रजनी परांजपे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एक प्रयोग होता सोलर एनर्जीच्या वापराचा. खरे तर हा प्रयोग नाहीच. हा मुलगा याचा वापर रोज आपल्या घरासाठी तर करतोच, पण आजूबाजूच्या १५-२० झोपडय़ांना मोबाइल चार्ज करण्यासाठी आणि एक दिवा लावण्यासाठी वीज पुरवतो आणि हे सर्व साहित्य, सोलर पॅनेल वगैरे त्याला आणि त्याच्या मामाला भंगार गोळा करताना मिळालेले. मामानेच त्याला याचा वापर शिकवला. हा आठ-दहा वर्षांचा मुलगा, जेमतेम तिसरीपर्यंत शाळेत गेलेला, लिहिता-वाचता न येणारा, आज मामाने शिकवलेले ‘ज्ञान’ वापरून त्याचा रोज वापर करत आहे. हे बघून आश्चर्यही वाटते आणि हळहळही.. अठ्ठावीस फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून नुकताच साजरा केला गेला. त्यानिमित्ताने वाडी, वस्त्यांमधील मुलांसाठी आवर्जून विज्ञानविषयक प्रयोग केले जातात; पण त्यांना पुढे शिक्षण कसे मिळणार, हा प्रश्नच आहे.

निरनिराळ्या वस्त्यांमधले आमचे काम चालूच असते. त्यातून एका वेळी दोन-अडीच हजार मुलांपर्यंत आम्ही रोजच पोहोचतो. यात वारंवार स्थलांतरित होणाऱ्या मुलांचे प्रमाण जास्त हे खरे असले तरी बालवाडीपासून सुरू करून दहावी-अकरावीपर्यंत पोहोचणारी मुलेही आमच्याकडे असतात. मुले शाळेत रुळली, त्यांना चांगले लिहितावाचता येऊ  लागले, की मग त्यांना इंग्रजी, गणित, विज्ञान इत्यादी विषयांची माहिती, शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न असतो. त्यातून विज्ञान या विषयाची मुलांना गोडी लागावी, त्यांना लहान लहान प्रयोगांतून, रोजच्या जीवनातल्या उदाहरणांतून विज्ञानाची मूलभूत तत्त्वे समजावून सांगावी यासाठी आमचे विशेष प्रयत्न असतात. विज्ञानावर अशा तऱ्हेने भर देण्याचे मुख्य कारण म्हणजे आमच्याच परिसरात असणारी ‘क्वेस्ट’ नावाची प्रयोगशाळा आणि या प्रयोगशाळेच्या सर्वेसर्वा, त्यामागची प्रेरणा, ऊर्जा, दिशादर्शक यंत्र हे सर्व काही एकाच व्यक्तीत एकवटलेले आहे अशी व्यक्ती म्हणजे मालती केळकर.

आमची मुले आठवडय़ातून एकदा या प्रयोगशाळेत न्यायला आम्ही सुरुवात केली त्याला आता १४ वर्षे झाली. मुलांना येथे लहान लहान प्रयोग प्रत्यक्ष करून बघता येतात, त्याची माहिती मिळते, त्याच्या पाठीमागची कारणमीमांसा समजावून सांगितली जाते. सुरुवात लहान प्रमाणावर झाली. हळूहळू आमचे कार्यक्षेत्र वाढू लागले. ‘आमच्याच परिसरातली प्रयोगशाळा’ असे म्हणण्यासारख्या अंतरावरचे वर्ग कमी आणि लांब-लांबचे वर्ग जास्त असे चित्र दिसू लागले. त्याचबरोबर मुलांना या उपक्रमाची गोडी वाटते. शाळेतदेखील इतर मुलांच्या तुलनेत ती वेगळी दिसतात आणि शाळेतील शिक्षकही त्याचा मुद्दाम उल्लेख करतात असे लक्षात आले आणि मग लांब लांब असणाऱ्या मुलांपर्यंत कसे पोहोचायचे हा विचार सुरू झाला.

त्यातून दोन गोष्टी करण्याचे ठरले- एक म्हणजे दूर असलेल्या केंद्रावर विज्ञान साहित्य द्यायचे आणि तेथील शिक्षिकांचे प्रशिक्षण घेऊन त्यांना हे लहान लहान प्रयोग कसे करायचे, त्यापाठीमागचे विज्ञानतत्त्व सोप्या शब्दांत कसे समजावयाचे हे शिकवायचे. (आमच्या शिक्षिकांचे सरासरी शिक्षण १०-१२ वी इतके असते.) उदाहरणार्थ, साबणाचे फुगे उन्हात बघितले तर त्यावर इंद्रधनुष्याचे रंग कसे दिसतात याचा मुलांना अनुभव द्यायचा आणि त्यामागचे कारण सांगायचे. झाडे जमिनीची धूप थांबवतात हे प्रत्यक्ष दाखविण्यासाठी एक छोटासा प्रयोग करायचा. प्लॅस्टिकच्या पाण्याच्या तीन बाटल्या घ्यायच्या, त्या आडव्या कापायच्या म्हणजे पन्हाळीसारखा भाग तयार होतो. त्या तीनही बाटल्यांत (पन्हाळीत) माती भरायची. एकात गहू किंवा आहळीव पेरायचे आणि दाट उगवू द्यायचे. दुसरीत गहू किंवा आहळीव लावायचा, पण विरळ-विरळ आणि तिसऱ्या बाटलीत नुसतीच ओली माती ठेवायची. या तीनही बाटल्या शेजारी-शेजारी ठेवून एकेका बाटलीत हळूहळू पाणी घालायचे. खाली पडणारे पाणी जमा करण्यासाठी भांडी ठेवायची, ज्यात आहळीव किंवा गहू दाट उगवले आहेत त्यातून बाहेर पडलेले पाणी स्वच्छ, विरळ झाडीच्या बाटलीतून पडलेले पाणी थोडे गढूळ, तर ज्यात कोणतीच रोपे नाहीत त्या बाटलीतून पडलेले पाणी पूर्णच मातीने भरलेले दिसते. मुलांनी हे करून बघितले, की झाडे जमिनीची धूप थांबवतात हे सत्य त्यांच्या मनावर कायमचे ठसते. असेच इतरही लहान लहान प्रयोग मुले करून बघतात आणि शिकतात.

गेली काही वर्षे विज्ञान दिनाचे निमित्त साधून आम्ही एक प्रदर्शन आयोजित करतो. या वर्षीही केले. यात मुले स्वत: त्यांच्या आवडीचा एक प्रयोग निवडतात. प्रदर्शनाला येणाऱ्या प्रेक्षकांना तो प्रयोग करून दाखवतात आणि त्याच्या मागची कारणमीमांसा आणि ते वैज्ञानिक तत्त्व वापरून आपण काय करू शकतो किंवा आपल्या रोजच्या जीवनात त्याचा कसा उपयोग करतो हे सांगतात. यात सर्व प्रकारची मुले असतात. म्हणजे काही मुले नुसती पोपटपंची करतात आणि आपण मधूनच एखादा प्रश्न विचारला तर गप्पच बसतात. उत्तर देऊ  शकत नाहीत; पण एखाददुसरे मूल असे असते की, ते शिकवलेली गोष्ट तर आत्मसात करतेच, पण त्याच्याही थोडे पुढे जाते.

या वर्षीच्या प्रदर्शनात अशी दोन उदाहरणे दिसली. एका मुलाने हवेचा दाब, त्या दाबातून निर्माण होणारी ऊर्जा, याचा वापर करून एक जेसीबीचे मॉडेल बनवले होते आणि सिरींजेस वापरून ते कसे चालते, वर-खाली कसे होते याचे प्रात्यक्षिक तो येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाला करून दाखवत होता आणि दुसरा प्रयोग होता सोलर एनर्जीच्या वापराचा. खरे तर हा प्रयोग नाहीच. हा मुलगा याचा वापर रोज आपल्या घरासाठी तर करतोच, पण आजूबाजूच्या १५-२० झोपडय़ांना मोबाइल चार्ज करण्यासाठी आणि एक दिवा लावण्यासाठी वीज पुरवतो आणि हे सर्व साहित्य, सोलर पॅनेल वगैरे त्याला आणि त्याच्या मामाला भंगार गोळा करताना मिळालेले. मामानेच त्याला याचा वापर शिकवला. दुर्दैवाने मामा आता हयात नाही; पण हा आठ-दहा वर्षांचा मुलगा, जेमतेम तिसरीपर्यंत शाळेत गेलेला, लिहिता-वाचता न येणारा, आज मामाने शिकवलेले ‘ज्ञान’ वापरून त्याचा रोज वापर करत आहे. हे बघून आश्चर्यही वाटते आणि हळहळही.

हळहळ अशासाठी की, शाळेत गेला नाही तर याच विषयातील पुढचे शिक्षण घेण्याचा कुठलाही पर्यायी, मान्यताप्राप्त मार्ग आज उपलब्ध नाही. शिक्षण पूर्ण करायचे म्हटले तर शाळेतच आयुष्याची दहा वर्षे जातात. आज ज्या मुलांविषयी आपण बोलतो आहोत त्यातली बरीचशी मुले हा दहा वर्षांचा पल्ला गाठू शकत नाहीत. कोणी पोटापाण्याच्या कामाला लागतात तर कोणी ‘आम्ही शिकलेले’ म्हणून मोलमजुरी किंवा तत्सम कामे करणार नाही, अशा भ्रामक मोठेपणाच्या जाळ्यात अडकतात. त्यातून पुढे गुटखा, दारू आणि तत्सम व्यसनांच्या विळख्यात सापडतात आणि आईवडील मात्र त्यांच्या शिक्षणाच्या आणि शिक्षणानंतर मिळणाऱ्या ‘ऑफिसर’कीच्या स्वप्नांचा झालेला ‘इस्कोट’ बघत हळहळत राहतात.

सर्वासाठी शिक्षण तर हवेच, पण त्यातील सर्वासाठी ‘असलेच’ पाहिजे असा भाग किती आणि निरनिराळ्या आवडीनिवडी, निरनिराळी अंगभूत कौशल्ये, उदा. चित्रे काढणे, गाणी गाणे, अभिनय, नृत्य, विज्ञान, गणित, शिल्पकला इत्यादी वाढविण्याच्या दृष्टीने लहानपणापासूनच निरनिराळ्या दिशेने जाऊ  शकतील असे शिक्षण, जे शिकता-शिकता लहानमोठी कमाई करता येईल असे शिक्षण आपल्या मुलांना कधी मिळणार? हा विचार अजिबात नवीन नाही. अनेकांनी अनेक वेळा मांडला आहे; पण सर्वसामान्य जनतेला अजूनही असे पर्याय उपलब्ध नाहीत. मग आम्हाला मधूनमधून सापडणाऱ्या अशा जेसीबी किंवा सोलर पॅनेलचा उपयोग करणाऱ्या मुलांसाठी काय करायचे? त्यांना पुढे कसे आणायचे? त्यांच्या आवडीचे शिक्षण त्यांना आधी द्या, मग ते आपणहूनच लिहिणेवाचणे शिकतील, पुढे जातील, असे आपण म्हणतो; पण त्यांच्या आवडीचे शिक्षण त्यांना आधी देण्याचा मार्ग कुठे शोधायचा?

आणि इथे उल्लेखलेल्या मुलांसाठी एक वेळ मार्ग सापडला तरी किती तरी मुले अंधारातच राहतात आणि अंधारातच विझतात त्याचे काय?

rajani@doorstepschool.org

chaturang@expressindia.com

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shikshan sarvansathi article about rajni paranjape