किती आवडतं लोकांना काही खळबळजनक घडलेलं जाणून घ्यायला..! आपापसात संवादाला विषयही मिळतो. जरा कुठे आवाज आला की खिडकीबाहेर डोकावतो. मग ती मिरवणूक असू दे, नाहीतर भांडण असू दे. समजायला पाहिजेच. कसला आवाज झाला. लगेच विचारतात. ‘काय झालं? क्या हुआ?
परवाची गोष्ट.! दुपारची वेळ होती. मी सहज म्हणून घराच्या बाहेर आले. समोरच्या बिल्डिंगकडे नजर गेली तर काय..! दुसऱ्या मजल्यावरच्या घराच्या बाल्कनीत- म्हणजे खिडकीला हल्ली वाढवलेली छोटीशी बंदिस्त जाळीदार बाल्कनी असते ना, तर तशा बाल्कनीत- एक स्त्री होती आणि काही खटपट करत होती. त्या खिडकी कम बाल्कनीत घरातील एसीचा बाहेरचा भाग होता. ती बाई खिडकीची काच उघडायचा प्रयत्न करत होती. मला अर्थातच उत्सुकता वाटली. म्हणून मी विचारलं, ‘काय झालं?’ तर ती म्हणाली, ‘खिडकीच्या काचा बाहेरून पुसायला म्हणून बाहेर आले. पुसता पुसता खिडकी लॉक झाली. आणि मी बाहेर अडकून पडलेय. पिंजऱ्यात अडकल्यासारखी.’ अरे..! हे तर काहीतरी खळबळजनक घडत होते.
मी तिला खालून ओरडून विचारलं, ‘घरात कुणी नाही का?’ ती म्हणाली, ‘नाही ना!’ आता आली का पंचाईत..! ती बाई खरोखरच अडचणीत सापडली होती. कारण खिडकी लॉक झाली की बाहेरून उघडता येत नाही. मग मी तिला विचारले, ‘घरची किल्ली नाही का शेजारी?’ ती म्हणाली, ‘आहे’. मला एकदम हुश्श झालं. कोणीतरी घराची किल्ली घेऊन घर उघडलं, खिडकी उघडली तर ती बाई आत जाऊ शकणार होती. दोन मजले चढणार कोण? मग मी रस्त्यावरून जाणाऱ्या एका लहान मुलाला त्या बाईच्या शेजारणीकडे जायला सांगितलं. तो लहान मुलगा शेजारणीच्या मुलाच्या नावाने मोठय़ाने हाका मारू लागला.
दुपारची वेळ, काहीतरी खमंग घडतंय, याचा वास येऊन लगेच रस्त्यावर चार माणसं गोळा झाली. त्या बाईची शेजारीण खिडकीतून डोकावली. तिला काय झालंय ते ओरडून सांगितलं, आणि अडकलेल्या बाईच्या घराचं दार उघडायला सांगितलं. ती तत्परतेने गेली. पण हाय रे दैवा. अडकलेल्या बाईनं सेफ्टी डोअरची कडी आतून लावून घेतली होती. आता काय करायचं? दुपारचं रणरणतं ऊन.. अडकलेल्या बाईला आता प्रसंगाचं गांभीर्य लक्षात येऊ लागलं. कशी सुटका होणार आपली? तोपर्यंत काय झालं? काय झालं? करत रस्त्यावर गर्दी वाढू लागली. कोणी म्हणू लागलं, ‘काचा फोडा’. ती अडकलेली बाई काचा कशी फोडणार? तोपर्यंत कुणी म्हणालं, ‘फायर ब्रिगेडला बोलवा.’ खाली जमलेल्या गर्दीत गप्पा सुरू झाल्या होत्या. असंच कुणाचं तरी कुणीतरी कसं अडकलं होतं, मग फायर ब्रिगेडच्या लोकांनी कशी सुटका केली हे सांगू लागलं. तोपर्यंत एक जण म्हणाली, ‘एवढी का हौस होती खिडकीच्या काचा बाहेरून साफ करायची? एवढं समजत नाही का, खिडकी लॉक होते म्हणून..’ काही जणी त्या बाईला दोष देऊ लागल्या. ती बाई घायकुतीला आली होती. तोपर्यंत एकीनं सांगितलं, ‘काचांवर जोरजोरात बुक्के मारा.’ अडकलेली बाई जोराजोरात बुक्के मारू लागली.. आणि काय आश्चर्य! चक्क खिडकी उघडली गेली. मग ती बाई आत गेली. हुश्श.! इतका वेळ चाललेल्या नाटय़ावर पडदा पडला. पण तो प्रसंग चघळायला एक विषय पुरवून गेला. कसा असतो ना मानवी स्वभाव..! केवढी उत्सुकता असते..! जरा कुठं खुट्ट झालं की मनात लगेच विचारांचे तरंग येतात. ‘काय झालं? क्या हुआ?’
सांगायची गोष्ट म्हणजे उत्सुकता ही सापेक्ष असते. नकारात्मक घटनांबद्दल उत्सुकता जरा जास्तच असते. मध्यंतरी आमच्या इथे एका डॉक्टरने एक्स रे क्लिनिक काढले. तेव्हा पूजा वगैरे झाली. कसली गर्दी म्हणून जरा डोकावले, तेव्हा कळलं क्लिनिक सुरू झालं. काही दिवस गेले. एक दिवस त्या क्लिनिकच्या पुढे गर्दी.. लगेच उत्सुकता. काय झालं? काय झालं? गर्दीही खूपच होती. गर्दीला रेटून पुढे जाऊन बघितलं, तर चक्क पोलीस होते. ‘काय प्रकार आहे? काय झालं? क्या हुआ?’ म्हणून शेजारी उभ्या असलेल्या अनोळखी व्यक्तीला विचारलं, ‘ये डॉक्टर सोनोग्राफी से प्रेग्नंट औरतों को लडका है, या लडकी है ये बताता है ना, इसलिये पुलिस ने अॅरेस्ट किया!’ अरे बापरे! भलतीच खळबळजनक बातमी..! संध्याकाळी मी तिखटमीठ लावून घरच्यांना सांगितली.. अगदी धन्य धन्य वाटलं.. त्या घटनेची मी साक्षीदार होते ना.. काय मजा असते ना. जिथे गर्दी दिसते, तिथे एक उत्सुकता असते ‘काय झालं?’ हे समजून घेण्याची. समजा, एकदा कोणी प्रवचन देतोय हे कळलं तर आपण धडपड करत पुढे जाणार नाही. पण तेच निदर्शनं चाललीयेत, गडबडगोंधळ चालू आहे, तर आपण पुढे जाऊन काय झालं ते बघू. आपल्या मनाला खळबळजनक बातमीची ओढ असते.
आपलं नेहमीचं चाकोरीबद्ध, सरळसोट आयुष्य.. कुठेही काही घडत नाही असं.. किती कंटाळवाणं असतं..! पण आपल्या सुदैवानं असं कायम राहत नाही. निसर्गाचा नियमच आहे हा..! चार दिवस सुरळीत गेले की पाचव्या दिवशी हमखास काहीतरी घडतंच. कुठे अचानक हवेत बदल होतो.. कुठे पाइपलाइन फुटते.. कुठे संप होतात.. कुठे आगी लागतात.. पण काहीतरी वेगळे घडतेच. गेल्याच आठवडय़ात दुपारी मला पाठीमागच्या बिल्डिंगमधून बाईच्या रडण्याचा आवाज आला. ‘अरे कोई है, अरे कोई है?’ मी लगेच कान टवकारले. काय चाललंय? परत एकदा तो आवाज. पाठीमागच्या बिल्डिंगमधल्या दुसऱ्या मजल्यावरच्या बाथरूममधून.. माझ्या मनात ‘काय झालं? काय झालं?’ शब्द घुमू लागले. हिला कुणी कोंडून तर ठेवलं नाही ना? मोठय़ाने विचारले, ‘क्या हुआ?’ तर त्या बाईने बाथरूममधून रडत रडत सांगितलं, ती बाथरूममध्ये अडकली होती. तिचं पाच महिन्यांचं बाळ बाहेर पाळण्यात रडत होतं. ती बाथरूमच्या आत गेली. तिच्या तिसरीतल्या मुलीला लक्षात आलं नाही. मुलीने बाथरूमला बाहेरून कडी घातली आणि बाहेरचा मुख्य दरवाजा ओढून टय़ूशनला निघून गेली. दरवाजा लॉक झाला. मी त्या बाईकडून तिच्या नवऱ्याचा फोन नंबर घेतला, पण तो कुल्र्याला होता. आता काय करायचं? तोपर्यंत बाळाने भूक लागल्याने रडून आकांत केला होता. बाथरूममधून बाईचं रडणं.. तोपर्यंत कुणी चावी बनवून देणाऱ्याकडे गेलं होतं. अर्थात त्याला वेळ लागला. तोपर्यंत बाळ रडून दमल्यामुळे बहुतेक झोपलं होतं, आणि बाथरूममध्ये त्या बाईनं बाळाच्या रडण्याचा आवाज का येत नाही, त्याला काय झालं? म्हणून आणखीनच गळा काढला.. शेवटी एकदाचं दार उघडलं..! तोपर्यंत रस्त्यात ही गर्दी.. प्रत्येक जण विचारतोय, ‘काय झालं? काय झालं? क्या हुआ?’ केवढी ती उत्सुकता..!
किती आवडतं लोकांना काही खळबळजनक घडलेलं जाणून घ्यायला..! आपापसात संवादाला विषयही मिळतो. जरा कुठे आवाज आला की खिडकीबाहेर डोकावतो. मग ती मिरवणूक असू दे, नाहीतर भांडण असू दे. समजायला पाहिजेच. कसला आवाज झाला. काही लोकांची घ्राणेंद्रिये जरा तीक्ष्णच असतात. कुठल्याही बातमीचा वास त्यांना लगेच लागतो. त्यातल्या त्यात बायकांचं नाक जरा जादाच तीक्ष्ण असतं. त्यांना ऑफिसातल्या मैत्रिणींच्या, शेजारणींच्या चेहऱ्यावरूनही जर त्यांचं काही बिनसलं असेल तर कळतं. लगेच विचारतात. ‘काय झालं? काय झालं?’ भले तुम्ही घरच्या गोष्टी चार भिंतींच्या आड दडपण्याचा प्रयत्न करा. पण हे विसरू नका. भिंतीला कान असतात. सगळीकडे हुंगणारी, बातमीचा वेध घेणारी नाकं असतात. काय झालं? का झालं? कसं झालं? का झालं? कुठे झालं? कुणी केलं? हे प्रश्न पडणारच! ब्रेकिंग न्यूज मिळणारच.! मानवी स्वभावच तो गप्प बसणार थोडाच!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा