शिल्पा परांडेकर
खाद्यसंस्कृतीचा कोणता वारसा कुठे सापडेल आणि अनेकदा त्यातही आध्यात्मिक जगण्याचा कसा परिचय होईल ते सांगता येत नाही. गजबजलेल्या मुंबईच्या जवळ उल्हासनगरमध्ये अतिशय चविष्ट सिंधी खाद्यसंस्कृती आपल्याला तृप्त करते, तर महानगराला लागून असलेल्या शहापूर, येऊर भागांत आदिवासी खाद्यसंस्कृती स्वागत करते. सिंधी दाल-पकवान, गुरुद्वारातला कडा प्रशाद ते आदिवासी स्त्रियांनी औषधी म्हणून जपलेल्या रानभाज्या, रानमेवा आणि कोहळय़ाच्या चामटय़ांसारख्या वेगळय़ा पदार्थापर्यंतची ही खाद्यसफर!
ठाणे म्हणजे मुंबईच्या शेजारचं आणखी एक धावणारं शहर. औद्योगिक हब आणि तलावांचं शहर असे ठाण्याचे महत्त्वाचे पैलू. रोजगार, शहरीकरण, आधुनिक दळणवळणाची साधनं अशा अनेक कारणांमुळे आजूबाजूची शहरं आणि गावं मुंबई आणि ठाण्याला जोडली गेली. शहापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली वगैरे भागांतून हजारो लोक कामानिमित्त मुंबई किंवा ठाण्यात रोज ये-जा करतात. अशा धावणाऱ्या महानगरांमध्ये विस्मरणात गेलेला एखादा वारसा, एखादी आठवण किंवा एखादा पदार्थ तरी मला सापडेल का? या प्रश्नाला माझंच उत्तर होतं, शोधलं की नक्कीच सापडणार!
फाळणीनंतर अनेक सिंधी लोक ‘सिंधीनगर’ म्हणजेच सध्याचं ‘उल्हासनगर’ इथे येऊन वसले. त्यांच्याबरोबर त्यांची अशी खास खाद्यसंस्कृतीही आली. सिंधी ‘दाल-पकवान’ हा पारंपरिक पदार्थ आपण चाखला असेलच. (नसेल तर आवर्जून खाऊन पाहा.) स्नॅक्स किंवा सकाळच्या नाष्टय़ाचा हा लोकप्रिय पदार्थ. दाल-पकवानशिवाय सिंधी खाद्यसंस्कृती पूर्णच होऊ शकत नाही. हा पदार्थ जसा सिंधी घराघरांमध्ये तयार केला जातो, तसाच रेस्टॉरंस्ट्समध्येही मिळतो. दाल-पकवानमधील दाल म्हणजेच डाळ ही हरभऱ्याच्या डाळीपासून बनवली जाते आणि पकवान म्हणजे चपाती/पोळीसारखा थोडा कडक, कुरकुरीत तळलेला प्रकार.
एके दिवशी सकाळीच मी उल्हासनगरला पोहोचले. दाल-पकवानवर ताव मारला आणि योगायोगानं एका गुरुद्वारापाशी येऊन थांबले. योगायोगानंच; कारण तिथे गुरुद्वारा असेल याची मला कल्पना नव्हती. आत गेले. गुरुद्वाराची देखभाल करणारे बाबाजी आणि त्यांची पत्नी भेटले. त्यांनी एक-एक करत तीन-चार आजोबांना बोलावून घेतलं. प्रांत किंवा समुदाय कोणताही असो, आपल्या सर्वाच्या जिव्हाळय़ाचा विषय म्हणजे, खाणं. त्याचा विषय आला की सगळे भरभरून बोलू लागतात. एक आजोबा थेट त्यांच्या बालपणात, पंजाबमधल्या दिवसांमध्ये पोहोचले. चेहऱ्यावरचा आनंद त्यांना लपवता येत नव्हता. ‘‘हमारे जमाने की बातही कुछ और थी। तब जो खाना बनता था, उसी वजह से हम आज भी तंदुरुस्त हैं। नहीं तो आजकल की पिढी घर में बननेवाला पारंपरिक, सात्त्विक खाना छोडकर फास्टफूड के पीछे भाग रही हैं।’’ ते म्हणाले. आजोबांनी जाता-जाता त्यांच्या आठवणीच्या कप्प्यात रेंगाळणाऱ्या ‘पंजाबी लस्सी’ची आठवण सांगितली. ‘मोठाल्या रवीनं घुसळलेली, भरपूर मलई असलेली पंजाबमधील लस्सीच खास असायची. तुमच्या मिक्सरमधली नाही बरं का!’ असं त्यांचं म्हणणं.
बाबाजींच्या पत्नीनं मला एका लंगरला येण्याचं आमंत्रण दिलं. परंतु पटेना. वाटलं, आपली तिकडे कुणाशी ओळख नाही आणि थेट जेवायलाच जायचं! म्हटलं, ‘‘मैं ऐसे कैसे आ सकती हूँ? बिन बुलाये मेहमान!’’ त्या म्हणाल्या, ‘‘अरे बेटा, कोई प्रॉब्लेम नहीं. हमारे यहाँ तो लोग इंतजार करते हैं, की ऐसे कोई मेहमान आए।’’ आणि खरंच असं झालंही. सगळे लोक एका अनोळखी, रीतिरिवाज भिन्न असलेल्या पाहुणीचं इतकं प्रेमानं आदरातिथ्य करतील असं वाटलं नव्हतं मला. मानवता, राष्ट्रीय एकात्मता यांविषयी आपण नेहमी बोलतो, वाचतो. पण या गोष्टी घरात बसून बोलण्याच्या नाहीत, तर घराबाहेर जाऊन, विविधतापूर्ण समाज-समुदायांना भेटून अनुभवण्याच्या आहेत याचा मी पुन्हा अनुभव घेतला. इथे मी केवळ ‘कडा प्रशाद’चाच नाही, तर खाण्याच्या बाबतीतल्या काही उच्च विचारांचाही आस्वाद घेतला. (कडा प्रसाद म्हणजे कणकेचा शिरा किंवा हलवा. भरपूर तूप घालून तो बनवला जातो. त्याची आणखी एक खासियत आहे. कडा प्रसाद खाऊन झाल्यानंतर स्त्रिया तळहातावरचं राहिलेलं जास्तीचं तूप आपल्या हाताला पुसतात, तर पुरुष दाढी-मिश्यांना. प्रसादाचा मान ठेवण्याची ही पद्धत आणि त्याचबरोबर जुनं ‘ब्युटी सिक्रेट’देखील!) मी लंगरच्या ठिकाणी पोहोचले, तेव्हा एका बाबाजींचा पाठ सुरू होता. यजमानांनी माझी ओळख करून दिली आणि माझ्या कामाविषयी सांगितलं. बाबाजी म्हणाले, ‘‘खाना दो तरीकों का होता हैं। एक मन की खुराक हैं और एक तन की खुराक। मन का खाना भजन, तन का खाना भोजन। खाना खा-खा के पेट बढमया (इन्सान) इसका मतलब नहीं समझेगा।’’ (खरं तर, थोडा विचार केला तर याचा अर्थ सहज समजण्यासारखा.)
ठाणे महानगर असलं तरी शहापूर तालुका, ठाण्यातली येऊरसारखी ठिकाणं आजही आदिवासी लोकवस्तीसाठी ओळखली जातात. आता मी मानवनिर्मित सिमेंटच्या जंगलातून निसर्गनिर्मित जंगलात, येऊरला येऊन पोहोचले. येऊरमध्ये आल्या आल्या एका साधेखाणी उपाहारगृहातून ‘बाय’चा पत्ता मिळाला. बाय हे एक आगळं रसायन होतं. मला इथले आदिवासी पदार्थ आणि संस्कृती जाणून घ्यायची आहे, असं सांगताच ‘मग तुम्हाला बायलाच भेटायला हवं’, असं त्यांनी सांगितलं. बाय आत जंगलात ‘वनीचा पाडा’ इथे राहते. ‘‘बाय एकदम डेरिंगबाज आहे. ती तुम्हाला सगळी माहिती देईल,’’ असं सांगून दुसऱ्या एका स्थानिक स्त्रीला माझ्याबरोबर पाठवण्यात आलं. दूर आत जंगलात चालत गेल्यानंतर बायचं साधं, कौलारू घर दिसलं. अंगण सारवलेलं, अंगणाच्या पुढेच शेती. तिथे बायनं स्थानिक भाजीपाला वगैरेची लागवड केली होती. घराच्या बाजूच्या एका खोलीत जुनी बी-बियाणं पुढच्या सुगीसाठी साठवली होती. बायला स्थानिक उपज तसंच तेलपट, लोत, शेवळी यांसारख्या रानभाज्या, कंदमुळं, झाडपाला, घरगुती उपचार यांचं चांगलंच ज्ञान अवगत होतं. तेलपट, लोतची भाजी ठेचलेला लसूण, मिरची, मीठ, थोडा कांदा घालून परतून करतात. जुलाब झाल्यास लोतची भाजी खाल्ल्यास उपयुक्त ठरतं. (फणसाची भाजी खाल्ल्यास देवी हा आजार होत नाही असाही आदिवासी लोकांचा समज आहे.) कापल्यामुळे शरीरावर जखम झाली, तर त्या जागी पळसाची कोवळी साल ठेचून लावावी, असे अनेक उपचार बाय सहजतेनं सांगत होती.
पूर्वी, म्हणजे जेव्हा आजच्यासारखा बारा महिने भाजीपाला उपलब्ध नसायचा, तेव्हा राज्यभरात सर्वत्र भाज्या सुकवून ठेवण्याची पद्धत होती. पावसाळय़ात या भाज्यांचा उपयोग होत असे. मात्र पावसाळय़ात येणाऱ्या रानभाज्या सुकवून ठेवण्याच्या खास पद्धती विशेषत: आदिवासींमध्येच आढळतात. यातली एक पद्धत म्हणजे ‘उताण’ची भाजी. चुलीवर विशिष्ट अंतरावर कापड अथवा चाळण/जाळी बांधून त्यात पालेभाजी सुकवण्यासाठी ठेवली जाते. ही भाजी कडक होईपर्यंत सुकवली जायची आणि ती पुढच्या सुगीपर्यंत टिकत असे, असं बाय सांगत होती. बोलता बोलता तिनं तिच्या परसबागेतून घेवडय़ासारख्या थोडय़ा शेंगा तोडून माझ्या पुढय़ात ठेवल्या. कोवळे, सेंद्रिय दाणे चवीला छान होते. नंतर तिचं घरही मला दाखवलं. स्थानिकांनी सांगितल्याप्रमाणे बाय ‘डेरिंगबाज’ होतीच, मला तर ती प्रेमळच जास्त वाटली. तिचा दरारा मात्र दांडगा होता!
शहापूरला मी रात्री पोहोचले. महामार्गावरचे अनेक ढाबे पाहता इथे आदिवासी भाग असेल असं वाटतच नव्हतं. शिवाय या भागातले काहीच संपर्क मला मिळाले नव्हते. बऱ्याचदा असं होतं. विशेषत: आदिवासीबहुल भागात कुणाचे संपर्क मिळत नाहीत आणि खूप शोधाशोध करावी लागते. अक्षरश: मजल-दरमजल प्रवास असतो. दुसऱ्या दिवशी असंच झालं. माझी शोधमोहीम सुरू असताना एक पाला दिसला. माझा प्रयत्न असतो, की माझ्या प्रवासात शक्य तितक्या समाज-समुदायांना भेटावं, त्यांची संस्कृती जाणून घ्यावी. पालातले लोक मराठवाडय़ातून शेतीच्या कामासाठी परिवारासहित येऊन राहिले होते. यांचं फिरस्तीचं जीवन; मग यांचं जेवण कसं असेल?.. विचार करत मी आत शिरले. तिथं अनेक परिवार होते. आपापल्या चुली त्यांनी मांडल्या होत्या. भाकर, कसलंसं कालवण, भात शिजत होते. फिरस्तीचं जीवन कष्टाचं. त्यांनी त्यांच्याबरोबर त्यांच्या गावाकडून आणलेलं वाणसामान. नाही तर स्थानिक जे मिळेल त्यावर गुजराण असा प्रकार. माझं त्यांच्याबरोबर बोलणं सुरू असतानाच कोठारे गावच्या सरपंचांनी मला पाहिलं. माझी चौकशी केली, विषय समजताच त्यांनी त्यांच्या गावी आणि आजूबाजूच्या काही वाडय़ांवरही नेऊन माहिती दिली.
इथल्या गावातल्या आदिवासी स्त्रिया आजही आदिवासी वेशभूषेत- म्हणजेच ‘पखवा’ (पारंपरिक वेशभूषा) घातलेल्या होत्या. बऱ्याच जणांना मराठी भाषा बोलता येत नव्हती. तरीही या स्त्रियांनी पदार्थ, गाणी, पद्धती, रीतिरिवाज याबाबत माहिती दिली. इथे भेटली ‘बोतरी आजी’(दात नसलेली). आजी असली तरी लहान मुलासारखा स्वभाव. आगाऊ आणि खोडकरही! एका जागी म्हणून स्थिर नाही. झटपट आली, पटापट काही पदार्थ सांगितले आणि निघूनही गेली. जाताना वटय़ातून (ओच्यातून) आणलेली तोरणं, जांभळं देऊन गेली आणि बालिप्रतिपदेदिवशी केल्या जाणाऱ्या तिच्या आवडीच्या कोहळय़ाच्या चामटय़ांची (चामटय़ा म्हणजे हातावर थापलेल्या लहान पुऱ्यांसारखा पदार्थ) वर दिलेली पाककृतीही सांगून गेली.
कोहळय़ाच्या चामटय़ा
साहित्य – कोहळय़ाचा गर, तांदळाचं पीठ, गूळ, वेलची, पाणी.
कृती – कोहळय़ाचा गर किसून घ्यावा. गरम पाण्यात वेलची आणि गूळ घालावा. गूळ विरघळल्यावर त्यात किसलेला कोहळा घालावा आणि मिश्रण शिजवून घ्यावं. कोहळा शिजल्यानंतर मिश्रणात तांदळाचं पीठ घालावं. मिश्रणाच्या हातावर चामटय़ा (पुऱ्या )थापून तळून घ्याव्यात.