्योजकांचा गाव’ म्हणून ओळखला जावा, असा माझा मानस आहे आणि त्यासाठी मी प्रयत्न करतेय,’’ हे म्हणणं आहे अक्कलकोटच्या वनिता तंबाके यांचं. खूप कष्टांतून त्यांनी असाध्य ते साध्य केलं आहे. दिवाळीसाठीचे पदार्थ बनवण्यात त्यांचा पूर्वीपासूनच हातखंडा होता. एकदा त्यांनी घरी बनवलेली चकली किराणा मालाच्या दुकानात विक्रीसाठी ठेवली. ती लोकांच्या पसंतीला इतकी उतरली की नंतर अक्कलकोटच्या बाहेरही विकली जाऊ लागली आणि आता चकली आणि इतर घरगुती खाद्यपदार्थाच्या जोरावर वनिताताईंचा ‘प्रियदर्शनी गृह उद्योग’ पुण्यासारख्या मोठय़ा बाजारपेठेत पोहोचला आहे.
एके रात्री खूप उशिरा सोलापूर शहरात फेरफटका मारत होते. खरं तर आपल्यापेक्षा वेगळं काही ‘स्ट्रीट फूड’ इथे मिळतंय का, याचा शोध हादेखील माझ्या या प्रवासाचाच एक भाग. घरातल्या खाद्यसंस्कृतीबरोबर खाऊगल्ल्या, चौपाटी, जुनी उपाहारगृहं अशा ठिकाणीदेखील एक वेगळीच खाद्यसंस्कृती नांदत असते. ‘सोलापूर चौपाटी’वरचे पदार्थ अगदी निराळे आहेत. चमन भेळ, डिस्को भजी (मीठ, मसाला भरून मंद आचेवर तळलेली मिरची भजी. थंड झाली की त्याचे तुकडे करून पुन्हा तळून घेतात.), चटणी पाव, शेव पाव हे पदार्थ केवळ सोलापुरातच मिळतील (आता शेव पाव पुण्यातही मिळतो). आंध्र प्रदेश आणि कर्नाटकाचा प्रभाव इथल्या ‘स्ट्रीट फूड’वर जाणवतो. इडली, चटणी आणि सांबार दाक्षिणात्य पद्धतीचं. सात रस्ता चौकातली ‘आण्णाची इडली’, ‘सुधा इडली उपाहारगृह’, ‘सुप्रजा पावभाजी’ ही ठिकाणं आणि खवा पोळी, शेंगदाणा पोळी, हे पदार्थ सोलापूरमध्ये येणाऱ्या प्रत्येक खवय्याचे आवडते.
तर, त्या रात्री असाच पदार्थाचा शोध घेत असताना सिद्धेश्वर मठाच्या समोरच्या फुटपाथवर झोपडीवजा खानावळीकडे माझं लक्ष गेलं- ‘लक्ष्मी खानावळ’. खूप उशीर झाल्याने दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे सकाळी लवकरच त्या खानावळीकडे आले. अद्याप कोणी ग्राहक तिथे नव्हतं; परंतु भाकरी, चपाती, भाजी बनवण्याचं काम अगदी जोरात सुरू होतं. लक्ष्मी कुंभार ही खानावळ चालवतात. त्यांच्या आईनं याची सुरुवात केली. प्रामुख्यानं वेठबिगार लोक इथले मुख्य ग्राहक; पण हल्ली इतर पर्यटकही त्यांच्याकडे घरगुती जेवण चाखण्यासाठी आवर्जून येत असल्याचं त्या सांगतात. ‘‘माझ्या लहानपणी सुरुवातीच्या काळात आम्ही भीक मागून गुजराण करत होतो. आम्ही लहान भावंडं आणि आई एकटी. वडील नाहीत. लहानपणी इतर ठिकाणीही कामं केलीत; पण लोक त्रास देत. स्थिरस्थावर व्हावं म्हणून आईनं खानावळीची सुरुवात केली. सुरुवातीला आम्ही २५ पैशाला भाकरी-भाजी विकत होतो आणि आज लोकांना परवडेल अशा किमतीत पोटभर, घरच्या चवीचं जेवण देण्याचा प्रयत्न असतो.’’
लक्ष्मी मावशींनी आजवर अपंग, गरजू, परित्यक्तांनाच मदतनीस म्हणून घेतलं आहे, ही बाब मला खूप विशेष वाटली. स्वत: बिकट परिस्थितीत असताना गरजवंतांना मदत करणं, त्यांना खाऊ-पिऊ घालणं, हे हृदयात पाझरणाऱ्या मायेमुळेच शक्य आहे. त्या सांगतात, ‘‘या भाजी-भाकरीमुळे आम्ही फक्त स्थिरावलोच नाही, तर यामुळे आम्ही अनेक नाती कमावली आहेत.’’
सोलापूरची सुप्रसिद्ध कडक भाकरी, चटणी आणि लांबोटी चिवडा विकत घ्यायचा माझा बेत होता. कडक भाकरी सोलापूर आणि उत्तर कर्नाटकात बनवली जाते. ही भाकरी बनवून उन्हात वाळवून पापडाप्रमाणे कडक केली जाते. ती अनेक दिवस टिकत असल्यामुळे प्रवासात, दुष्काळ पडल्यास उपयोगी पडते. ड्रायव्हरनं सांगितलं, ‘‘एक ठिकाण आहे, तिथे तुम्हाला भाकरी-चटणी मिळेल आणि लांबोटी चिवडा शोधणाऱ्या आजीही भेटतील.’’ मोहोळ तालुक्यातलं लांबोटी हे एक गाव आणि याच नावावरून ‘लांबोटी चिवडा’ हे नाव प्रसिद्ध झालं आहे.
‘हॉटेल जय-शंकर’ हे महामार्गावरचं एक मोठं हॉटेल. माझी खरेदी झाल्यावर ड्रायव्हरनं दिलेली माहिती बरोबर असल्याची खातरजमा करून घेतल्यावर गल्ल्यावर बसलेल्या मुलाशी मी बोलू लागले. ‘‘आजी लगेच भेटणं अवघड आहे जरा. ती आता कामात असते.’’ त्यानं सांगितलं. खरंच, बराच वेळ झाला तरी आजी काही भेटायला तयार नव्हत्या. ‘‘त्या इथे नाही येऊ शकत, पण मी तर त्यांच्याकडे जाऊ शकते ना!’’ असं म्हणत मी त्यांच्या नातवाची परवानगी घेऊन आजींना भेटायला गेले. हॉटेलच्या मागच्या पटांगणात काही स्त्रिया कडक उन्हात शेंगदाण्याच्या मोठाल्या ढिगातून खराब आणि चांगले शेंगदाणे वेगळे करण्याचं काम करत होत्या. माझ्याबरोबर आलेल्या वेटरनं माझी आणि आजींची- रुक्मिणी शंकरराव खताळ यांची ओळख करून दिली. मुळात त्या आजी वाटतच नव्हत्या; २२-२५ वयाची २-३ नातवंडं आहेत त्यांना तरीही! आजही त्या त्यांची सुप्रसिद्ध उत्पादनं स्वत: जातीनं लक्ष घालून बनवून घेतात. इतक्या कडक उन्हात रोज बसून अशा किती तरी शेंगदाण्याच्या राशी लीलया साफ करतात.
मी विचारलं, ‘‘रोज किती किलो शेंगदाणे साफ करत असाल? रोज किती किलो चटणी बनत असेल साधारण?’’
‘‘पोरी, मी कधी याचा हिशोब नाही ठेवला. ग्राहक हे आपलं परमेश्वर आहे, ही शिकवण माझ्या पतीची. त्यांना मी मालक म्हणे. मला जन्म आई-वडिलांनी दिला, पण सर्व काही मालकांनी शिकवलं. आताशी पोरं-नातवंडं काही काम करू देत नाहीत; पण मला स्वत:ला काम केल्याशिवाय करमत नाही. गिऱ्हाईकं आपल्यासाठी लांबून येतात, तर त्यांना आपल्या इथे चांगलंच खायला मिळालं पाहिजे.’’
एका छोटय़ा लाकडी खोप्यापासून ते मोठय़ा हॉटेलपर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा होता. चिवडा बनवण्याचा किंवा हॉटेल चालवण्याचा कोणताही अनुभव नसताना अनुभवातून शिकत शिकत त्यांनी हे साम्राज्य उभं केलं आहे. हा माझा प्रवास आता फक्त खाद्यसंस्कृतीचा प्रवास राहिला नसून, जेवण कसं असावं इतकंच नाही, तर जीवनही कसं असावं, हे शिकवतो आहे. या तिघींचं कर्तृत्व पाहता मला ‘अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!’ या सुप्रसिद्ध ओळी आठवल्या.
सोलापूरला कर्नाटकची सीमारेषा सामायिक होत असल्यामुळे इथल्या खाद्यसंस्कृतीवर त्याचा प्रभाव आपसूकच जाणवतो. नागपंचमीला केला जाणारा ‘दिंड’सारखा ‘कडबा’ हा पदार्थ मी स्वामी यांच्या घरी खाल्ला. याला इथले मराठी लोक ‘गोड फळं’ असंदेखील म्हणतात. सोलापूरमध्ये घरी आलेल्या पाहुण्याला हुग्गी खाऊ घालणं ही त्यांच्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. ‘हुग्गी’ म्हणजे गव्हाची खीर. हा महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात केला जाणारा पारंपरिक पदार्थ. स्वामी यांच्या घरचा हुग्गी, कडबा आणि सात्त्विक जेवणाचा पाहुणचार माझ्या कायम स्मरणात राहील.
सोलापूर जिल्हा अनेक ऐतिहासिक घडामोडींचा साक्षीदार राहिला आहे. त्याचा परिणाम इथल्या खानपानावर झाला आहे आणि त्याचे ठसे आजही आपल्याला या पदार्थाच्या रूपात पाहायला मिळतात. सोलापूरच्या दुष्काळी पट्टय़ातले पदार्थही निराळे आहेत. आज जनावरांना खायला दिली जाणारी भाजी ‘बरबडा’ किंवा ‘बरबटा’चा पाला पूर्वी दुष्काळात खाऊन आम्ही आमचं पोट कसं भरलं होतं, ही गोष्ट सांगताना इथल्या जुन्या लोकांच्या डोळय़ांत आजही पाणी तरळतं.
शेंगदाणे, ज्वारी, बाजरी, डाळी हे सोलापूरमधल्या आहारातले प्रमुख घटक. हुरडय़ाचं (ओली ज्वारी) थालीपीठ, चकली, घुगऱ्या, मुटके, ज्वारीचा खिचडा, धपाटे, सुशीला, पेंडपाला, वकिलीची भाजी, सोलाण्याची आमटी, ‘मोहरम’साठी बनवले जाणारे घोडे, दालचा खाना, असे किती तरी विविध प्रकार सोलापूर जिल्ह्यात आजही बनवले जातात, तर काही काळाच्या ओघात मागे पडले आहेत. दुष्काळी भागामुळे इथे भाज्यांचं प्रमाण कमी. त्यामुळे पेंडपाल्यासारखे पदार्थ घरी उपलब्ध साहित्यातून बनवले जातात. मात्र अनेक ठिकाणी पेंडपाल्यामध्ये उपलब्धतेनुसार वांगी, गवार किंवा आवडीच्या भाज्यादेखील घातल्या जातात. तसंच हा पदार्थ आमटीप्रमाणे किंवा सरसरीत भाजीप्रमाणेसुद्धा बनवला जातो; परंतु ताटात भाकरी आणि पेंडपाला असं एकत्र कुस्करून खाण्याचीच पद्धत अधिक प्रचलित आहे. सहभोजन, थंडीच्या दिवसांमध्ये किंवा झटपट होणारा पदार्थ म्हणून पेंडपाला आजही सोलापूर-पंढरपूर भागात आवडीनं खाल्ला जातो. खाद्यसंस्कृती ही परंपरेने समृद्ध होत जाते. मला या खाद्यसफरीत अनेक स्त्रिया भेटल्या ज्यांनी केवळ पदार्थाच्या जोरावर स्वत:ला तर सक्षम बनवलंच, परंतु बरोबरीने इतरांनाच्या हातालाही बळ दिलं.
कडबा
साहित्य- सारण-
सुकं खोबरं, खसखस, बडीशेप, सुंठ, काळी मिरी, गूळ, वेलची, जायफळ, (सुकामेवा- आवडत असल्यास),
पारीसाठी- कणीक, मीठ, भरपूर तेल.
कृती- सारण-
सुकं खोबरं, खसखस, बडीशेप, सुंठ, काळी मिरी भाजून घ्या. गूळ, वेलची, जायफळ, सुकामेवा घालून सारण एकत्रित करून घ्या.
पारीसाठी नेहमीपेक्षा थोडी सैलसर कणीक भिजवून मळून घ्या. पारीच्या पिठाची पातळ पोळी भरपूर तेल लावून (कोरडं पीठ न वापरता) लाटा. तयार सारण त्यावर मध्यभागी पसरवून घ्या. पोळीच्या चार बाजूंनी चौकोनी आकारात घडय़ा घाला. पुन्हा अशीच एक पातळ पोळी लाटून तयार केलेला कडबा या पोळीमध्ये ठेवून अशाच पद्धतीनं चारही बाजू दुमडून घ्या. सर्व कडबा मोदकांप्रमाणे वाफवून घ्या.
नागपंचमीला, तसंच पूर्वी सर्दी-खोकल्यावर आराम मिळावा म्हणून सुकामेवा न वापरता केलेले कडबा खाल्ले जायचे.
पेंडपाला
साहित्य-
तुरीची डाळ- १ वाटी, तिळकूट- अर्धी वाटी, शेंगदाणा कूट- अर्धी वाटी, मेथी दाणे- २ चमचे, चिंच-गुळाचा कोळ, काळा मसाला, ओलं किंवा सुकं खोबरं- १ चमचा, लसूण, फोडणीसाठी जिरे-मोहरी, तेल.
कृती-
अर्धा चमचा मेथ्या घालून डाळ वरणाप्रमाणे शिजवून घ्यावी. फोडणी करून त्यात उरलेले मेथी दाणे घालावे. तीळ व शेंगदाण्याचं कूट, खोबऱ्याचा कीस घालून चांगलं परतावं. चिंच-गुळाचा कोळ, काळा मसाला घालून परतावं. शिजवलेलं वरण व चवीनुसार मीठ घालून चांगली उकळी येऊ द्यावी.