रजनी परांजपे
मुलांना ‘भीक मागू नका’, असे तुम्ही सांगत का नाही, असा प्रश्न पुष्कळदा विचारला जातो. मुले हीच जर या कुटुंबांचे मिळकतीचे मुख्य साधन असेल तर आपण त्यांना भीक मागण्यापासून कसे परावृत्त करणार? आपल्याकडे त्यांना द्यायला दुसरा धंदा किंवा मिळकतीचे साधन काय आहे? या मुलांना भीक मागण्यापासून थांबवायचे असेल तर त्यावर उपाय एकच. आपण भीक देण्याचे थांबवणे. आता हा धंदा चालत नाही असे जेव्हा या पालकांच्या लक्षात येईल तेव्हा ते आपोआपच हा धंदा थांबवतील.
या ही गोष्टीला वीसएक वर्षे झालीच असतील. तेव्हा पुण्यातील सेनापती बापट रस्ता आजच्या सारखा आधुनिक इमारतींनी सजलेला नव्हता. चतु:शृंगीचे मंदिर आणि त्याच्या आजूबाजूच्या दोन-चार इमारती सोडल्या तर बरेचसे मोकळे मदानच होते. मंदिराच्या आजूबाजूला भीक मागून गुजराण करणारी बरीच कुटुंबे रस्त्यावरच रहात. आम्ही येथल्या मुलांसाठी आमची ‘स्कूल ऑन व्हील्स’ बस नेत असू.
रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलांची गोष्टच वेगळी. रात्रंदिवस रस्त्यावर राहून, गर्दीत आणि रहदारीत सराईतपणे वावरून त्यांना ‘अर्थार्जन’ करावे लागते. गर्दीला घाबरून, रस्त्याच्या कडेला उभे राहून, भीक मागणे किंवा लहानसहान गोष्टी विकून पैसे मिळवणे जमण्यासारखे नाही. या धंद्यात वय जितके लहान आणि अवतार जितका अस्वच्छ, फाटक्या तुटक्या कपडय़ातला, दयनीय असेल तेवढे चांगले. ते एक प्रकारचे धंद्याचे भांडवलच. या मुलांना वर्गात बसवायचे, तास दोन तास शिकवायचे तर त्यांना आधी स्वच्छ करून घ्यायला लागे. मुलांचे हात पाय धुण्यासाठी, आंघोळ घालण्यासाठी जवळच असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहाचा आम्ही वापर करत असू. पहिल्या दिवशी मुलांना आंघोळीला नेले तेव्हा गंमतच झाली. आमच्या शिक्षकांनी आणि काही व्हॉलेंटीअर्सनी मिळून आंघोळीची जय्यत तयारी केली. नवे कपडे, टॉवेल, साबण इत्यादींची जमवाजमव झाली. मुलांना आंघोळीला पाठविण्याआधी त्यांच्या हातात साबण आणि टॉवेल्स ठेवले. पहिली बॅच आंघोळ करून बाहेर आली ती पाण्याने निथळतच. अंगावरचे कपडे तसेच ओलेचिंब, टॉवेलही त्यातच सामील केलेला. टॉवेल कशासाठी आणि कसा वापरायचा याची कल्पनाच नाही. ते दृश्य बघून हसावे की रडावे तेच कळेना.
वर्ग दोन किंवा तीन तासच असे. वर्ग सुटला की मुले घरी जात. घरी गेली की कामावर रुजू! त्या रस्त्याने जात येत असताना कधी कधी आपली रिक्षा किंवा गाडी सिग्नलशी थांबली की पटकन एखादे मूल समोर येई, हात पसरे आणि आपण त्याच्याकडे बघतो न बघतो तेवढय़ात तेथून पसारही होई. त्या मुलाने आपल्याला ओळखलेले असे, पण आपण त्याला ओळखणे मुश्कील. ज्या मुलाला आपण सकाळी नीटनेटक्या, स्वच्छ कपडय़ात बघितलेले
असते तेच मूल परत कळकट कपडय़ात, दयनीय चेहऱ्यात दिसते तेव्हा आश्चर्य वाटते. असे का? हा वेशबदल कशासाठी? तर तसे केले नाही तर समोरच्याला दया कशी येईल आणि भीक कशी मिळेल? हा धंदा चांगला होण्यासाठी असा ‘मेक ओव्हर’ करावाच लागतो हे आम्हाला या मुलांबरोबर काम करता करता समजले. धंद्याचे हे गणित त्यांना मात्र लहाणपणीच समजलेले असते.
या मुलांना शाळेत दाखल करणे कठीण. कारण मुले हे मिळकतीचे मुख्य साधन. मोठय़ा माणसांपेक्षा मुलांना भीक मिळण्याची शक्यता जास्त. त्यामुळे पालक या मुलांना शाळेत पाठविण्यासाठी तयार नसतात. त्यातून गणपती, नवरात्र, जत्रांचे दिवस हा यांचा ‘धंद्याचा’ सीझन. त्या दिवसात तर मुले घरीच पाहिजेत. यातल्या काही मुलांना आम्ही हॉस्टेलवरही ठेवून बघितले. आईवडीलही तयार झाले. मुले हॉस्टेलवर गेली आणि रुळलीही. एक दिवस अचानक हॉस्टेलवरून फोन आला की मुले हॉस्टेलवर नाहीत. पळाली. त्यांच्या घरी जाऊन बघितले तर मुले होती. ‘‘पळून का आलात?’’ असे विचारले तर, ‘‘आता धंद्याचे दिवस, या दिवसात मुले तिथे ठेवली तर वर्षभर आम्ही काय खाणार?’’ असा पालकांचा उलट प्रश्न.
या मुलांना ‘भीक मागू नका’, असे तुम्ही सांगत का नाही, असा प्रश्न पुष्कळदा विचारला जातो. मुले हीच जर या कुटुंबांचे मिळकतीचे मुख्य साधन असेल तर आपण त्यांना भीक मागण्यापासून कसे परावृत्त करणार? आपल्याकडे त्यांना द्यायला दुसरा धंदा किंवा मिळकतीचे साधन काय आहे? या मुलांना भीक मागण्यापासून थांबवायचे असेल तर त्यावर उपाय एकच. आपण भीक देण्याचे थांबवणे. आता हा धंदा चालत नाही असे जेव्हा पालकांच्या लक्षात येईल तेव्हा ते प्रश्न आपोआपच हा धंदा थांबवतील. धंद्यामध्ये मागणी तसा पुरवठा असे तत्त्व असते. ‘भीक’ देण्याची गरज आपल्याला वाटते. ती आपली मागणी आहे. त्यातून आपल्या नकळत आपल्याला कसले तरी समाधान मिळते हे नक्कीच.
मग या मुलांना कसे शिकवायचे? या कर्दमातून त्यांना बाहेर कसे काढायचे? अलीकडेच चतु:शृंगी परिसरातील एका सोसायटीने या मुलांना शिकविण्याचा, रस्त्यावरून उचलून दुसऱ्या धंद्यापाण्याला लावण्याचा प्रयत्न केला. मुलांना दिवसभर सोसायटीच्या हॉलमध्ये आणून ठेवले, तेथे त्यांना आंघोळ-पांघोळ, जेवण-खाण, टी.व्ही किंवा तत्सम करमणुकीची साधने आणि शिकवायला शिक्षक या सर्व गोष्टींची सोय केली. या मुलांना दिवसभर गुंतवून ठेवणे, एका जागी बसण्याची सवय लावणे, शिकवणे, शाळेत घालणे इत्यादी गोष्टींसाठी आम्ही त्यांच्याबरोबर काम केले. या मुलांसाठी म्हणून दोन अनुभवी शिक्षिका पूर्ण वेळेसाठी तिथे ठेवल्या. काही दिवस बरे गेले पण प्रोजेक्ट फार दिवस चालले नाही. याचे कारण मुलांना शिस्त लागेल, ती रोज येतील, स्वच्छ राहतील, आपआपसात भांडणार नाहीत, जेवण चिवडणार नाहीत, इत्यादी गोष्टींविषयीच्या अशा कामाचा अनुभव नसताना आपल्या ज्या अपेक्षा असतात त्या पुऱ्या होऊ शकल्या नाहीत. सोसायटीच्या माणसांच्या कल्पनेप्रमाणे मुलांचा प्रतिसाद मिळेना. शेवटी सोसायटीने देऊ केलेल्या सुविधा बंद झाल्या. विद्यापीठासमोर राहणारी कुटुंबेही तेथून हलली किंबहुना हलवली गेली. तसे म्हटलं तर अनधिकृत वस्त्यांमधे राहणाऱ्या मुलांबरोबर काम करताना येणारी ही एक मोठी अडचण. पोलीस येऊन वस्ती कधी उठवतील ते सांगता येत नाही. वस्ती एकदा उठली की पुन्हा तिथे वस्ती येणारच नाही असेही नाही. पुष्कळदा तर ज्यांना तिथून उठवले असते तीच माणसे परत येऊन राहतात आणि त्यांना तिथे राहूही दिले जाते. पण म्हणून एकदा विस्कटलेली घडी बसायला वेळ लागायचा तो लागतोच.
विद्यापीठाजवळची वस्ती मात्र कायमस्वरूपी हलली असे दिसते आहे. यातील बरीच कुटुंबे आता पुलाची वाडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वस्तीत राहतात. मुलांबरोबरचे आमचे कामही चालूच आहे, पण ते अडथळ्याची शर्यत असावी तसे आहे. मुलांचे येणे-जाणे अनियमितही आणि नियमितही. म्हणजे येणे अनियमित पण सणवार, जत्रा इत्यादी आले की ‘नेमेचि’ येणाऱ्या पावसाळ्याप्रमाणे मुले वर्गातून नाहीशी होणार हे ठरलेले. म्हणजे मग या मुलांबरोबर काम करणे निर्थक आहे का? तर नाही. अलीकडचाच एक अनुभव. आमच्या एका जुन्या शिक्षिकेने सांगितलेला. चतु:शृंगीजवळ ज्या मुलांबरोबर आम्ही काम करत होतो त्याच मुलांपैकी एक मुलगा, आता अर्थातच मोठा झालेला, तिला रस्त्यात भेटला. त्यानेच तिला थांबवले. जुन्या दिवसांची आठवण करून दिली. ते बसमधले दिवस, तो अनुभव, ती चित्रे काढणे, ती गाणी म्हणणे हे सर्व त्याला आठवत होते. त्याविषयी तो भरभरून बोलला. ‘‘आता काय करता? कसे चालले आहे?’’ विचारल्यावर, ‘‘आम्ही आहोत तसेच आहोत. दुसरे काय करणार? सध्या पुलाच्या वस्तीत राहतो. मुलांना मात्र इथे आणले नाही, भीक मागायला लावले नाही. शाळेत पाठवतो. गावी आहेत- त्यांना शिकवणार मोठे करणार.’’
वीस वर्षांपूर्वी चतु:शृंगीजवळ लावलेले बी रुजले, वाढले आणि त्याला फळही धरले, आणखी काय हवे?
rajani@doorstepschool.org
chaturang@expressindia.com