‘का नाही सांगितलेस?’ हा प्रश्न अनेकदा आयुष्यात येतो. वेळीच ही गोष्ट कुणाला सांगितली असती तर पुढचा अनर्थ टळला असता ही पश्चातबुद्धी अशा वेळी उपयोगी नसते. म्हणूनच मनाला अस्वस्थ करणारे, त्रास देणारे, द्विधा अवस्था करणारे विचार वेळीच बोलून टाकायला हवेत. आपल्या माणसांवर तेवढा विश्वास हवा. मग आयुष्य सहजसोपं व्हायची निदान शक्यता तरी असते.
मोठे व्यावसायिक म्हणून प्रसिद्धीस पावलेले उद्योजक मांजरेकर यांची इंजिनीअिरग फर्म होती. मुले पुढे-मागे व्यवसायात हाताशी येतील, ही वेडी आशा ठरली. मुले चांगली हुशार, खूप शिकली आणि परदेशात स्थायिक झाली. मात्र मायदेशी यायची चिन्हे दिसेनात. व्यवसायाचे काय करावे? कोणाच्या हाती सोपवावा, हा प्रश्न उभा राहिला. मुलांनी सहज सांगितले, ‘विकून टाका आणि निवांत राहा मजेत.’ बोलणं सोप्पं होतं, पण मांजरेकरांसाठी अशक्य. त्यांनी शोध सुरू केला, कोण करू शकेल का माझा व्यवसाय? संपूर्ण मार्गदर्शनासह चांगल्याप्रकारे जम बसेपर्यंत ते बरोबर राहणार होते, पण कोणी तसे भेटले नाही. आणि एक दिवस जाहिरात देऊन फर्म विकायला काढली. एका व्यक्तीशी बोलणी झाली.  मनाविरुद्ध टोकनही घेतले. आणि त्याच संध्याकाळी नात्यातलाच पराग सहज रस्त्यात भेटला. नुकताच इंजिनीअर झालेला, तेही मांजरेकरांच्याच विषयात. उत्तम रीतीने पास झालेला पाहून सहज प्रश्न केला, ‘आता काय करायचं ठरवलं आहेस?’
पराग म्हणाला, ‘मला नोकरी नाही करायची. काही तरी व्यवसाय करायचा विचार आहे, पण नक्की काय हे अजून ठरत नाही. लवकरच ठरवेन काहीतरी.’
‘अरे, आधी का नाही सांगितलेस? यायचं होतं ना भेटायला यापूर्वीच. मी याच क्षेत्रात आहे हे माहीत होतं ना तुला? चल. माझ्याबरोबर घरी, एक मिनिटसुद्धा दवडायचे नाहीस.’ ते त्याला घरी घेऊन आले आणि भरभरून बोलत सुटले. खूप दिवसांनी मोठ्ठं काही तरी सापडल्यासारखे. ‘तू अजिबात काळजी करू नकोस. फक्त माझा व्यवसाय घे, मी तुला तयार करतो.’ परागला आनंद होत होता, पण विश्वासही बसत नव्हता. ‘आधीच सांगितलं असतं यांना तर मधल्या काळातली घालमेल कमी झाली असती,’ त्याला वाटून गेलं. मांजरेकरांनी टोकनचा चेक परत केला. मांजरेकर आणि परागने अतिशय चांगल्या प्रकारे तो व्यवसाय मार्गस्थ केला. आज मांजरेकर समाधानी आहेत.
आयुष्यात अनेकदा द्विधा मन:स्थिती होते. काय बरोबर काय चूक कळत नाही. कुणाशी तरी बोलावंसं वाटतं, पण भीती वाटत असते, ‘इतरांना सांगून काय फायदा? त्यांना ते आवडणार नाही. उगीचच मलाच वेडय़ात काढतील.’  तर काही वेळा वाटतं, ‘फुकटचे नकाराचे सल्ले  मिळाले तर मी ऐकून घेणारच नाही. मला जे करायचे ते मी करणारच. मी का सांगत सुटू सगळ्यांना.’ अगदी परस्पर विरुद्ध आणि टोकाचे विचार. अगदी सगळ्याच परिचित लोकांना तुमच्या मनातले जरी सांगितले नाही, तरी तुमच्या जवळच्या म्हणून ज्या विश्वासाच्या व्यक्ती असतील, त्यांचाजवळ नक्कीच बोलले पाहिजे. तुमच्या निर्णयापासून ते परावृत्त करतील असाच विचार करून बोलायचे टाळले जाते. पण अनेकदा इतरांचा दृष्टिकोन, विचारधारणा, जो मार्ग तुम्ही स्वीकारणार आहात, त्याची माहिती, फायदेतोटे, विस्तार, संधी, पसा, पोझिशन असा सर्व बाजूंनी त्याचा विचार करता येतो. अंतिम निर्णय विचारांती ठरवता येतो. अनेकदा आपलं एक पाऊल दुसऱ्याचं आयुष्य वाचवू शकतं. आपल्या बोलण्याने प्रश्न सुटू शकतो.
सीमाच्या शेजारणीच्या मुलीचं, विद्याचं लग्न ठरलं. सीमाला त्या मुलाचं व्यसन आणि त्याचा घरादारावर झालेल्या दुष्परिणाम माहीत होता. ती अस्वस्थ झाली. शेजारच्यांना या गोष्टीची माहिती आहे का, आपण ते त्यांना सांगावं का, हा तिला प्रश्न पडला. ती तिच्या नवऱ्याशी बोलली. तिचा नवरा म्हणजे ‘आपण बरे आपले काम बरे,’ या स्वभावाचा. तो म्हणाला, ‘कशाला कोणाच्या अध्यात-मध्यात पडतेस? समजा, आपण काही सांगायला गेलो आणि त्यांना नाही आवडलं, काही बोलले, तर कशाला अपमान करून घ्यायचा. उगीच आगाऊपणा नकोय. तुझं काय नडलंय का त्यांना सांगायचं? त्यापेक्षा गप्प बस.’
पण प्रसंग विद्याच्या आयुष्याचा होता, सीमाला राहवेना आणि धीर करून, नवऱ्याला न सांगता, तिने शेजारचे घर गाठले, ‘‘तुम्ही विद्याचे लग्न ज्या मुलाबरोबर ठरवले आहे, तो मुलगा आमच्या चांगला परिचयाचा आहे. तो व्यसनाच्या आहारी गेलेला आहे. दारूच्या आणि इतरही. व्यसनमुक्ती केंद्रात सहा महिने होता, पण तो नोकरीनिमित्त बाहेर गेला असेच सांगितले सगळ्यांना. आणि आता घाईघाईने लग्न उरकत आहेत बहुधा. त्याची नीट चौकशी केलीत का तुम्ही?  मी तर म्हणेन मोडा हे लग्न.’’
‘‘आत्ता आम्ही सगळी तयारी केली, खरेदी, कार्यालय, दागदागिने झालेत. आता आठच दिवस राहिले लग्नाला. आणि आज बोलताय? का नाही सांगितले आधीच?’’ तो सूर नक्कीच चांगला नव्हता. क्षणिक सीमाला नवऱ्याने सांगितलेलं आठवलं. पण दुसऱ्याच क्षणी चढय़ा आवाजात म्हणाली, ‘‘अजून लग्न होऊन विद्या गेली नाही ना त्याच्याकडे. मी वेळीच सांगत आहे. तुम्ही कसून चौकशी केलीत का? तुम्ही तुमच्या खात्रीसाठी हवं तर या या केंद्रात जाऊन या.’’ इतक्या ठामपणे सांगितल्यावर घरचे चपापले, जागे झाले आणि त्यांना सीमाचे म्हणणे अनुभवास आले. आणि ते लग्न मोडले. वेळीच टाका घातला की पुढची उसवण थांबतेच. समजा, सीमाने नवऱ्याचे ऐकून काही बोलली नसती तर, विद्याचे आयुष्य संकटात सापडले असते. आणि एका मुलीच्या आयुष्याचा नाश आपण वाचवणं शक्य असूनही केवळ न बोलण्यामुळे वाचवू शकलो नाही, ही बोचणी सीमाला आयुष्यभर छळत राहिली असती.
न बोलणं, न सांगणं हे तर घराघरात दिसतं. तेच टाळले पाहिजे. घरात एकत्रितपणे राहण्याऐवजी एकोप्याने जगणे महत्त्वाचे. फारसे काही करावे लागत नाही यासाठी. जाणून घ्यावीत सगळ्यांची मते, विचार, अनुभव. त्यातूनच वाढत जात असते आपली  विचारक्षमता, वागायची पद्धत आणि परिपक्वता. मोकळं राहण्याचे मोठे फायदे आधी समजत नाहीत. पण त्यानेच घडत जातो माणूस. जितकी जास्त जवळीक, प्रेम, ओलावा सर्व नात्यानात्यांमध्ये तेवढी परिपक्वता साठवली जाते व्यक्तिमत्त्वामध्ये. प्रत्येकाला घरातल्या लोकांबद्दल ओढ हवी. मी सांगेन आणि ते सर्व ऐकून घेतील हा विश्वास हवा, त्याचबरोबर जर माझे काही चुकत असेल तर मला योग्य प्रकारे सांगण्यात येईल, समजावले जाईल अशी ठाम खात्रीसुद्धा हवीच हवी आणि जर घरातल्या माणसांची भीती वाटते, म्हणून बोलले गेले नाही, तर हीच माणसे बाहेरच्या अपरिचितांशी कशी काय, कुठल्या पद्धतीने बोलू लागतील?
अगदी पती-पत्नीसुद्धा अनेकदा मनातील महत्त्वाच्या घडामोडींबद्दल चकार शब्द काढीत नाहीत. कधी त्याच्या, कधी तिच्या मनात धाकधूक असते. कळेल का मी बोलतोय/तेय ते? का गैरसमज होईल? भांडण होईल? अशा शंका मनात आणून बोलणे टाळले जाते. याला कारण काय? विश्वासाचा अभाव, समजून घेण्यात कमतरता, आपण एकच आहोत ही जाणीव नसणं, भावनिक गुंतवणूक कमी असणं आणि असेच काही दुरावे, दुखावलेले आठवणीतले प्रसंग. मागच्या काही कटू आठवणी, अनुभव मोकळेपणाने बोलायला देत नाहीत. भूतकाळ असा घट्ट रुजलेला असतो मनात, पण त्यामुळे वर्तमान वाया चाललाय हे लक्षातही येत नाही.  पत्नी पतीशी मोकळेपणाने बोलत नाही. नवराही आपल्या मनाप्रमाणे वागत रहातो आणि आयुष्यभर मन मारत जगणं तिच्या नशिबी येतं. आयुष्याच्या शेवटी मी वेळीच ‘यांना सांगायला हवं होतं, मनातलं,’ असा पश्चात्ताप करण्यात काहीच अर्थ नसतो.
 इतिहासातील गोष्ट आहे. गौतम बुद्ध, म्हणजे आधीचा सिद्धार्थ, आपली पत्नी यशोधरा आणि मुलगा यांना न सांगता घर सोडून गेला. बुद्ध झाला आणि एक दिवस बारा वर्षांनी आला घरी. यशोधरा होतीच घरी आणि राहुल मोठा झालेला पाहून आनंदला. पण काय बोलणार होती  यशोधरा? ती मनातल्या मनात असं म्हणाली असेल का की, ‘‘आपण बुद्ध झालात. मला अभिमान नक्कीच आहे. एक खंत माझ्या मनातली, बारा वर्षे जपलेली, आता विचारते, जाताना मला का नाही सांगितले? मी अडवले असते का तुम्हाला? का मी रडारड करेन, त्रागा करून तुम्हाला जाऊ देणार नाही असे वाटले तुम्हाला? विश्वास नव्हता का माझ्यावर. का नाही सांगितले? ’’ ती गप्प राहिली असावी कारण तिला माहीत होतं याचं उत्तर कुणाकडेच नाही.
अनेकदा मात्र मनातलं बोलायला नात्यातल्या माणसापेक्षा जवळची, मैत्रीच्या नात्यातली माणसंच उपयोगी पडतात. घरातल्या लोकांशी जे बोलणार नाही ते मित्र-मैत्रिणींशी बोलून मोकळं होतो आपण. सहा-सात मित्रांचा एक ग्रुप आहे. त्यातील एक, सुरेशने व्यवसायासाठी कर्ज घेतले. त्याच वेळी आईचे ऑपरेशन निघाले, बहिणीचे लग्न घाईत ठरले आणि करावे लागले. या सगळ्यासाठी घेतलेले कर्जाचे पसे, पळवाटा शोधत संपूनही गेले. बँकेचा तगादा सुरू, नोटीस आली, तो घाबरून गेला. बरं, हे तो कोणाही जवळ बोललाच नव्हता. अगदी बायकोलदेखील हे माहीत नव्हतं आणि सुरेशने आत्महत्येचा निर्णय घेतला, पण धीर थोडाच होतो? पुरता घाबरला आणि आला अड्डय़ावर संध्याकाळी, तेही खूप दिवसांनी. कोणाला फोन केला नव्हता की आलेला घेतला नव्हता, बरेच दिवस. जो तो आपापल्या उद्योगात मग्न. त्यातून त्याचा व्यवसाय म्हणजे हा आणखीनच जास्त गुंतलेला. असेच वाटले सगळ्यांना. सुरेश आला, भेदरलेला. सारी कहाणी सांगितली आणि खिशातून झोपेच्या गोळ्यांची बाटली काढली. झाकण उघडले होते, पण एकही गोळी घेतली नव्हती. मित्रांना धक्काच बसला. सुरेश इतका संकटात असेल असे कोणालाच वाटले नव्हते. सगळे ओरडलेच त्याला. ‘अरे, तू का नाही सांगितलेस आम्हाला? आम्ही काय फक्त चहा पिण्यापुरते भेटणारे मित्र आहोत का? हे घे, असे म्हणून दोघांनी कोरे चेक ताबडतोब दिले. एक म्हणाला, किती ट्रान्स्फर करू, बोल खाते नंबर सांग लगेच. इतके दरिद्री नाहीत तुझे मित्र. आधी बोलायला काय झाले होते तुला? किती दिवस असा भरकटत होतास? जिवापेक्षा पैसे मोठे नसतात रे.’..
 आणि .. सुरेशचा बंध फुटला.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा