शिल्पा परांडेकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
वरईचा शिरा, कांगची खीर, आयतोली, दुधेडी, मलिदा.. कधीही न ऐकलेले पदार्थ मी कोकणात भरडोली आणि दादरपाडा इथे पाहात आणि चाखत होते. मला ज्ञात नसलेली पूर्णत: वेगळी अशी एक संस्कृतीही जाणून घेत होते. आतापर्यंतच्या प्रवासात मी अक्षरश: हजारो स्त्रियांना भेटले आहे. प्रत्येक स्त्रीमध्ये नावीन्यता, सर्जनशीलता, संयम, चिकाटी, जिद्द आदी गुण आढळले. ही प्रत्येक बाब एखादा पदार्थ घडवण्याठी, तो पिढय़ानपिढय़ा जतन करण्यासाठी आवश्यक आहे.
मार्च-एप्रिल महिने प्रत्येकासाठी धामधुमीचे असतात. आर्थिक वर्ष समाप्ती, मराठी कालगणनेनुसार वर्षांतला शेवटचा सण फाल्गुन शुक्ल पौर्णिमा म्हणजे होळी आणि नवीन वर्षांतला पहिला सण चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा, जागतिक महिला दिन, मुलांच्या परीक्षा, उन्हाळी वाळवण-साठवण, उन्हाळी सुट्टय़ांमधल्या सहली.. योगायोगानं अशाच धामधुमीच्या काळात मी रायगड जिल्ह्यात प्रवास करत होते. शिमग्याची सोंगं, पुरुषांनी रंगवलेली स्त्रीपात्रं, क्वचित कुठे स्त्रियांची होळीची तयारी आणि होळीची लोकगीतं पाहायला-ऐकायला मिळत होती. होळीला एक व्यक्ती किंवा स्त्रीस्वरूप मानून वर्षांतून एकदाच भेटीला येणाऱ्या या मैत्रिणीभोवती (होळीभोवती) स्त्रिया फेर धरून समर्पित भावनेतून व्यक्त होतात, हे त्यांच्या होळी गीतांमधून मला जाणवलं.
महाराष्ट्राचा प्रवास करता-करता, गावातल्या लोकांना, विशेषत: स्त्रियांना भेटत असताना आणि त्यांच्याकडून आपल्या संस्कृतीचा वारसा समजून घेताना आपल्या संस्कृतीला आणि खाद्यसंस्कृतीला जपण्यात, ती पुढील पिढीकडे हस्तांतरित करण्यात स्त्रियांचा मोठा सहभाग आहे हे जाणवतं. माझ्या आतापर्यंतच्या प्रवासात मी अक्षरश: हजारो स्त्रियांना भेटले आहे. प्रत्येक स्त्रीमध्ये नावीन्यता, सर्जनशीलता, संयम, चिकाटी, जिद्द मला आढळली आणि ही प्रत्येक बाब एखादा पदार्थ घडवण्यासाठी, तो पिढय़ान्पिढय़ा जतन करण्यासाठी आवश्यक आहे, असं मला वाटतं.
श्रीवर्धन तालुक्यातलं गाव भरडोली इथल्या माजी स्त्री सरपंचांबरोबर माझा आधीच संपर्क झाला होता. अर्थात तिथे जाण्यापूर्वी मला माहीत नव्हतं, की त्या माजी सरपंच आहेत. स्वच्छ, सुंदर, संपूर्ण गाव शेणानं सावरलेलं होतं. तुम्ही पाहिलंय असं गाव? मी तर प्रथमच पाहत होते. सरपंचाच्या आणि ग्रामस्थांच्या प्रयत्नांमुळेच त्या वर्षीचा ‘तंटामुक्त आणि स्वच्छ गाव’ असे शासनाचे पुरस्कार त्यांना मिळाले होते. तिन्हीसांजेची वेळ होत होती. गुरं, चारा, तर कुणी डोईवर जळणासाठीची मोळी घेऊन घरी परतत होतं. आपापली कामं उरकून स्त्रिया आमच्याबरोबर गप्पा मारायला येऊ लागल्या. गावातल्या सर्व स्त्रिया एकत्र येऊन गप्पा मारत आहेत, काही महत्त्वाची माहिती देत आहेत, असं फार कमी गावांत घडतं. प्रत्येक माहिती, प्रथा, पदार्थ याविषयी सांगताना त्या सगळय़ांमध्ये कमालीचा उत्साह होता. एखाद्या गावात वेगवेगळे समाज किंवा समुदाय असतील, तर त्या गावांमध्ये मिळणाऱ्या पदार्थामध्येही विविध प्रकार आणि वैविध्य पाहायला मिळतं. इथं मात्र तसं नव्हतं. कारण या गावात सर्व लोक कुणबी समाजातले असल्यामुळे त्यांचे पदार्थ, प्रथा-परंपरा यात साम्य होतं.
एकोपा आणि स्वच्छता याबरोबर मला भावलेली आणखी एक बाब म्हणजे इथं जपलेला पारंपरिक पदार्थाचा वारसा. कांगची खीर आणि हिरक्याचा भात हे त्यातले पदार्थ. २०२३ हे वर्ष ‘भरडधान्य’ म्हणून साजरं केलं जात आहे. माझ्या मागील सहा वर्षांच्या प्रवासात ठिकठिकाणी मी भरडधान्यांची माहिती घेतच होते. काही ठिकाणी मला ही धान्यं, त्यापासून बनणारे आंबील, भात, खीर यांसारखे पारंपरिक पदार्थ चाखता आले. मधल्या काळात काहीशी विस्मरणात गेलेली भरडधान्यं पुन्हा प्रवाहात आली आहेत ही खूप चांगली गोष्ट आहे. भरडोलीत आजही सणांसाठी कांगपासून (राळे/ राळा) केली जाणारी खीर, न्याहारीसाठी वरईची आंबील, उपवासासाठी वरईचा शिरा किंवा भाकरी, हरक्याचा (कोडू/ कोदो/ कोद्रा) भात किंवा खिमट हे पदार्थ बनवले जातात. आजची पिढीदेखील असे पदार्थ आवडीनं खाते, ही समाधानाची भावना त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होती.
दादरपाडा इथल्या गुलाब आजी उंच, गोऱ्या आणि धिप्पाड. उत्साही आणि अगदी टवटवीत. या गुलाब आजी म्हणजे जुन्या म्हणी, जुन्या गोष्टी आणि माशांच्या माहितीचं कोठारच जणू. त्यांच्या तिथे असण्यानंही वातावरण त्यांच्यासारखंच टवटवीत झालं होतं. ‘नकले डोले, नकले कान, मेरी कृपा तेरी जान’ (पुढे पुढे करणं, या अर्थानं.), ‘हाशी हास पोशीला, अन शेंबूड माझ्या नाकाला’ (आपण इतरांवर हसू, तर आपलंच हसू होईल.), ‘ऊठ गं बालं, बसं गं शालं, शेजारणीचं शिक गं चालं’ (सासूचं शेजारणीबरोबर भांडण आहे, पण सून मात्र त्याच शेजारणीशी गप्पागोष्टी करायला जाते.) अशा जुन्या म्हणी आणि माशाचा प्रकार असलेल्या कोलीमच्या चटण्या, कोलीम आणि पालक माशाच्या वडय़ा तसंच त्यांचं आहाराच्या दृष्टीनं असणारं महत्त्व, असं सर्व त्यांना रीतसर माहिती होतं. तापात तोंडाला चव येण्यासाठी सुकटाची चटणी खावी, तर अशक्तपणा किंवा बालकांमधलं कुपोषण यावर पालक या माशाच्या वडय़ा उपयुक्त, असं त्यांनी सांगितलं. त्यांच्याकडे जवळपास
१५-२० प्रकारचे सुकवलेले मासे होते. मला त्यातला फरक समजावा यासाठी त्यांनी सर्व मासे जमिनीवर कागद पसरून त्यावर मांडले, माझ्याकडून कागदाच्या चिठ्ठय़ा बनवून त्यावर एकेका माशाचं नाव लिहून त्या-त्या सुकटासमोर चिठ्ठय़ा ठेवल्या. आणि म्हणाल्या, ‘‘हं, काढ आता फोटो!’’ मला वाटलं, अशा जर उत्साही आणि आदरयुक्त दरारा असणाऱ्या आजी प्रत्येक ठिकाणी असतील, तर कधीच कोणती खाद्यसंस्कृती विस्मरणात जाणार नाही.
सामाजिक, सांस्कृतिक आक्रमणं किंवा वेगवेगळय़ा संस्कृतींचा मिलाफ यातून बऱ्याचदा एक वेगळीच संस्कृती जन्माला येते. अशीच एक संस्कृती आपल्या रेवदांडा किल्ल्याच्या पायथ्याला वसलेली पाहायला मिळते. रायगडमधल्या आगरी, कोळी, आदिवासी, मुस्लीम यांच्यात आपलं वेगळेपण जपून ठेवणारे ‘क्रेओल पोर्तुगीज’. कोरलाईमध्ये जात असतानाच हे वेगळेपण जाणवतं. वेगळय़ा बांधणीची घरं, चर्च, लोक, त्यांची वेषभूषा आणि त्यांची भाषा. ‘‘आम्हाला पोर्तुगीज म्हणू नका. आम्ही ‘ते’वाले पोर्तुगीज नाही. आम्ही क्रेओल पोर्तुगीज आहोत,’’ एका मुलीनं पुढाकार घेत स्वत:हूनच मला सांगितलं. दोन विभिन्न संस्कृतींतून ही नवी संस्कृती जन्माला आली आहे. आता त्यांना त्यांची स्वत:ची ओळख आहे, अस्तित्व आहे. क्रेओल ही भाषा आहे आणि ही भाषा केवळ आपल्याकडे महाराष्ट्रातच नाही, तर आशिया, आफ्रिका, अमेरिकेतही काही ठिकाणी बोलली जाते. ही भाषा स्थानिक आहे. युरोपियन भाषा या भाषेचं मूळ. या भाषेला ना लिपी आहे, ना व्याकरण वगैरे भाषेचे नियम. त्यामुळे या भाषेत आणि चालीरीतींमध्ये अनेक महाराष्ट्रीय गोष्टींचा प्रभाव जाणवतो. भाषा वेगळी, तसे काही ‘इंद्याल’सारखे (डुकराचं मटण) पदार्थ पूर्णपणे वेगळे आहेत. काही पदार्थ- उदा. आयतोली, आपल्या कोकणी घावन किंवा सांदणसारखा एक पदार्थ. महाराष्ट्रीय-कोकणी तांदळाची भाकरी क्रेओल पोर्तुगीजदेखील खातात.
एक बाई पोतं भरून चिबूड आणि रताळी घेऊन आल्या. ‘‘हे घेऊन जा तुमच्याबरोबर. आमच्या शेतातली आहेत.’’ ते चिबुडाची आणि रताळीची शेती करतात, म्हणजे त्यापासून अनेक पदार्थही बनवत असतील असं मला वाटलं, पण यांच्याकडे चिबडाचे वडे होत नाहीत किंवा उरण भागात केले जाणारे रताळय़ाच्या सांडग्यांसारखे पदार्थही होत नाहीत. विशेष म्हणजे ज्या पोर्तुगीजांमुळे आपल्याला पावाची ओळख झाली, तो पाव इथे मात्र क्वचित प्रसंगीच खाल्ला जातो. संस्कृती, भाषा, रंग, रूप भिन्न, मात्र आपुलकी, माणुसकी आणि आपली संस्कृती जपण्याची धडपड सारखीच.
कार्ले गावात पोहोचले तेव्हा गावात स्मशानशांतता होती. गावात कुणी तरी वारलं होतं आणि सर्व जण तिकडे गेले होते. मात्र कुणी पाहुणे (म्हणजे मी) आले आहे, हा निरोप त्यांच्या सरपंचांपर्यंत कसा पोहोचला कोण जाणे आणि एका माणसानं धावत येऊन मला ‘‘सरपंच येत आहेत, त्यांनी तुम्हाला त्यांच्या घराजवळ थांबायला सांगितलं आहे,’’ असा निरोप दिला. सरपंच इक्बाल यांचं व्यक्तिमत्त्व साधं, नम्र, मनमिळाऊ होतं. त्याहूनही मनमिळाऊ, सालस आणि लाघवी त्यांच्या पत्नी शबाना. ज्या वेळी माझा अभ्यासाचा विषय जमलेल्या स्त्रियांना समजला, तेव्हा अगदी एकमुखानं सर्वजणी म्हणाल्या, ‘‘तुम्ही योग्य घरी आला आहात. कारण आमची शबाना पाककलेत तरबेज आहे.’’ योगायोगानं त्यांच्याकडे नुकतीच काही मिष्टान्नं बनवली होती. दुधेडी, मलिदा, खजुरे वगैरे.. यातील दुधेडी आणि मलिद्याचा स्वाद अप्रतिम होता. ‘‘हा मलिदा तांदळाच्या पिठापासून बनवला जातो आणि त्याची कृतीही गुंतागुंतीची आहे. त्यामुळे मलिदा बनवताना खूप संयम हवा,’’ एका बाईंनी शबाना यांना दुजोरा दिला. दुधेडी हा साधारण शंभर वर्षांहूनही अधिक जुना असा पदार्थ. तो सध्या क्वचितच कुठे तरी बनवला जातो.
माझ्या प्रवासात मला भावलेल्या काही स्त्रियांपैकी या काही जणी. त्यांच्यातला आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी वाखाणण्याजोगीच होती. त्या परिपूर्ण होत्या आणि स्वत्व जपत, संस्कृतीचा वारसा जतन करत गावच्या कल्याणासाठीही झटत होत्या.
वरई/वरीचा शिरा
वरई भरडून त्याचा रवा करून घ्या. तयार रवा तुपावर भाजून घ्या. जितका घेतला असेल, त्याच्या तीन पट पाणी उकळून आधणातच गूळ, वेलची, नारळाचा चव घाला. त्यातच भाजून ठेवलेला रवा घालून शिजवून घ्या.
कांगची खीर
कांग (राळा) तुपावर भाजून घ्या. त्यात कांग धान्याच्या चौपट गरम पाणी घ्या. गूळ, वेलची पूड घालून शिजवून घ्या. शेवटी गॅस बंद करून खिरीप्रमाणे दूध घालून घ्या.
आयतोली
तांदळाचं पीठ, यीस्ट, मीठ घालून रात्रभर पीठ भिजवून ठेवावं. सकाळी गूळ, खोबरं घालून मिश्रण तयार करून ते तव्यावर घावनपेक्षा जाडसर पसरवून भाजून घ्यावं.
दुधेडी
नारळाचं दूध काढून त्यात गूळ विरघळवून घ्यावा. त्यात तांदळाचे पीठ घालून एकत्रित करावं. चूल/गॅसवर पातेल्यात ठेवून हे मिश्रण चांगलं घोटावं. नंतर तूप लावलेल्या थाळीवर मिश्रण थापून त्याच्या वडय़ा पाडाव्यात.
कालव्यांचं कालवण
कालवं समुद्रातल्या दगडांना घट्ट चिकटून असतात. ती काढून विळय़ानं फोडून आतला मासा काढून घेतात. कालवं स्वच्छ धुऊन, गरम तेलात लसूण, कांदा, आंबट (चिंचेच्या कोळाप्रमाणे आंबट काही तरी), हिरवी मिरची, आगरी मसाला, मीठ, वगैरे साहित्य घालून कालव्यांचं कालवण करतात. (हा मासा उष्ण, चिपचिपीत असल्यामुळे याची इतर माशांप्रमाणे साठवण केली जात नाही.)