एका बाजूला पुरुषांचे लैंगिक भुकेलेपण आहे तसेच त्याचा वापर करून आपला  आर्थिक फायदा उठवणारे गल्लाभरू चित्रपट, प्रसारमाध्यमे आहेत, यातून एका बाजूला पुरुषांची कोंडी होते आहे. तर दुसरीकडे पुरुषप्रधान संस्कृती पुरुषी अहंकाराचे स्तोम मजवत स्त्रीला दुय्यम लेखत तिची कोंडी करत राहिली. यातूनच निर्माण झालेले पुरुषी लैंगिकतेचे घृणास्पद अनुभव सध्या संपूर्ण समाजालाच भोगावे लागत आहेत. म्हणूनच हा फक्त पुरुष वा फक्त स्त्रियांचा प्रश्न नसून तो समाजाचा आहे. त्यावर उपाय म्हणून समाजानेच काय करायला हवे हे सांगणारा,  ५ जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘लैंगिकतेचे शमन की दमन?’ या लेखाचा हा उत्तरार्ध ..
निसर्गत: माणसाच्या ब्रेनमध्ये झालेल्या प्रिवायरिंग सेटअपमुळे विवाहप्रथा आणूनसुद्धा स्त्री-पुरुषांमध्ये असणारा मुक्त आचरणाचा कल आपण रोखू शकलेलो नाही. यासंबंधीची शरीरशास्त्रीय माहिती आपण मागील लेखात घेतली. विवाहामुळे स्त्री-पुरुष संबंधांचे नियमन  होत राहणार आहे, या कल्पनेत (किंवा भ्रमात) आपण राहिल्याने लैंगिक भावनांची दडपणूक (दमन) कधीपासून सुरू झाली, हे आपल्याला कळलेलेच नाही; आणि आज स्त्रियांवर होणाऱ्या पुरुषांच्या हल्ल्यातून हे दमन विकृतपणे समोर येताना दिसत आहे.
विवाहाने प्रस्थापित केलेल्या पुरुषप्रधान समाजात जर स्त्री-पुरुषांची कामवासना योग्य प्रकारे शमविण्याचा विचार आपण करणार असू, तर पहिल्या प्रथम पोटाच्या भुकेप्रमाणे लैंगिक भुकेची अनिवार्यता समजून घेता आली पाहिजे. जसे पोटाची भूक व्यवस्थित भागत असेल तर आपण अन्नसेवन समाधानाने, आनंदाने करतो. पण जे भुकेलेले असतात, ते अन्नावर तुटून पडताना आपण पाहतो. मात्र इथे आपण त्यांची उपासमार समजून घेतो. माणसांनी अन्नावर तुटून पडणे वाईट दिसते म्हणून त्यांची ती भूक, अन्न मिळू न देता दमन करण्याचा विचार कधी कुठे होत नाही. उलट त्यांना अन्न मिळण्याची सहज सोय करण्याचा प्रयत्न होतो. लैंगिक भुकेची नेमकी हीच स्थिती आहे. तरीसुद्धा ती सहजपणे भागविण्यात समाज अडथळे उभारतो. विवाहाचं वय वाढून सुद्धा विवाहपूर्व लैंगिक शमन हे अनैतिक ठरवतो. तेव्हा उपासमारीची स्थिती  निर्माण होऊन ती भूकवासना अनावर होते. त्यातून मग मिळेल त्या मार्गाने स्त्री-पुरुषांनी शरीरसंबंधाचा प्रयत्न  करणे, चोरून वेश्यागमन करणे, ब्ल्यू फिल्म्स पाहणे, बलात्कार, छेडछाड, विनयभंग, लैंगिक रॅगिंग, लहान मुलांचे लैंगिक शोषण म्हणजेच एकप्रकारे ‘तुटून पडणे’ ही सेक्सक्रिया सर्वत्र, म्हणजे चित्रपटांतून, कुटुंबातून, मैत्रीमधून, सामाजिक गुन्ह्य़ांतून आणि अगदी वैवाहिक संबंधातूनही दिसते. पण गंमत म्हणजे या गुन्ह्य़ांमागील खऱ्या कारणांना बगल देऊन स्त्रिया अंगप्रदर्शन करतात, म्हणून पुरुष गुन्हे करतात, असा दिशाभूल करणारा युक्तिवाद नेहमी केला जातो. आपल्याला वरवर विचार करण्याची सवय लावली गेल्याने असे युक्तिवाद अगदी चटकन पटतात. पण जगातल्या सर्व आदिवासी समाजात स्त्रिया या सर्वासमक्ष उघडय़ा अंगाने फिरत असतात, पण त्यांच्या समाजात हे लैंगिक गुन्हे अज्ञात आहेत, हे मागील लेखात आपण पाहिले. उलट आपल्याच समाजातले लोक या स्त्रियांचे फोटो आणि व्हिडीओ काढून आपले भुकेलेपण दाखवतात. तेव्हा प्रश्न हा शरीर उघडे टाकण्याचा नसून, आपल्या समाजात लैंगिक भावनेचे शमन आदिवासी समाजानुसार होत नाही. त्यामुळे कुठेही शरीराचा थोडासा भाग जरी उघडा दिसला की, अरे पाहा, पाहा, अशी आपली मानसिकता प्रक्षुब्ध होत असते. स्त्रीला संपूर्ण बुरखा घालायला लावणाऱ्या समाजात (देशात) स्त्रीचा उघडा हात जरी दृष्टीस पडला तरी पुरुष उत्तेजित होऊ शकतात. याउलट फ्री सेक्स असणाऱ्या पाशात्त्य देशात स्त्री-शरीराचे सवंग कुतूहल नसल्याने तोकडे पेहराव केलेल्या स्त्रिया अवतीभोवती असल्या तरी तेथील पुरुष रिलॅक्स असतात. जिच्याविषयी आकर्षण तिचे नखही दृष्टीस पडू नये अशा समाजात क्रौर्य, हिंसा आणि विकृतीने भरलेले तालिबानी पुरुष जन्म घेतात, हा योगायोग नाही.
आपल्या समाजात लैंगिक कामना शमविण्याच्या वाटा अतिशय युक्तीने चित्रपट आणि टीव्ही मालिकांमधून त्यांचे निर्माते दाखवत असतात. बहुसंख्येने हे निर्माते पुरुषच असतात. अर्थात पुरुषांच्या कामवासनेची होत असलेली कोंडी त्यांच्या परिचयाची असते. म्हणून मग स्त्रीचे अंगप्रदर्शन, सेक्श्युअल नृत्य, बेडसीन्स हा सर्व मसाला प्रत्येक चित्रपटात ठासून भरला जातो. जे पाहून पुरुषवर्ग उत्तेजित होतो. ते पाहण्यास चित्रपटाला गर्दी होते आणि निर्मात्याचा धंदा जोरात होतो. परंतु उत्तेजित होऊन चित्रपटगृहाबाहेर पडलेल्या पुरुषांना कामवासना  शमविण्याचा सन्माननीय मार्ग उपलब्ध असतोच असे नाही. आपल्या देशात तर अशा पुरुषांमध्ये अविवाहित तरुण, घटस्फोटित पुरुष तसेच नोकरीनिमित्त पत्नीला सोडून दुसऱ्या ठिकाणी राहणारे असंख्य पुरुष अशी मोठी यादी सांगता येईल. पुरुषांची नैसर्गिक कामवासना शमविण्यासाठी काही क्षेत्रात महिनोन्महिने किंवा काही वर्षेसुद्धा स्त्रीसहवास त्यांना मिळू शकत नाही. यामध्ये बांधकाम साईटवरचे कामगार पुरुष, इंजिनीअर्स, ठेकेदार, मोठे व्यावसायिक किंवा बोटीवर असणारे पुरुष, लष्करातील पुरुष अशा सर्वाचा समावेश असतो. प्रगतीकडे सतत धावणाऱ्या माणसाने अशा पुरुषांच्या लैंगिक गरजेचा विचार कधी केलेला नाही. त्यामुळे या  पुरुषांचे समलैंगिक संबंध, विवाहबाह्य़ संबंध किंवा शेवटी बलात्कार अशी न टाळता येणारी स्थिती मानवी जीवनात ठाण मांडून बसलेली आहे. या कृत्यांना फक्त गुन्हा समजून सोडून देणे, हा अविचार आहे.
जगभरात विवाहसंस्था सर्वत्र असली तरी प्रत्येक संस्कृतीत सेक्सबाबत असणारा दृष्टिकोन हा त्या त्या देशातील गुन्ह्य़ाचे प्रमाण ठरवतो. सेक्स दृष्टिकोन जितका उदार, जितका निकोप तितकी ती संस्कृती नवनव्या तंत्रज्ञानास सहजपणे सामावून घेत असते. आपण जेव्हा पाश्चिमात्य चित्रपटातील सेक्सप्रदर्शन जसेच्या तसे उचलले, तेव्हा त्या समाजात फ्री सेक्स रूढ आहे आणि आपल्याकडे ती कल्पनाही सहन होत नाही, हे लक्षातच घेतले गेले नाही. उलट भुकेल्या माणसास जेवणाचे ताट दाखवून ते काढून घेतल्याप्रमाणे सेक्सविषयीचा हा खेळ खेळून भारतीय मानसिकतेचा छळ करण्यासाठी या कल्पना प्रसारमाध्यमांकडून वापरल्या जात आहेत. ज्यामुळे आपला समाज झपाटय़ाने विकृतीकडे चालला आहे. भारतीय मुली ज्या पाश्चात्त्य देशात शिक्षण वा नोकरी करीत आहेत, त्यांच्यावर बलात्कार वा तत्सम लैंगिक हल्ले झाल्याच्या बातम्या आपण ऐकत नाही. मात्र भारतात आलेल्या परदेशी स्त्रियांवर बलात्कार होत असतात आणि बलात्कार करून त्यांची हत्याही होत असते. या स्त्रियांना गर्दीमध्ये भारतीय पुरुषांच्या हस्तस्पर्शाचासुद्धा जेव्हा ‘प्रसाद’ मिळतो तेव्हा त्या आपल्या या संस्कृतीने चकित होतात. स्त्री-पुरुषांची आपल्या समाजात कोंडून घातलेली लैंगिक इच्छा आणि त्यातून पुरुषांची स्त्रीबाबत तयार झालेली भोगवादाची मानसिकता त्याचे हे वरील परिणाम म्हणावे लागतात.
मात्र पुढे पुढे निव्वळ लैंगिक भावनेची कोंडी या थेट कारणांवर अनेक पांघरुणे आपल्या भोवतालामधून पडत गेली. संशोधक ज्याचा उल्लेख करतात, त्या ‘भोवताल’मध्ये अनेक विषय आणि व्यक्ती असतात. म्हणजे पालक, शिक्षक, नातलग, शेजारी, मित्रमैत्रिणी, शिक्षण, आर्थिक परिस्थिती, विविध प्रसारमाध्यमे समाजातील विवाह, धर्म, कुटुंब, न्याय, शासन अशा संस्था व त्यांचे संस्कार वगैरे! पितृत्वासाठी प्रथमच निसर्गव्यवस्थेला डावलून बंधनातल्या शरीरसंबंधाची कल्पना प्रस्थापित करणारी विवाहकल्पना निसर्गाच्या रेटय़ापुढे वाहून जाऊ नये म्हणून पुरुषांनी धर्मग्रंथ लिहून त्यातून स्त्रियांची योनिशूचिता आणि पातिव्रत्य याचे स्तोम मांडण्यात आले. ते मोडणाऱ्या स्त्रियांना शिक्षा सांगण्यात आल्या. त्यातून पुढे पुरुषाला झुकते माप देणारी संस्कृती उदयाला येऊन आपल्या समाजात पुरुषांसाठी नवस व त्याचे कौतुकसोहळे स्त्रियांनी करण्याच्या परंपरा निर्माण करून पुरुषाला संस्कृतीने अधिकच श्रेष्ठ पदावर  बसविले.
विवाहसंस्था, धर्मसंस्था यांच्या संस्काराचे परिणाम कुटुंबसंस्थेवर झाले. स्वत:च्या पितृत्वासाठी विवाहित स्त्रीच्या लैंगिक इच्छेवर पतीचा असणारा सातत्याने पहारा तसेच विवाहापूर्वी स्त्रीला मातृत्व येऊ नये म्हणून अविवाहित स्त्रीवरसुद्धा ठेवली जाणारी नजर याची परिणती, पुरुषांची मानसिकता, स्त्रीबाबत मालकी हक्काची भावना बाळगणारी होऊन बसली आहे. पुरुष स्वामी आणि स्त्री त्याच्या आधीन अशा निसर्गविरोधी असणाऱ्या आपल्या स्वयंभू कल्पनेतून मुला-मुलींवर जन्मल्यापासूनच संस्कार कुटुंबातूनच केले जातात. त्याकरिता ‘बॉय कोड’चा वापर करून मुलगा पाच-सहा वर्षांचा झाला की त्याच्या भावनाशील, संवेदनशील असण्याचे हसे केले जाते. मुलगा घाबरला, रडला किंवा लाजला तर तू पुरुष आहेस, स्ट्राँग पाहिजेस, याची त्याला सारखी जाणीव करून दिली जाते. त्याची मानसिक, भावनिक गरज लक्षात न घेता त्याला ‘मम्माज बॉय’ असे हिणवून त्याच्या आईपासून तोडण्यास सातव्या-आठव्या वर्षांपासून सुरुवात केली जाते. मुलींसारखे रडतोस काय, नि लाजतोस काय? अशा प्रकारे प्रत्येक वेळी त्या मुलामध्ये तो मुलीपेक्षा विशेष असल्याची भावना निर्माण केली जाते. त्यामुळे एकीकडे स्त्रीसारखं हळूवार व्यक्त न होऊ शकणारा, आणि दुसरीकडे पुरूषी कामभावना दडपणारा असा अहंकारी पण द्विधा मनस्थितीचा पुरूष कुटुंबात मालक म्हणून जेव्हा घडविला जातो तेव्हा स्त्री व पुरुषांमधील सर्वच स्नेहसंबंधांची पुरती दैना होते. आई-मुलगा, बहीण-भाऊ, पती-पत्नी, मित्र-मैत्रीण यापैकी कोणतेही नाते समपातळीत आणि निकोप राहत नाही. शिवाय मुलींची संवेदनशीलता किंवा त्यांच्या प्रतिक्रिया या चुकीच्या किंवा मूर्खपणाच्या आहेत, या बालपणीच्या संस्करांमुळे स्त्री आपल्यापेक्षा कमी दर्जाची आहे, या भावनेतून पुरूष कुटुंबातील किंवा समाजातील स्त्रीबरोबर तुच्छतने किंवा हिंसकतेने व्यवहार करतो. बालवयातील संस्कार म्हणून दुरूस्त होणं गरजेचं आहे.
कुटुंबामध्ये पती-पत्नीने एकमेकांना प्रेमाने जवळ घेणे, प्रेमाने चुंबन घेणे हे आपल्या संस्कृतीत मुलांच्यादेखत ‘वाईट संस्कार’ समजले जातात. पण आश्चर्य म्हणजे मुलांसमोर पत्नीचा पाणउतारा करणे, तिला मुलांदेखत मारणे हे मात्र वाईट संस्कारात येत नाही! एका तीन वर्षांच्या मुलाचे वडील त्याच्या आईला हातात मिळेल ते फेकून मारताना पाहून हा मुलगा घाबरून रडत असे. पण नंतर तेच ते पाहून आई ही मारण्यासाठी असते, असा त्याचा समज झाला आणि आईने त्याला काही शिस्त लावली की आपली खेळणी तिच्यावर फेकून तो मारू लागला. स्त्रीविषयीची सन्मानाची भावना अशी पायरी पायरीने खाली उतरवली जाते. ज्यातून पुढे समाज स्त्री-भ्रूणहत्या करायला मागेपुढे पाहत नाही.
(‘युनिसेफ’तर्फे कौटुंबिक हिंसाचाराबाबत एक धक्कादायक सव्‍‌र्हे काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध झाला, ज्यामध्ये पत्नीला मारणे योग्य आहे, असे ५७ टक्के पुरुषांनी सांगितले तर पत्नीला मारायला हरकत नाही, असे सुमारे ५३ टक्के स्त्रियांनी सांगितले. अचंबित करणाऱ्या या मतांचे मूळ हे टीव्ही मालिकांमध्ये आहे. मालिकेतला एखादा पती पत्नीचा अवमान करणारा, हात पिरगळणारा, वस्तू फेकणारा दाखवलेला असतो तरी ती पत्नी त्याला जवळ घेऊन ‘तू तिथे मी’ म्हणत प्रेमाने त्याच्या छातीवर डोके टेकते तेव्हा तरुणांचा समज होतो की मुलींना असेच पुरुष आवडतात. पत्नीला मारणे हा पुरुषार्थ आहे. त्यामुळेच पत्नी प्रेम करते. तर याच मालिकांमधून समजूतदार, मनमिळाऊ पुरुष हा बहुधा हतबल आणि अपमानित होणारा दाखवतात. त्याची खुद्द आईसुद्धा त्याची मानहानी करताना दाखवतात. काही मालिकांत अशा पुरुषाला मतिमंद किंवा वेडासुद्धा दाखवतात. अर्थात मुलींवर मनमिळाऊ पुरुष म्हणजे कचखाऊ पुरुष, असा संस्कार होतो. याऊलट या मालिका गुंड प्रवृत्तीचा, आक्रमक पुरुष यशस्वी दाखवतात. मुख्य म्हणजे मुलींना असा पुरुष बाहेरच्या जगापासून सुरक्षा देण्याच्या कुवतीचा वाटतो. जो आपल्या अंगावर धावून येईल, तोच बाहेरच्यांना धडा शिकवील या एकूण समजुतीतून ‘युनिसेफ’कडे तशी मते स्त्री-पुरुषांनी नोंदविलेली दिसतात. यातून स्त्रीमनात बाहेरच्या जगातील असुरक्षिततेची असणारी धास्ती तर दिसतेच पण टीव्ही मालिकासुद्धा मनमिळाऊ पुरुष अपयशी दाखवून किती घातक संस्कार बाहेर टाकतात हेसुद्धा उघड होते. अशा समाजविघातक आणि विकृत मूल्ये बाहेर फेकणाऱ्या मालिकांच्या विरोधात देशभर पालकांनी आणि प्रेक्षकांनी रस्त्यावर येऊन निदर्शने करण्याची वेळ आता आलेली आहे.)
राजकारण क्षेत्रात आपल्याकडे स्त्रीवर बलात्कार करून किंवा तिच्याशी विवाहबाह्य़ संबंध ठेवून हत्या करणारे काही जण आहेत. स्वत:च्या पत्नीला मारणारे, विनयभंग करणारे पोलीस आहेत. गैरवर्तन करणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी ज्यांची नेमणूक आहे तेच स्वत: असे दुसऱ्याला उद्ध्वस्त करणारे गुन्हे करून, वर पुन्हा निर्दोष सुटतात. ही वस्तुस्थिती सामान्य समाजकंटकांना, रोडरोमियोंना हिंमत देऊन बिनधास्त करणारी आहे. आपल्या देशात स्त्रीविरोधी गुन्ह्य़ांचे प्रमाण वाढण्याचे हे फार महत्त्वाचे कारण आहे. थोडक्यात, विवाहसंस्था, धर्मसंस्था, संस्कृती कुटुंबसंस्था, प्रसारमाध्यमे, शासनसंस्था वगैरे या भोवतालच्या घटकांद्वारे बाहेर पडणारी घातक मूल्ये व संस्कार, आधीच ज्यांचे लैंगिक दमन झाल्यामुळे मनोवस्था प्रक्षुब्ध आणि विकृत झालेली आहे, त्यांना हिंसक बनविण्याची महत्त्वाची कामगिरी कशी पार पाडतात हे इथे लक्षात येईल.
मग अशा समाजव्यवस्थेतील बलात्कारासारख्या गुन्ह्य़ासाठी अगदी फाशी जरी बजावली तरी तो त्या गुन्हेगार व्यक्तीपुरता मर्यादित उपाय ठरतो. तो हवाच. पण त्यामुळे भविष्यातले गुन्हे थांबत नाहीत हे दिल्लीच्या घटनेनंतरसुद्धा ज्या बेशरमपणाने बलात्काराचे गुन्हे घडत आहेत त्यावरून लक्षात येईल. फाशी शिक्षा देण्यात धोका असा आहे की, बलात्काराचा पुरावा म्हणून असणाऱ्या त्या स्त्रीची निश्चित त्यामुळे हत्या होईल. म्हणून आमरण जन्मठेप ही अधिक चांगली शिक्षा ठरेल. स्त्रिया-मुलींनी तिथल्या तिथे प्रतिकार करावा असे काही मार्ग सुचविले जात आहेत. उदा. डोळ्यात मिरची पावडर टाकणे, गुंडाच्या ओटीपोटात लाथ मारणे वगैरे. तरी ते यशस्वी होतीलच असे नाही.
म्हणून मग व्यक्तिगत शिक्षा किंवा व्यक्तिगत प्रतिकार याच्यापलीकडे जाऊन ही लढाई अखेर या व्यवस्थेच्या विरोधात लढण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. दिल्लीच्या घटनेसंबंधीच्या मोर्चात मोठय़ा संख्येने पुरुषही होते, ही त्यातल्या त्यात दिलासा देणारी गोष्ट. खरोखरच दुर्वर्तनी पुरुषांपेक्षा सद्वर्तनी पुरुषांची संख्या भारतात जर जास्त असेल तर अशा गुन्ह्य़ासंदर्भातील परिस्थितीच्या नियंत्रणाची सूत्रे त्यांना सांभाळता आली पाहिजेत. जिथे कुठे स्त्रीची छेड काढण्याचा प्रयत्न असेल तिथे १०-१२ पुरुषांनी एकदम या गुंडाला घेरले पाहिजे. त्यापैकी किमान एकाला तरी त्यांनी पोलीस चौकीत नेले पाहिजे आणि तिथे त्याच्या कुकर्माचा पाठपुरावा याच सज्जन पुरुषांनी ठिकठिकाणी संघटना स्थापून केला पाहिजे, म्हणजे ते गुंड सहजी सुटणार नाहीत. या कामी त्यांना टीव्ही चॅनेल्सची मदत होऊ शकते. पुरुषांची ही नेमकी भूमिका महिलांना अपेक्षित आहे. घटना घडून गेल्यानंतर मेणबत्ती-मोर्चात सामील होऊन निव्वळ सहानुभूती प्रदर्शन हे प्रत्येक वेळेस सज्जन पुरुषांना शोभा देणारे ठरणार नाही.
सर्व स्त्रियांनीसुद्धा अशा घटनांसंदर्भात एकदा तरी सार्वजनिक संपाची हाक दिली पाहिजे. शिक्षण संस्था, अन्य सरकारी खाती, आयटी क्षेत्र, खासगी कंपन्या, बँका, अंगणवाडय़ा, मनोरंजन क्षेत्र, बचत गटातील स्त्रिया, उद्योजक व व्यावसायिक स्त्रिया, कामगार-मजूर स्त्रिया व गृहिणी या सर्वानी दोन दिवस तरी आपापली कामे बंद ठेवून एक प्रकारे महिलांशिवाय चालवून दाखवा देश, असे आव्हान या व्यवस्थेपुढे ठेवून आपली ताकद दाखवली पाहिजे आणि स्त्रियांच्या प्रश्नांची दखल घेण्यास व्यवस्थेला भाग पाडलं पाहिजे.
बलात्कारकर्त्यांला कोणती शिक्षा द्यावी असे वाटते, असा प्रश्न मी एका तरुणाला केला असता तो म्हणाला, अशा पुरुषांचे लैंगिक खच्चीकरण हाच या घृणास्पद वृत्तीवरचा उपाय मला वाटतो. पुरुषाला त्याचे लिंग म्हणजे मर्दानगीचा मानबिंदू वाटत असतो. पण त्याचा त्याने कुणाला उद्ध्वस्त करण्याकरिता दुरुपयोग केला असेल तर त्याचा हा नैसर्गिक परवाना आपण रद्द करायला पाहिजे. लैंगिक खच्चीकरणामुळे त्याला आयुष्यभर  समागमसुखापासून वंचित राहण्याचे दु:ख भोगावे लागेल आणि ते त्याने भोगलेच पाहिजे. कारण कुणा निरपराध स्त्रीला किंवा बालिकेला त्याने उद्ध्वस्त केलेले आहे याची जन्माची आठवण त्याला राहिली पाहिजे. स्त्रिया अनेक शतके लैंगिक मानहानी सोसत आहेत. तेव्हा आता अशा वृत्तीच्या पुरुषालासुद्धा ही मानहानी भोगतानाच्या होणाऱ्या वेदना कळल्या पाहिजेत. म्हणून फाशीऐवजी लैंगिक खच्चीकरणाचा कायदाच अशा हीन वृत्तीला दहशत बसवेल असे मला वाटते.
आहे का असा कायदा चालवून घेण्याची  हिम्मत विविध सत्तेवरच्या पुरुषांमध्ये?

Maharashtra government schemes for women,
लाडक्या बहिणींनो, कोणी तुमच्यावर उपकार करत नाही…!
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
government that gives Rs 1500 as ladaki bahin is not doing favour to women
‘लाडक्या बहिणींनो’ कोणी तुमच्यावर उपकार करत नाही…!
Supreme Court order Uttar Pradesh government regarding bulldozer operation
अग्रलेख: नक्की काय बुलडोझ झाले?
japan ban wedding after 25 for women
‘या’ देशात महिलांना पंचविशीनंतर विवाहास मनाई, प्रस्तावावरून नागरिक संतप्त; कारण काय?
sex ministry in russia
‘या’ देशात स्थापन होणार सेक्स मंत्रालय? डेटिंग अन् लग्नासाठीही सरकार पुरवणार आर्थिक साह्य? कारण काय?
Advice from Uttar Pradesh State Commission for Women to male tailors
‘पुरुष शिंप्यांनी महिलांचे माप घेऊ नये’ ; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाचा सल्ला