शिल्पा परांडेकर
‘‘मागील पिढीतील आज्यांना भेटून नवी माहिती कळेल, हा माझा अंदाज अचूक होता. कोकणी स्त्रियांना सुबक मोदक करताना पाहात, येल्लाप्यांसारख्या जुन्या पदार्थाबद्दल जाणून घेत, चिबुडासारख्या फळाचे पदार्थ कसे करतात ते विचारत माझा प्रवास सुरू झाला होता..’’
दुसऱ्या दिवसाचं कोदे काकूंनी छान नियोजन केलं होतं. आज त्या मला त्यांच्या वाडीतल्या परब आजींकडे घेऊन जाणार होत्या. नाष्टा आटोपून आम्ही परब वाडीकडे प्रस्थान केलं.
‘‘काय गो, झोपलो आसा? तुमका भेटूच ह्या मुंबय वरून आलंय आसा बघ.’’ काकूंनी आजींच्या घरी थेट प्रवेश करत संवाद सुरू केला. परब आजींना प्रेमानं सर्व जण ‘बिबजा आजी’ म्हणतात. बिबजा आजी म्हणजे वाडीतल्या तरुण मुली-सुनांसाठी संस्कार आणि संस्कृतीचा चालता-बोलता ‘एन्सायक्लोपिडिया’च जणू. आजींनी आपुलकीनं माझं स्वागत केलं. मी आणि बिबजा आजींच्या मधला संवादसेतू म्हणजे कोदे काकू आणि बिबजा आजींचा भाऊ. कारण आजींना मराठी येत नव्हतं आणि मला मालवणी! कोदे काकूंकडून त्यांच्याविषयी आणि त्यांच्या पाककलेविषयी खूप ऐकलं होतं. मी त्यांना माझा संकल्प सांगितला, तशा त्या अगदी उत्साहानं अनेक जुने पदार्थ, त्यांच्या कृतींची माहिती सांगू लागल्या. अस्सल मालवणीमध्ये. त्यांनी अनेक जुन्या वस्तू, कायमस्वरूपी माळय़ावर गेलेली भांडी केवळ माझ्यासाठी खाली उतरवून घेतली.
येल्लापे (आप्प्यांसारखा एक गोड पदार्थ), सांदण, असे जुने पदार्थ त्यांनी सांगितले. माशांची एखादी जात आता नामशेष झाली आहे का? असं विचारताच त्या म्हणाल्या, ‘‘मासे पूर्वी जे मिळायचे ते आजही मिळतात. मात्र आता मला चवीत बदल जाणवतो. आता करण्याच्या पद्धतीतही खूप बदल होत चालले आहेत.’’ आमच्यातला तोडकामोडका संवाददेखील त्यांच्या अनेक आठवणींची पोतडी उघडणारा होता. अनेक जुने, विस्मरणात गेलेले किंवा विस्मरणाच्या मार्गावर असणारे पदार्थ त्यांनी मला सांगितले. तो ठेवा घेऊनच आम्ही तिथून बाहेर पडलो.
‘‘तुला मोदक आवडतात का?’’ कोदे काकूंनी विचारलं. ‘‘जीव की प्राण आहेत माझ्यासाठी!’’ मी. ‘‘तर मग तयार राहा आज संध्याकाळी खास चुलीवरचे मोदक खाण्यासाठी.’’ काकू म्हणाल्या. चुलीवरचे मोदक अगदीच भन्नाट होते माझ्यासाठी. त्या दिवशी संकष्टी असल्यानं त्या संध्याकाळी आम्ही कोदे काकूंच्या जुन्या कोकणी घरी जाणार होतो. जिथे त्यांचे दीर, जावा, त्यांची मुलं असा मोठा परिवार राहातो. हे त्यांचं घर कोकणातल्या जुन्या घरांच्या धाटणीचं. घराकडे जाणारी वाटही मिट्ट काळोखातली. मातीच्या भिंती, प्रशस्त अंगण, घरातील बैठकीच्या खोलीत वगळता बाकी सगळय़ा ठिकाणी आजही रॉकेलवर चालणारे दिवे किंवा कंदील.
आम्ही स्वयंपाकघरात पोहोचलो तेव्हा मोदकाची तयारी सुरू होती. या काकूसुद्धा प्रचंड हौशी आणि गप्पिष्ट. त्यांच्याकडची चूल खूप सुंदर आणि सुबक होती. पण त्यांच्या सासूबाईंच्या काळातली चूल याहीपेक्षा छान आणि स्वयंपाकाच्या गरजेनुसार बांधलेली होती, असं त्यांनी सांगितलं. टप्प्या-टप्प्यांची चूल म्हणजे अधिक आच, मध्यम आच आणि कमीत-कमी आच ते निखारा, अशी. त्यांचे हात मोदक वळण्यात इतके सराईत झाले होते, की एखाद्या कलाकारानं सुबक मूर्ती बनवावी! त्यांनी पटपट एकसारखे २१ मोदक, काही कानवले वळले. कोकणातले उकडीचे मोदक अनेकदा खाल्ले, मात्र अशी चव दुर्मीळच!
यानंतरचा दिवस थोडा वेगळा अनुभव देणारा होता. आधी भेटलेल्या रिक्षाचालक पोलीस पाटलांकडून त्यांच्या एका पत्रकार मित्राचा संपर्क क्रमांक मिळाला होता. त्यांच्याशी बोलले. त्यांनी काजू, आमसुलांची फॅक्टरी, घरगुती खाद्योत्पादनं बनवणाऱ्या महिला बचत गटांची भेट घालून दिली. यानंतर आम्ही मालवण बाजारपेठेतल्या एका जुन्या घरी गेलो. यादेखील एक परब आजीच. परब आजी घरी एकटय़ाच होत्या. मात्र घरी पाहुणी आली आहे म्हटल्यावर त्या लगबगीनं बाजारात जाऊन चिबूड घेऊन आल्या. हे कोणतं फळ, असा विचार मी करतच होते, तोवर त्याच म्हणाल्या, ‘‘याला चिबूड म्हणतात. पेरूसारखं कापायचं, त्यावर साखर घालायची आणि खायचं.’’ बोलता बोलता त्यांनी चिबूड कापून त्यावर साखर भुरभुरून माझ्यासमोर ठेवलंदेखील. मला जाणवलं, चिबुडाला स्वत:ची अशी विशेष चव नाही. मात्र परब आजींनी सांगितलं, की त्याचे वडे चांगले होतात. मी घरी परतल्यानंतर चिबुडाचे वडे करून पाहिले. खरंच हे वडे खूप चविष्ट लागतात. शिवाय याच चिबुडापासून सॅलडदेखील बनवता येतं. वाफवलेले किंवा नुसतेच चिबुडाचे तुकडे आणि त्यावर नारळाचं गूळ घातलेलं घट्ट दूध ‘ड्रेसिंग’ म्हणून घालायचं. हे सॅलड खूप चविष्ट लागतं.
यानंतर मी जुन्या पदार्थाच्या शोधात अशाच एका ओळखीतून चौकेजवळील आंबेरी गावी शुभांगी मेस्त्री यांच्या घरी पोहोचले. गणपतीच्या मूर्ती बनवणं हा या कुटुंबाचा पारंपरिक व्यवसाय. त्यांच्या घरापर्यंत जाणारी वाट गर्द झाडीतून जात होती. पुढे एका निमुळत्या रस्तानं खाली उतरलं की त्यांचं जुनं, कोकणी कौलारू घर. शुभांगीताईंनी अनेक जुने पदार्थ आणि काही घरगुती औषधी उपाय सांगितले. त्यांच्या घरी आजही काही पदार्थ पारंपरिक पद्धतीनं चुलीवरच केले जातात. यांच्याकडे मला डोणा-फळी-वाळमाण, डवली, कुडू (धान्य मोजण्याचं माप. साधारण ६ किलो), रवळी, चिवारी (धान्य धुण्यासाठीचं भांडं) अशी काही जुनी, दुर्मीळ भांडी व साधनं पाहायला मिळाली. शुभांगीताईंनी मला त्यांच्या परडय़ाचीही सफर घडवली. लाल भाजी, अळू आणि इतरही काही ऑरगॅनिक (सेंद्रिय) भाज्यांबरोबर एक झाड पाहायला मिळालं- ‘नेवली’. कोकणी मान्यतेनुसार आंबोळीच्या पिठात नेवलीच्या पानांचा रस मिसळून त्यापासून बनवलेली आंबोळी गर्भवती स्त्रीसाठी खूप उपयुक्त असते. तसंच याचा पाला नवजात बाळाच्या अंगाला चोळला जातो. इथेही यथेच्छ कोकणी पाहुणचाराचा आस्वाद घेता आला. दिवस मावळत आला. अंधार पडण्याआधी मला परत कांदळगावाला जायचं होतं, मी निघाले..