संमतिवय अर्थात शारीरिक संबंध ठेवण्यास कायद्याने परवानगी असण्याचे वय किमान १८ असेल तर याचा अर्थ आपण मुलांना ‘फ्री डेटिंग’ करायला परवानगी देत आहोत का? त्याच्यासाठी पालक म्हणून आपली तयारी आहे का? सिंगल मदर, डेट रेपसारख्या घटना आपण स्वीकारू शकणार आहोत का? त्यातून आपल्या मुलांच्या शारीरिक, भावनिक गुंत्याचं काय?.. वळणवाटांवरल्या या तारुण्याला आपण कसा योग्य मार्ग दाखवणार?
संमतिवय म्हणजे नेमके काय? तर शारीरिक संबंध ठेवण्यास कायद्याने परवानगी असण्याचे वय.. येऊ घातलेली कायद्यातील सुधारणा ‘बलात्कार’ या गुन्ह्य़ाशी निगडित असली तरी त्यातील ‘संमतिवय’ हा वेगळा मोठा, महत्त्वाचा तसेच आपल्या अगदी उंबरठय़ावर येऊन ठाकलेला विषय आहे. याची दखल न घेणे कोणालाच परवडणारे नाही. संमतिवय म्हणजे शरीरसंबंध ठेवण्याचा निर्णय घेता येण्याची क्षमता अंगी येण्याचे किमान वय असा सर्वसाधारण अर्थ आहे. म्हणजेच संमतिवयावरील मुलांना त्यांनी शरीरसंबंध ठेवावेत की नाही, कोणाशी व कसे ठेवावेत याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मिळते. त्यासाठी पालकांच्या, समाजाच्या परवानगीची त्यांना गरज नाही. त्यांना कोणी अडवू शकत नाही. तसेच त्यांच्याबरोबर शरीरसंबंध ठेवणाऱ्या व्यक्तीविरुद्ध अपहरण, बलात्कार अशा कलमांखाली – खुद्द त्या मुलाने/ मुलीने तक्रार केल्याशिवाय गुन्हा नोंदवता येत नाही. संमतिवय आणि लग्नाचे किमान वय शक्यतो एक असावे हे तर्काला धरून असले तरी संमतिवय हे केवळ मुक्त शरीर संबंधापुरते मर्यादित आहे तर लग्न दोन व्यक्तीमधील दीर्घकालीन बांधीलकी, भावनिक बांधीलकी, जोडीदारांचे परस्पर हक्क व जबाबदारी या सर्वाशी निगडित आहे.
संमतिवयाच्या निमित्ताने ज्यांना ‘टीनएज’ मुले- मुली आहेत अशा पालकांशी, या वयातील मुलांशी जवळून संबंध येणाऱ्या शिक्षकांशी, समुपदेशकांशी बोलताना असे लक्षात आले की मुलांचे मुक्त शरीरसंबंध, पालकांपासून लपवून जरी असले तरी खूप मोठय़ा प्रमाणात सुरू आहेत. बऱ्याच सुशिक्षित पालकांनी याबाबतीतला आपला हतबलपणा लक्षात घेऊन ‘समजूतदार’ भूमिका घेतली आहे. याबाबतीत मुलांना आता स्वातंत्र्य द्यायला हवे हे त्यांना मान्य आहे आणि मुलांना विरोध करण्यापेक्षा त्यांना योग्य ते ‘शिक्षण’ द्यावे असे मत दिसले. थोडक्यात काय तर, पाश्चात्त्य देशांप्रमाणे आपल्या मुलांना ‘फ्री डेटिंग’ करायचे आहे. वयाच्या १०व्या-१२व्या वर्षांपासूनच ‘स्टेडी रिलेशनशिप’मधील ‘गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड’ असण्याची गरज भासू लागली आहे. ही मानसिक-शारीरिक गरज (बौद्धिक म्हणावे किंवा नाही हे मला अजून समजलेले नाही.) योग्य की अयोग्य, याची कारणे काय, त्यावर उपाय काय हा पूर्ण वेगळा विषय तर आहेच, पण तो खासगी व वैयक्तिक आहे. या विषयावर कुणाचेही एक मत असणे शक्य नाही.
‘डेटिंग’ म्हणजे मुलामुलींमधील फक्त मोकळी मत्री एवढेच नसून त्यात प्रेमसंबंध/ शरीरसंबंध अध्याहृत आहेत. डेटिंग साधारणपणे एक मुलगा-एक मुलगी अशा स्वरूपाचे असते. कपल डेटिंग, ग्रुप डेटिंग, ब्लाईड डेटिंग असे अनेक प्रकारही रूढ आहेत. पाश्चात्त्य देशांमधून डेटिंग करण्याचे वय आणि संमतिवय सारखेच मानले आहे. वेगवेगळ्या देशांतून १६ ते १८ असे संमतिवय असल्याची माहिती इंटरनेटवर मिळते. अशा प्रकारच्या डेटिंगमधून होणाऱ्या भरपूर समस्या पाश्चात्त्य कुटुंबांना भेडसावत आहेतच. (सध्या टीव्हीवर दिसणाऱ्या परदेशी सिटकॉम्समधून त्याचेही दर्शन घडते आहे.) डेटिंगला परदेशातही कमी प्रमाणात असला तरी विरोधही आहे. डेटिंगमध्ये अतिशय कोवळ्या वयापासून मुलामुलीची बौद्धिक आणि मानसिक शक्ती हवे ते ‘बॉयफ्रेंड’ आणि ‘गर्लफ्रेंड’ मिळवण्यात खर्च होत राहते. अमुक एका व्यक्तीची ‘बॉयफ्रेंड’ किंवा ‘गर्लफ्रेंड’ असणे हा स्टेटस सिम्बॉल होतो. फेसबुकवर ‘इन रिलेशनशिप’ आणि ‘सिंगल’ असल्याची सतत जाहिरात होत असते. एकीकडे ‘रिलेशनशिप’ तर हवी असते, पण ती टिकवण्यासाठी लागणारी ‘कमिटमेंट’ करण्याची क्षमता किंवा इच्छा किंवा दोन्ही नसू शकते. अनवेड मदर्स – अविवाहित माता – विशेषत: टीनएज वयातल्या- ही समस्या त्यांच्या समाजाने पचवली आहे. अविवाहित माता पाश्चात्त्य समाजात आता सामावली जाते. काही पालक आपल्या मुलीला व नातवालाही कुटुंबात सामावूनही घेतात, पण म्हणून त्यातून निर्माण होणाऱ्या भावनिक/ मानसिक समस्यांचे निराकरण होते असे नाही. आजही तेथे अविवाहित मातांसाठी चालवलेल्या हेल्पलाइन, सपोर्ट ग्रुप्समधून त्यांना, त्याच्या कुटुंबीयांना होणारा भावनिक-मानसिक त्रास स्पष्ट दिसून येतो. बहुतांशी अविवाहित मातेवरच मुलाची जबाबदारी असते. जेथे मुलाला जन्म दिला जातो पण मुलाचा सांभाळ करण्यास अविवाहित माता असमर्थ असते तेथे शासनाकडून मासिक आर्थिक मदत दिली जाते. मुलाविषयी कवडीचे प्रेम नसून केवळ त्या मुलामुळे मिळणाऱ्या आर्थिक लाभापायी देखील काही माता मुलाला ठेवून घेतात किंवा ‘अनवेड मदर’ होण्याचा पर्याय चरितार्थाचे साधन म्हणून स्वीकारतात अशीही उदाहरणे आहेत. सिंगल पेरेंटिंगच्या समस्या कोवळ्या वयात अर्थातच झेलता येत नाहीत. आई-वडिलांना नको असलेल्या मुलांना ‘फोस्टर केअर’चा पर्याय असतो. फोस्टर केअरमध्येही मुलांचा छळ, आबाळ, खूनही झाल्याची उदाहरणे आहेत. अनेक शोधअभ्यासातून अशा मुलांवर सर्वतोपरी वाईट परिणाम झाल्याचे निष्कर्षही काढण्यात आले आहेत.
आई-वडील दोघांनाही नको असलेल्या मुलांच्या वाढत्या प्रमाणामुळे (चाईल्ड पॉवर्टी) ‘लहान मुलांमधील गरिबी’ हा नवा अर्थशास्त्रीय प्रश्न आज अमेरिकेसारख्या देशामध्ये चíचला जात आहे. एकाचे मन जोडीदाराच्या प्रेमात, येऊ घातलेल्या मुलात गुंतलेले असताना दुसऱ्याने डेटिंगनंतर औपचारिकपणे विलग होणे ही नित्याची बाब आहे. डेटिंगशी निगडित गुन्हेदेखील होतच आहेत. लंगिक अत्याचार, बलात्कार, अनसíगक वा विचित्र (किंकी) शरीरसंबंध, शरीरसंबंधाचे नकळत चित्रीकरण करून ते इंटरनेटवर टाकणे, जुन्या मित्र/ मत्रिणीचा पाठलाग करणे, एकतर्फी प्रेमातून हल्ला किंवा प्रेमभंगातून वैफल्य/ आत्महत्या अशा गुन्ह्य़ाची संख्या वाढतीच आहे. डेट रेपची तक्रार लक्षात घेता डेटिंग करणाऱ्या व्यक्तीमधील वयाचा फरक, एकमेकांशी असलेले अधिकाराचे व मत्रीचे संबंध यानुसार गुन्ह्य़ाची तीव्रता नोंदवण्याची तरतूद तेथील कायद्यात केलेली आहे. अर्थात संमतिवयात मोडणारी प्रत्येकच व्यक्ती काही या चक्रातून जात नसेल, तरीदेखील या समस्या पाश्चात्त्यांसाठी चिंताजनकच आहेत.
या पाश्चात्त्य पाश्र्वभूमीवर आपल्या देशाचा विचार करायचा झाला तर आपल्या असे लक्षात येते की प्रत्येकच मुद्दय़ावर दोन देशांमध्ये प्रचंड तफावत आहे. त्यांच्याकडे लहान मुलांमधील गरिबीचा प्रश्न चíचला जातोय, तर आपण अजूनही देशाच्या गरिबीतूनच बाहेर पडलेलो नाही. मुलांच्या संगोपनाकरता शासनाकडून पुरेशी आíथक मदत मिळणे, फोस्टर केअरसारखे पर्याय राबवणे आपल्याकडे कठीणच आहे. आपल्याकडील मुलांसाठीच्या संस्थामधील त्यातला त्यात चांगला पर्याय म्हणजे बालग्राम. बाकी आश्रमशाळा, अनाथालये, रिमांड होम्स यांच्या अवस्थांविषयी चर्चा न केलेलीच चांगली.
आता काही सामाजिक-सांस्कृतिक मुद्दे. अजूनही थोडय़ा प्रमाणात का होईना पण ऑनर किलिंग्ज होत असलेल्या आपल्या देशात अविवाहित माता व त्यांच्या संततीला सन्मानाने मान्यता मिळण्याची शक्यता अतिशयच कमी आहे. सुशिक्षित घरांमधून डेटिंग मान्य झाले तरी शेवटी लग्न करताना तोलामोलाचे घराणे असणे अजूनही महत्त्वाचे असते.  विवाहापूर्वी मूल होऊ देण्यास परवानगी असण्याची शक्यता नाहीच. मुलीचा जबरदस्तीने गर्भपात करून घेणे, मूल अनाथाश्रमात टाकणे अशा अनेक गोष्टीदेखील घडतायत. ज्याविषयी आपण बोलणे टाळतोच आहोत. मुलामुलींना मुक्तपणे डेटिंग करायला परवानगी देताना पालक म्हणून आपल्या मुलीचे/ मुलाचे मूल स्वीकारण्यास आपण तयार आहोत हा विचार पालकांनीही आपल्या मनाशी करायला हवा किंवा ही जबाबदारी आम्ही घेणार नाही, तुझे तू निस्तर असे सांगण्याइतका कठोरपणा तरी हवा.
डेटिंगमध्ये शारीरिक संबंध ठेवताना एकाच व्यक्तीशी ‘कमिटमेंट’ नसल्याने ते अनेक व्यक्तींबरोबर घडू शकतात हेही मान्य करायला हवे. अनेक वैद्यकीय तज्ज्ञांशी बोलल्यावर लक्षात येते की केवळ कंडोम वापरल्याने एड्स टळतोच असे नाही. हा एक मोठा धोका पालक व पाल्य दोघांनाही पत्करावा लागणार आहे. आपल्याला पसंत नसलेल्या मुला/ मुलीशी जर आपला पाल्य डेटिंग करत असेल तर पालक त्याला विरोध करू शकणार नाहीत. पालक आणि पाल्य दोघांपकी एकाला दुसऱ्याचे मत/ अधिकार मान्य नसेल तर असा वाद न्यायालयात जाईल आणि पालकांचे हक्क विरुद्ध मुलांचे हक्क असा सरळ सामना होईल.
कायद्याच्या बाबतीत बोलायचे तर डेटिंगनंतर बलात्काराव्यतिरिक्त लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याची तक्रार मुलाविरुद्ध केली जाऊ शकते. मुलांच्या बाबतीत ‘घराण्याचा वारस’, ‘वंशाचा दिवा’ वगरे मानणारे मुलाच्या जन्मानंतर ताबा मागण्यासाठी जास्त आग्रही होऊ शकतात. अशा संततीबाबत वारसाहक्काचे प्रश्न कळीचे ठरू शकतात. बलात्काराची, लैंगिक अत्याचाराची तक्रार नोंदवायला प्रचंड धर्य लागणाऱ्या आपल्या देशात डेट रेपची तक्रार नोंदवणे सोपे नसेल. विशेषत: मुलीचे पूर्वचरित्रच खराब आहे आणि तिचे अनेकजणांशी शरीरसंबंध आहेत असा जर बचावपक्षाचा पवित्रा असेल तर! इतर काही संभवनीय गुन्हे जसे – एकतर्फी प्रेमातून हल्ला, पाठलाग इ. अमेरिकेत घडतात तसे येथेही घडू शकतीलच.  
केवळ मुलामुलींना संततिनियमनाची साधने वापरणे शिकवले, लंगिक शिक्षण दिले की या सगळ्यातून मार्ग निघेल असे वाटत नाही. कारण कडक कायदे, त्याची आपल्या देशापेक्षा जास्त चांगली अंमलबजावणी, अनुकूल समाजमन, शालेय जीवनापासून लंगिक शिक्षण असे सारे असूनदेखील पाश्चात्त्य देशांतील समस्या सुटलेल्या नाहीत. डेटिंगमुळे कोवळ्या वयात भावनांची होणारी गुंतागुंत, ती झेलण्याची क्षमता नसल्याने होणारा मानसिक त्रास, हे सारे इतक्या कोवळ्या वयात, आयुष्यातील इतक्या महत्त्वाच्या टप्प्यावर अनुभवायलाच हवे का की नाही अनुभवले तरी चालेल हेदेखील मुलांना समजावून सांगायला हवे. त्यासाठी मुलांच्या मानसिकतेवर जागरूकपणे लक्ष ठेवायला हवे. लहान वयातील ‘रिलेशनशिप’मधील भावनिक गुंतवणुकीमुळे मोठेपणी ‘रिलेशनशिप’बद्दल ‘डीसेन्सिटाइझ’ व्हायची शक्यता नाकारता येत नाही. इतक्या कोवळ्या वयात प्रेमाच्या शारीरिक नात्यांमधील चढ-उतारांना सामोरे जाण्याची आपली मानसिक व भावनिक क्षमता आहे का? यावर त्यांना विचार करायला प्रवृत्त करायला हवे.
याव्यतिरिक्त असे अजून काही मुद्दे आणि त्यांचा विस्तृत विचार शब्दमर्यादेअभावी येथे मांडणे शक्य नाही. पण काही प्रमाणात का होईना, या विषयावर आपल्या सगळ्यांच्या विचारचक्रास चालना देण्यास, या विषयावर विचारमंथन सुरू करण्यास आणि कायदा निर्मितीस हा लेख कारणीभूत झाला तरी प्रस्तुत लेखाचा उद्देश सफल झाला असे म्हणता येईल.

मुलांच्या लैंगिक संबंधांसाठी संमतिवय १८ आणि लग्न मात्र होताहेत २४-२५ वर्षांनंतर. या पाच ते सहा वर्षांच्या दरम्यान अनेक गोष्टी घडू शकतात, विशेषत: मुलांच्या शारीरिक, भावनिक आयुष्यात. कसं सांभाळणार आपण आपल्या मुलांना या काळात. या विषयावर तुमच्याकडेही काही मुद्दे, विचार, अनुभव असणारच.. १५ मे रोजीच्या जागतिक कुटुंबदिनाच्या निमित्ताने लोकसत्ता-चतुरंग – समन्वय संस्था या विषयावर आपली मते/ विचार मागवत आहे. सुमारे ५०० शब्दांत आपले विचार वा प्रतिक्रिया पुढील ईमेल/ पत्त्यावर कळवाव्या.
२१ एप्रिल २०१३ पर्यंत पाठवावेत.
‘लोकसत्ता चतुरंग’, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई, ४००७१० किंवा ईमेल करा. chaturang@expressindia.com

Supreme Court on maternity leave
दत्तक मूल तीन महिन्यांपेक्षा मोठे असल्याने मातृत्व रजा नाकारली ; सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे मागितले उत्तर
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Loksatta chaturang article Free of mobile mind result Counselor
सांदीत सापडलेले…! अवधान
Childrens day 2024 | childhood days never come back
Children’s day 2024 : बालपणीचे दिवस परत कधीही येत नाही! VIDEO पाहून आठवेल तुम्हाला तुमचे बालपण
Who is heir of Babasaheb ambedkar Gavai or Ambedkar
बाबासाहेबांचे वारसदार कोण? आंबेडकर की गवई?
Special facilities to transport disabled voters to the polling station
नागपूरकरांनो, दिव्यांग मतदारांना ‘ही’ मोफत सेवा…
Extension of the Sadanika Lottery Scheme of PMRDA Pune news
पीएमआरडीएच्या सदनिका लाॅटरी योजनेला मुदतवाढ