जाणीवपूर्वक निघण्याच्या ठिकाणात अडकलेलं आपलं सगळं काही निगुतीनं सोडवता यायला हवं. पायात पाय नको. यातलं त्यात नको. पूर्णविराम, कितीही दु:खद वाटला तरी देता यायला हवा.
निरोप.. गेल्या वर्षांचा! त्या वर्षांतल्या अनेक गोष्टींचा. नात्यांचा. नाती.. फक्त वैयक्तिक नाहीत. तुम्ही सगळेसुद्धा माझ्या नात्यातलेच आहात आता. इतके दिवस मी या स्तंभातून बोलते आहे. तुम्ही ऐकलंत. तुमचंही किती काय मला वेगवेगळय़ा मार्गाने कळवत राहिलात, सांगत राहिलात. आपली निरोपाची वेळ जवळ आली आहे का.. हुरहुर वाढते आहे. गेल्या वर्षांबरोबर बरंच काही संपतं आहे. जे संपलं त्याचं आयुष्य तेवढंच होतं अशी स्वत:ची समजूत घालते आहे मी.. ज्याचं आयुष्य अजून शिल्लक आहे. ते पुढे चालू राहील, जुनं असलं तरी. काहीही झालं तरी तुमच्याशी बोलण्याची, त्यानिमित्तानं स्वत:पाशी यायची छान सवय लावली मला या स्तंभानं. त्या सवयीचा निरोप घ्यायचा नाही मला. आयुष्यात काही निरोप सक्तीचे असतात, घ्यावेच लागतात. पण काही निरोपांमध्ये सूटही मिळते. जाणार जाणार वाटणारं माणूस फिरून परत येतं. पण काही वेळा येतही नाही. जातंच..
निरोपाची वेळ नेहमीच अवघड वाटत आलेली आहे मला. जाणाऱ्या माणसाचा कायमचा निरोप तर जीव जडावतोच, पण आवडत्या माणसाचा, जागेचा थोडय़ा दिवसांपुरता घेतलेला निरोप पण सैरभैर करतो मला. मी राष्ट्रीय नाटय़ विद्यालयात जायला निघाले तेव्हा पहिल्यांदा माझ्या गावचा, पुण्याचा निरोप घेऊन दिल्लीला जायची वेळ आली. त्या पुण्याच्या निरोपाची मला काही केल्या सवयच झाली नाही. विद्यालयात असतानाच्या तीन वर्षांच्या काळात मी जितक्यांदा पुण्यात सुट्टीला आले तितक्यांदा पुन्हा दिल्लीला निघताना तितकीच रडले. तो पुण्याचा निरोप असायचा तसाच पुण्यातल्या माणसांचाही निरोप असायचा. काही काळापुरता का असेना, आई, बाबा, माझा भाऊ जय, माझा नवरा संदेश यांचा तो निरोप असायचा. जायच्या दिवसाआधी पूर्ण आठवडा संध्याकाळचे माझे डोळे पाणावायचे. दिल्लीला पोचल्यानंतरही कितीतरी दिवस दिल्लीच्या आकाशात मी पुण्याचं आकाश शोधत राहायचे. पुणे स्टेशनातनं माझी ट्रेन दिल्लीच्या दिशेनं निघायची. प्लॅटफॉर्मवर माझे जीवाभावाचे सगळे हात हलवत उभे असायचे. निरोपाचा हात! माझं किती काय काय त्या हलणाऱ्या हातांमध्येच अडकलेलं असायचं. मीही हात हलवत असायचे. त्यांच्या, माझ्या हातांमध्ये आम्हाला सोडणारी एक अदृश्य लवचीक दोरी आहे असं वाटायचं. जी ताणून ताणून दिल्लीपर्यंत येईल. गाडी लांब जात जायची आणि माझे जीवाभावाचे सगळे प्लॅटफॉर्मच्या गर्दीत मिसळत मिसळत दूर जात, लहान होत होत दिसेनासे व्हायचे. मला हरवल्यासारखं व्हायचं. ‘खूप काही महत्त्वाचं पुण्यातच राहून गेलं आहे आता दिल्लीत कसं होणार माझं,’ असं वाटायचं. आता दिल्लीच्या दिवसांकडे बघते तेव्हा वाटतं, ती तीनही र्वष माझ्यातली अर्धीमुर्धी ‘मी’च फक्त तिथे जात राहिले का.. बऱ्याचशा अध्र्यामुध्र्या मला पुण्यातच सोडून? आता वाटतं, त्यावेळी पुण्याचा निरोप जास्त समजुतीनं घेता यायला हवा होता मला. म्हणजे मी जास्त पूर्णपणे दिल्लीला जाऊ शकले असते. जिथं जाऊ तिथलं होता यायला हवं. दिल्लीला जाताना बरंचसं पुणंच तिथे न्यायचं, हा दिल्लीवर अन्याय आहे. नुसतं ठिकाणाचंच नाही, मोठं होता होता अनेक गोष्टींचे निरोप अपरिहार्यपणे घ्यावेच लागलेत मला, प्रत्येकालाच लागतात. मला माझ्या प्रत्येक नाटक, मालिका, चित्रपटाचा शेवटचा दिवस असाच अस्वस्थ करतो. आता ठिकाणांचे, माणसांचे, नाटक-चित्रपटांच्या कुटुंब झालेल्या युनिटस्चे निरोप घेता घेता एक फार कटाक्षानं जाणवतं आहे, निरोप संपूर्णपणे नीट घेता यायला हवा. जाणीवपूर्वक निघण्याच्या ठिकाणात अडकलेलं आपलं सगळं काही निगुतीनं सोडवता यायला हवं. पायात पाय नको. यातलं त्यात नको. पूर्णविराम, कितीही दु:खद वाटला तरी देता यायला हवा. हे सगळं आत्ता नव्यानं जाणवण्याचं कारण म्हणजे एक चित्रपट. असगर फरहादी नावाच्या दिग्दर्शकाचा. त्याचं नाव ‘द पास्ट’. अहमद आणि मारी या जोडप्याची ही कथा. त्यांचं आपसात पटत नाही. त्यामुळे ते चार र्वष एकमेकांपासून वेगळे राहात आहेत. मारी फ्रान्समध्ये, अहमद तेहरानमध्ये. वेगळे राहात असूनही त्यांनी रीतसर घटस्फोट घेतलेला नाही. पण आता मारीला तो घ्यायचा आहे. म्हणून ती अहमदला त्यासाठी तेहरानहून बोलावून घेते. खरं तर आताच्या काळात घटस्फोटासाठी यावं लागत नाही, कागदपत्रं पाठवून सह्य़ा करून दुरूनही तो घडू शकतो. तरीही मारी त्याला बोलावते. आणि तो येतो. कारण शरीरानं जरी ते एकमेकांपासून लांब राहात असले तरी त्यांचं खूप काही ‘कटू’ एकमेकांमध्ये अडकलेलं आहे. ते अडकलेलं त्यांना सोडवता आलेलं नाही. त्यामुळं त्यांचं नातं अजूनही संपलेलं नाही. ते पुढंही जात नाही. ते थिजून राहिलं आहे. मारीच्या आयुष्यात एक नवा पुरुष आला आहे. त्याचं बाळ तिच्या पोटात आहे, पण तिला नवी सुरुवात करता येत नाही. कारण त्या नव्या सुरुवातीला पूर्ण भिडण्यासाठी आधीचा निरोपही पूर्ण.. अगदी पूर्ण घ्यायला हवा. तिला वाटतं, तिचा आणि अहमदचा रीतसर घटस्फोट तिला तिच्या अहमदबरोबरच्या नात्याला पूर्णविराम द्यायला मदत करेल. घटस्फोट ही काही नुसती एक सही नसते. तिला वाटतं, ती सही कदाचित तिला मदत करेल ‘हे सगळं संपलं’ हे मनाला सांगण्यासाठी. जसं, हल्ली मी माझं कितीही जवळचं माणूस गेलं असलं तरी त्याची अंत्ययात्रा शेवटच्या क्षणापर्यंत डोळे उघडून पहाते. अगदी माझ्या माणसाचं शव सरकत्या दरवाजातून सरकत आत विद्युतधुनीपर्यंत जाऊन पुढचा खटका बसून सरकता दरवाजा पूर्ण बंद होईपर्यंत. कितीही भीती वाटली तरी मी पहाते. त्या पहाण्याने ‘आता हे माणूस कायमचं अंतरलं’ हे डोळ्यांना दिसतं, मग डोळे मनाची समजूत घालायला घेतात. घटस्फोटाची सही कदाचित असंच काहीसं करत असावी. मला माहीत नाही. पण मारी आणि अहमदची वेगळं होण्याची धडपड पहाताना वाटतं, फक्त एका सहीनं हे गुंतलेलं इतकं काही पटकन्.. तुटत असेल का.. निरोप घेणं सोपं नाही. नात्याचा तर नाहीच नाही. कित्येकदा माणसं एकमेकांबरोबर राहात असूनही एकमेकांपासून कधीच दूर निघून गेलेली असतात. जाताना एकमेकांना सांगतही नाहीत. खराखुरा निरोप घेण्यासाठी वेगळंही काही करावं लागत असेल. ते करायला हवं, नाहीतर मग त्या सहीची पण काही मदत होत नाही. जुन्या नात्याचा पूर्ण निरोप घेतला नाही तर जुने अर्धेमुर्धे हिशोब मनात उसळत राहातात. जुन्या माणसाच्या जुन्या तक्रारी नव्या नात्यातल्या नव्या माणसावर थोपवल्या जातात. आणि नवं नवं म्हणून नुकतं सुरू केलेलं नातं अकाली वृद्धत्व आल्यासारखं पुन्हा जुनंच होतं. नव्या माणसाबद्दल पुन्हा तेच सगळं वाटायला लागतं. पण आता पुन्हा सगळं मोडून नवं मांडण्याची उमेद संपलेली असते. मग ‘आहे, हे असंच असणार’ असं मानून ते जुनं झालेलं नवं नातं निभवावं लागतं. मारीला हे नको आहे. अहमदनंतर तिच्या आयुष्यात अनेक पुरुष आले आहेत, पण कुणीच टिकू शकलेले नाहीत. यावेळी मात्र हा जो नवा पुरुष तिच्या आयुष्यात आला आहे तो तिला हवा आहे, कायमचा! म्हणून त्याचं बाळ ती तिच्या पोटात वाढू देते आहे. अहमदपासून मोकळं व्हायची धडपड तिची तिलाच दमवणारी आहे. तिनं काय करायला हवं?  तिनं तिच्या निरोपापाशी थांबायला हवं..
तिच्या निमित्ताने मला माझ्याही काही निरोपक्षणांकडे पुन्हा एकदा पहावंसं वाटतं आहे. मला माझी अशी अनेक नाती आठवतायेत जी मी न सांगता बंद केलीत. माझी नात्यांचा निरोप घेण्याची पद्धत वरवर पहाता फार शांत आहे. मला भांडायची भीती वाटते. पटेनासं झालं की मी कासवासारखी अलगद पाय आत ओढून घेते. इतक्या अलगद की समोरच्याला कळतही नाही, मी नात्यातून निघून गेली आहे, मी त्या माणसाला माझ्या आयुष्यातून काढलं आहे. त्यानंतर भले मी त्या माणसाशी नीट बोलत असेन, पण मी त्या नात्यातून निघून गेलेली असते. काही दिवसांनी हळूहळू ते समोरच्याला कळतं, पण त्याला धड रागवताही येत नाही. मला माझी एक मैत्रीण म्हणाली होती, ‘‘तुला हवं तेव्हा तू शटर बंद करून घेतेस. मग आम्ही बाहेरचे कुणी आत येऊच शकत नाही तुझ्या. मग तुला हवं तेव्हाच तू ते उघडतेस. या सगळ्यात समोरच्याचा काही विचार?’’ आता ‘द पास्ट’ पाहिल्यानंतर वाटतं आहे, हे काही खरं नाही. निरोपाच्या ऐन मोक्याच्या क्षणी घाबरून स्वत:ला बंद करून घेणं काही खरं नाही. हे न सांगता निघून जाणं आहे. निघताना ‘जाते’ म्हणणं कितीही अवघड वाटलं तरी करायला हवं. त्या म्हणण्यात एक जबाबदारी घेणं आहे, नात्याची आणि त्या नात्याच्या संपण्याचीही! या सगळय़ात पुन्हा स्वत:पाशी यावं लागेल. मारीला, तसंच मलाही. प्रत्येक निरोपक्षण एक आरसा घेऊन आपल्यासमोर येतो. तो आरसा आपल्याला हवं तेच आपलं रूप आपल्याला दाखवेल असं नाही, पण ती एक संधी घ्यायची का त्या निरोपक्षणाला घाबरून अर्धामुर्धा निरोप घेऊन काही अर्धमूर्ध त्या क्षणापाशीच ठेवून, काही अर्धमूर्ध कसंबसं घेऊन पुढे जायचं?
मी ती संधी घेणार आहे. मी त्या आरशात पाहाणार आहे.