मनुष्यप्राणी हा शेवटच्या श्वासापर्यंत लैंगिकदृष्टय़ा सक्रिय असू शकतो, असं म्हणतात, परंतु ‘गोल्डन इयर्स’मधली मंडळी त्याविषयीचे पूर्वग्रह आणि ‘मुलं काय म्हणतील’ म्हणून कामजीवन तर सोडाच, साधं एकमेकांच्या सहवासात राहण्याचाही आनंद घेणं विसरतात. म्हणूनच मुलांनीही आपल्या आईवडिलांमधला ‘रोमान्सचा चार्म’ कायम राहावा यासाठी मदत करायला हवी. खरं तर कोणत्याही वयात सेक्सची अनुभूती घेणं ही एक कला आहे. त्यामुळे नवरा-बायकोतील नातं अधिक जवळकीचं तर होतंच, शिवाय अनेक गंभीर आजारपणापासून मुक्तीही मिळू शकते.

प्रेम, लग्न, कामजीवन, याबद्दल आपल्या मनात काही ठोकताळे असतात. उदा. वयात आलेलं मूल प्रेमात पडणार हे जसं गृहीत धरलं जातं तसंच वयाची पन्नाशी-साठी उलटली की शरीर भावना शरीरातून हद्दपार होणार हेदेखील मनात पक्कं ठाण मांडून बसलेलं असतं. पण असं खरंच असतं का? वाढत्या वयानुसार कामभावना विझून जावी याला खरंच काही आधार आहे का? नसेल, तर मग ज्येष्ठांचं कामजीवन हा विषय समाज म्हणून आपण कायमच ‘ऑप्शन’ला का टाकत आलो आहे, हा मोठा प्रश्न आहे.

Maharashtra government schemes for women,
लाडक्या बहिणींनो, कोणी तुमच्यावर उपकार करत नाही…!
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Nagpur Bench of Bombay High Court held Even with consent of minor wife physical intercourse is part of rape
अल्पवयीन पत्नीसोबत सहमतीतून शारीरिक संबंध बलात्कारच, उच्च न्यायालय म्हणाले, ‘पीडितेच्या इच्छेविरोधात…’
government that gives Rs 1500 as ladaki bahin is not doing favour to women
‘लाडक्या बहिणींनो’ कोणी तुमच्यावर उपकार करत नाही…!
sanjay bangar son gender transformation
आर्यन झाला अनाया: क्रिकेटर संजय बांगर यांच्या मुलाने केलेली ‘हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी’ची प्रक्रिया कशी होते? त्याचे दुष्परिणाम काय?
Garlic Rate, Vegetable Rate, Pune, Garlic,
लसूण महागला, परराज्यातील लसणाची आवक कमी
Commodification of beauty
स्त्री ‘वि’श्व : सौंदर्याचं वस्तूकरण
Five young women sold into prostitution with the lure of employment
नोकरीच्या आमिषाने कुंटणखान्यात पाच तरुणींची विक्री, गुन्हे शाखेकडून तरुणींची सुटका

संयुक्त राष्ट्रसंघाच्या अलीकडच्या अहवालानुसार आज आपल्या देशात साठीच्या पुढील व्यक्तींची संख्या ही १३ कोटी ९० लाख इतकी आहे. हे प्रमाण २०५० पर्यंत ३४.७ कोटींपर्यंत पोहोचणार आहे. वृद्धांची इतकी मोठी संख्या असलेल्या समाजात ‘सीनियर सेक्स’विषयी असलेले सगळे गैरसमज दूर करत ज्येष्ठांनी आणि इतरांनी ज्येष्ठांच्या सहजीवनाकडे आणि कामेच्छेकडेही निकोप दृष्टिकोनातून बघण्याची गरज आहे. मनुष्यप्राणी हा शेवटच्या श्वासापर्यंत लैंगिकदृष्टय़ा सक्रिय असतो ही वस्तुस्थिती आहे, असं विधान ओथनाईल सेदन यांनी लिहिलेल्या आणि २००७ मध्ये प्रकाशित झालेल्या Sex in the Golden Years या पुस्तकात करण्यात आलं आहे. या विधानाचं स्पष्टीकरण करताना हा लेखक नमूद करतो, की गेल्या दोन दशकांमध्ये सरासरी आयुर्मानात लक्षणीय वाढ झाली आहे. अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत बहुतेकांचा असा समज असायचा की वयाच्या पन्नाशी किंवा साठीनंतर सेक्सचं महत्त्व कमी होत जातं. या समजुतीमागचं मुख्य कारण हेच होतं की कुणी ज्येष्ठांशी या विषयावर बोलायलाच जायचं नाही. पण वाढत्या आयुर्मानामुळे ज्येष्ठांच्या सहजीवनाचा-कामजीवनाचा विचार करता ही वयोमर्यादा केवळ साठीपर्यंतच नाही, तर वयाच्या सत्तरी, ऐंशी आणि नव्वदीपर्यंत वाढलेली दिसून येते. ज्येष्ठ नागरिकांच्या वेगवेगळय़ा संशोधनांतून दिसून येतं, की उतारवयातही कामजीवन हे तितकंच महत्त्वाचं आणि आनंददायी राहू शकतं.
एकीकडे पाश्चात्य संशोधक ‘गोल्डन इयर्स’मधल्या कामजीवनाचा अभ्यास करत त्याला प्रोत्साहन देत असताना आपल्याकडे मात्र या विषयाकडे अतिशय संकुचित दृष्टिकोनातून पाहिलं जातं का, असा प्रश्न पडतो.

काऊन्सिलिंग सायकॉलॉजिस्ट इरावती महाजन आपल्याकडे समुपदेशनासाठी आलेल्या एका मध्यमवयीन जोडप्याविषयी माहिती देताना सांगतात, ‘‘या जोडप्याच्या लग्नाला २७ वर्ष झाली होती. पतीचं वय ५०, तर पत्नीचं वय ४७ होतं. त्यांना मोठी मुलं होती आणि ती शिक्षण-नोकरीनिमित्त परगावी राहायची. त्यांचा नेमका प्रश्न काय आहे हे त्यांना स्वत:लाही मांडता येत नव्हतं. एकमेकांविषयीच्या किरकोळ स्वरूपाच्या तक्रारी ते सांगत होते. त्यांना समुपदेशनामधून नेमकी काय मदत हवी होती ते समजत नव्हतं. मी त्यांना त्यांच्या कामजीवनाविषयी विचारल्यावर बायको म्हणाली, की पाच खोल्यांच्या मोठय़ा घरात गेल्या चार वर्षांपासून ते दोघं वेगवेगळय़ा खोल्यांत राहातात. मुळात ते वेगवेगळय़ा खोल्यात का राहायला लागले, हे विचारल्यावर त्यांना कोणताच प्रसंग, भांडण किंवा अमुक एक घटना अशी आठवत नव्हती. कामजीवनाचं सोडा, ते कोणतीच गोष्ट एकत्र, जोडीनं करत नव्हते. जेवण, टीव्ही बघणं, बाजारहाट, बाहेर फिरायला जाणं, मित्रमैत्रिणींना भेटणं, अशा सर्व ठिकाणी ते एकेकटे जायचे. गेल्या अनेक दिवसांत एकमेकांशी कामाशिवाय ते बोललेही नव्हते. साधं भांडण करूनही त्यांना अनेक दिवस झाले होते. समुपदेशनाच्या तिसऱ्या सेशनमध्ये त्या बाईंनी सांगितलं, की त्यांना पतीपासून घटस्फोट हवा आहे. कारण त्यांना आता या नीरस जीवनाचा कंटाळा आला आहे.’’

अमेरिकेत झालेल्या एका संशोधनानुसार ६० ते ६४ या वयोगटातील ८७ टक्के पुरुष आणि ८९ टक्के स्त्रिया लैंगिकदृष्टय़ा सक्रिय आहेत. वाढत्या वयानुसार हे प्रमाण कमी होताना दिसत असलं तरी ‘सहस्रचंद्रदर्शन’- म्हणजेच वयाची ८० पार केलेले २९ टक्के पुरुष आणि २५ टक्के स्त्रिया या लैंगिकदृष्टय़ा सक्रिय असल्याचं दिसून आलं.

साठीनंतरही शरीरसंबंधांचा आनंद घेणाऱ्या आणि त्यामुळे अपराधगंडानं पछाडलेल्या एका जोडप्याविषयी सांगताना फॅमिली फिजिशियन डॉ. अमित थत्ते सांगतात, ‘‘या जोडप्याचं वय पासष्टीच्या आसपास आहे. त्या दोघांमध्येही कामेच्छा उत्तम आहे. मुलगा-सून नोकरीवर आणि नातवंडं शाळेत गेली की सकाळच्या वेळेत त्यांना एकांत मिळतो. त्या वेळी ते संबंध ठेवतात. शरीरसंबंध या वयातही हवेहवेसे वाटतात, हे नॉर्मल आहे का? मुलाला-सुनेला कळलं तर काय? अशी भीती त्यांच्या मनात होती. त्यांची ही भीती अनाठायी आहे, हे त्यांना समजावून सांगितलं. बऱ्याचदा अपराधगंडामुळे किंवा चुकीच्या समजुतींमुळे ज्येष्ठांमधील कामजीवनामध्ये खंड पडतो. वास्तविक सेक्समुळे डोपामाइन, ऑक्सिटोसिन ही ‘हॅपी हार्मोन्स’ स्रवतात. त्यामुळे आनंद मिळतो. सेक्सची अनुभूती घेणं ही कला आहे.’’

मुलांनी आपल्या ज्येष्ठ आईवडिलांना गृहीत धरू नये, त्यांच्या एकांताचा आदर करावा, हा मुद्दा अधोरेखित करताना डॉक्टर नीलिमा सांगतात, ‘‘नातवंडं मोठी झाली, की ती आजीआजोबांच्या खोलीत झोपणार, हा बहुतेक घरांतला पायंडा असतो. पण स्वत:च्या एकांताचा विचार करताना आपल्या आईवडिलांच्या सहजीवनाचा-एकांताचा विचार आणि आदर मुलांनी-सुनांनी करायला हवा. तसंच सेक्स म्हणजे फक्त संभोग, हा संकुचित विचार न करता ज्येष्ठांनी श्रृंगार, प्रणय यांचा विचार करावा.’’

डॉ. विठ्ठल प्रभू लिखित ‘प्रश्नोत्तरी कामजीवन’ या पुस्तकात ‘साठी-सत्तरीनंतर संभोग केल्यास प्रकृतीस अपाय होतो का?’ या प्रश्नाचं उत्तर देताना डॉ. प्रभू नमूद करतात, की संभोगामुळे कोणत्याही वयात प्रकृतीस अपाय होत नाही. उलट व्यायामाप्रमाणे शरीरास फायदा होतो. सुमारे १५० उष्मांकाचा व्यय होतो. रजोनिवृत्तीनंतर स्त्रियांमध्ये योनीमार्ग कोरडा होण्याची समस्या उद्भवते. यावर जेलीसारख्या वंगणाचा वापर करण्याचा सल्ला डॉ. प्रभू देतात.

‘अमेरिकन युरॉलॉजिकल असोसिएशन’च्या २०१५ मध्ये झालेल्या वार्षिक अधिवेशनात उपस्थित संशोधकांनी एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं होतं. यानुसार कामजीवनात सक्रिय असलेल्या पुरुषांमध्ये आणि विशेषत: ज्येष्ठांमध्ये प्रोस्टेट कर्करोगाचा धोका कमी असतो.

यशस्वी कामजीवनाचं रहस्य उलगडताना नागपूरमधील सेक्सॉलॉजिस्ट आणि ‘काउन्सिल ऑफ सेक्स एज्युकेशन अँड पॅरेंटहूड इंटरनॅशनल’ या संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ. संजय देशपांडे सांगतात, ‘‘वापर करा किंवा घालवा (Use it or lose it) हे सूत्र कामजीवनालाही लागू पडतं, हे जोडप्यांनी समजून घ्यायला हवं. केवळ वय वाढलंय किंवा लोक काय म्हणतील, या मानसिकतेमुळे शरीरसंबंध ठेवलेच नाहीत तर सेक्सची इच्छा कमी होऊ शकते. अशी जोडपी फॉरेन ट्रिपा वगैरे करतात, पण सेक्स मात्र करत नाहीत. वास्तविक निवृत्तीनंतर मोकळा वेळ असतो. त्यामुळे रोमान्सचा चार्म हा जोडप्यांनी प्रयत्नपूर्वक जपायला हवा. नैराश्य-एकटेपणा यावरही यामुळे मात करता येऊ शकते. कामजीवन उत्तम असलेल्या जोडप्यांमध्ये हृदयविकार, मधुमेह, प्रोस्टेटचे विकार, गर्भाशयमुखाचा कर्करोग, या व्याधींचं प्रमाण कमी असल्याचं वेगवेगळी संशोधनं सांगतात. संबंधांमध्ये तोचतोचपणा जाणवत असेल, तर दर वेळी बाहेरगावी जायची गरज नसते. थोडं वातावरण बदलून पाहा, तर कधी आसनं बदला. सगळय़ात महत्त्वाचं म्हणजे आपण म्हातारे झालो, हा समज बदला!’’

वृद्ध आईवडिलांना डे-केअरमध्ये किंवा शुद्ध मराठीत वृद्धाश्रमात ठेवणं, याकडे अनेकदा शब्दश: शाप म्हणून पाहिलं जातं. त्यावर भाष्य करताना डॉ. संजय देशपांडे यांनी सांगितलं, ‘‘एकल वृद्धांचा विचार करता, घरात त्यांच्याशी कुणी प्रेमाचे दोन शब्द बोलत नाही की मायेचा स्पर्श कुणी करत नाही. अशा वेळी वृद्धाश्रमात त्यांना समवयस्क मित्रमैत्रिणींची सोबत मिळाली तर त्यांचं उतारवय आनंददायी होऊ शकतं. पाश्चात्त्य देशांत तर डे केअरमध्येही ज्येष्ठ जोडप्यांना एकांत मिळावा म्हणून स्वतंत्र खोल्या असतात. वृद्धांच्या ‘इंटलेक्चुअल इंटिमसी’चाही विचार समाज म्हणून करायला हवा.’’

Sex in the Golden Years या पुस्तकात अधोरेखित करण्यात आलेला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काही ठरावीक औषधांमुळे कामेच्छेत कमालीची घट होऊ शकते. अशा वेळी कोणताही संकोच न करता डॉक्टरांच्या निदर्शनास ही गोष्ट आणून देत औषधं बदलून घ्यायला हवीत. तसंच मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, अशा चुकीच्या जीवनशैलीमुळे मागे लागलेल्या व्याधी असतील तर या व्याधींमुळे सेक्सला सोडचिठ्ठी देण्यापेक्षा नियमित व्यायाम, चांगल्या आहाराची जोड देत कामजीवनाची विस्कटलेली घडी सुधारायला हवी.

संसाराची सेकंड इिनग नीरसपणे कंठायची, की या उत्तरायणात मावळतीच्या नभाचे नानाविध रंग भरायचे, हा निर्णय प्रत्येक जोडप्यानं विचारपूर्वक घ्यायला हवा!

niranjan@soundsgreat.in